शनिवार वाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते.
शनिवार वाडा पहिल्या बाजीरावाने बांधला. त्याच्या बांधकामाची सुरूवात जानेवारी १०, इ.स. १७३० रोजी झाली. श्रीमंतांनी स्वतः लाल महालातून माती आणून त्याची पायाभरणीची सुरूवात केली. बांधकाम वेगाने करण्यात आले. अखेर तत्कालीन १६,०१० रुपये खर्चून, शनिवार वाड्याचे बांधकाम जानेवारी २२, इ.स. १७३२ रोजी पूर्ण झाले. इ.स. १८२८ साली लागलेल्या आगीत हा सात मजली वाडा पूर्णपणे जळून गेला. त्यामुळे मूळच्या स्वरूपातील वाडा आपण पाहू शकत नाही. या वाड्याच्या चौथर्यावर बसविलेल्या छोट्या फलकावरून एकेकळी येथे असलेल्या गणेश महाल, रंगमहाल, हस्तिदंतीमहाल, दिवाणखाना, कारंजे इत्यादी गोष्टींची कल्पना करता येते.
शनिवार वाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दार किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधॆ असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रूंदी १४ फूट आहे[. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते
दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच[ संदर्भ हवा ]. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.
एक मुसलमान सरदार पत्रात लिहितो: "बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो. मात्र आत स्वर्गासारखा दिसतो."