मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्या वेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला अतोनात देवी आल्या होत्या. अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता. मी दापोलीस जवळच शिकावयास राहिलेला होतो. मला घरी जाता येत असे. शनिवार-रविवारीसुद्धा मनात आले, तर मी घरी जाऊन यावयाचा. परंतु माझा मोठा भाऊ दोन वर्षांनी घरी येत असे. त्या वेळेस तो दोन वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता.
देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते. देवीची फार आग असते. काही तरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते. गुलकंद देणे सर्वांत चांगले. परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद? पैसे कोठून आणावयाचे? परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला.
कांदा फार थंड असतो. कांदा फार स्वस्त आहे. पौष्टिकही आहे. कांद्यात फॉस्फोरस आहे, असे डॉक्टर सांगतात. तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू. कारण नेहमी कांदा असेच. कांदा-भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला! शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यांस कांद्यापासून अपाय नाही. परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे.
कांद्याचे गुणधर्म काही असोत. माझ्या आईने कांद्यांना अर्धवट वाफ दिली. वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले. हा कांदेपाक फार थंड असतो, असे सांगतात. आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील दोन तीन कांदे देऊ लागली.
मी एक दिवस आईला म्हटले, "आई! आम्हांला कधी पाकातला कांदा देऊ नकोस, हो. मी तुझा नावडताच मुळी. दादाला कांदे नि बिंदे. त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त, आम्हांला काही नाही. आम्ही जवळचे ना! आम्ही नेहमी घरी येतो. आम्हांला कोण विचारतो! जवळ असे ते कोपऱ्यात बसे, लांबचे स्वप्नी दिसे. आहे, बोवा! दादाची मात्र चमाण आहे. मला तरी देवी आल्या असत्या, तर बरे झाले असते! मिळाला असता कांदेपाक, मिळाले असते दही-दूध, मिळाले असते गाईचे तूप!"
माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले. माझा दादा थोर मनाचा होता. शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते. परंतु मुकाट्याने सारे सहन करीत असे. माझ्यासारखा खट्याळ, खोडसाळ तो नव्हता. शांत व धीमा होता. समुद्र जसा आत वडवानळाने जळत असतो, तसा तो आत दुःखाने, अपमानाने जळे; परंतु तोंडातून ब्र कधी काढीत नसे. तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे. स्वतःचे दुःख, स्वतःची करुण कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखी का दुःख द्या, असे तो म्हणे. दादा आईला म्हणाला, "खरेच, आई, मला एकट्याला खायला लाज वाटते, हो. उद्यापासून मला देऊ नकोस. साऱ्यांना देणार असशील, तरच मला दे. देवी बऱ्या झाल्या. आता काय? बरणीत आहे, तो चार दिवस आम्ही सारी मिळून खाऊ."
आई म्हणाली, "अरे, तुम्ही माझी कुणी सावत्र का मुले आहात. श्याम! असे, रे, काय घालून पाडून बोलतोस! अरे, त्याच्या तळपायांची, डोळ्यांची सारखी आग होत असते, रात्री तळमळत असतो, त्याला झोप येत नाही, हे तुला माहीत नाही का? त्याला थंडावा मिळावा, म्हणून हे औषध आहे. खाण्यासाठीच का जन्म आहे? म्हणे, मला का नाही देवी आल्या? श्याम, अरे, असे म्हणावे का? देवाला काय वाटेल? चांगले धडधाकट शरीर दिले आहे; तर तुला नसती भुते आठवतात. असे करू नये. श्याम, तू का आता लहान आहेस? मग पोथ्या-पुराणे कशाला, रे, वाचतोस ती? रामावर लक्ष्मणाचे-भरताचे किती प्रेम! उगीचच वाचायचे वाटते? काही त्यातला गुण घ्यावा. तुझाच ना तो भाऊ, का कोणी परका आहे? अरे, परक्याचाही हेवा करू नये. परक्यालाही तो आजारी असेल, तर द्यावे. तू घरी आलास, म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत? कढत पाणी देत? तू घरी आलास, म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत? नारळीपाकाच्या वड्या, नाही तर दुसरे काही तरी नाही का करून देत बरोबर? भावाचा का असा मत्सर करावा? पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडेही नाही रे पहाणार! असे नको हो करू श्याम!"
दादा आईला म्हणाला, "आई! तू उगीच मनाला लावून घेतेस. श्यामच्या मनात नसते हो काही. चल, तू आम्हांला आज पानग्या करून देणार आहेस ना? मी आणू केळीचे फाळके काढून?"
आई म्हणाली, "जा रे, श्याम, फाळके काढून आण. सुर्याचे पाने नको हो कापू! ते पानकापे घे व वरची पाने काप, जा."
मी गेलो व पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांगा कापून खाली पाडल्या. पाने नीट कापून घरी आणली. "अण्णा! टाटोळा मला वाजवायला दे. मी फटफटे करीन." बाबुल्या म्हणाला.
आई पानग्या करावयास बसली. कढत कढत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते. त्यामुळे फारच छान लागत होती. "अरे, पहाटे तुळशीला नैवेद्य दाखविलेली लोणीसाखर तेथे शिंपीत असेल, ती घ्या!" आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणीसाखरेचा नैवेद्य आई दाखवीत असे. दादाने कांदेपाक आणला व पानगीबरोबर त्याने सर्वांना वाढला. आई म्हणाली, "श्याम, उद्या नको हो मागू. तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको, हो, पडायला. ऐकलेस ना, श्याम? आता शहाणा हो."
मी त्या दिवशी रागावलेला होतो. सकाळपासून मी कोणीशी धड बोललो नाही. दादाने मला विटीदांडू खेळावयास बोलाविले, मी गेलो नाही. दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्यबाणांनी खेळू लागला. छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते. दादा नेम मारीत होता. तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटले, "दादा! त्या झाडांना का दुखवतोस? त्यांच्या अंगातून रक्त काढतोस?"
दादा म्हणाला, "मग विटीदांडू खेळावयास येतोस?"
"माझे अडले आहे खेटर! मी नाही येत जा!"
फणकाऱ्याने मी निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते; परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहात होतो! ती वंचना होती. जो भावावर प्रेम करीत नाही, तो झाडावर काय करणार!
दुपारची जेवणे झाली. दादा पडला होता. तो आपले तळवे हातांनी कुरवाळीत होता. त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे. आज इतकी वर्षे झाली, तरीही त्याच्या तळव्यांची आग होते; मग त्या वेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादाच्या पायांवर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळे बरे वाटत असे. परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहात होता; मुकेपणाने मला बोलावीत होता. परंतु त्याच्या पायांवर पाय द्यावयाचे नाहीत, असे मी ठरविले होते. मी दुष्ट झालो होतो. माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला, "श्याम! देतोस का रे तळव्यावर पाय? मला तुला सांगायला लाज वाटते, हो. रोज रोज तरी तुला किती सांगावयाचे? पण श्याम, मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार. येथे तू आहेस, म्हणून सांगतो. दे रे जरा."
दादाच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो. परंतु अहंकार होता. अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात. त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्या वेळेस मी ठरविले होते. दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही. मी काही केल्या उठलो नाही.
आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुऊन आली. मी जागचा हललो नव्हतो, हे तिने पाहिले. ती दादाजवळ आली व म्हणाली, "गजू! मी देते हो, तुझ्या पायावर पाय. त्याला कशाला सांगतोस? त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा? भाऊ सख्खे दाईद पक्के!" असे म्हणत आई खरेच दादाच्या पायांवर, त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी-खरकटी तशीच पडली होती. खटाळभर भांडी घासायची होती; परंतु ते सारे आईने पडू दिले. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये, म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती आई! मोठ्या मनाची आई! एक शब्दही मला ती बोलली नाही; माझ्यावर रागवली नाही. शेवटी मीच शरमलो. माझा अहंकार पार वितळला. मी आईजवळ गेलो व म्हटले, "आई! तू जा. मी देतो पाय. आई, हो ना दूर."
आई म्हणाली, "द्यायचे असतील, तर नीट हळूहळू दे. धसमुसळ्यासारखे नको देऊ. त्याला झोप लागेपर्यंत दे. मग खेळायला जा. श्याम! तुझाच ना तो भाऊ?" असे म्हणून आई गेली. उष्ट्यांना शेण लावून ती भांडी घासावयास बाहेर गेली. दादाच्या पायांवर मी पाय देत होतो. माझ्या पायांच्या बोटांनी त्याचे तळवे चेपीत होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली.
माझा राग मावळला. जसजसा सूर्य अस्तास जाऊ लागला, तसतसा माझा क्रोधही अस्तास जाऊ लागला. रात्रीची जेवणे झाली. आईचे उष्टेशेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोक पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येताजाता पाणी घालतात. याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पणती लावलेली होती. परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती. सुंदर चांदणे पडलेले होते. माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी, पुरुषोत्तम व बाबुल्या अंगणात बसलो होतो! दूर्वांची आजी, आईसुद्धा बसल्या होत्या. शेजारच्या जानकीवयनीसुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढीत होतो. मी आईला म्हटले, "आई! तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना, मला ते फार आवडते. 'पडला अभिमन्यू वीर रणी, चक्रव्यूह रचिला द्रोणांनी, पडला अभिमन्यू!' म्हणतेस का? कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता, ते शोधावयास जातात; मुखाने 'कृष्ण कृष्ण' असा मंजुळ जप अभिमन्यू करीत असतो, त्या मंजुळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल, असे त्यांना वाटले. कसे छान आहे गाणे! आई! म्हण ना, ग!"
आई म्हणाली, "आज आजीच छानदार गाणे म्हणणार आहे. तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे. मीही पुष्कळ दिवसांत ऐकले नाही." आईने आजीस सांगितले.
दूर्वांच्या आजीला पुष्कळ गाणी येत असत, म्हणून मागेच सांगितले आहे. चिंधीचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटले, काही तरी 'पर्ह्यातली पातेरी कोण हुक् करी', अशासारखेच ते असेल. मी उतावळा होऊन ते नको चिंधीचे भिकार गाणे, चांगले पीतांबराचे तरी आजी म्हण, असे म्हटले.
आई म्हणाली, "श्याम! ऐक तर खरे. त्या चिंधीच्या गाण्यात पीतांबर पैठण्याच आहेत."
आजी गाणे म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती योग्य तेथे जोर देऊन हात वगैरे हालवून गाणे म्हणे, भावनामय होऊन गाणे म्हणे, विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे. त्या गाण्याचे आकडकडवे-ध्रुवपद असे होते.
'द्रौपदीसी बंधु शोभे नारायण'
हे चिंधीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप; म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे. त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व, अद्वैत आहे, असे दाखविण्यासाठी द्रौपदीसही 'कृष्णा' नाव मिळालेले आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे. कृष्णाचे पाठल्या बहिणीवर-सुभद्रेवर प्रेम कमी; परंतु द्रौपदी-ही मानलेली बहीण-हिच्यावर जास्त. असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे.
प्रसंग असा आहे. एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रम्हवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकांत म्हणजे सुर, नर, असुर या निन्ही लोकांत-सात्त्विक, राजस व तमस; श्रेष्ठ, मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकांत फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्ये पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा तरी दूर कर, कोठे कोपऱ्यात सुगंधी फूल फुललेले असले, तर त्याचा वास सर्वत्र ने, इत्यादी कामे ते करीत असावयाचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे. कारण ते निःस्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत.
या वेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्यास क्षेमालिंगन दिले व कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, "देवा! आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी, निःपक्षपाती, असे मी सर्वत्र सांगतो. परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले, 'नारदा, पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे, पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टी नि काय?' मी काय बोलणार? म्हटले, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग आता सारे. तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का, ते सांग."
कृष्ण म्हणाला, "नारदा, मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील, तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे; परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला, वारा ज्यांची घरे बंद नाही, त्यांच्याच घरात जातो, माझ्या घरात का येत नाही, तर ते योग्य होईल का? ज्यांनी दारे सताड उघडी ठेवली, त्यांच्या घरात वारा शिरला. त्यांच्या घरात प्रकाश शिरला, जितके दार उघडाल, तितका प्रकाश व हवा आत जाणार. तसेच माझे. द्रौपदीचा दोर बळकट असेल, तिने खेचून घेतले. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार? मी स्वतः निष्क्रिय आहे. 'लोकी निःस्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी' हेच माझे योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहावयाची आहे का? हे बघ, मी सांगतो, तसे कर. सुभद्रेकडे धावत-पळत जा व तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने दिली, तर घेऊन ये. तिने न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग."
नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, "ये रे नारदा! प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रम्हलोकी, पाताळात, कोठे काय पाहिलेस, सांग. तुझे आपले बरे, सारीकडे हिंडतोस. तुला नारदा, कंटाळा कधी येतच नसेल. रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश. आज नंदनवन, उद्या मधुवन. बैस, अरे, एवढी घाई काय आहे?"
नारद म्हणाले, "सुभद्राताई, बसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे. भळभळ रक्त येत आहे. बोट बांधायला एक चिंधी दे."
"नारदा, आता चिंधी कुठे शोधू? हा पीतांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला आणि हा शालू. हा कुंतीभोज राजाने भेट म्हणून पाठविला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ. ही मौल्यवान पैठणी. नारदा! चिंधी नाही, रे!" असे सुभद्रा म्हणाली.
"बरे तर, मी द्रौपदीताईकडे जातो." असे म्हणून नारद निघाले.
द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. "ये नारदा! हा हार तुझ्याच गळ्यात घालते. बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण येथे आहे, म्हणून आलास नाही रे? याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमावयाचे! पण माझा कृष्ण सारा लुटू नका, हो. मला ठेवा थोडा."
"द्रौपदी! थट्टा करावयाला वेळ नाही, बोलावयाला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे. एक चिंधी दे, आधी." नारद घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला.
"खरे का, नारदा! कितीसे रे, कापले? माझ्या कृष्णाचे बोट कापले? अरेरे!" असे म्हणून नेसूचा पीतांबरच फाडून तिने चिंधी दिली.
भरजरी ग पीतांबर दिला फाडून
द्रौपदीस बंधू शोभे नारायण
माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की, मी तल्लीन होऊन गेलो होतो. डाळिंब्या काढायचे विसरून गेलो होतो.
गाणे झाले. मला आई म्हणाली, "श्याम! आवडले की नाही? ऐकलेस की नाही नीट?"
आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारले, "आई! आजीला तू हेच गाणे आज म्हणावयास का सांगितलेस, ते ओळखू?"
"ओळख बरे. तू का मनकवडा आहेस?" आईने म्हटले.
मी म्हणालो, "आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना. तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही. मला हे तुला दाखवून द्यावयाचे होते. होय ना? मला लाजविण्यासाठी हे गाणे तू आजीला म्हणावयास सांगितलेस. खरे, की नाही सांग."
आई म्हणाली, "होय. तुला लाजविण्यासाठी नाही; तर तुला प्रेम शिकविण्यासाठी."
मी एकदम उठलो व दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटले "दादा! आजपासून मी तुला 'नाही' म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन. भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर."
दादा म्हणाला, "श्याम! हे काय रे? क्षमा नि बिमा कसची मागतोस? मी दुपारचे विसरूनही गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात, तसा तुझा राग. तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे, हेही मला माहीत आहे. आई! आम्ही कधी एकमेकांस अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो, तरी फिरून एकमेकांस मिठी मारू."
आई म्हणाली, "तुम्ही परस्पर प्रेम करा. त्यातच आमचा आनंद, देवाचा आनंद."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel