कुरुक्षेत्रावर युद्ध सुरु होऊन नऊ दिवस झाल्यावरही भीष्म पांडवांना जड पडत होते. दूर क्षितिजावर युद्धाचा लाल रंग पसरला होता आणि शत्रुत्वाचे वारे उधान वाहून वाहू लागले होते. तेंव्हा त्यांना थांबवण्यासाठी पांडव पक्षात चर्चा सुरु झाली. भीष्मांना मारणे शक्य नव्हते कारण त्यांना इच्छामरणाचा वर प्राप्त होता. पण पांडवांकडे कृष्णाचे मार्गदर्शन होते. एका संध्याकाळी भीष्मांना मारण्याच्या चर्चेच्या वेळी कृष्णाने सांगितले की,
“भीष्मांना मारणे जरी शक्य नसले तरी त्यांना बाणांच्या सहाय्याने जमिनीला खिळवून टाकले जाऊ शकते. आणि असे बंदिस्त भीष्म कौरवांच्या कामी येणार नाहीत.”
कुरुक्षेत्रात जोपर्यंत भीष्मांच्या हाती शस्त्र आहे, तो पर्यंत तरी हे अशक्य होते आणि जगातल्या कोणत्याही शूर-वीर योध्दयाच्या विरतेने त्यांना निशस्त्र करणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत द्रुपदाने सुचवले,
“शिखंडीला पुढे करून अर्जुनाने भीष्मांवर बाणाचा वर्षाव करावा.”
कारण भीष्म शिखंडीला स्त्री समजायचे, आणि एका स्त्रीवर शस्त्र उगारण्याइतके हीन कुलीन क्षत्रिय भीष्म नक्कीच नव्हते. हा डाव साधला आणि शिखंडीनीची म्हणजेच अंबेची भीष्मांच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली.