तीन किलोमीटर लांबीचा बोगदा खणण्याचे काम महाराजा कन्स्ट्रक्शन्स कंपनीला देण्यात आले होते .यामुळे रस्त्याचे अंतर वीस बावीस किलोमीटरने कमी होणार होते .वेळ वाचणार होता.अपघात कमी होणार होते. मोटारी ट्रक यांची तेवढी झीज कमी होणार होती .डिझेल पेट्रोल वाचणार होते.

वेळ वाचविण्यासाठी लवकर काम पुरे होण्यासाठी दोन्ही बाजूनी एकाच वेळेला बोगदा खोदण्याला कंपनी सुरवात करणार होती . बोगदा उत्तर दक्षिण असा होता .उत्तरेच्या बाजूला पंचवीस किलोमीटरवर एक बऱ्यापैकी मोठे शहर होते .बरेच कामगार, मजूर, इंजिनिअर्स, बुलडोझर इत्यादी यंत्रे चालविणारे अर्धकुशल कामगार,शहरापासून अप डाऊन करीत असत .कंपनीच्या बसेस शहरापासून बोगद्यापर्यंत ये जा करीत असत. बोगद्याजवळही पंधरा वीस राहुट्या तंबू टाकलेले होते.खोदाईसाठी आणलेली यंत्रे,त्याशिवाय लागणारे इतर सामान,यंत्रांसाठी डिझेल अाणणारे टँकर्स, पाणीपुरवठा करणारे टँकर्स,ड्रायव्हर्स, यंत्रज्ञ, तंत्रज्ञ,मजूर, पाऊस आला तर भिजू नये असे सामान, रखवालदार, इत्यादीसाठी या राहुट्या तंबू इत्यादी होते.

बुलडोझरआणि इतर खोदकामाची यंत्रे एकाच वेळी काम करीत असत. एकाच वेळी अनेक यंत्रे व मजूर त्यामुळे धूळ व आवाजाचा कल्लोळ उठत असे.असेच काही दिवस गेले आणि काही गूढ प्रकार घडू लागले .कामावरचे मजूर नाहीसे होऊ लागले .सकाळी बोगद्याच्या तोंडावर मुकादम बसून हजेरी घेत असे. परत जाताना पुन्हा प्रत्येकाला हजेरी द्यावी लागे.एक दिवस  हजेरी घेताना संध्याकाळी एक मजूर गायब आहे असे लक्षात आले .त्यांच्या नावाने स्पीकरवर जोरात पुकारा करण्यात आला. बोगद्यातील मजुरांना सूचना करण्यासाठी स्पीकर्स लावण्यात आले होते.प्रकाशाचे झोत टाकून तपास घेण्यात आला .मजूर सापडला नाही .त्याची बायकोही दुसऱ्या दिवशी आरडाओरडा करत आली .तिला घेऊन बोगद्यात सर्वत्र तपास करण्यात आला .कुठेही मजूर सापडला नाही. पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला .अज्ञात कारणाने गंगाराम अदृश्य, तपास केला सापडत नाही अशी नोंद करण्यात आली . 

असे काही दिवस गेले आणि एके सकाळी एक मजूर झाडाला लटकत असलेला आढळला .पोलिस आले.प्रेत खाली उतरण्यात आले. पंचनामा झाला.त्याने स्वतः फाशी घेतली की त्याला कुणी फाशी दिला ते कळले नाही .प्रेत पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले .त्याचा रिपोर्ट आल्यावरच उलगडा झाला असता .

नंतर काही दिवसांनी एका मजुराने कड्यावरून उडी टाकून आत्महत्या केली .बोगद्याचे काम चालू होते तिथून जवळच एक कडा होता .कुणी खाली पडू नये म्हणून तिथे कठडा केलेला होता .तिथे उभे राहिल्यानंतर संध्याकाळी सूर्यास्ताचे दृश्य फार मनोहारी दिसत असे.हा मजूर तिथे उभा असता असता एकदम कठड्यावर चढला आणि त्याने खाली उडी ठोकली . एकच आरडा ओरडा झाला .ट्रेकर्सच्या सहाय्याने दरीत उतरून प्रेताचा शोध घेण्यात आला. छिन्नविछिन्न अवस्थेत प्रेत सापडले.एक महिन्यांमध्ये तीन मजुरांचे  मृत्यू झाले . बोगद्यामध्ये भुताटकी आहे ते भूत कुणाला तिथे काम करू देणार नाही.अशी अफवा पसरली .मजूर काम करण्यासाठी येईनासे झाले.बोगद्याचे काम ठप्प झाले .महाराजा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वरिष्ठांकडे अर्थातच ही बातमी पोचली . मजुरांचे पगार वाढविले पाहिजेत .एखादा कामगार मृत्यू पावल्यास त्यासाठी देण्यात येणारी भरपाई वाढविली पाहिजे .जरी कामावर असताना मृत्यू झाला नाही तरीही मजुराच्या कुटुंबीयांना भक्कम भरपाई दिली गेली पाहिजे तरच मजूर कामाला मिळतील अन्यथा बोगद्याचे काम तसेच अर्धवट राहील,अशी परिस्थिती निर्माण झाली .

तीन कामगारांच्या मृत्यूचे रहस्य सोडविल्याशिवाय कामाला गती मिळणार नाही .बोगद्यात काम करणार्‍या  मजुरांचे मृत्यू का होतात ते शोधून काढले पाहिजे असा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला .या मृत्यूमागे काहीतरी रहस्य असले पाहिजे आणि ते सोडवण्यासाठी एखादा हुशार गुन्हे सोडविण्यात कुशल असलेला मनुष्य पाहिजे यावर एकमत झाले .त्यातील एका संचालकांनी त्या विभागातील डीएसपी ना फोन  लावला त्यांनी आमच्या ऑफिसमधील शामराव यांना तिथे पाठवितो ते मृत्यूचे रहस्य शोधून काढतील सर्व काही पूर्वस्थितीला येईल म्हणून आश्वस्त केले.शामरावाना फोन करून साहेबांनी लगेच बोलवून घेतले . लगेच या कामावर त्यांची नेमणूक झाली .

स्थानिक पोलिस स्टेशनला जाऊन शामरावानी त्या संदर्भातील सर्व कागदपत्रे पाहिली. स्थानिक मजुरांमध्ये मिसळणे आवश्यक होते.जे मजूर मृत्यू पावले,जो मजूर नाहीसा झाला,त्यांची परस्पर ओळख होती का? त्यांचे आणखी कुणा कुणाशी मैत्री संबंध होते.त्या बोगद्यातील जागेसंदर्भात काही अफवा आहेत का ?वगैरे अनेक गोष्टी जाणून घेतल्यावर काही उलगडा होऊ शकला असता .स्वाभाविकच या कामासाठी शामरावांना संदेशची आठवण झाली. आणि संदेशबरोबर स्वाभाविकपणे युवराजांचीही आठवण आली. युवराजांना फोन लावला . केस संदर्भात सविस्तर बोलणे झाले .युवराजांनी मी उद्या संदेशला घेऊन येथून निघतो असे सांगितले .युवराज व संदेश त्याच्या टीमसह दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिथे पोचले .युवराजांनी संदेशला त्याच्या कामाचे स्वरूप समजून सांगितले होते.कोणती कोणती चौकशी केली पाहिजे या संदर्भात त्यांचे सविस्तर बोलणे झाले होते .

दुसऱ्या दिवशी सकाळी जीपमधून शामराव युवराजबरोबर प्रत्यक्ष साईटवर पाहणी करण्यासाठी निघाले. प्रथम ज्या कठड्यावर चढून कामगाराने उडी मारली होती त्याचे युवराजांनी निरीक्षण केले .सकाळी सुद्धा तिथून दिसणारे सृष्टीसौंदर्य लाजवाब होते.नंतर जीपमधून दोघेही बोगद्यात शिरले. जवळजवळ एक हजार मीटर बोगदा झाला होता .आतून मजबुती देण्याचे, प्लास्टरिंग करण्याचे, काम चालू होते .ठिकठिकाणी गर्डर्स लाविले होते .काम करता यावे म्हणून आतून बोगदा विजेने उजळून टाकला होता .जीप शेवटपर्यंत जाऊ शकत नव्हती .दोघेही पायउतार होऊन बोगद्यात निरीक्षण करीत या टोकापासून त्या टोकापर्यंत  फिरले नेहमीप्रमाणे युवराजांचे दोन्ही बाजू्ंचे सूक्ष्म निरीक्षण चालले होते.युवराजांचे पुरेसे समाधान झाल्यावर ते जीपमध्ये बसले .येताना ते विचार करीत होते .शामराव त्यांच्या विचारमग्न चेहऱ्याकडे पाहून काही न बोलता जीप चालवीत होते.पोलिस स्टेशनला पोचल्यावर त्यांनी फोनवर संदेशला आणखी काही सूचना दिल्या .नंतर त्यांनी शामरावांना दोन चार दिवसात उलगडा होईल असे मोघम उत्तर दिले आणि त्यांना  ज्या हॉटेलवर ते उतरले होते तिथे सोडण्यास सांगितले .

बोगद्यातील रहस्य 

( युवराज कथा)

भाग २(अंतिम)

शामरावही निरनिराळ्या मजुरांना व मुकादमाला बोलवून त्यांचे जाबजबाब घेण्यात मग्न होते.भुताटकीवर शामरावांचा विश्वास नव्हता .नाहीसा झालेला व मृत्यू पावलेले असे तीन मजूर एकमेकांशी संबंधित असले पाहिजेत असे शामराव व युवराज यांना वाटत होते.त्या तिघांचा संबंध आणखी कुठे तरी असला पाहिजे असेही त्यांना वाटत होते .मजुराने आत्महत्या न करता त्याला कुणीतरी ढकलून दिले असले पाहिजे असेही त्याना मनोमन वाटत होते.हा संबंध नक्की कोणता असावा हे कुणाच्याच लक्षात येत नव्हते .एवढ्यात संदेश स्वत: युवराजांकडे आला.त्याने त्याला मिळालेली काही माहिती युवराजांना सांगितली .युवराजांनी शामरावांना बोलवून घेतले.संदेशने गोळा केलेल्या माहितीनुसार ते तिघेही मजूर एकमेकांचे मित्र होते .त्यांच्यासोबत आणखी दोन मजूर होते त्यातील एक रघू बुलडोझर चालवणारा होता  .हे पाचही जण संध्याकाळी काम संपल्यावर विरंगुळ्यासाठी एकत्र बसत असत. थोडीशी तरतरी आल्यावर नंतर जेवून पांगत असत .रघूला मार देवून त्याची पोलिस चौकशी करून काही पत्ता लागेल अशी खात्री नव्हती.रघूवर नजर ठेवावी असे एकमताने ठरले .दोन तीन दिवसांत काही धागेदोरे हाती लागले नाहीत तर मग रघूला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करावी असे एकमताने ठरविण्यात आले .काम संपल्यावर रघू काय करतो ते पाहण्यासाठी दोनतीन हेर संदेशने त्याच्या पाठीवर सोडले.

रघू व त्याचा दोस्त रात्री बोगद्यावरील डोंगरावर जातात असे आढळून आले .त्यांच्या पाठीमागून जात असताना ते एकाएकी अदृश्य झाले त्यांचा पत्ता कुठेच लागेना.दोन्ही दिवस असेच झाले असा रिपोर्ट त्या हेरानी संदेश व युवराजांना दिला.मजूर कामावर गुंतलेले आहेत असे पाहून दिवसा डोंगरावर जाऊन शोध घ्यावा असे ठरविण्यात आले.त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी  मजुरांनी कामाला सुरुवात केल्यावर रघू व त्याचा दोस्त कामावर आहेत असे पाहून तिघे जण डोंगरावर शोध घेण्यासाठी निघाले .युवराजांनी हातात एक काठी घेतली होती .त्याचा उपयोग आधार घेण्यासाठी तर होत होताच परंतु त्या काठीने मधूनमधून जमीन ठोकूनही पाहात होते.ज्या अर्थी मजूर डोंगरावर अदृश्य झाले त्या अर्थी डोंगरावर कुठेतरी भुयार असले पाहिजे असा युवराजांचा कयास होता .डोंगरावर फिरताना थोडी सपाटी लागली .त्या ठिकाणी काठीने ठोकून पाहिले असता पोकळ आवाज येत होता.थोड्याच वेळात त्यांना एक झुडुप आढळले .त्या झुडुपातील दगड सहज दूर होत होता . संदेशला बाहेर लक्ष ठेवण्यासाठी ठेवून युवराज व शामराव आत उतरले .आत उतरल्यावर पुढे ओबडधोबड पायऱ्या होत्या .त्या उतरून खाली गेल्यावर एका खोली एवढी मोकळी जागा होती .त्या खोलीत एका माणसाला हात पाय बांधून ठेवण्यात आले होते .जो बोगद्यामध्ये हरवला असे वाटत होते तोच हा मजूर होता .रात्री त्याला अन्न पाणी देण्यासाठी रघू डोंगरावर येत असे .त्या मजुराचे बांधलेले हात पाय सोडल्यावर व तोंडाची चिकटपट्टी काढल्यावर त्याने बराच खुलासा केला .

रघूला बुलडोझर चालवीत असताना डोंगरात एक पेटी सापडली.ती एका कोपऱ्यात ठेवून त्यावर त्याने माती लोटली.रात्री सर्व सामसूम झाल्यावर सर्वजण ती पेटी नेण्यासाठी बोगद्यात आले. ती पेटी उचलून नंतर डोंगरावर आणण्यात आली .इथेच या मजुराचा व उरलेल्यांचा मतभेद झाला . सखारामचे म्हणणे ,जो मजूर बांधलेल्या अवस्थेत सापडला त्याचे नाव सखाराम होते ,ही पेटी पोलिस चौकीत जाऊन तिथे हजर करावी .यातील धन आपल्याला पचणार नाही .यात शिवकालीन सोन्याच्या मोहरा आहेत .त्या आटवाव्या लागतील नंतर त्या सोन्याची विक्री करावी लागेल .कुठे ना कुठे आपण पोलीस चौकशीमध्ये सापडू .त्यापेक्षा सापडलेले धन जमा केल्यावर आपल्याला त्यातील नियमाप्रमाणे पंचवीस टक्के मिळतील .तेवढेच आपल्याला पुष्कळ झाले .असे करणे हा सेफ गेम ठरेल .

या उलट रघू व उरलेल्या साथीदाराना ते सर्व धन आपणच वाटून घ्यावे असे वाटत होते .प्रत्येकाला त्यांच्या  वाट्याच्या सोन्याच्या मोहरा मिळाल्यानंतर ज्याने त्याने आपल्याला जसे जमेल तसे करावे.सोन्याची कुणातरी मार्फत विल्हेवाट लावावी .यामध्ये आपण मालामाल होऊ . सखाराम त्यांचे म्हणणे न पटल्यामुळे त्यांना सोडून निघून जाऊ लागला .तो हे गुपित न ठेवता पोलिस चौकीत जाऊन सर्व सांगेल अशा भीतीने त्यांनी याला बांधून तळघरात ठेवले.रघू व त्याचे साथीदार स्थानिक होते.डोंगरावर लहानपणी खेळता खेळता त्यांना या गुहेचा तळघराचा शोध लागला होता .त्या ठिकाणी त्यांनी याला तेव्हापासून बांधून ठेवला होता .नंतर ती पेटी ते कुठे घेऊन गेले आणि त्याचे काय केले ते सखारामला माहित नव्हते .त्या प्रश्नाचे उत्तर रघू देऊ शकणार होता .

दुसऱ्या दिवशी रघू व त्याच्या साथीदाराला पकडण्यात आले .दोघांनाही अलग अलग कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. दोघांचीही कसून पोलीस चौकशी चालली होती .दोघेही ताकास तूर लावू देत नव्हते .ती पेटी सापडणे अतिशय महत्त्वाचे होते .पुन्हा एकदा युवराज त्या डोंगरावर गेले .बरोबर अर्थातच शामरावही होते .फिरता फिरता एका जागी त्यांना जमीन भुसभुशीत सापडली .तिथे खणले असताना त्यांना ती मोहरांची पेटी सापडली .काही दिवस, महिने,काहीही न करता तसेच जाऊ द्यावेत .नंतर ती पेटी काढून त्यातील मोहरा वाटून घ्याव्यात .अशी एकूण योजना असावी असे वाटत होते .

जो बोगद्यात नाहीसा झाला  असे वाटत होते तो सापडला .ज्याने आत्महत्या केली असे वाटत होते त्याला कुणीतरी ढकलून दिले असावे असा अंदाज  करता येत होता .त्याने कदाचीत सखारामप्रमाणे मत मांडले असेल किंवा मोहरांचे वाटप कसे करावे यावरून वाद झाला असेल . एक भागीदार कमी व्हावा यातून एक जण फाशी गेला असावा. त्याला बहुधा मारून नंतर फासावर लटकविले असावे. पोस्टमार्टम रिपोर्टवरून ते कळण्यासारखे होते. नक्की काय ते या दोघांतील कुणीतरी बोलता झाल्याशिवाय कळणार नव्हते.मोहरांची सापडलेली पेटी पुढ्यात ठेवल्यावर आणि सखाराम काय म्हणाला ते  सांगितल्यावर व माफीचा साक्षीदार करतो म्हणून आश्वासन दिल्यावर दुसरा घडाघडा बोलू लागला .थोड्या बहुत प्रमाणात युवराजांनी जो अंदाज केला होता त्याचप्रमाणे घटना घडल्या होत्या .कठड्यावरून उडी मारलेल्या मजुराने आत्महत्या केली नसून त्याला रघूने ढकलले होते.त्याचप्रमाणे वादावादीवरून मजुराला रघूने फाशी लटकाविले होते.त्याला अगोदर मारून नंतर आत्महत्या केल्याचा भास निर्माण करण्यात आला होता .पोस्टमार्टेम अहवालावरुन त्याला अगोदर मारण्यात आले हे स्पष्ट झाले .एकाला माफीचा साक्षीदार करण्यात आले .त्याची साक्ष, सखारामची साक्ष,पोस्टमार्टेम रिपोर्ट,या सर्वावरून रघूवरील आरोप पूर्णपणे सिद्ध झाला.त्याला वीस वर्षांची सक्तमजुरी देण्यात आली .माफीचा साक्षीदार अर्थातच पूर्णपणे सुटला .

अति लोभापायी रघूने सर्वस्व घालविले.दोघांना निष्कारण आपले प्राण द्यावे लागले .जर वेळीच सर्वांनी विशेषतः रघूने सखारामचे म्हणणे ऐकले असते तर  सर्वांनाच भरपूर प्रमाणात बक्षिसी मिळाली असती .

संदेशने मजुरामधील असलेले संबंध शोधून काढणे,युवराजानी चाणाक्षपणे व चौकसपणे तळघर व पुरलेल्या खजिन्याचा शोध लावणे यामुळे सर्व केस पंधरा दिवसांत व्यवस्थितपणे सुटली.शामरावांचा डिपार्टमेंटतर्फे सत्कार झाला.युवराजांना कन्स्ट्रक्शन कंपनीकडून लठ्ठ चेक मिळाला. संदेशला त्याच्या व त्याच्या सहकाऱ्यांच्या कामाचा पुरेपूर मोबदला युवराजांकडून मिळाला .

कंपनीचे अफवांमुळे काही काळ थांबलेले काम पुन्हा सुरू झाले. कंपनी  ठरलेल्या वेळात बोगदा पूर्ण करू शकली .कंपनीने ठरलेल्या वेळेत काम पुरे केले नसते तर जो दंड पडला असता तो वाचला.कंपनीची होणारी संभाव्य बदनामीही झाली नाही. घाटातील अवघड वळणांचा रस्ता टाळून वाहतूक बोगद्यातून सुरू झाली .

आणखी एक केस यशस्वीपणे सोडविल्याचे श्रेय युवराजांना मिळाले.  

२४/२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel