३५०७.

विश्रांतीचें स्थान संतांचें माहेर । तें या भूमीवर अलंकापूर ॥१॥

तये स्थळीं माझा जीवाचा वो ठेवा । नमीन ज्ञानदेवा जाऊनियां ॥२॥

सिध्देश्वर स्थान दरुशनें मुक्ती । ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर ॥३॥

चौर्‍यांयशी सिध्दांचा सिध्द भेटी मेळा । प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष ॥४॥

तयासी नित्यतां घडतां प्रदक्षणा । नाहीम पार पुण्या वास स्वर्गीं ॥५॥

अमृतमय वाहे पुढें इंद्रायणी । भागीरथी आदिकरुनि तीर्थराज ॥६॥

ऐशिया स्थळीं समाधी ज्ञानदेवा । एका जनार्दनीं ठाव अलंकापूर ॥७॥

३५०८.

नमो ज्ञानराजा नमो ज्ञानराजा । निवृत्ति सहजा गुरुवर्या ॥१॥

नमो सोपानदेवा मुक्ताई परेशा । ठाव त्या सर्वेशा कर्‍हातटीं ॥२॥

समाधि वैभव पाहतां नयनीं । चुकतसे आयणी जन्मव्याधि ॥३॥

एका जनार्दनीं म्हणावा आपुला । अंकित अंकिला दास तुमचा ॥४॥

३५०९.

ज्ञानदेव ज्ञानदेव वदतां वाचे । नाहीं कळिकाळाचें भेव जीवां ॥१॥

जातां अलंकापुर गांवीं । मोक्ष मुक्ति दावी वाट त्यासी ॥२॥

ब्रह्मज्ञान जोडोनी हात । म्हणे मी तुमचा अंकित ॥३॥

वाचे वदतां इंद्रायणी । यम वंदितो चरणीं ॥४॥

एका जनार्दनीं भावें । ज्ञानदेवा आठवावें ॥५॥

३५१०.

तुम्हांलागीं हरिहर । येती सत्वर अलंकापुरी ॥१॥

ऐशी थोरी तुमची देवा । न कळे अनुभवावांचूनि ॥२॥

माझे चित्त समाधान । जाहलें ध्यान धरितांचि ॥३॥

आठवी तुमचे गुण । जाहलें खंडन जन्ममृत्यु ॥४॥

वारंवार क्षणाक्षणा । माथा चरणां तुमचिया ॥५॥

भाकितों करुणा वचनीं । शरण एका जनार्दनीं ॥६॥

३५११.

मोक्ष मुक्ति ऋध्दिसिध्दि । पाहतां समाधी ज्ञानदेवा ॥१॥

ऐसा लाभ सांगे देव । ऐके नामदेव आवडी ॥२॥

दरुशनें नासे व्याधी पीडा । ऐसा सवंगडा ज्ञानदेव ॥३॥

एका जनार्दनीं मापारी । नाचतसे अलंकापुरीं ॥४॥

३५१२.

जोडोनियां दोन्ही हात । जगीं जाणवितों मात ॥१॥

एकदा जा रे अलंकापुरा । जन्म वेरझारा चुकवा ॥२॥

आवडीं सांगा जीवींचें आर्त । माउली पुरविती जाणोनी ॥३॥

ज्ञानराज माझी माउली । एका जनार्दनाची साउली ॥४॥

३५१३.

जेथें न पुरे काळाचा हात । काय मात सांगूं त्याची ॥१॥

यमधर्म जोडोनी हात । उभेचि तिष्ठत द्वारेसी ॥२॥

ब्रह्मज्ञान लाळ घोटी । ऐशी कसवटी जयाची ॥३॥

शरण एका जनार्दनीं । लोळे ज्ञानदेवा चरणीं ॥४॥

३५१४.

कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥

न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥

भलतिया भावें शरण जातां भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥

ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥४॥

३५१५.

धन्य जाहलों आतां । अवघी चिंता वारली ॥१॥

आजी देखिलीं पाउलें । सुख जाहलें समाधान ॥२॥

निवारला भाग शीण । पाहतां चरण गोमटे ॥३॥

भय निवारली खंती । दृष्टी मूर्ति पाहतां ॥४॥

समाधी सोहळा देखिला । एका जनार्दन सुखावला ॥५॥

३५१६.

कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा । चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ॥१॥

ज्ञानियाचा शिरोमणी । वंद्य जो का पूज्यस्थानीं । सकळांसी शिरोमणी । ज्ञानोबा माझा ॥२॥

चालविली जड भिंती । हारली चांग्याची भ्रांती । मोक्षमार्गाचा सांगाती । ज्ञानोबा माझा ॥३॥

रेड्यामुखीं वेद बोलविला । गर्व द्विजांचा हरविला । शांतिबिंब प्रगटला । ज्ञानोबा माझा ॥४॥

गुरुसेवेलागीं जाण । शरण एका जनार्दन । चैतन्याचें जीवन । ज्ञानोबा माझा ॥५॥

३५१७.

ज्ञानदेव चतुरक्षरीं जप हा करितु सर्वज्ञा । ज्ञानाज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ।

ज्ञाता ज्ञेय जागे होय ऐसी प्रतिज्ञा । ज्ञानाग्नीनें पापें जळती हें ज्याची आज्ञा ॥१॥

ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतां ज्ञानदेव देतो । वासुदेव होतो अखंड वदनीं वदे तो ॥

ध्रु० ॥ नररुपें विष्णु अवतरला हा भगवान । नदी नद वापी कूप पाहतां उदक नव्हे भिन्न ।

नवल हेचि पशु ह्मौसा करितो वेदाध्ययन । नमन करुनी सद्वावें जपतां होय विज्ञान ॥२॥

देवाधीश देव भक्ताप्रती वर दे । देतां वर ब्रह्मांडा ब्रह्मा आनंद कोंदे ।

देशिकराज दयानिधि अलंकापुरीं जो नांदे । देशभाषा ज्ञानदेवी गीतार्थ वदे ॥३॥

वक्ता श्रोता श्रवणेंपठणें पावती समभाव । वर्णूं जातां अघटित महिमा होतो जीवशिव ।

वंदुनी अनन्य एका जनार्दनीं धरी दृढभाव । वर्षती निर्जर ज्ञानदेवनामें पुष्पांचा वर्षाव ॥४॥

३५१८.

ॐनमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा ॥१॥

तुमचा अनुग्रह लाधलों । पावन जालों चराचरीं ॥२॥

मी कळाकुसरी काहींच नेणें । बोलतों वचनें भाविका ॥३॥

एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥

३५१९.

सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ॥१॥

शिवपीठ हें जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥

वेदशास्त्र देती ग्वाही । म्हणती ज्ञानाबाई आई ॥३॥

ज्ञानाबाईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥

३५२०.

तुमचिया नामस्मरणीं । निशिदिनीं मति लागो ॥१॥

आठव तो मज द्यावा । दुजा हेवा मी नेंणें ॥२॥

वारंवार नाम कीर्ति । आठवीन श्रीपती दयाळा ॥३॥

एका जनार्दनाचा आपुला । पाहिजे सांभाळिला मायबापा ॥४॥

३५२१.

समाधि घेतली आळंदी । भोंवतीं शोभे सिध्द मांदी ॥१॥

सन्मुख पुढें अजानवृक्ष । देव येती तेथें साक्ष ॥२॥

कीर्तन गजरीं । नामघोष चराचरी ॥३॥

ऐसा सोहळा आनंद । एका जनार्दनीं नाहीं भेद ॥४॥

३५२२.

माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव श्रेष्ठमूर्ती ॥१॥

तुम्ही बैसोनि अंतरी । मज जागवा निर्धारीं ॥२॥

तुम्ही सत्ताधारी । प्रपंच करावा बाहेरी ॥३॥

श्रेष्ठा ज्ञानदेवा । एका जनार्दनीं आठवा ॥४॥

३५२३.

अहो दयाळे ज्ञानाबाईं । आर्त माझें तुझ्या पायीं ॥१॥

इंद्रायणीचे तटीं । ज्ञानाबाईं वो गोमटी ॥२॥

सकळ मेळा हो सिध्दांचा । ज्ञानाबाई अनुग्रहाचा ॥३॥

पूर्व पश्चिम देवस्थान । मध्यें ज्ञानाबाई आपण ॥४॥

ऐशी ज्ञानाबाई ध्याऊं । एका जनार्दनीं शरण जाऊं ॥५॥

३५२४.

श्रीज्ञानदेवें येउनी स्वप्नांत । सांगितली मात मजलागीं ॥१॥

दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥

अजानवृक्षाची मुळी कंठास लागली । येऊनि आनंद स्थळीं काढ वेगीं ॥३॥

ऐसें स्वप्न होतां आलों अलंकापुरीं । तंव नदीमाझारी देखिलें द्वार ॥४॥

एका जनार्दनीं पूर्वपुण्य फळलें । श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥

३५२५.

आदिनाथ शंकरे केला उपकार । ठेवणें निर्धार प्रगट केलें ॥१॥

तोचि महाराज निवृत्ति अवतार । केला उपकार जगालागीं ॥२॥

निवृत्तिने गुज सांगितलें ज्ञानदेवा । होतां जो ठेवा गुह्य कांहीं ॥३॥

ज्ञानदेव केले ठेवणें प्रगट । एका जनार्दनीं नीट मार्ग सोपा ॥४॥

३५२६.

पडलें मायावर्तीं शुध्दि नाहीं जया । म्हणोनि अवतार तयां धरणें लागे ॥१॥

धन्य गुरु माझा निवृत्ति दयाळ । दाखविले सोज्वळ पद जेणें ॥२॥

केला उपकार तारिले हे दीन । ज्ञानांज्ञानांजन घालूनियां ॥३॥

नेणती जाणती पडलीं जीं भुलीं । तयां शुध्दि केली त्रिअक्षरीं ॥४॥

एका जनार्दनीं त्रिभुवनीं प्रताप । उजळिला दीप ज्ञानदेवें ॥५॥

३५२७.

अवतार शिवाचा । निवृत्ति साचा जप करा ॥१॥

श्रीविष्णूचा अवतार । स्वामी माझा ज्ञानेश्वर ॥२॥

सोपानदेव तो निर्धार । ब्रह्मयाचा अवतार ॥३॥

मुक्ताईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥

३५२८.

आणिक एक चमत्कार । जेव्हा उद्वस अलंकापूर । तेव्हां रंकांसी आदर । ज्ञानेश्वरें केला ॥१॥

वाणी होउनी आपण । प्रत्यक्ष मांडिलें दुकान । अन्न उदक तृप्त जाण । सर्वही केलें ॥२॥

ऐसें हे कौतुक । आश्चर्य मानती लोक । एका जनार्दनाचा रंक । चरणारविंदींचा ॥३॥

३५२९.

जाले ज्ञानदेव वाणी । आले सामुग्री घेउनी ॥१॥

पर्वकाळ द्वादशी । दिली सामुग्री आम्हांसी ॥२॥

ज्ञानदेवाच्या चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥३॥

३५३०.

उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं मात जयाची ॥१॥

केला भगवदगीते अर्थ । ऐसे समर्थ तिहीं लोकीं ॥२॥

बोलविला रेडा चालविली भिंती । चांगदेवातें उपदेशिती ॥३॥

एका जनार्दनीं समर्थ ते भक्त । देव त्यांचा अंकित दास होय ॥४॥

३५३१.

संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा तो ॥१॥

अर्जुना संकट पडतां जडभारीं । गीता सांगे हरी कुरुक्षेत्रीं ॥२॥

तोचि अवतार धरी अलंकापुरी । ज्ञानाबाई सुंदरी तारावया ॥३॥

गीता शोधोनियां अर्थ तो काढिला । ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ॥४॥

जगाचा उध्दार ज्ञानाबाई नामें । साधन हें आणिक नेणें न करीं कांहीं ॥५॥

एका जनार्दनीं ज्ञानाबाई नाम । पावेन निजधाम संतांचें तें ॥६॥

३५३२.

श्रीज्ञानदेवा चरणीं । मस्तक असो दिवसरजनीं ॥१॥

केला जगासी उपकार । तारियेले नारीनर ॥२॥

पातकी दुर्जन हीन याती । चार अक्षरें तयां मुक्ती ॥३॥

संस्कृताची भाषा । मर्‍हाठी नि:शेष अर्थ केला ॥४॥

ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । अनुभव दावी भाविकां ॥५॥

एका जनार्दनीं अनुभव । समाधि ठावें अलंकापुरीं ॥६॥

३५३३.

भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥

स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी ॥२॥

तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाहीं तया ॥३॥

एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel