(पुढील कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे कुणालाही साधर्म्य वाटल्यास तो योगायोग समजावा )
एखाद्या व्यापाऱ्याला हाताशी धरून त्याला मनोजकडे पाठवावे.त्याने मनोजला लाच द्यावी .त्याच वेळी अँन्टी करप्शन ब्यूरोच्या लोकांकडून मनोजला पकडण्यात यावे.त्याला शिक्षा होवो न होवो निदान तो सस्पेंड झाला तरी आपले काम झाले.
मगनलालला या कामासाठी तयार करण्यात आले.अँन्टी करप्शनचे अधिकारी व मगनलाल यांची भेट घडवून आणण्यात आली.या अधिकाऱ्यालाही वजन ठेवून मॅनेज करण्यात आले.शेवटी सर्व माणसेच असतात .खुणा केलेल्या नोटांचे बंडल मगनलालकडे सोपविण्यात आले.त्याने इम्पोर्ट लायसन्सचा अर्ज घेऊन मनोजला भेटायचे ,त्याच्याशी बोलता बोलता नोटांचे बंडल त्याच्या हातात कसेही करून सरकावयाचे,काम झाल्यावर विशिष्ट खूण करायची, आणि त्याच वेळी या अधिकाऱ्याने आपल्या टोळीसह तिथे जाऊन त्याला अटक करायची.पंचनामा करायचा. सर्व उपचार व्यवस्थित पार पाडायचे.अशी योजना निश्चित करण्यात आली .योजनेच्या यशस्वितेवर मनोज दूर होईल की नाही, सर्व स्टाफचे पूर्वीप्रमाणे मनसोक्त बागडणे चालू राहील की नाही ते ठरणार होते .
आणि तो दिवस उजाडला. मनोज नेहमीप्रमाणे आपल्या केबिनमध्ये येऊन काम करीत होता.मगनलाल अटॅची घेवून ऑफिसमध्ये आला.प्यूनमार्फत मनोजच्या भेटीसाठी रीतसर चिठी पाठविण्यात आली.अगोदर मनोजला फोन करून मगनलालने त्याची अपॉइंटमेंट घेतली होती.मनोजने मगनलालला आत पाठविण्यास सांगितले.अर्ज देऊन पाच दहा मिनिटे दोघांचे अर्जासंबंधी बोलणे झाले आणि नंतर मगनलालने नोटांचे बंडल काढून ते मनोजच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला .मनोज रागाने लाल पिवळा होऊन काही बोलण्यासाठी उभा राहिला.मी लाच घेत नाही.मी कुणालाही लाच घेऊ देत नाही.मी कुणालाही लाच देऊ देत नाही.हे तो बोलत असताना मगनलालने चपळाईने त्याच्या टेबलाचा ड्रॉवर उघडून त्यात ते पैशाचे बंडल टाकले आणि तोंडाने हलकीशी शिटी मारली.शिटी ही खूण होती .केबिनबाहेर थांबलेले अधिकारी आपल्या टोळीसह आत शिरले . त्यांच्याबरोबर पंचनाम्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था होती.खुणा केलेले नोटांचे बंडल ताब्यात घेण्यात आले .पंचनामा करण्यात आला .मनोजला अटक करण्यात आली .सर्व सरंजामासह मंडळी बाहेर पडली.पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर मनोजला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले .
मनोजच्या वडिलांना ही हकीकत कळल्यावर त्यांनी वकील घेऊन पोलीसस्टेशन गाठले.त्याची जामिनावर सुटका केली .
लाचलुचपत विरोधी खात्यालाही आपण काम करतो असे दाखविणे आवश्यक असते.मनोजच्या ऑफिसातील लोकांनाही मनोज दूर होणे त्यांच्या स्वार्थासाठी गरजेचे होते मगनलाललाही त्याच्या लायसेन्सचे काम मनासारखे होणे आवश्यक होते. अशाप्रकारे मनोजला बळीचा बकरा करून सर्वच समाधानी व आनंदी झाले.
हे सर्व घडत असताना मनोज कमालीच्या पलीकडे शांत होता .आपल्याला कौशल्याने अडकविण्यात आले आहे हे त्याने ओळखले .यातून कसबाने आपल्याला सुटले पाहिजे तरच आपण वाचू हे त्याच्या लक्षात आले .सुटण्यासाठी त्याच्या डोक्यात एक योजनाही तयार होती .त्याच्या शेजारचा फ्लॅट शामरावांचा होता .पेपरमधून व शामरावांकडून त्याने युवराजांबद्दल बरेच ऐकले होते .मनोमन त्याने त्यांची मदत घेण्याचे निश्चित केले होते .
आज शामरावांचा रजेचा दिवस होता .मनोजने शामरावांच्या फ्लॅटची बेल दाबली .शामरावांच्या नोकराने दरवाजा उघडला.कोण म्हणून विचारता मनोजने मी मनोज म्हणून सांगितले .त्यावर शामरावांनी उठून मनोजचे स्वागत केले .पेपरमध्ये मनोज संबंधी आलेली बातमी शामरावांनी वाचली होती .मनोजला ते कित्येक वर्षे ओळखत होते .त्याच्या सत्यवक्तेपणा प्रामाणिकपणा सचोटी निर्गर्वी स्वभाव त्यांना माहिती होता . बातमी वाचल्यावर अापणच जाऊन त्याला मदत करावी का असा विचार ते करीत होते.एवढ्यात मनोजच त्यांच्याकडे आला .तो कशासाठी आला असावा याची त्यांना पुरेपूर अटकळ होती .
मनोजने उगीचच इकडे तिकडे गप्पा मारीत वेळ न घालवता मुद्द्याचे बोलण्याला सुरुवात केली .तुम्ही माझ्यासंबंधी पेपरमध्ये आलेली बातमी वाचली असेलच .मला यामध्ये पुरेपूर अडकविण्यात आले आहे .मी स्टाफला वरकड रक्कम घेण्यास बंदी केल्यामुळे त्यांच्यापैकी काहींनी ही योजना आखली असावी .अँन्टी करप्शन ब्यूरो प्रामाणिक असेल किंवा नसेल मला काही सांगता येत नाही.पण मगनलाल मात्र लबाड आहे.त्याची माझ्याशी बोलण्याची पद्धत, मी पैसे घ्यावे या संबंधी आग्रह, मी हातात पैसे घेत नाही असे पाहिल्यावर ड्रॉवर उघडून त्यामध्ये नोटांचे बंडल टाकण्याची त्याची चपळाई,लगेच खुणेची शिटी वाजवण्याचे कसब,यावरून तो या कामात वाकबगार आहे असे स्पष्ट दिसते.
शामराव म्हणाले हे सर्व जरी खरे असले तरी ते कोर्टात सिद्ध होणे आवश्यक आहे .त्यासाठी भक्कम पुरावा पाहिजे. पुरावा नसेल तर पुरावा गोळा केला पाहिजे.एवढेच नव्हे तर यामध्ये कुशल असलेला वकीलही तुमच्याबाजूने केस लढण्यासाठी पाहिजे.तरच तुमची सुटका होईल .
यावर मनोज म्हणाला कि मी त्यासाठीच तुमच्याकडे आलो आहे . तुमची व युवराजांची चांगली मैत्री आहे .जर तुम्ही शब्द टाकला तर युवराज माझी केस घेण्याला नक्की तयार होतील .
त्यावर शामराव म्हणाले मी तुला लहानपणापासून ओळखतो.मीच तुझ्याकडे येण्याचा विचार करीत होतो. तोच तू माझ्याकडे आलास.माझ्याही डोक्यात युवराज यातून तुला बाहेर नक्की काढू शकतील असे आहे.आपण दोघेही युवराजांकडे जाऊया आणि ते काय म्हणतात ते पाहू.असे म्हणून शामरावानी युवराजांना फोन लावला.फोन करण्याचे कारण सांगून आम्ही तुमच्याकडे केव्हा येऊ असे विचारले .युवराजांनीही त्या केससंबंधी स्थानिक वर्तमानपत्रात सविस्तर आलेली बातमी वाचली होती.त्यांनी विजयाला काही अपॉइंटमेंट आहे का असे विचारले.आता काही अपॉइंटमेंट नाही असे विजयाने सांगताच त्यांनी शामरावांना मनोजला घेऊन लगेच ऑफिसवर बोलाविले.
मनोज युवराजांच्या ऑफिसवर आल्यावर त्याने पहिल्यापासून सर्व हकीगत सविस्तर व्यवस्थित सांगितली .तो बोलत असताना युवराज त्याच्याकडे टक लावून पाहात होते .युवराजांना त्यांच्या इतक्या वर्षांच्या अनुभवाने व अंतःप्रेरणेने आणि चेहर्यावरील हावभावावरुन कोण खरा आहे व कोण बनवाबनवी करीत आहे हे ओळखता येत असे .मनोज खरेच प्रामाणिक आहे आणि तो यात पद्धतशीर गुंतवला गेला आहे हे त्यांना पटले.
*त्यांनी मनोजला सर्वोतोपरी मदत करण्याचे मनोमन निश्चित केले .शामरावांनी मनोजची केलेली तरफदारीही त्यांना त्यांचा निर्णय घेण्यास साहाय्यभूत ठरली होती.*
युवराज म्हणाले तुम्ही कितीही खरे असला तरी ते कोर्टात सिद्ध करावे लागते.तुला तुझ्या ऑफिसमधील किती लोक तुझ्या बाजूने साक्ष देण्यास तयार होतील असे वाटते?वीस पंचवीस जणांपैकी निदान तीन चार लोक माझ्या बाजूने नक्की साक्ष देतील असे मनोजने सांगितले .
त्यावर युवराज म्हणाले त्यांची साक्ष महत्त्वाची आहेच परंतु ऑफिसमधील कोणी हा कट तयार केला त्याची माहिती मिळाली तर फार बरे होईल .
त्यावर मनोज म्हणाला हे लोक पटकन माहिती इतरांच्या भीतीने देणार नाहीत .
युवराजांनी त्यांची नावे देण्यास सांगितले व संदेश मार्फत त्यांच्याकडून कौशल्याने माहिती गोळा करू असा विचार केला.
ते लोक काय सांगतील ते तर पाहूच परंतू अापल्याला आणखीही पुरावा लागेल .त्यावर एक महत्त्वाची माहिती मनोजने दिली .त्याने आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये एक छोटा रेकॉर्डर ठेवलेला आहे .जेव्हा तो मीटिंग घेतो किंवा त्याच्याकडे कुणीही व्यक्ती येते,मग ती ऑफिसमधील असो किंवा बाहेरची असो,खबरदारी म्हणून तो रेकॉर्डर चालू करतो आणि त्यांचे सर्व बोलणे त्यात रेकॉर्ड केले जाते .हा रेकॉर्डर बटण दाबून चालू करता येतो किंवा त्याचे नियंत्रण मनोजच्या मोबाइल मार्फतही करता येते .टेबलाच्या ड्रॉवरच्या आतल्या बाजूला तो टेपने चिकटवलेला आहे .मी तर आता ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही .माझे केबिन सील केलेले आहे जर कुणी केबिनमध्ये जाऊन तो रेकॉर्डर आणील तर त्यामध्ये सर्वांचे संभाषण मिळू शकेल .माझ्या बाजूने तो मोठा पुरावा होईल . मात्र आतापर्यंत कुणी केबिन उघडून तो रेकॉर्डर नेला नसला म्हणजे झाले .
( क्रमशः)