गुरू (Jupiter) सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे. सूर्याचे वस्तुमान गुरूच्या १००० पट असले तरीही इतर सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या अडीच पट वस्तुमान केवळ एकट्या गुरूचे आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचे वर्गीकरण राक्षसी वायू ग्रह म्हणून केले जाते. या चार ग्रहांना "जोवियन प्लॅनेट्स" ( jovian planets) असेसुद्धा म्हटले जाते.
प्राचीन काळापासून खगोलशास्त्रज्ञांना गुरू माहीत होता. अनेक संस्कृतींच्या पौराणिक व धार्मिक कथांमध्ये गुरूचा उल्लेख आढळतो. प्राचीन रोमवासीयांनी रोमन देव ज्युपिटर याच्यावरून या ग्रहाला ज्युपिटर हे नाव दिले होते. पृथ्वीवरून बघितले असता गुरूची दृश्यप्रत (apparent magnitude) −२.८ पर्यंत पोहोचू शकते. तेव्हा गुरू हा चंद्र व शुक्रानंतरचा आकाशातील सर्वाधिक प्रकाशमान ग्रह बनतो. (परंतु मंगळाची तेजस्विता त्याच्या कक्षाभ्रमणाच्या काही काळासाठी गुरूपेक्षा जास्त होते).
गुरू ग्रह हा मुख्यत्वेकरून हायड्रोजन व थोड्या प्रमाणात हेलियमचा बनला आहे. त्याला इतर जड मूलद्रव्यांचा उच्च दाबाखालील खडकाळ गाभा असणे शक्य आहे. गुरूच्या जलद परिवलनामुळे त्याचा आकार गोलाकार न राहता विषुववृत्तावर थोडासा पण जाणवण्याइतका फुगलेला आहे. गुरूचे बाह्य वातावरण वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये विभागलेले आहे. यामुळे या विभागांच्या सीमा रेषांवर मोठी वादळे होत असतात. याचा परिणाम म्हणजे गुरूवर दिसणारा प्रचंड लाल डाग. वास्तविकरीत्या हा डाग म्हणजे सतराव्या शतकापासून चालत आलेले एक मोठे वादळ आहे. गुरूच्या भोवती एक अंधुक कडा आहे व शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आहे. गुरूला कमीतकमी ६३ उपग्रह आहेत. यापैकी चार मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलिलियोने १६१० मध्ये लावला होता. त्यांना गॅलिलियन उपग्रह म्हटले जाते. गॅनिमिड हा यापैकी सर्वांत मोठा उपग्रह असून त्याचा व्यास बुध ग्रहापेक्षाही जास्त आहे.