(ही कथा काल्पनिक आहे कथा नावे यात साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )
या वर्षी मी, पत्नी व मुलांसह कोकणात आमच्या गावी गेलो होतो .वडिलांनी व मित्रांनी येताना आंबे घेऊन या म्हणून सांगितले होते .मे महिन्याची अखेर होती. आमच्या गावी किंवा जवळपास चांगले आंबे उपलब्ध नव्हते.आमचे गाव समुद्रकिनारी असल्यामुळे तिथे लवकर आंबे येतात व लवकर संपतात .चौकशी करता आंबेगावाला चांगले आंबे आणि हवे तेवढे मिळतील असे कळले .
आंबेगावचे नाव कानावर पडल्याबरोबर मला पंढरीनाथ साने यांची आठवण झाली .सानेकाका माझ्या वडिलांचे स्नेही आम्ही लहान असताना त्यांच्याकडे अनेकदा वडिलांबरोबर जात असू .त्यांची मुलेही आमच्याकडे येत असत .त्यांची मुले पुणे नागपूर गावी स्थिर झाली.आम्ही मुंबईला गेलो आणि नंतर येणे जाणे कमी झाले.सानेकाकांचा मुलगा पुण्याला असला तरी सानेकाका आपल्या घरीच असतात .कोकणात हल्ली माझे वडील वयोमानामुळे येऊ शकत नाहीत .परवा आम्ही सर्वजण इकडे आलो त्या वेळी बाबांनी सानेकाका आता वृद्ध झाले आहेत त्यांना एकदा भेटून ये म्हणून सांगितले होते त्याची आठवण झाली .आमच्या गावी आंबे मिळते तर कदाचित मी तिकडे गेलोही नसतो.
मी सानेकाकांना फोन केला आणि त्यांना मी त्यांच्याकडे येत असल्याचे कळविले.मी त्यांच्याकडे येणार असल्याचे ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला.दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व सानेकाकांकडे गेलो.संध्याकाळी गप्पा मारताना मी त्यांना आंबेगावात चांगले आंबे कुठे मिळतील म्हणून विचारले . विसूखोतांकडे चांगले आंबे मिळतील असे त्यानी सांगितले.त्यांनी आज संध्याकाळीच अापण त्यांच्याकडे जाऊ म्हणजे ते उद्या आंबे काढून पेट्या भरून आपल्याला देतील.पुढे ते म्हणाले आंबे मात्र त्यांच्या भुतांच्या बागेतीलच हवेत म्हणून सांग.भुतांच्या बागेतील हे शब्द ऐकून माझे कुतूहल जागृत झाले .मी त्यांना त्यांच्या बागेला भुतांची बाग कां म्हणतात म्हणून विचारले.आणि त्यातीलच आंबे चांगले का असेही विचारले. सानेकाकांना गप्पा मारण्याची फार हौस होती .कोणतीही गोष्ट खुलवून रंगवून अघळपघळ सांगण्यात त्यांचा हातखंडा होता.माझ्या प्रश्नावर त्यांनी ती फार मोठी झकास गोष्ट आहे असे म्हणून सांगायला सुरुवात केली .
हा विसू याची खोती गेली तरी त्याला खोत हे नाव कायमचे चिकटले आहे.ते त्याचे आडनावच झाले आहे.त्याचे नाव विश्वनाथ परंतु त्याला कुणीही विश्वनाथ म्हणून ओळखत नाही .विसू विश्या विसूखोत विसूभाऊ खोतसाहेब या नावानेच ते ओळखले जातात.त्यांच्या तीन चार कलमांच्या बागा आहेत .त्यातील ही एक भुतांची बाग .त्यांची ही बाग गावाबाहेर आहे.त्या बागेत अनेक वर्षे तीन भुतांचा वास आहे.विश्याच्या आजोबांपासून ही भुते तिथे आहेत.त्यांच्या बागेत शिरल्याबरोबर उजव्या हाताला तीन दगड आहेत.तिथे तीन नारळ द्यावे(फोडावे) लागतात. खोतांच्या वंशजांपैकीच कुणीतरी ते नारळ फोडावे लागतात.नारळ दिल्याशिवाय ती भुते कुणालाही आत प्रवेश करू देत नाहीत.
पूर्वी त्यांच्या बागेला कंपाउंड नव्हते .दूर दूर अंतरावर केवळ दगड पुरलेले होते .जर कुणी चुकून त्यांच्या हद्दीत गेला तर तो त्या भुतांकडून उचलून फेकला जात असे.विजेचा शॉक बसावा त्याप्रमाणे शॉक बसत असे.याचा सर्वांनाच त्रास होऊ लागला. त्यांच्या हद्दीला हद्द लागून असलेल्यांना तर फारच त्रास होई. भुतांच्या बागेशेजारील जमिनीच्या मालकानी विनंती केली की तुम्ही तुमच्या बागेला गडगा( कंपाउंड) बांधा.तुमची हद्द आम्हाला कळत नाही आणि चुकून आम्ही तिकडे गेलो तर आम्हाला त्रास होतो. त्यावर खोतांच्या पूर्वजानी त्यांना सांगितले तुम्ही हवा तर बांधून घ्या मला गरज नाही.माझ्या हद्दीत येण्याची कुणाचीही हिंमत नाही .खोतांना गडग्याची गरज नव्हती .इतरांनी खोतांना आम्हाला गडगा बांधू द्या अशी विनंती केली .शेवटी खोतांनी तिथे नारळ फोडले आणि गडगा बांधू द्या अशी त्या भुतांना विनंती केली.त्यानंतरच त्या भुतानी गडगा बांधू दिला.
आंब्यांच्या हंगामात चोर व वानर यांचा फार उपद्रव असतो . कोकणात सर्वत्र आंबे चोरीला जातात . दुसर्यांच्या बागेतील आंबे काढायचे आणि ते पेट्यांमध्ये भरून मुंबईला पाठवायचे.केवळ इतरांना दाखवण्यासाठी आपण एखादी बाग आंबे काढण्यासाठी भाड्याने करावयाची, बहुतेक आंबे मात्र चोरलेले पाठवायचे असा एक चोरट्यांचा धंदा आहे.बागेमध्ये वानरांची टोळी येते व सर्वत्र नासधूस करते .आंबे चोरीला जाऊ नयेत व वानरांचा उपद्रव होऊ नये म्हणून राखणदार ठेवावे लागतात .ते दोन तीन महिने बागेमध्येच राहतात . तिथेच जेवण करून जेवतात झोपतात .त्यासाठी त्याना भरपूर मेहनताना द्यावा लागतो .बरेच नेपाळी गुरखे किंवा उत्तर प्रदेशीय भय्ये येथे हंगामात येऊन राखणदारी करतात.
विसूच्या बागेला मात्र राखणदार लागत नाही.कुणाचीही आत प्रवेश करण्याची हिंम्मत नाही . त्याच्या बागेत कधीही वानर येत नाहीत .वानराना आपण या हद्दीत जायचे नाही हे आपोआपच कळते. कसे समजते ते माहीत नाही. जेव्हा जेव्हा कुणीही माणूस आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा त्याला जन्माची अद्दल घडते.
*अद्दल कोणती घडवायची ते भुतांच्या मर्जीवर अवलंबून असते. *
*एखादा गडग्यावरून (दगडांचे बांधलेले कम्पाऊंड )उडी मारून आत जाऊ लागला तर तो तिथून फेकला जातो.*
*एखादा अकस्मात उचलून दहा पंधरा फुटावर फेकला गेला तर त्याचे जे काही होईल ते त्या चोराचे होते.*
*कदाचित काही हाडे मोडतात. कदाचित मुका मार बसतो. काही दिवस हॉस्पिटलमध्ये काढावे लागतात .*
* एखाद्याचे हातपाय मोडून तो जन्माचा अधू होतो.*
(क्रमशः)
३०/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन