केनिया देशाचे चित्र रंगवताना “`हराम्बी‘” हा लेख लिहिला खरा पण तरीही ……. कारनिवोरचा अनुभव जर मी लिहिला नाही तर माझा केनियावारीचा लेख पूर्ण झाल्यासारखा वाटणार नाही.
 
मागील लेखात लिहील्याप्रमाणे मी केनिया टीमला घेऊन कारनिवोरला जायला निघालो. शुक्रवार संध्याकाळची वेळ. सर्व टीम मेंबेर्स आनंदी आणि उत्साही दिसत होते. १९८०-८१ साली सुरू झालेले हे हॉटेल नैरोबी शहरापासून साधारण १० किलोमीटर अंतरावर आहे. परंतु शुक्रवार संध्याकाळची वेळ असल्यामुळे आम्ही प्रचंड ट्रॅफिकला तोंड देत देत शेवटी ४५ ते ५० मिनिटांनी कारनिवोरला पोहोचलो. तो पर्यंत टीमच्या आनंदाची भरती ओसरून उतावीळपणाची आणि कंटाळ्याची ओहोटी लागू पाहत होती. परंतु दूरवरून मांस भाजल्याचा वास येऊ लागताच सर्वांच्या अंगात परत उत्साह संचारला. ते आपापसात बोलू लागले. बहुतेक मेनु ठरवत असावेत असे मला वाटले. शेवटी एकदाचे आम्ही पोहोचलो. प्रचंड प्रमाणात मांस भाजल्यामुळे सबंध आसमंत धूरकट झाला होता. बहुतेक सर्व युरोपियन किंवा आफ्रिकन लोक होते. बाहेरच मेनु बोर्ड होता. मला पहिला आश्‍चर्याचा धक्का बसला.
आपल्याकडे सर्व साधारणपणे हॉटेलच्या बाहेर मेनु लिहिलेला असतो “टुडेज़ स्पेशल: इडली फ्राय, पनीर डोसा वगैरे आणि त्याखाली ठळक अक्षरात लिहिलेले असते “जैन फुड मिळेल”.
इथे मात्र मेनु बोर्ड असा होता:
१. सर्व साधारण पदार्थ: कोंबडी, बीफ, पोर्क, टर्की, बकरी वगैरे.
२. एक्झोटीक मेनु (Exotic Menu): मगर, शहामृग, हरिण आणि बरेच काही.
३. गेम मेनु (Game Menu) (म्हणजे शिकार करून आणलेले प्राणी): बीस्ट (म्हणजे एक मोठे जंगली जानवर ज्याची शिकार करून आणले जाते), जिराफ, झेब्रा.
मी सर्द होऊन बघत राहिलो. बाकीचे हर्षाच्या भरात वेडे झाल्यासारखे आत शिरायला अधीर झाले होते आणि केंव्हा एकदा आपल्या शिकारीवर तुटून पडू अशा आवेशात होते.
carnivore_rest

भारतीय हॉटेलमध्ये किचन दाखवायचीच असेल तर सगळ्यात शेवटी असते. म्हणजे विशेषतः रुमाली रोटी किंवा पेपर डोसा या सारखे पदार्थ लोक पाहु शकतात. कारनिवोर हॉटेल मध्ये मात्र आतमध्ये शिरताच समोरच एक ९ ते १० फूट व्यास आणि साधारण ४ ते ७ फूट खोली असलेला विहिरीच्या आकाराचा बारबेक़यु (Barbeque) होता. खाली कोळसे चांगले लाल होऊन जळत होते आणि विहिरीच्या म्हणजे बारबेक़युच्या (Barbeque) काठांवर निरनिराळे प्राणी लोखंडी कांबीवर शेक घेत होते !! या विहिरीच्या सर्व बाजूंनी कोणत्या प्राण्याला किती न्याय द्यायचा हे ठरवत त्यांचे असंख्य चाहते उभे होते; भुकेल्या वाघांसारखे !!  बहुतेक सर्वजण या विहिरीच्या जवळची जागा पकडत होते. आम्ही मात्र, मी शाकाहारी असल्यामुळे आणि तो वास सहन होत नसल्यामुळे जास्तीतजास्त लांबचे टेबल घेतले. येथील सर्व खुर्च्यांच्या पाठीचे डिज़ाइन झेब्र्‍याच्या किंवा वाघाच्या कातडी सारखे होते. सर्व टीम मेम्बर्स स्थानापन्न झाल्यावर लगेचच एक वेटर आला. वेटरसुद्धा झेब्र्‍याच्याच चट्टेरी – पट्टेरी डिज़ाइनचे कपडे घालून फिरत होता

carnivore 3

.सर्वसाधारणपणे हॉटेलमध्ये मेनु कार्ड दिल्यानंतर जी काय ऑर्डर असेल ती प्लेट प्रमाणे दिली जाते. म्हणजे एक प्लेट चिकन टिक्का किंवा चिकन मसाला वगैरे. येथील पद्धत मात्र वगळी होती. मेनु कार्ड आले आणि काही क्षणातच ऑर्डर्स दिल्या गेल्या त्या अशा: एकाने पाव किलो बीफ आणि पाव किलो टर्की सांगितले, दुस-याने अर्धा किलो पोर्क तर काहींनी एक किलो असॉर्टेड मीट सांगितले. मी मात्र शाकाहारी आहे हे सांगितल्यावर वेटर बुचकळ्यात पडला. तेंव्हा त्यांच्याकडे फक्त सलाड आणि फ्रेंच फ्राइज देत असत. आयुष्यात पहिल्यांदाच मी सलाड आणि फ्रेंच फ्राइज वजनामध्ये ऑर्डर केल्या. (आता मात्र शाकाहारी मेनु थोडाफार वाढवला आहे). मी फक्त पाव किलो फ्रेंच फ्राइज, ब्रेड आणि पाव किलो सलाडची ऑर्डर देऊ शकलो. सर्व टीम मेम्बर्स माझ्याकडे आश्चर्याने आणि कुतुहलाने बघू लागले. शेवटी एकाने न राहवून प्रश्न केलाच की “तुम्ही शाकाहारी लोक नुसत्या पानाफळांवर आणि गहू तांदुळावर कसे जगू शकता?” मी विचार करून उत्तर देईस्तोवर बीफ, पोर्क, टर्की आणि सारे असॉर्टेड प्राणी आमच्या टेबलावर आले. त्यामुळे तो प्रश्न हवेतच विरून गेला. आतांमात्र कोणाचीही वाट न पाहता सारेजण आलेल्या अन्नावर तुटून पडले. आयुश्यात मी प्रथमच पाव किलो फ्रेंच फ्राइज आणि पाव किलो सलाड खाणार होतो. हां हां म्हणता सर्वांनी आपापले खाणे संपविले (मी सोडून). 


1295844965177

आपल्यापैकी बहुतेकांनी एक अनुभव घेतला असेल. आपल्या मागे किंवा आजूबाजूला कोणी उभे राहीले असेल तर आपल्या 6th Sense मुळे अचानक जाणवते की आपल्या आजूबाजूला कोणीतरी उभे आहे. मला अगदी तस्सेच जाणवले आणि मी मागे वळून पाहीले. एक ६ ते सव्वा ६ फूट उंची असलेला आणि त्या उंचीला साजेशी तब्बेत असलेला काळा कुळकळीत वेटर माझ्या मागे उभा होता. त्याने कोपरापर्यंत चामड्याचे हातमोजे घातले होते आणि अंगात बाह्या नसलेले चामड्याचे जॅकेट घातले  होते. त्यामुळे तो अजुनच भव्य आणि “दिव्य” दिसत होता. मी जरा दचकलोच कारण त्याच्या एका हातात लोखंडी कांब आणि त्या कांबिवर श्वार्मा (Shwarma) आणि दुस-या हातात एक छोटीशी तलवार होती. श्वार्मा (Shwarma) म्हणजे कोकरू, चिकन, टर्की, गोमांस, वासराचे मांस, बीफ किंवा मिश्र मांस एका लोखंडी कांबिवर भाजतात आणि जेवायला देतात. ते वाढण्याची पद्धत पण मोठी और असते. तो वेटर या तलवारीने प्लेटमध्ये मांस श्रेडिंग (Shredding) करून वाढतो. ही डिश सहसा साइड डिश म्हणून खातात. मी सलाड आणि फ्रेच फ्राइज खात होतो तर माझी टीम “गेम” केलेल्या प्राण्यांचा अजुन “गेम” करण्यात गुंग होती. बघता बघता सर्वांनी पाव किलो अर्धा किलो अन्न आणि श्वार्मा संपविले. लगेचच दुसरा वेटर आला. त्याच्या हातात भला मोठा Tray होता. त्या Tray मध्ये मगर, शहामृग, हरिण,  बीस्ट, झेब्रा वगैरेचे मांस होते. ह्या डिशला “न्यामा च्योमा” म्हणतात (“न्यामा च्योमा” म्हणजे नुसते भाजलेले मांस). न्यामा च्योमाचा पूर्ण आस्वाद घेतल्यावर सर्वांच्या चेह-यावर समाधान दिसू लागले


images

प्रत्येक टेबलावर एक फोल्डेबल (Foldable) निशाण असते. आपापले पोट भरले की हे निशाण पाडायचे किंवा खाली करावयाचे. जोवर आपण हे निशाण खाली करत नाही तोवर वेटर तुम्हाला तुमच्या आवडीचे खाद्य पदार्थ वाढत राहतो. एकदा का आपण निशाण पाडले की वेटर परत काय पाहिजे म्हणून विचारात नाही. त्याला पण समजते की आपले पोट भरले आहे.
जवळ जवळ दीड ते दोन तास चाललेली कारनिवोरची मेजवानी अखेरीस संपली.  माझ्यासकट सर्व टीम मेंम्बेर्सनी आपापली निशाणे खाली केली. सर्वांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वहात होता. काळ्या चेह-याच्या पार्श्वभूमीवर पांढ-या स्वच्छ दंतपंक्ती दाखवत सर्वांनी पोटे तुडुंब भराल्याची पावती दिली.
 
पुढील क्वॉर्टर आणि पूर्ण वर्षाचे टार्गेट अचिव्ह करण्याचे आणि त्याबदली परत एकदा कारनिवोर मध्ये यावयाचे अशा वचनांची अदलाबदल करूनच आम्ही बाहेर पडलो.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel