प्रोफेसर कृष्णकांतांचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता .त्यांच्या स्वतःच्या प्रयोगशाळेमध्ये गेली सहा वर्षे ते जे अविश्रांत संशोधन करीत होते त्याला आज यश मिळाले होते .त्यांच्या स्वप्नातील परी अस्मिता त्यांच्यासमोर उभी होती .ती एखाद्या नाजूक बाहुलीप्रमाणे दिसत होती .उंची साडेपाच फूट सडपातळ व सौंदर्यसंपन्न  असे तिचे स्वरूप होते .तिच्या चालण्या बोलण्यात एक डौल होता .ती जिवंत युवती वाटत होती .ती रोबो आहे यावर त्यांचा किंवा कुणाचाही विश्वास बसला नसता .प्रोफेसर कृष्णकांतांची ती निर्मिती होती. त्यांना ती रोबो आहे हे माहित होते.तिच्या शरीरात त्यानी जी मेमरी चिप बसवली होती त्यामुळे तिची  सर्व हालचाल डौलदार एखाद्या जिवंत युवती प्रमाणे होत होती .त्याचा रिमोट अर्थातच कृष्णकांतांच्या हातात होता .त्यांनी तिला कडक कॉफी बनवायला सांगितले व ती प्रयोगशाळेला लागून असलेल्या छोट्याच्या किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी निघून गेली. थोड्याच वेळात ती ट्रेमध्ये कॉफी घेऊन आली . २०११ साली त्यांच्या डोक्यात प्रथम ही कल्पना आली व नंतर त्यांनी त्यावर काम सुरू केले.अविश्रांत परिश्रमानंतर आता२०‍१७ मध्ये त्यांना यश मिळाले होते.

त्यांची प्रयोगशाळा घराला लागूनच होती .त्यांनी इंटरकॉम उचलला व त्यांची पत्नी सुलभा हिला बोलावून घेतले .ती आल्यावर त्यांनी अस्मिताशी तिची ओळख करून दिली.प्रथम सुलभाचा ती रोबो आहे यावर विश्वासच बसेना.गेली पाच सहा वर्षे कृष्णकांतांची चाललेली अविश्रांत धडपड ती पाहात होती .तेवढय़ात त्यांचा साहाय्यक माधव आतल्या खोलीतून बाहेर आला .तोही गेली चार वर्षे कृष्णकांतांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र त्यांच्या बरोबर काम करीत होता.हे यश कदाचित नोबेलही मिळवून देईल असे माधव म्हणाला.

ही तुझी मैत्रीण आणि सहाय्यकही कृष्णकांतानी सुलभाला सांगितले .ही तुला स्वयंपाकात मदत करील तुझ्याबरोबर पत्ते खेळेल वेळ प्रसंगी तुझ्या बरोबर शॉपिंगसाठी सुद्धा येईल .ही तुझी बॉडीगार्ड म्हणूनही काम करील.मी तिला पिस्तूल चालवण्याचे शिक्षण दिले आहे .ती उत्तम प्रकारे नेम धरून  गोळी घालू शकते.प्रत्येक वेळी तिला आज्ञा द्यावी लागतेच असे नाही ती स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेऊ शकते.

अस्मिता व सुलभा हातात हात घालून घराकडे निघून गेल्या .अस्मिता वाटली त्यापेक्षा जास्त हुषार निघाली सुलभाकडून तिने स्वयंपाक हां हां म्हणता शिकून घेतला.ती पेटी उत्तम वाजवीत असे त्याप्रमाणे तिला सारंगीही चांगली वाजविता येत असे.या दोन्ही कला सुलभाने तिला शिकविल्या होत्या. सुलभाकडून काही पक्वान्नेही तिने शिकून घेतली . घर कामांमध्ये सुलभाला तिची खूप मदत होत असे .एकदा चोर घरात शिरले असताना तिने चपळाईने त्यांच्यापासून सर्वांना वाचवले.तिला कराटेही उत्तम येत होते .

प्रोफेसर कृष्णकांत आता दुसऱया शोधाकडे लक्ष देत होते .त्यांना असा रोबो तयार करायचा होता की जो काही मिनिटांमध्ये सर्व सुटे भाग एकत्र जोडून इंजिन पूर्ण करील .त्यामध्येही त्यांना लक्षणीय यश मिळाले .एकाच वेळी कृष्णकांत दोन्ही शोधाकडे लक्ष पुरवीत होते त्यात अस्मिता अगोदर तयार झाली व सखाराम नंतर तयार झाला. यंत्रांच्या सुट्या भागांची जुळणी करणाऱ्या रोबोला त्यांनी सखाराम असे नाव ठेवले होते .

सर्व काही ठीक चालले आहे असे वाटत असताना एकाएकी एक अपघात घडला एक दुर्घटना प्रयोग शाळेमध्ये घडली .प्रयोग चालू असताना त्यांचा सहाय्यक माधव हा विजेचा शॉक बसून मृत्यू पावला .पोलीस आले त्यांनी सर्व तपास केला आणि शेवटी अपघात म्हणून केस बंद केली .

असेच आणखी काही महिने गेले व नंतर दुसरी दुर्घटना घडली .प्रोफेसर कृष्णकांतांची पत्नी सुलभा स्वयंपाक करीत असताना गॅसचा स्फोट होउन त्यामध्ये मृत्यू पावली.पोलिस पुन्हा आले त्यांनी सर्व तपास केला आणि शेवटी अपघात म्हणून केस बंद केली.

शेजारी पाजारी कुजबूज सुरू झाली .पेपरमध्येही कुठेतरी शंका निर्माण केली गेली .हे सर्व अपघात कोण घडवून आणीत आहे असा एकूण कुजबुजीचा रोख होता .माधव व सुलभा यांच्यामध्ये काहीतरी संबंध असावेत .ते सहन न झाल्यामुळे प्रोफेसरांनी  एकामागून एक असा दोघांचा काटा काढला असा कुजबुजीचा रोख होता.पुन्हा पोलीस आले त्यांनी दोन्ही केस पुन्हा उकरून काढून तपासल्या. दोषारोप कऱण्यासाठी काही पुरावा मिळाला नाही .

दोन्ही शोधांमध्ये यश मिळाल्यानंतर प्रोफेसरानी एक प्रेस कॉन्फरन्स ठेवली.त्याचवेळी भारतातील व जगातील निरनिराळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध शास्त्रज्ञानाही बोलाविले होते .

सकाळी दहाची वेळ होती सर्व शास्त्रज्ञ व वार्ताहर हॉलमध्ये जमले होते .नोकराने येऊन थोड्याच वेळात प्रोफेसर साहेब येतील असे सांगितले .थोड्याच वेळात प्रोफेसर हॉलमध्ये आले त्यांनी सर्वांना प्रयोगशाळेमध्ये येण्यास सांगितले .प्रथम त्यांनी सखारामाकडून गाडीचे इंजिन जोडून दाखविले .जे काम एखादा मेकॅनिक पूर्ण करण्यासाठी महिना घेईल तेच काम सखारामाने वीस मिनिटांमध्ये करून दाखविले .एका वार्ताहराने टेस्ट ड्राइव्ह घेतली तो पूर्ण समाधानी होता .हे सर्व होत असताना अस्मिता एका खुर्चीमध्ये शांतपणे बसून होती .नंतर त्यांनी अस्मिताला हाक मारली व जवळ बोलाविले .ती आज्ञाधारकपणे त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली . त्यांनी ही अस्मिता हीही रोबो आहे असे सांगितले .त्यांच्या सांगण्यावर कोणाचाच विश्वास बसेना .ती त्यांची असिस्टंट पीए असावी असे सर्वांना वाटत होते .

प्रोफेसर कृष्णकांत म्हणाले मी अाज्ञा देतो त्याप्रमाणे तर ही वागतेच परंतु स्वतंत्रपणेही ही निर्णय घेऊ शकते .निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी तिला प्रश्न विचारले व त्याची उत्तरे तिने समाधानकारक दिली.सर्व शास्त्रज्ञ अस्स्मिताची बुद्धिमत्ता पाहून आश्चर्यचकीत झाले .

एका वार्ताहराने तिला एक प्रश्न विचारला तो पुढील प्रमाणे होता .प्रोफेसर साहेबांची आज्ञा म्हणून नव्हे तर स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून जर एखादी गोष्ट  कर म्हणून तुला सांगितले तर ती तू स्वतंत्रपणे करू शकशील काय?तिने अर्थातच हो म्हणून उत्तर दिले.

त्यावर एका शास्त्रज्ञाने तू प्रथम कोणती गोष्ट करशील असे विचारले .त्यावर तिने ड्रॉवर उघडून त्यातून एक पिस्तूल काढले .ते त्या शास्त्रज्ञांवर रोखले .प्रोफेसर कृष्णकांत शास्त्रज्ञ व वार्ताहर जागेवरच खिळून गेले .तिने ट्रिगर ओढला प्रोफेसर कृष्णकांत जोराजोराने ओरडत तिला म्हणाले पिस्तूल खाली घे .मुकाट्याने ड्रावरमध्ये ठेवून दे.घाई घाईने त्यांनी खिशातून रिमोट काढला.ते त्याची काही बटणे दाबू लागले .त्यांना अस्मितावर  नियंत्रण प्रस्थापित करावयाचे होते .ही गोष्ट चाणाक्ष अस्मिताच्या लक्षात आली व तिने क्षणार्धात पिस्तूल कृष्णकांताकडे वळवून ट्रिगर ओढला आणि प्रोफेसर कृष्णकांत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले.हॉलमधील सर्व जण जागच्या जागी उभे राहून पळण्याच्या तयारीत होते .

तिने सर्वांना धीर गंभीर पण मंजुळ आवाजात खाली बसून घ्या घाबरू नका म्हणून सांगितले .सर्वजण मुकाटपणे खाली बसल्यावर ती पुढे म्हणाली .हा कृष्णकांत कोत्या मनोवृत्तीचा होता .माधव व सुलभा यांच्या मध्ये बहिण भावासारखे नाते असताना याने विनाकारण संशय घेतला .माधव घरी गेलेला असताना रात्री त्याने तारांची फेर जुळवणी करून सकाळी त्याला विजेचा शॉक बसेल व तो क्षणार्धात मृत्यूमुखी पडेल अशी रचना केली .हा खून यशस्वीपणे पचल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला .नंतर त्याने सिलिंडर गॅसचा स्फोट घडवून आणून सुलभाला ठार मारले .पोलीस तपास चालू असताना नेहमी त्याचा हात खिशामध्ये असे.मी जर काही बोलण्याचा प्रयत्न केला तर क्षणार्धात भस्मसात होईन याची मला खात्री होती. त्यामुळे दोन्ही वेळेला मनात असूनही मी काही बोलू शकत नव्हते .हे दोन्ही अपघात होते अशी माझी खात्री पटल्याचे नाटक मी चांगल्या प्रकारे वठविले .मला काहीही संशय आला नाही म्हणून तो निर्धास्त झाला .मी त्याला अगोदरही मारू शकले असते .परंतु मला त्याला तुम्हा सर्वांच्या देखत ठार मारावयाचे होते .व त्याचप्रमाणे सत्यकथनही करावयाचे होते .म्हणून मी ही वेळ निवडली होती .मला त्याला शासन करावयाचे होते व तुमच्यासमोर सर्व कैफियत मांडावयाची होती .एवढ्यात स्फोट झाला आणि अस्मिताही जमिनीवर पडली.सर्व जणांना पुन्हा एक मोठा धक्का बसला .

कृष्णकांत जरी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते तरी ते मृत्यू पावले नव्हते.खाली पडतानाही रिमोट त्यांच्या हातात तसाच राहिला होता.त्याचे बटण त्यांनी दाबले होतेआणि क्षणार्धात अस्मिताच्या डोक्याच्या  ठिकर्‍या  ठिकर्‍या उडाल्या होत्या     

७/१२/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel