गुरुगृही अध्ययन पूर्ण करून श्रीराम अयोध्येस परतले. त्यानंतर श्रीदशरथाच्या अनुमतीने त्यांनी वने, पवित्र तीर्थक्षेत्रे इत्यादींचे दर्शन घेतले. पण परत आल्यावर श्रीराम उत्साही न दिसता उद्विग्न, कृश होत चालले होते. महर्षी वाल्मीकी, गुरू वसिष्ठ, विश्‍वामित्र यांना श्रीरामांनी, "आपले चित्त स्थिर कशाने हाईल?' असा प्रश्‍न केला. त्याचे उत्तर देताना विश्‍वामित्रांनी शुकाची ही कथा सांगितली.
पूर्व कल्पातील द्वापार युगाच्या शेवटी झालेल्या व्यासपुत्र शुकाची व श्रीरामाची हकिगत सारखीच होती. शुक हा सर्व विद्याशाखांत निपुण व शुद्ध मनाचा होता. त्याने परमात्मस्वरूपाची अनुभूती घेतली, आत्मज्ञान प्राप्त करून घेतले तरी त्याच्या चित्ताला स्वस्थता लाभेना. व्यासमहर्षींनी शक्‍य तेवढे प्रयत्न करून पुत्राचे समाधान केले. पण शुकाला पित्याचे बोलणे फारसे महत्त्वाचे वाटले नाही.
महर्षी व्यासांच्या ते ध्यानात आले व सत्यज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी,तू विदेह नगरीच्या राजा जनकाकडे जा असा सल्ला दिला. त्यानुसार शुक जनकराजाच्या मिथिला नगरीस आला. पण शुकाची भेट घेण्यापूर्वी आपल्या वचनाचीही उपेक्षा होणार नाही याची खात्री राजा जनकाला करून घ्यायची होती. म्हणून सात दिवसांपर्यंत राजाने शुकाला बाहेरच थांबवले. सात दिवसांनी त्याला राजवाड्यात बोलावले, पण आणखी सात दिवस त्याची खबर घेतली नाही. जिज्ञासू शुकाला याचे मुळीच दुःख झाले नाही. पुढे सात दिवस शुकाला अंतःपुरात ठेवले. तेथे नाना प्रकारचे भोग त्याला उपलब्ध करून दिले. पण याचा शुकावर काहीच परिणाम झाला नाही. तो जितेंद्रिय असल्याने अवहेलना व भोग यावर शुकाने मात केली. या परीक्षेतून पार पडल्यावर जनकाने अत्यादराने शुकाचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. "मायामोहात गुरफटलेल्या चित्ताचा भ्रमनिरास होऊन चित्ताला शाश्‍वत शांतीची प्राप्ती होईल असा उपदेश करावा," ही इच्छा शुकाने व्यक्त केली. यावर जनक म्हणाले, "तू भोगविकारांपासून मुक्त आहेसच. तुझी बुद्धी व चित्त विरक्त असून तू तुझ्या पित्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस. ज्ञानाच्या जोडीला तुझ्या चित्तातून वासना नाहीशी झाल्याने तू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस. तेव्हा जे मिथ्या आहे त्याचा विचारच सोड, म्हणजे तुझी बुद्धी स्थिर होईल.''
’शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे' या वर्णनातील शुक हा उपदेश ऐकल्यावर स्थिरचित्त झाले. अशाच प्रकारचा उपदेश देऊन विश्‍वामित्र आदी ऋषींनी श्रीरामांचे मन शांत केले

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel