बुध हा सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर फक्त ५७, ९०९१७५ किलोमीटर. ( 0.38709893 A. U.) आहे. बुध त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ दिवसात पूर्ण करतो. हा एक छोटा ग्रह असून आकारानुसार केवळ प्लूटो ग्रह हा बुधापेक्षा लहान आहे (अर्थात प्लूटोच्या याच लहान आकारामुळे त्याची ग्रह ही संज्ञा रद्द करण्यात आलेली आहे.) सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतून फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाहीत. मरीनर १० हे यान बुधाजवळून गेले त्यावेळी त्या यानाने बुधाच्या पृष्ठभागाची छायाचित्रे काढून पृथ्वीवरील संकलन केंद्राला पाठविली. या छायाचित्रांच्या साहाय्याने बुधाच्या ४० ते ४५ टक्के पृष्ठभागाचे नकाशे बनविण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले.
बुध हा पृथ्वीच्या चंद्राप्रमाणेच असून त्यावर फारसे वातावरणही नाही. या ग्रहाला लोहाचा गाभा असून त्यामुळे पृथ्वीच्या १% इतके चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्याच्या पृष्ठभागावरचे तापमान ८० ते ७०० केल्विन(-१८० ते ४३० सेल्सियस) इतके असते. बुधाच्या सूर्यासमोरील भागाचे तापमान सर्वांत जास्त, तर ध्रुवावरील विवरांच्या तळाशी सर्वांत कमी तापमान असते.
बुध हा सूर्यमालेतील बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ या चार घन पृष्ठभाग असणार्या ग्रहांपैकी एक आहे (इतर ग्रहांचे पृष्ठभाग द्रवरूप किंवा गोठलेल्या द्रवरूपांत आहेत), व त्यांच्यामध्ये आकारमानाने सर्वांत लहान आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणेच खडकाळ आहे. त्याचा विषुववृत्ताजवळ व्यास हा ४८७९ कि.मी. आहे. बुध हा ७०% धातू तर ३०% सिलिका यांचा बनला आहे. घनतेच्या बाबतीत तो सूर्यमालेत दुसर्या क्रमांकावर आहे. त्याची घनता ही ५४३० कि.ग्रॅ./घन मी. इतकी असून ती पृथ्वीच्या घनतेपेक्षा थोडीशी कमी आहे.