(ही गोष्ट काल्पनिक आहे.कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
प्रज्ञा साने ही एक चटपटीत आणि हुषार मुलगी होती . एम ए (फिलॉसॉफी)च्या शेवटच्या वर्षाला ती होती .तिला मित्र मैत्रिणी खूप होत्या .तिच्या मित्रांपैकी एखाद्या मित्राबरोबर ती लग्न करील असा बऱ्याचजणांचा अंदाज होता.बहुधा तिला अजून एखाद्या मित्रामध्ये पती वैशिष्ट्य (हसबंड मटेरियल) सापडले नसावे .
प्रज्ञा साने कॉलेजमधून घरी आली .स्टॅंडवर स्कूटर लावल्यानंतर तिने बाहेर टांगलेल्या पत्रपेटीतील टपाल गोळा केले आणि ती घरात येउन सोफ्यावर बसली .त्या टपालात तिला "सखी" नावाचा अंक मिळाला .नाव जरा तिला गमतीशीर वाटले .कदाचित बाबांनी किंवा दादाने सुरू केला असेल असे तिला वाटले .एवढय़ात त्या अंकांवर असलेल्या पत्त्यावर तिची नजर गेली .त्यावर आपले नाव पाहून तिला आश्चर्य वाटले .अापण तर असे मासिक सुरू केलेले नाही.बाबा किंवा दादा मासिक सुरू केले तर त्यांच्या नावावर करतील माझ्या नावावर कशाला करतील ? त्यामुळे तिला चांगलेच कुतूहल निर्माण झाले.एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने परस्पर वर्गणी भरून अंक सुरू केला असावा आणि नंतर माझ्याकडून वर्गणी वसूल करण्याचा इरादा असावा अशीही एक शंका तिला आली .
अंक पाहात असताना तिला तो अंक आपल्याला बक्षीस म्हणून पाठविण्यात आला आहे असे लक्षात आले .त्या अंकात दर महिन्याला एक कोडे दिलेले असे .कोडे काव्यरूपात असे .त्या सदराचे नाव समस्यापूर्ती असे होते . उत्तरांपैकी ज्याची समस्यापूर्ती उत्कृष्ट ठरेल त्याला शंभर रुपये बक्षीस व टपालाने अंक पाठविला जाई.अंकासोबत एक पत्र होते त्यात प्रथम क्रमांकाबद्दल तिचे अभिनंदन करून तिचा बँक अकाऊंट नंबर कळविण्याची विनंती केली होती .बँक अकाउंट नंबर त्यांना कळविल्यावर शंभर रुपये तिच्या नावावर जमा झाले असते .
ही समस्यापूर्ती दुसऱ्याच कुणीतरी केली होती.आपल्याला ओळखणाऱ्या कुणीतरी ही उठाठेव केलेली असावी. हा किंवा ही कोण असावी असे तिला कुतूहल निर्माण झाले .समस्यापूर्ती करण्याइतकी प्रतिभा असताना स्वतःच्या नावावर पत्र न पाठविता ते तिच्या नावावर पाठविण्यात आले होते .ज्याच्याकडे एवढी प्रतिभा आणि क्षमता आहे तो स्वतःचेच नाव वापरील .योग्य श्रेय घेईल .त्यातून मिळणारा आर्थिक आणि सामाजिक लाभही घेईल.माझ्या नावावर समस्यापूर्ती करून पाठविण्याचे कारण कारण काय असावे,असा विचार तिच्या मनात आला .हे काम कुणाचे असावे असे विचारचक्र तिच्या मनात सुरू झाले
तिने आपल्या डोळ्यांसमोर सर्व मित्र व मैत्रिणी आणल्या .मैत्रिणी तिच्या नावावर समस्यापूर्ती करणे शक्यच नव्हते .ज्याचे आपल्यावर प्रेम आहे अशीच व्यक्ती मला आकर्षित करून घेण्यासाठी अशी उठाठेव करील.माझ्या मित्रांमध्ये जर कुणी माझ्यावर प्रेम करीत असते तर त्याने ते माझ्याजवळ या ना त्या मार्गाने केव्हाच उघड केले असते . त्याला असा आडमार्ग शोधण्याचे काहीही कारण नव्हते . आपण ज्याला ओळखत नाही परंतू आपल्याला जो ओळखतो असा कुणी तरी हा असावा .बहुधा, बहुधा काय नक्कीच, हा आपल्यावर प्रेम करीत असावा .
हा असा कुणीतरी असावा की जो आपल्याला भेटायला घाबरतो . अापण त्याला आवडतो .तो आपल्यावर प्रेम करतो.त्याला आपली ओळख करून घ्यायची अाहे.तो आपल्या मित्रांपैकी कुणीही नाही.हा अज्ञात मित्र, प्रेमिक, कोण आहे एवढा एकच प्रश्न तिच्या मनात सारखा घोळत राहिला .ती कुठेही असली रस्ता ,कॉलेज, थिएटर ,बाग, रेस्टॉरंट, किंवा आणखी कुठे ,तिचे डोळे त्याला शोधीत असत.तो हा असेल का ? तो तो असेल का ?असे विचार तिच्या मनात येत
आपल्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी, आपल्याला भेटण्यासाठी, त्याने ही संधी मुद्दाम निर्माण केली आहे . मुद्दाम निर्माण केलेली ही संधी साधून तो आपल्याला भेटण्याचा प्रयत्न करील ,निदान आपल्याला फोन करील,म्हणून ती वाट पाहात होती .त्याचा फोन आलाच नाही .तिला भेटण्याचा कुणीही प्रयत्न केलाच नाही .
जो अंक तिला समस्यापूर्तीचे बक्षीस मिळाल्यामुळे भेट म्हणून आला होता, त्याच अंकात नवीन समस्यापूर्ती कूट प्रश्न आला होता .तिने तो सोडविण्याचा प्रयत्न केला .परंतु तिला समाधानकारक योग्य उत्तर सापडले नाही .असाच जवळजवळ एक महिना गेला .नवीन अंक विकत घेऊन त्यामध्ये कशाप्रकारे समस्यापूर्ती केली आहे ते पाहण्याचे तिने ठरविले.
नवीन महिन्याच्या एक तारखेला पुन: तो अंक तिच्याकडे आला .त्यात समस्यापूर्ती केलेली होती .तिलाच समस्यापूर्तीचे पहिले बक्षीस मिळाले होते.तिने उत्तर पाठविलेले नव्हते .त्या अज्ञात मित्राने बहुधा प्रेमिकाने समस्यापूर्ती करून ती तिच्या नावावर पाठविली होती.यावेळीही बक्षीस म्हणून शंभर रुपये तिच्या अकाउंटला जमा झाले.आता तर ती फारच अस्वस्थ झाली .हुषार,समस्यापूर्ती सहज करू शकणारा, प्रतिभा संपन्न आणि ती समस्यापूर्ती आपल्या नावावर पाठविणारा कोण आहे याची तिला जास्तच रुखरुख लागली .त्याला शोधण्याचा तिचा प्रयत्न या महिन्यातही तसाच चालू राहिला. तिला स्वप्नातही तो कोण आहे अश्या प्रकारची स्वप्ने पडू लागली .त्याने लवकरात लवकर आपल्याशी संपर्क साधावा असे तिला उत्कटतेने वाटत होते .
गेल्या महिन्याप्रमाणेच या महिन्यातही तिला तो अज्ञात प्रेमिक सापडला नाही.तिच्या कल्पनेप्रमाणे तो तिला भेटायला आला नाही .तिची तळमळ आणखी वाढली .तिची उत्सुकता अधिकच वाढली.
तिसऱ्या महिन्यात मागच्याच महिन्याची सर्व बाबतीत पुनरावृत्ती झाली.आता मात्र हा अज्ञात प्रेमिक आपल्याला केव्हा भेटतो याची तिला प्रचंड उत्सुकता निर्माण झाली .तिला जळी स्थळी काष्ठी पाषाणी तो दिसू लागला .
ज्याला आपले नाव पत्ता माहीत आहे ,त्याला आपला फोन नंबरही माहीत असणारच . तो आपल्यालाशी केव्हातरी संपर्क केल्याशिवाय राहणार नाही याची तिला खात्री होती. .
प्रचंड उत्सुकतेने त्याच्या फोनची ती वाट पाहात होती .मोबाईल रिंग वाजली की ती उत्सुकतेने मोबाइलचा स्क्रीन पाहत असे .माहितीचा नंबर दिसला की ती थोडीशी हिरमुसली होई.शेवटी आठ दिवसांनी त्याचा तिला फोन आला .
त्याने सुरुवातीलाच मला ओळखले का? म्हणून विचारले.
तिनेही तो अज्ञात समस्यापूर्तीकार ना? म्हणून विचारले.
त्यावर दिलखुलास हसून त्याने हो म्हटले.
तिने खोट्या खोट्या रागाने माझ्या नावाचा असा उपयोग का केला? म्हणून विचारले .
त्यावर त्याने ते ओळखण्याइतपत तू हुषार आहेस असे सांगितले
ओळखण्याइतपतच का ?मी त्याहून जास्त हुषार आहे असे ती म्हणली.
असे का ?मग मी कोण आहे ते तू कसे ओळखले नाही ? त्याचा प्रश्न .
पुढे तो म्हणाला "तू मान्य कर किंवा करू नकोस परंतु गेले तीन महिने तू अस्वस्थ आहेस.मला शोधत तुझी नजर भिरभिरत होती .हे मी स्वतः पाहिले आहे .मी तुझ्याजवळच होतो परंतु मला तुला भेटण्याइतपत धीर नव्हता.~मी योग्य वेळेची वाट पाहत होतो .मी मनाशी ठरविले होते की जर सलग तीन महिने मी समस्यापूर्ती करू शकलो तरच दैव मला अनुकूल आहे नंतरच तुला भेटायचे .आता मी तुला भेटण्यासाठी उत्सुक आहे .कुठे भेटायचे ते मला सांग.~
मी त्याला फोनवर म्हटले, आणि मला भेटायचे नसले
तर ?
(क्रमशः)
५/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन