Source: http://mr.upakram.org/node/1083
आजही तरूणांचं आदरस्थान म्हणून पहिलं नाव शिवाजी महाराजांचं घेतलं जातं . इतिहासात अभ्यासासाठी असूनही शिवाजीराजे कोणाला नकोसे झाले नाहीत . मोबाइलच्या स्क्रीन सेव्हरपासून ऑरकुटच्या साइटवरही ते आरूढ झाले . पण ... शिवाजीराजांची एवढी क्रेझ असूनही त्यांची माहिती फारच थोड्यांना आहे . शिवाजी महाराजांनी अफझलखानाची बोटं कापली असा शोध कोणी लावतं , कोणासाठी ते ' लीडर ' आहेत , तर कोणासाठी ' ग्रेट राजा '!
.........................
' शिवरायांचा आठवावा प्रताप ,' असं आपण म्हणत असलो तरी आपल्याला तो आठवावा लागत नाही . त्यांनी घडवलेला इतिहास केवळ पुस्तकापुरता नाही , तर तो आजही सगळ्यांना स्फूर्ती देणाराच ठरतो . त्यांनी केलेला प्रताप , त्यांनी घडवलेला इतिहास सगळ्यांनाच माहित आहे , असं आपण गृहित धरतो .
ज्या काळात हिंदूंना कोणी त्राता नव्हता , त्या काळात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं साम्राज्य उभं राहिलं . स्वराज्याचं सुराज्य करणाऱ्या या राजाच्या दूरदृष्टीमुळे शत्रूलाही सळो की पळो करुन सोडलं होतं . या कर्तव्यदक्ष राजाचा प्रताप आणि त्याची न्यायप्रियता यावर त्या काळात हिंदूच नाही , तर अन्य धमिर्यांनाही विश्वास होता . मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच हा कालखंड . आपल्या प्रजेची काळजी वाहणाऱ्या या राजाला आपल्या सर्वांचा मानाचा मुजरा .
खरं सांगायचं तर शिवरायांना आठवायला आपल्याकडे निमित्त लागत नाही . त्यांचा अभिमान बाळगायला केवळ मराठी असण्याची गरज नाही . भाषणात त्यांची उदाहरणं देण्यासाठी अमुक एका पक्षाची उमेदवारी करावी लागत नाही . इतिहासात अभ्यासायला आले किंवा भाषेच्या पुस्तकात त्यांच्यावर एखादा धडा होता , म्हणून मुलांना ते कधीच नकोसे झाले नाहीत . आजच्या आयटी युगातही ते ' सॉल्लिड पॉप्युलर ' आहेत . तरुणांनी ऑरकुटवर त्यांची कम्युनिटी आणि एक साइटही आणलीय . मोबाइलचा स्क्रीन सेव्हरवर म्हणूनही ते सेट झाले आहेत . एकंदरीत छत्रपती शिवराय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके आहेत . आवडता राजा म्हणून आजही त्यांचाच पहिला नंबर लागतो . पण जेव्हा वेळ येते त्यांच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देण्याची तेव्हा ... तेव्हा मात्र कपाळाला हात लावायची पाळी येते . हे हवेतले तीर नाहीत . कॉलेजमधल्या काही मुलांशी गप्पा मारल्या . म्हटलं , जाणून घेऊयात शिवाजी महाराजांचा आदर करणाऱ्या या ' मराठ्यां ' ना शिवाजी महाराजांबद्दल कितपत माहिती आहे ते ! म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारल्या तेव्हा आलेला अनुभव अतिशय धक्कादायक होता . आपल्या माहितीसाठी एक नमुना पेश है -
प्रश्न : शिवाजी महाराज कोण होते ?
उत्तर : लीडर
प्रश्न : शिवरायांचा राज्याभिषेक कोणी
केला ?
उत्तर : शहाजीराजांनी (' हो ना ?'
आपल्यालाच उलट प्रश्न
विचारण्यात येतो .)
प्रश्न : शिवाजी महाराजांनी कोणाची बोटं
कापली ?
उत्तर : अफझलखानाची (' ए चुकलं तर
चालेल ना ?')
प्रश्न : शिवाजीराजांना तलवार कोणी
दिली ?
उत्तर :( अरे , आम्हाला हा प्रश्न होता !)
औरंगजेबाने
प्रश्न : शिवरायांनी कोणता युद्धप्रकार
आणला ?
उत्तर : गुरिला वॉर ( मराठीत काय
म्हणतात ते आठवत नाही )
इतिहास कच्चा होता किंवा इतिहासातील काही आठवत नाही , असं म्हणत आपल्या अज्ञानाचं समर्थन करायला मात्र कोणी विसरत नाही . शिवाजी महाराजांचे गुरू कोण , शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातल्या व्यक्तींची नावं काय , गड आला पण सिंह गेला असे उद्गार त्यांनी कोणाला उद्देशून काढले , असे प्रश्न म्हणजे मुलांना परत एकदा परीक्षा द्यायला लावण्यासारखंच होतं . या प्रश्नांना बरोबर उत्तरं देणारी फारच कमी मुलं होती . चुकीची उत्तरं ऐकून आपण चक्रावून गेलो नाही , तरच नवल !
या प्रश्नांना मिळणा-या चमत्कारिक उत्तरांनंतर खरं तर अनेकजण निराश होतील . अशा वेळेला आजच्या मुलांना इतिहासाचं महत्त्व ते काय कळणार , जन्मत : च स्वातंत्र्य मिळालेल्या या मुलांना स्वातंत्र्याची किंमत काय कळणार अशा प्रतिक्रिया साहजिकच व्यक्त होतात . यापेक्षा आणखी भयंकर उत्तरं न मिळता काहीतरी बरं ऐकू येईल या आशेवर आपण आणखी प्रश्न विचारत राहतो . महाराजांमधला कोणता गुण तुम्हाला आवडतो किंवा महाराजांना तुमच्या लेखी एवढं महत्व का हा प्रश्न मुलांना विचारताच जवळजवळ सर्वच मुलांनी महाराजांच्या न्यायप्रियतेचा आणि परस्त्रीला सन्मान देण्याच्या गुणांचं कौतुक केलं . त्यांच्यातील याच गुणामुळे आपण महाराजांचे फॅन , ओह सॉरी महाराजांचा आदर करतो असं सांगितलं . शिवाजी महाराज , मराठी भाषा , मायबोलीचा डंका पिटणाऱ्यांच्या राज्यात ' वाघिणीचं दूध ' पिण्याची भलतीच ओढ दिसून येते . त्यामुळे बोलताना भाषेची गल्लत होतच होती . परस्त्रीला ' इज्जत द्यायचे ,' शिवाजी महाराज म्हणजे ' अरे , सॉलिड राजा . मानतो आपण त्यांना ! ग्रेट माणूस यार ,' अशी तरुणांच्या बोलीभाषेची गरुडझेप दिसत होती . पण त्यात शिवरायांचा अपमान करण्याची भावना नव्हती . उलट , ज्यांना उत्तरं देता आली नाहीत , महाराजांबद्दल आपल्याला माहिती नाही म्हणून वाटणारी खंत त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत असते . कुठलीही परीक्षा नाही , जाहीर सभा नाही , सहज चालणा-या गप्पातही आपल्या तोंडून शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारला जाऊ नये म्हणून मुलांना काळजी वाटत असते . तरीही संभाषण संपवताना सगळे सांगायला विसरत नाहीत , ए , कूल , वी लव हिम !