अश्‍व शाळेतील शामकर्णाच्या कपाळावरील सुवर्ण-पत्रिका वाचून बभ्रुवाहनाचे मन गोंधळले. "युद्ध करावं, की नजराणा घेऊन श्यामकर्ण परत करावा," यावर त्याला निर्णय घेता येईना. आजपर्यंत अनेक संकटांना त्याने धैर्याने तोंड दिले होते, तो विजयीही झाला होता; पण आजचा प्रश्‍न नाजूक होता. आईच यातून योग्य तो मार्ग दाखवील असा विचार करुन तो तिच्या महालाकडे निघाला.
चित्रांगदा महालात एकटीच होती. अनुमती विचारुन बभ्रुवाहन आत गेला. नमस्कार करुन तिच्या जवळच्या आसनावर बसला. त्याला असं अचानक आलेला पाहताच तिने विचारले, "आज असं अचानक येणं केलं ? दरबारात जायचं नाही ?"
"दरबारातच निघालो होतो ; पण सेवकांनी एक घोटाळा करुन ठेवलाय. त्यासाठी..."
"सेवकांनी केलेला घोटाळा तू राजा असून तुला निस्तरता येत नाही ?"
"आई, प्रश्‍न मोठा नाजूक आहे, म्हणून तुला विचारायला आलो आहे."
"सांग, कसला घोटाळा केला आहेस ?"
"सेवकांनी अश्‍वमेधाचा श्यामकर्ण अश्‍वशाळेत बांधून ठेवला आहे, त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे."
"त्यात कसला पेच ? बभ्रुवाहना, युद्धाची भीती वाटायला लागली की काय ? अरे, तुझा पिता इथे नसताना तुला सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं. असं असताना तुला साधे प्रश्‍न सोडवता येत नाहीत."
"आई, मी युद्धाला भीत नाही; पण श्यामकर्ण पांडवांचा आहे."
"पांडवांचा--म्हणजे आपल्या घरचा--"
चित्रांगदेचा चेहरा बदलला. बभ्रुवाहनावरचा क्षणैक क्रोध मावळला. ती वेगळ्याच विचारांनी सुखावली. तिच्या बदलत्या मुखकमलाकडे पाहत बभ्रुवाहन म्हणाला, "आई, यासाठीच तुला विचारायला आलो आहे. अर्जुन स्वतः घोडयाचं रक्षण करीत आहेत. आता तूच सांग, सेवकांनी श्यामकर्ण बांधला म्हणून क्षात्रधर्माला अनुसरुन युद्धाला सज्ज होऊ की आपल्या घरचा अश्‍वमेध आहे म्हणून श्यामकर्ण घेऊन जाऊन पार्थचरणांना वंदन करु ? क्षात्रधर्म की पुत्रधर्म ? तूच सांग आई, कोणत्या धर्माचं पालन करु ?"
बभ्रुवाहनाचा प्रश्‍न ऐकून क्षणभर चित्रांगदाही विचाराक्रांत झाली. त्याला काय सांगावे हे तिला समजेना. तोच बभ्रुवाहन पुढे म्हणाला, "आई, माझं धनुर्विद्येचं शिक्षण सुरु असताना तू नेहमी म्हणायची, ’तू इतका पराक्रमी हो की, ह्यांनी तुला ’पराक्रमी’ म्हटलं पाहिजे.’ भारतीय युद्धातच पराक्रम दाखविण्याची माझी इच्छा होती; पण लहान असल्याने जाता आलं नाही. आई, मला वाटतं, आता पराक्रमाची संधी आली आहे. तेव्हा आता युद्धात भाग घ्यावासा वाटतो."
"काय ? तू अर्जुनांशी युद्ध करणार ? अरे, आपल्या घरचा हा अश्‍वमेध. तेव्हा पुत्रधर्माचं पालन करायचं सोडून त्यात तू विघ्न आणायचा विचार करतोस ?"
"असं मी कसं करीन ?"
"मग-"
"अगं आई, युद्धात भाग घेऊ इच्छितो म्हणजे आता तातांना विश्रांती देऊन, श्यामकर्णाचं रक्षण करायला आम्ही स्वतः जावं, असं म्हणतो,. आपल्या घरच्या यज्ञात ही मदत करायलाच हवी, असं मला वाटतं. मी असताना तातांना आता त्रास कशाला ?"
"बाळ--बभ्रू--"
चित्रांगदेचा कंठ दाटून आला. आपल्या गुणी मुलाचं तिला कौतुक वाटलं. ती भारावून म्हणाली, "बाळा, तुझं म्हणणं वीर पुत्राला साजेसं असून क्षात्रधर्मालाही अनुसरुनच आहे."
"आई, पण हे तातांना पटेल का ? ते क्षात्रवीर आहेत. मी त्यांना सामोरा गेलो तर त्यांना आवडेल का ? त्यांना हे आवडलं नाही तर ?"
"तेही खरंच !"
"म्हणून तर खरा प्रश्‍न आहे. इथे पुत्रधर्म आणि क्षात्रधर्म परस्परविरोधी आहेत."
"तुझा प्रश्‍न योग्य असला तरी, इथं आपल्या घरचाच यज्ञ असल्याने, शरण जाण्याचा प्रश्‍न येतोच कुठे ? ही पितापुत्रांची भेट आहे. पित्याची भेट घेण्यात, त्यांना नम्रतेने सामोरे जाण्यात वीरपुत्राला काही कमीपणा आहे असं मला वाटत नाही."
"मलाही तेच वाटतं. आई, तुझ्या इच्छेप्रमाणे सारे करतो."
बभ्रुवाहनाने आईला नमस्कार केला. तिचा आशीर्वाद घेऊन तो महालाच्या बाहेर पडला.
श्यामकर्ण सजवला गेला. सुवर्णमुद्रांची तबके सेवकांनी हाती घेतली. सगळी सिद्धता करुन बभ्रुवाहन निघाला. पाठीमागे सारे सैन्य होते. लवाजम्यानिशी निघाला. अर्जुनाला शरण निघाला, नव्हे, पित्याचे चरणरज मस्तकी धारण करायला वीरपुत्र निघाला. त्याच्या मुखावर विलक्षण समाधान पसरले होते.
अर्जुनाला निरोप गेला - ’मणिपूरचे महाराज बभ्रुवाहन श्यामकर्ण घेऊन भेटीला येत आहेत.’ अर्जुन सुखावला. इतके दिवस युद्धाने दमलेल्या योद्धयांनाही आनंद झाला. युद्ध टळलं म्हणून !
थोडयाच वेळात बभ्रुवाहन आपल्या मंत्र्यांसह अर्जुनाला सामोरा आला. सुवर्णमुद्रांची तबके पुढे ठेवली. हात जोडून उभा राहिला. अर्जुनाचे लक्ष त्याच्या मुखावर खिळले. गतस्मृतींचे तरंग मनात उमटले. विचार आला, ’याला कुठेतरी पाहिले का ?’ उत्तर मिळत नव्हते. विचारात पडलेल्या अर्जुनाच्या मुखाकडे पाहत बभ्रुवाहनच नम्रतेने म्हणाला, "तात, मला ओळखलं नाही. मी-"
"तात ऽऽ ?"
"होय, तातच. आपण माझे पिता आहात. मी बभ्रुवाहन. चित्रांगदेचा मुलगा."
"कोण बभ्रुवाहन-माझा मुलगा-"
"होय, तात. आपण बभ्रु-"
बभ्रुवाहनाचे शब्द पूर्ण होण्याच्या आतच अर्जुनाचा चेहरा बदलला. ’आपला मुलगा-वीर अर्जुनाचा मुलगा आणि शरणागती ?’ त्याला काही समजेना. तो ताडकन म्हणाला, "शक्य नाही ! माझा मुलगा नि असा भेकड ? अशक्य--"
असं म्हणतच नमस्कारासाठी खाली वाकलेल्या बभ्रुवाहनाच्या मस्तकावर अर्जुनाने लाथ मारली. तो खाली कोसळला. स्वतःला सावरुन तो पुन्हा उभा राहिला. अर्जुनाचा क्रोध त्याच्या मुखावर स्पष्‍ट दिसत होता. या क्रोधाच्म कारण त्याला कळेना. अर्जुनाने आपल्याला लाथ का मारावी हेही त्याच्या ध्यानात येईना. आपला काय अपराध घडला हेही त्याला समजेना. तो पुन्हा नम्रतेने, शांतपणे म्हणाला, "तात, आपण का रागावलात ? मी भ्याड नाही. मी वीर अर्जुंनाचा पुत्र आहे. तो भेकड कसा असेल ?"
"मग ही सारी लक्षणं काय तुझ्या शौर्याची आहेत ? बांधलेला श्यामकर्ण परत आणणं, ही खंडणी देणं ही कृत्यं काय तुझ्या शौर्याचे पोवाडे गात आहेत ? म्हणे मी भेकड नाही."
"तात, आपला काहीतरी गैरसमज होतोय, पुत्रधर्माचं पालन करण्यासाठी मी.."
"शरण येणं हा पुत्रधर्म होय ? नर्तकीच्या पोरा, असं शरण येण्यापेक्षा आपल्या आईच्या नृत्यामागं मृदुंग बडविण्याच्या पुत्रधर्माचं पालन का करीत नाहीस ? युद्ध म्हणजे मृदुंग बडवणं नव्हे !"
"तात, आपण मला भ्याड म्हणालात. लाथ मारली; पण मी तिकडे दुर्लक्ष केलं. मोठया माणसांनी रागाच्या भरात मारलं अथवा अपमान केला तरी तोही हिताचाच समजावा, असं मी मानत आलो होतो. मी आपल्याला एक राजा म्हणून शरण आलो नव्हतो, पित्याची चरणधुली मस्तकी लावावी म्हणून मी आलो होतो. हे माझं राज्य आपलंच नव्हे का ? मी आपलाच पुत्र नाही का ? मग शरण येण्याचा प्रश्‍नच कोठे येत होता ? आज केवढं स्वप्नं माझ्या डोळ्यांसमोर तरळत होतं. मी म्हणत होतो, आता आपल्याला भेटून सांगावं, ’आपण आता थकलात. विश्रांती घ्या. मी श्यामकर्णाच्या रक्षणाचा भार स्वीकारतो. हा आपल्या घरचाच यज्ञ. मी मदत करतो.’ हे स्वप्न उराशी बाळगून मी येथे आलो होतो. पण तात...मी माझ्या आईचा अपमान सहन करु शकत नाही. ती माझं सर्वस्व आहे. तिनं मला घडवलं आहे. आपण इथं आलात म्हणून किती आनंद झालाय तिला. तिच्या अनुमतीनंच मी आपल्या चरणाशी आलो होतो. आपल्याला सन्मानाने न्यायला. पण आता ते शक्य नाही. धर्मानेच आई ही पित्यापेक्षा श्रेष्‍ठ ठरविली आहे. तिचा अपमान सहन करील तो मुलगा कसला ? मी आपल्या रक्‍तानेच तिचा अपमान धुऊन काढीन. मी भ्याड नाही हे रणांगणावरच सिद्ध होईल. तात, माझं चतुरंग सैन्य तयार आहेच. थोडयाच वेळात आपली गाठ रणांगणावर पडेल."
महामंत्र्यांच्याकडे पाहत तो म्हणाला, "महामंत्री, ही खंडणी परत घेऊन चला. युद्धाच्या नौबती वाजवा. शंखभेरी निनादू द्या, या मणिपूरचा दरारा, येथला पराक्रम सार्‍यांना समजू द्या."
बभ्रुवाहन आपल्या रथात आला. त्याचा रथ युद्धसामग्रीने सज्ज होताच. त्याने स्वतःच शस्‍त्रास्‍त्रे भरण्यावर देखरेख केलेली होती. अर्जुनाच्या भेटीनंतर तो त्यांना मणिपुरात ठेवून स्वतः युद्धाला जाणार होता. सैन्यही तयार होतेच; पण घडले वेगळेच. इथेच युद्धाची वेळ आली.
बभ्रुवाहनाने सैन्याला इशारा दिला. नगारे निनादू लागले. शंखभेरी यांच्या प्रचंड नादाने आकाश कंपित झाले. सारे मैदान वीरांच्या आरोळ्यांनी, घोडयांच्या खंकाळण्याने, हत्तींच्या चीत्कारांनी भरुन गेले.
वाद्यांचे आवाज दूरवर ऐकू जात होते. राजप्रासादापर्यंत ! चित्रांगदेच्या कानी ते आवाज जाताच तिच्या छातीत धस्स झाले.
’हे तर युद्धवाद्यांचे आवाज ! काय झालं असावं ? ते काही बभ्रुला बोलले का ? त्याला अपमान वाटला का ? का...का रागाच्या भरात तो काही बोलला ? पण बभ्रू तसा नाही. मग हे युद्ध का ? पितापुत्रांचं युद्ध !’
तिला काही सुचेना. ती अस्वस्थ झाली. तशात तिचा उजवा डोळा लवू लागला.

’अपशकुन... अपशकुन का व्हावा ? काही विपरीत घडणार आहे का ? कोणाचा तरी एकाचा विजय..पण कोणाचाही विजय झाला तरी माझा पराभवच आहे. पती विरुद्ध पुत्र ! कोणाचं यश चिंतू ?’

हे युद्ध कसं थांबवावं, हेच तिला कळेना. तिने दूताबरोबर निरोप पाठवला, "काहीही कर. महामंत्र्यांची गाठ घे अन् हे युद्ध थांबवा. बभ्रू अजून लहान आहे. पित्याशी युद्ध करण्यापासून त्याला परावृत्त करा म्हणावं."
दूत वेगाने गेला, पण उशीर झाला होता. युद्धाला तोंड लागले होते. आता कोणीच ऐकायला तयार नव्हते.
पांडवसैन्य आणि बभ्रुवाहनाचे सैन्य दोन्ही आवेशाने लढत होती. बभ्रुवाहनाचा आवेश पाहून पार्थ चकित झाला. थोडयाच वेळात रणभूमीने उग्र स्वरुप धारण केले. रक्‍ताचे पाट वाहू लागले. मांसाचा चिखल झाला. घोडयांचे खिंकाळणे, हत्तींचे चीत्कारणे, जखमी वीरांचा आक्रोश याने वातावरण भरुन गेले. अर्जुनाला हा देखावा नवीन नव्हता; पण ज्या वेगाने बभ्रुवाहनाचे सैन्य पांडवसैन्याला गारद करीत होते, तो वेग असह्य होता. पांडवसैन्यात अतिरथी-महारथी ठरलेले वीर त्याने पार धुळीस मिळवले. सोसाटयाच्या वार्‍याने पाचोळा जसा सैरभैर होतो, तशी अवस्था पांडवसैन्याची झाली. बभ्रुवाहनाचा आवेश असाच राहिला, तर आपला पराभव होणार, असं अर्जुनाला मनोमनी वाटू लागले. त्याचे मन थोडे विचलित झाले. कधी नव्हे ती पराभवाची शंका त्याच्या मनावर आघात करु लागली.
आणि अशा द्विधा मनःस्थितीतच अर्जुनाच्या रथासमोर बभ्रुवाहनाचा रथ येऊन उभा राहिला. ते पाहून अर्जुनाने स्वतःला सावरले आणि त्याला म्हणाला, "पोरा, फार पराक्रम केलास; पण आता माझ्याशी गाठ आहे. अनेक वीरांना मी अजिंक्य ठरलो आहे.तुझा पराक्रम माझ्यापुढे चालणार नाही. आता दाखव तुझं शरलाघव."
बभ्रुवाहनाने फक्‍त स्मित केले, दोघांच्या युद्धाला सुरुवात झाली. अर्जुनाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. त्यानेही ते सर्व बाण सहज लीलया तोडून टाकले. ते पाहून अर्जुन खवळून म्हणाला, "सांभाळ, माझ्या शरवर्षावापुढे भीष्म, कर्णही टिकले नाहीत, तिथं तुझी काय कथा ?"
"मला माहीत आहे. सारं महाभारत मला ठाऊक आहे. शूर वीर पराक्रम कधी बोलून दाखवीत नसतात. काय करायचं आहे ते करुन दाखवा. तुमच्या बाणांचा समाचार घ्यायला मी उभा आहे. येऊ द्यात बाण."
पुन्हा शरवृष्‍टी सुरु झाली. बभ्रुवाहन पर्वतासारखा स्थिर होता. ते पाहून अर्जुनाने अस्‍त्रप्रयोग सुरु केला. त्याला अस्‍त्रांनीच उत्तर देत तो म्हणाला, "अर्जुना, हे असलं युद्ध, ही अस्‍त्रं आता फार जुनी झाली आहेत. माझ्या नव्या युद्धतंत्राने आपल्या सैन्याचा फन्ना उडत आला आहे, आणि तोही काही घटिकांच्या आत तेव्हा काही नवीन बाण असतील तर काढा, नाहीतर आता माझ्या बाणांचा मारा सहन करा."
अर्जुनानेही आपलं सारं युद्धकौशल्य, सारा अनुभव पणाला लावला. कोणीच कोणाला हार जात नव्हते. शेवटी बभ्रुवाहनाने एक तेजस्वी बाण काढला, नेम धरुन अर्जुनावर सोडला. त्याच्या बाहूवर बाण बसला आणि तो खाली कोसळला. पांडव सैन्यात हाहाःकार उडाला. सगळीकडे एकाच विषयाची चर्चा सुरु झाली. अर्जुन पडला ! अर्जुन पडला ! !

बभ्रुवाहनाने काही घटकांतच पांडवसैन्याचा पराभव केला होता. तो नगरीत परतला. त्याचा जयजयकार होत होता. विजयाची वाद्येवाजत होती. सगळीकडे आनंदीआनंद पसरला होता. बभ्रुवाहनालाही आपण आईच्या अपमानाचा सूड घेतल्याचे समाधान वाटत होते.
तो तसाच आईच्या महालात गेला. चित्रांगदा मंचकावर खिन्न होऊन बसली होती. युद्ध सुरु झाल्याची वार्ता तिच्या कानांवर आली होती. ती ऐकून भविष्यकाळाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य तिच्यात उरले नव्हते. दोघांचाही पराक्रम तिला माहीत होता. म्हणूनच याचा शेवट काय होणार याची तिला कल्पनाही करवत नव्हती. आत येताच बभ्रुवाहनाने आईला हाक मारली, "आईऽऽ"
तिने दाराकडे पाहत विचारले, "कोण-तू आलास ?"
"होय आई, तुझ्या अपमानाचं..."
"माझा अपमान !"
बभ्रुवाहनाने गेल्यापासूनचा सारा वृत्तांत सांगितला. तो पुढे म्हणाला, "आई, तुझा अपमान मला सहन झाला नाही. तुला अर्जुनाने नर्तकी म्हटलं. तू नर्तकी असलीस म्हणून काय झालं ? समाजाला त्याची आवश्यकता नाही ? समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक पेशा सारख्याच तोलामोलाचा असतो. या सार्‍या तारांचे सुसंवादी सूर निघाले, तरच समाजजीवन सुरेल होईल, हे अर्जुनाला समजावून देण्यासाठी मला त्यांच्याशी युद्ध करावं लागलं. आई-अन् मी विजयी झालो -"
"म्हणजे--त्यांचं--"
"आई, क्षमा कर मला, पण माझ्या बाणांनी अर्जुन -"
"बस्स ! बस्स कर तुझं सांगणं ! काय ऐकते आहे मी हे--तू आपल्या पित्याला मारलंस ? मला विधवा केलंस ? काय केलंस हे ? द्रौपदी, सुभद्रा या वीरमाता मला काय म्हणतील ? मुलानं बापाला ठार केलं ? आणि त्याच्या नगरात आनंदाप्रीत्यर्थ हे पडघम वाजत आहेत. बंद करा तो आवाज-बंद करा ! मी आता जिवंत राहून तरी काय करु ? ज्या हातानं त्यांना तू मारलंस त्याच हातानं मलाही ठार मार-मीही त्यांच्याबरोबर -"
"आईऽऽ -"
बभ्रुवाहनाची हाक पूर्ण व्हायच्या आधीच चित्रांगदा मूर्च्छित झाली. सारा महाल आपल्या भोवती फिरतो आहे, असं बभ्‍रुवाहनाला वाटलं. ’आईच्या अपमानाचा बदला घ्यायला गेलो अन् त्यातून हे नवंच संकट उद्‌भवलं ! काय करावं ? आई थोर मानून पित्याला शासन करायला गेलो तर पती श्रेष्‍ठ मानून आईही त्यांच्या पाठोपाठ जाणार !’ अर्जुनाला जिवंत करण्यावाचून गत्यंतर नव्हते. पण ते कसे शक्य होते ?
थोडया वेळातच ही वार्ता सगळीकडे पसरली. बभ्‍रुवाहनाची दुसरी माता उलूपी तीही शोक करीत तेथे आली. बर्‍याच प्रयत्‍नानंतर चित्रांगदा सावध झाली. ती पुन्हा शोक करु लागली.
बभ्रुवाहनाला खरं म्हणजे अर्जुनाला मारायचे नव्हते. त्याने आठवून पाहिले. एक विषलिप्‍त बाण त्यांच्या बाहूला लागल्यावर ते पडले होते. म्हणजे विष अंगात भिनल्यामुळे ते खाली कोसळले होते. हे ध्यानात आल्यावर बभ्‍रुवाहन आईकडे वळून म्हणाला, "आई, अर्जुंनांनी तुझा अपमान केला तो सहन न झाल्यानं मी त्यांच्याशी युद्ध केलं. माझ्या हातून चूक झाली. पण आई-तू शोक करु नकोस. मी त्यांना पुन्हा जिवंत करतो. तुझ्या प्रेमासाठी, तुझ्यासाठी आणि आता माझ्यासाठीही ! माझ्यावर विश्‍वास ठेव. अर्जुन अजूनही जिवंत होतील."
"मूर्खा-का उगाच वेडी आशा दाखवतो आहेस ? मेलेलं माणूस कधी जिवंत होईल का ? जा, मला पुन्हा तुझं तोंडही पाहण्याची इच्छा नाही...जा, चालता हो माझ्या समोरुन."
बभ्‍रुवाहनाने आईची समजूत घातली. अर्जुनाचा मृत्यू कसा झाला हे तिला सांगून तो म्हणाला, "आई, उलूपी माता नागकन्या आहे. तिच्या वडिलांच्या जवळ नागाचे भयंकर विष उतरवून घेणारा मणी आहे. आपल्या जावयाला उठविण्यासाठी नागराज वासुकी तो मणी निश्‍चित देतील. नागलोक काही फार लांब नाही. आत्ता काही घटकांतच तो मणी येईल, आणि अर्जुन पुन्हा जिवंत होतील."
दोन्ही मातांना हा उपाय पटला. त्यांच्या डोळ्यांत आशेचा किरण तरळला. उलूपी म्हणाली, "बभ्‍रु, पुंडरिकाला बोलाव. तो नाग असल्याने त्याला तेथली सगळी माहिती आहे. तुझे आजोबाही त्याला ओळखतात. शिवाय मी खुणेची अंगठीही त्याच्याजवळ देते म्हणजे ते लवकर मणी देतील."
पुंडरिकाने खुणेची अंगठी घेतली. त्याचा रथा नागलोकांकडे दौडू लागला. काही वेळाने पुंडरिकाला निरोप ठेवून चित्रांगदा, उलूपी, बभ्‍रुवाहन सारे रणभूमीवर आले. आता सार्‍यांचे लक्ष त्या मण्याकडे लागले होते. चित्रांगदा डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत होती. उलूपी काळजी करीत होती. थोडया वेळातच रथ आला. बभ्‍रुवाहनाने मणी घेतला. अर्जुनाच्या अंगावरुन फिरवला. त्याने सारे विष शोषून घेतले. मणी हिरवा-निळा पडला. अर्जुनाचे शरीर पूर्ववत झाले. श्‍वासोच्छ्‌वास सुरु झाला. थोडया वेळात अर्जुन सावध झाला. त्याने पाहिले, चित्रांगदा, उलूपी, बभ्‍रुवाहन तेथे होते. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. तोही भारावला. शब्द मुके झाले. अर्जुनाने बभ्‍रुवाहनाला गाढ आलिंगन दिले. तो म्हणाला, "बाळा, आज तुझ्या शौर्यावर आम्ही संतुष्‍ट आहोत. ज्या धैर्याने तू माझ्याशी युद्ध केलेस, ते पाहून मी प्रसन्न झालो आहे."
"तात, ही सारी आपली आणि आईची कृपा."
"बाळा, तुझ्या पराक्रमानं आज मला दुसरा अभिमन्यू मिळाला. हा अभिमन्यूही माझाच आहे."
पितापुत्रांचे हे प्रेम चित्रांगदा आणि उलूपी भरल्या अंतःकरणाने पाहत होत्या. त्याही कृतार्थ झाल्या होत्या. प्रेमाच्या या वर्षावाने त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू झरत होते. सकाळच्या सूर्यनारायणाने पितापुत्रांचा संघर्ष पाहिला होता आणि आता मावळणारा सूर्य त्यांचे वात्सल्य पाहत होता. वेगाने घडलेल्या घटनांचा ताण असह्य होऊन जणू तो विश्रांतीसाठी उत्सुक होता. डोंगराआड वेगाने जात होता.
चित्रांगदा आणि उलूपी दोघीही पती-पुत्रासह राजप्रसादी परत निघाल्या होत्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel