प्रवास म्हटला की वेगवेगळे अनुभव आलेच. त्यातही काही अनुभव इतके थरारक असतात,की एखाद्या दुःस्वप्नासारखे ते कायम आपली छाया मागे ठेवतात. असाच हा एक अनुभव!
माणूस `तंग‘ असल्याशिवाय `जंग‘ करू शकत नाही, हे नुसते पुस्तकी वाक्य नव्हे, तर ह्याची प्रचिती मी एकदा नव्हे; तर कैकदा घेतली आहे. दोस्तानो, या घटकेला सुद्धा नायजेरियात जाऊन राहणं तितकस सुरक्षित नाही. मग पंचविस वर्षांपूर्वी तेथील परिस्थिती किती बिकट असेल याची कल्पनाच केलेली बरी! १९९२ मध्ये कंपनीच्या कामासाठी प्रथमच नायजेरियाला जाणार होतो. कंपनीच्या एजंटकड़े मी नायजेरियाला पोचण्याची तारीख सांगून हॉटेल बुक केले. एजंटने आपला माणूस लागोस एअरपोर्टवर घ्यायला येईल असं आश्वासन दिलं. `लागोस‘ ही नायजेरियाची व्यापारी राजधानी आहे. मी निश्चिंत झालो आणि लागोसला पोहोचल्यानंतर कुणाला कसं भेटावं याचा आराखडा तयार केला. जय्यत तयारीनिशी मी नायजेरियासाठी प्रस्थान ठेवलं. मुंबईहून मध्यरात्री निघालेला मी, संध्याकाळी सात वाजता लागोसला पोहोचणार होतो. पण विमान तेथे तब्बल चार तास उशिरा पोहोचलं. विमान `लॅण्ड‘ झालं आणि विमानातील सर्व नायजेरियन उतारूंनी टाळ्या पिटल्या. त्याचा अर्थबोध न झाल्याने मी बुचकळ्यात पडलो. मी सहप्रवाशाला विचारलं, “बाबारे, या टाळ्या कशासाठी?” ”अरे, आपला एवढÎ लांबचा प्रवास सुखरूप पार पडल्याचा आनंद अशा प्रकारे इकडे व्यक्त करतात.” “असं का?” म्हणून मीही टाळ्या पिटल्या.
बाहेर येईस्तोवर रात्रीचे बारा वाजून गेले होते. कसं होणार अशी धाकधूक मनात असतानाच माझ्या नावाचा बोर्ड घेतलेला एक माणूस पुढे आला. आम्ही तडक हॉटेल गाठलं. हॉटेलमधील`चेक इन‘चे सोपस्कार पूर्ण होईस्तोवर रात्रीचा दीड वाजून गेला होता. झोप अनावर झाली होती, तोच फोन वाजला. फोनच्या दुस–या बाजूकडून भारदस्त शब्द आले, “`हॅलो, मी प्रिन्स ओबोकान बोलतोय”. नायजेरियात नावाच्या आधी प्रिन्स किंवा चीफ लावणारी बरीच मंडळी आहेत. पण याचा अर्थ तो माणूस कोणी फार मोठा साहेब वा राजकुमार असेलच असं मात्र अजिबात नाही. ह्या राजकुमार ओबोकानने खास नायजेरियन अरेरावीत म्हटले, “मला खात्रीआहे की माझ्या ऑफीसरने तुम्हाला एअर पोर्ट वर पिकअप करुन हॉटेलमध्ये सुखरूपआणले आणि तुम्ही एव्हाना सेट्ल झाला असाल”. तो त्या कंपनीचा बॉस असावा हे त्याच्या आवाजातील जरबेवरून जाणवत होतं. जराही उसंत न घेता तो अधिकारवाणीने पुढे म्हणाला, “मी सकाळी ६.३० वाजता तुम्हाला घ्यायला गाडी पाठवतो.” वीस-बावीस तासांचा प्रवास,`जेट लॅग‘, नायजेरियाबद्दल ऐकलेल्या भयकथांचा ताण घेवून मी रात्री दोनला झोपणार आणि परत पहाटे सहाला उठणार हे खरोखरच अशक्यप्राय होतं. तसं मी त्याला स्पष्ट सांगूनही तो माझं म्हणणं मान्यच करेना. सकाळी साडेसहालाच निघणं कसं गरजेचं आहे ह्याची त्याने एक नाही तर दहा कारणं सांगितली आणि माझ्याकडून `जुलमाचा होकार‘ मिळवला.
सकाळी ठीक साडेसहाला ड्रायव्हर मला नेण्यासाठी हजर झाला. मी त्याचे नाव, त्याच्या बॉसचे नाव विचारून त्याच्या खरेपणाची चाचपणी केली. हॉटेल सोडल्यानंतर साधारण दोन ते अडीच तासांनी आम्ही लागोसपासून अति दूर अंतरावर पोहोचलो. आमचं वाहन सोडल्यास रस्त्यावर दुसरं वाहन नव्हतं. सगळीकडे शुकशुकाट आणि सामसूम. आजूबाजूला गावं, घरं, कारखाने काहीसुद्धा दिसत नव्हतं. ती स्मशानशांतता मला भयाण वाटू लागली. तोच गाडीने झुपकन एक वळण घेतले आणि आम्ही एका आलिशान घरासमोर येऊन थांबलो. घराच्या चहूबाजूला आठ-दहा फूट उंच तटबंदी होती. किल्ल्याचा दिंडी दरवाजा उघडावा तसा या प्रचंड घराचा तितकाच प्रचंड दरवाजा सुरक्षा रक्षकानं उघडला. त्या नीरव शांततेमुळे मी गोंधळून गेलो होतो. या बंगल्याच्या ऐश्वर्यापुढे माझ्या कल्पनेतल्या श्रीमंतीच्या व्याख्या तोकड़या पडल्या असत्या! बंगल्याच्या दर्शनी भागात `लेटेस्ट मॉडेल‘च्या चार-पाच गाड़या उभ्या होत्या. उंची गालिचे,सोफा, देशविदेशातून जमवलेल्या कलाकुसरीच्या नानाविध वस्तू, लोलकांची किंमती झुंबरं,भिंतीवरचा प्रचंड टीव्ही; असं सारं डोळे दिपवणारं वैभव होतं. एका नोकराने सुका मेवा,कोकचा कॅन आणि फळांचा रस माझ्या समोर आणून ठेवला. पंधरावीस मिनिटानंतर त्या वास्तूला शोभेल असाच साडेसहा फुटी आडदांड माणूस हॉलमध्ये शिरला, तेव्हा `काळा पहाड‘ माझ्या रोखाने येत असल्यासारखं मला वाटलं! वेड्या वाकड्या शंकाकुशंकानी डोकं भणभणू लागलं.
`हॅलो, कसे आहात तुम्ही?’ अशी औपचारिकता उरकल्यावर मी माझ्या कंपनीची आणि औषधांची सविस्तर माहिती सांगू लागलो. पण त्यात प्रिन्स ओबोकानला विशेष स्वारस्य वाटत नसावं. तरीपण मी माझं संभाषण चालूच ठेवलं. दहा मिनिटं माझी `चर्पटपंजरी‘ सहन केल्यावर अखेरीस त्यानं तोंड उघडलं आणि माझा पासपोर्ट मागितला. ही काय भानगड आहे, मला कळेचना. मी का, कशाला म्हणू लागलो तोच तो राक्षस उठून उभा राहीला आणि आपला राकट पंजा पुढे करून खरखरीत आवाजात म्हणाला `पासपोर्ट प्लीज‘. आपण अजाणता सिंहाच्या गुहेत पाऊल ठेवलं आहे हे त्याक्षणी मला कळून चुकलं. वाघ समोर येऊन ठाकल्यावर शेळीची जी अवस्था होईल तशीच माझी अवस्था झाली.
माणसाच्या संकटसमयी सर्वप्रथम धावून येते ती त्याची समयसूचकता आणि त्वरेने निर्णय घ्यायची तत्परता! माझं विचारचक्र वेगाने चालू झालं. या संकटावर कशी मात करावी, इथून कसं सुटावं ह्याचा मी सावधपणे अंदाज घेऊ लागलो. तिथे शारिरीक ताकद दाखवणं मूर्खपणा ठरला असता. युक्ती आणि गोड बोलूनच सुटकेची थोडी फार शक्यता होती. चातुर्य आणि आत्मविश्वासपूर्ण बोलून स्वतःची सुटका करून घेणं एवढाच पर्याय माझ्यासाठी खुला होता. मी पासपोर्ट त्याच्या हवाली केला. तशी तो त्याने सरळ स्वत:च्या खिशात टाकला. मग म्हणाला “तुमच्याकडे किती डॉलर्स आहेत?” मी स्वतःला सावरून म्हटलं “एकशेवीस डॉलर्स”. गडगडाटी हास्य करीत तो म्हणाला “ब-या बोलाने खरं सांग” मीही न कचरता परत तेच उत्तर दिले. मग त्याने कंपनीच्या औषधांची चौकशी चालू केली. मला म्हणाला “तुमच्या कंपनीची सर्वात महागडी दहा औषधं सांग” मी उसन्या उत्साहानं दहा नावं सांगितली. मग प्रिन्स म्हणाला, “एक `इनव्हॉइस‘ बनव. औषधं कोणतीही टाक पण किंमत दणकून तीन-चार दशलक्ष डॉलर्स एवढी कर”. एव्हाना माझ्यावरच्या अरिष्टाची मला पूर्ण कल्पना येवून चुकली होती आणि मला एकाकी झुंज द्यायची होती. `सामर्थ्य आहे कल्पकतेचे‘ हे वाक्य स्मरून माझी मदार आता शक्तीपेक्षा युक्तीवरच होती.
`इनव्हॉइस‘चा धागा पकडून मी म्हटले, “मी तुम्हाला तसं इनव्हॉइस दिलं तर तुम्ही काय करणार?” त्यावर तो म्हणाला “ते इनव्हॉइस आरोग्य मंत्र्याकडे नेणार आणि औषधं न पुरवताच तीन-चार दशलक्ष डॉलर्स घेणार.” माझे ठेवणीतलं अस्त्र बाहेर काढत मी म्हटलं, “वा! छान!” मग एक दीर्घ `पॉज‘ घेऊन सावधपणे म्हणालो, “पण यात माझा काय फायदा?”हा बाण लक्ष्यावर अचूक लागला. मोठया चोराला छोटा चोर भेटल्याचा आनंद त्याला झाला. त्याने लगेच अजून दोन ज्यूस, सुका मेवा, केक मागवले आणि म्हणाला, “बरोबर तीस दिवसांनी आपण युरोपातील एका अज्ञात स्थळी भेटू. जी रक्कम मला मिळेल त्यातील पंचवीस टक्के वाटा तुझा.” मी मनात म्हटलं, “अरे लेकाच्या काळोबा, बाळकोबा, मी जर ह्यातून सहीसलामत सुटलो ना तर तुझी धडगत नाही.” अर्थात वरकरणी म्हणालो, “ज़रूरज़रूर. आपली छान पार्टनरशिप होइल.” प्रिन्स खुशीत दिसत होता. इकडच्या तिकडच्या,विशेषतः युरोपच्या गप्पा मारल्यावर प्रिन्स ओबोकोनने मला “इनव्हॉइस‘ बनवण्यास फर्मावलं. मी काळवेळेचं भान राखून हलकेच हसत म्हणालो, “मी काही इनव्हॉइस बरोबर ठेवून फिरत नाही.” तेव्हा त्याचा चेहरा जरा उतरला. मी वरून शांत भासत असलो तरी आतून माझं हृदय भीतीनं धडधडत आणि काळजीनं थडथडत होते. आता प्रिन्स थोडा उग्र भासू लागला. त्याची देहबोली आक्रमक होत असलेली पाहून मी लगेच म्हणालो, “काळजी करू नका. मी उद्या येताना घेऊन येतो.” त्याची पूर्ण खात्री पटवण्यासाठी मी लगेच कामाचे पेपर, पेन आणि काही औषधं बाहेर काढली आणि त्याला थोडा टेक्निकल डोस पाजला! तेव्हा तो थोडा सैलावला आणि शेवटी म्हणाला, “ ठीक आहे. तुम्ही आता जाऊ शकता.” पण माझा पासपोर्ट परत करण्यास प्रिन्स तयार होईना. काही तरी सबब सांगून पासपोर्ट परत मिळवणं खूप गरजेचं होतं. मी म्हटलं, “प्रिन्स, मी काल रात्री खूप उशिरा हॉटेलात `चेक इन्‘ केल्याने,पासपोर्टची झेरॉक्स कॉपी काउंटरवर द्यायची राहून गेली आहे. तसंच आजकाल लागोसमध्ये.इमिग्रेशन अधिकारी किंवा पोलीस, परदेशी लोकांकडे केव्हाही पासपोर्ट मागतात. तेव्हा मी त्यांना काय सांगू? तुमचं नाव सांगितलं तर चालेल का?” ह्या बाणानेही अचूक निशाणा साधला. अत्यंत नाइलाजानं प्रिन्सने माझा पासपोर्ट मला परत दिला. चेहरा निर्विकार ठेवून मी पासपोर्ट हस्तगत केला; आणि दुस-या दिवशी पुन्हा येण्याचं खोटं वचन प्रिन्सला देऊन तेथून बाहेर पडलो. जाताना विनंती केली, “उद्या ड्रायव्हरला थोडं उशीरा पाठवा. साडेसहा म्हणजे फारच लवकर होतं बुवा. परत मला इनव्हॉइस बनवायला तसा वेळही लागणार आहे ना!” हे ऐकून प्रिन्स बराच खुश झाला आणि मला सोडायला दारापर्यंत आला.
दुपारी खूप उशीराने मी हॉटेलवर पोचलो.शारिरीक आणि मानसिक श्रमांमुळे बिछान्यावर अंग टाकताच मला गाढ झोप लागली. ब-याच वेळानंतर फोनच्या बेलने मी जागा झालो. माझा एजंट मला भेटण्यास आला होता. माझे विचारचक` वेगात फिरू लागले. मी कोणत्या हॉटेलमध्ये उतरलो आहे, मी किती वाजता आलो, कोणत्या फ्लाइटनं आलो हे सारं फक्त त्या एजंटला ठाऊक होतं. मग हे त्या प्रिन्सला कसे कळले? ह्याचा अर्थ तो एजंट आणि प्रिन्समध्ये काहीतरी गुफ़्तगू असणार हे उघड होते.
एजंट रूममध्ये आल्यावर मी त्याला घडलेली सर्व हकीगत सांगितली आणि मग थंड आवाजात आणि अगदी खालच्या पट्टीत म्हणालो, “मित्रा, लागोसचा पोलिस कमिशनर माझ्या ओळखीचा आहे. खरं तर, काल मी आल्यापासून माझ्या मागे त्याने दोन पोलीसही ठेवले आहेत. आज सकाळीसुद्धा ते पोलीस माझ्या मागे होतेच म्हणा….” या शेवटच्या वाक्याने आपलं काम चोख बजावलं कारण एजंट लगेचच उठला आणि काहीतरी सबब सांगून तेथून बाहेर सटकला, आणि गेला तो गेलाच! परत कधी आलाच नाही. दुस-या दिवशी त्या प्रिन्स ओबोकानचा ड्रायव्हरपण आला नाही. जणु काल मला पडलेलं ते एक दुःस्वप्न होतं. त्याराक्षसाच्या तावडीतून सुटल्याच्या आनंदात मी मात्र दुसऱया दिवशी लगेचच हॉटेल बदललं..