पुढच्या जन्मात ती द्रुपद राजाच्या घरी परत एक मुलगी म्हणूनच जन्माला आली. पण इथे खरा मोठा घोळ झाला. द्रुपद राजाला मुलगा हवा होता जो त्याच्या सारखा यु्द्धात पारंगत असेल, नीतिमान असेल, ज्याला राज-पाट नित सांभाळता येईलं आणि त्याच्या वंशाला पुढे नेईल. यासाठी त्याने खूप वर्ष यज्ञ याग केले खूप आराधना केल्या. सरतेशेवटी त्याने एक मोठा यज्ञ केला जो काही महिने चालला. त्यात भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. या द्रुपद राजालाही भगवान शंकरांनी “तुला मुलगा होईल” असा वर दिला होता. शंकरावरील अपार श्रद्धेपोटी द्रुपदाला विश्वास होता की, देवाचा शब्द खोटा ठरणार नाही. याच विश्वासापोटी त्याने जन्माने मुलगी असलेल्या अर्भकाला मुलगा म्हणूनच वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे नाव ठेवले शिखंडी.
शिखंडीला एका राजपुत्रा प्रमाणे वागवण्यात येऊ लागले. तिला एका राजपुत्राला दिले जाते ते सारे प्रशिक्षण दिले जाऊ लागले. शिखंडीसुद्धा स्वतःला एक योद्धा समजायला लागली होती. इतकेच काय, वयात आल्यावर तिचे दसर्णाचा राजा हिरण्यवर्णच्या मुलीशी लग्नही लावून दिले गेले. या सगळ्या गोंधळात आणि द्रुपद राजाच्या अहंकारामुळे शिखंडीची वाताहात झाली. पण व्हायचे ते झाले नि पहिल्याच रात्री बायकोला तो शिखंडी नसून ती शिखंडीनी (स्त्री) असल्याचे कळले. तिचा बाप ह्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पांचाळ राज्यावर चाल करून आला. आपली मुलगी हा मुलगा असल्याचे सिद्ध केल्याशिवाय हे युद्ध टळणार नाही याची द्रुपद राजाला जाणीव होती, पण ते सिद्ध करणे अशक्य आहे हे ही तितकेच कळत होते.
आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या स्त्रीत्वाचा सामना करावा लागत असलेल्या शिखंडीनीने ह्या सगळ्या गोंधळास स्वतःला जबाबदार धरून जीव देण्याचे ठरवले आणि त्यासाठी ती तावा तावाने जंगलात गेली. सगळीकडे घनदाट वन होतं. तिला जायला कुठेच मार्ग सापडेना बराच वेळ निराश होऊन ती या घनदाट वनात फिरत राहिली आणि शेवटी एका तळ्याकाठी आली...! ती हताश होऊन तळ्याकाठी उभी होती. आता ती जीव द्यायला जाणार इतक्यात तिथे तिला एका यक्षाने जीव देण्यापासून वाचवले.
निराश झालेल्या शिखंडीनीने त्याला आपली जीवन कहाणी सांगितली. त्याने तिची कहाणी ऐकली. यक्षाला तिची दया आली.
“मी यक्ष आहे. आमच्यकडे अनेक शक्ती असतात. मी आता टू जे काही देणार आहे तसे करायची मुभा आम्हा यक्षांना नाही तरी तुझ्यावर ओढावलेल्या प्रसंगामुळे तुला एका रात्री पुरते स्वतःचे पौरुषत्व देततो, परंतु एका रात्री पुरतेच..! याची कुणालाही थांगपत्ता लागता कामा नये…. उद्या सूर्योदयाच्या आधी तू मला इथेच भेटशील आणि माझे पौरुषत्व मला परत देशील....!”
असे म्हणत यक्षाने स्वतःचे पौरुषत्व शिखंडीनीला एका रात्रीपुरते वापरायला दिले. पुरुष झालेली शिखंडीनी अत्यानंदाने परतला आणि त्याने स्वतःचे पौरुषत्व सिद्ध केले, या वरामुळे युद्धही टळले.
परंतु इकडे वनात मोठा प्रसंग उभा राहिला होता...! यक्षांचा राजा कुबेराला या यक्षाच्या या दानशूरतेचा राग आला कारण तसे करण्याची मुभा यक्षांना नव्हती. पण जेंव्हा शिखंडीनी खरंच त्याचे पौरुषत्व परत करायला गेली तेंव्हा, तिचा सच्चेपणा पाहून कुबेरही आश्चर्यचकित झाला. का नाही होणार? अशी गोष्ट कोण परत करतो का?
प्रसन्न कुबेराने आयष्यभरासाठी यक्षाचे पौरुषत्व शिखंडीनीला दिले. द्रुपदालाही आपल्याला सरते शेवटी मुलगा मिळाल्याचा आनंद झाला. त्याचे नाव शिखंडी झाले...!
पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. एके दिवशी सहज म्हणून अजाणतेपणी शिखंडीने वर्षानुवर्षे खांबाला अडकून असलेली ती सदाबहार कमलपुष्पांची माळ गळ्यात अडकवली. द्रुपदाला कळून चुकले की, आपला हा मुलगाच भीष्माच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार आहे, पण त्याला तर गुरु द्रोणांना मारणारा मुलगा हवा होता. कारण द्रोणांनी द्रुपदाचे अर्धे राज्ज्य कौरव-पांडवांची गुरुदक्षिणा म्हणून भीष्मांकरवी मागून घेतलेले होते. म्हणून चिडलेल्या द्रुपदाला द्रोणांना मारणारा एक मुलगा आणि कुरु कुळात फूट पाडणारी एक मुलगी हवी होती. त्यामुळे त्याने एक यज्ञ केला आणि त्याला त्यातून द्रौपदी आणि द्रिष्टद्युम्न अशी मुलं झाली. पुढचं महाभारत अतिपरिचित आहे.