३५७१.

उठोनियां बैसतां घरीं । नाम्या म्हणोनी हांक मारी ॥१॥

पाहो नेदी कांही धंदा । लावियेलें आपुल्या छंदा ॥२॥

हा तो जन्माचा भिकारी । सदा हिंडे दारोदारीं ॥३॥

एका जनार्दनीं म्हणे । आपुल्यासारखें केलें येणें ॥४॥

३५७२.

येणें आमुचे पोरा लावियेला चाळा । आपण निराळा वेगळाची ॥१॥

याचें तो बिढार राउळींच असे । आम्हांसी कोपट नसे बैसावया ॥२॥

एका जनार्दनीं किती यासी बोलूं । नायके विठ्ठलु आमुचें तो ॥३॥

३५७३.

नाम्यासी सांगतां नायके विचार । येणें फ़जितखोर केला नामा ॥१॥

घेउनी जवळी बैसे एकान्तासी । सुचुं नेदी त्यासी कामधाम ॥२॥

शिकविलें नायके व्यापारा न जाये । धरले मनीं पाय विठोबाचे ॥३॥

एका जनार्दनीं यासी युक्ति काय । पुढे कार्य आहे नामयाचे ॥४॥

३५७४.

मी तो दरिद्री नाहीं जवळी द्रव्य । कैसा तरणोपाय होय आतां ॥१॥

या नामयाचें कैसें होईल लग्न । कोण देईल धन आम्हांलागी ॥२॥

आमुचा घराचार येणें बुडविला । पोर फ़ितविला काय करुं ॥३॥

या विठोबाचा येणें धरिलासे छंद । आमुचें जाहलें धिंद जगामाजीं ॥४॥

एका जनार्दनीं कोणा सांगूं गुज । कोण आहे मज जीवलग ॥५॥

३५७५.

कान्ता ही अबला नाहीं तिसी ज्ञान । माझें वृध्दपण जाहलें आतां ॥१॥

नवस करुनी हा मागितला नामा । संसार विश्राम होईल आम्हां ॥२॥

येणें तो मनीं धरिला विठ्ठल । याजकडे नाहीं बोल प्रारब्धेंचि ॥३॥

एका जनार्दनीं ऐसा होय कष्टी । तो दामशेटी आपुले मनीं ॥४॥

३५७६.

रात्रंदिवस मनीं करीतसे चिंता । काय हे अनंता कर्म माझें ॥१॥

माझीया अदृष्टीं नाही पुत्रसुख । नित्त्यानित्य दु:ख आम्हालागीं ॥२॥

चालेना व्यापार मज न चले युक्ति । कैशी आतां गति नामयाची ॥३॥

येणे धरिला छंद विठ्ठलाचा मनीं । एका जनार्दनीं काय करुं ॥४॥

३५७७.

लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फ़जिती होय जगीं ॥१॥

सांगतां नायके नाहीं कोणाचा धाक । पंढरीनायक धरिला मनीं ॥२॥

एका जनार्दनीं ऐसें ऐकोनि दु:ख । मग तो नामा देख काय करी ॥३॥

३५७८.

येऊनी राउळा सांगे विठोबासी । वडील आम्हांसी गांजिताती ॥१॥

उदईक कापड घेऊनि बाजारासी जातों । परतोनि येतो सवेंचि घरा ॥२॥

व्यापार करावा तो कैसा मी नेणें । जन्मोनि पोसणें तुमचें देवा ॥३॥

आलें जें भोगांसी ते करणें लागे । एका जनार्दनीं सांगे गुज देवा ॥४॥

३५७९.

ऐकोनियां देव नाम्यासी बोलत । बाजार करुनि त्वरित येई वेगीं ॥१॥

तुज पाहिल्यावांचून मज नोहे समाधान । नाम्या तुझी आण वाहातसे ॥२॥

लौकरी नामया यावें परतोनी । ऐसें चक्रपाणी बोलतसे ॥३॥

एका जनार्दनीं ऐसें बोलोनि सर्वथा । नामा तो तत्त्वतां घरीं आला ॥४॥

३५८०.

त्रिवर्ग भोजना बैसले ते जाणा । गोणाई नाम्याकारण बोलतसे ॥१॥

नाम्या किती शिकवितां नायकसी बाळा । विठ्ठलाचा चाळा नको नाम्या ॥२॥

घेऊनि कापड जाईं बाजारासी । तेणें वडिलांसी समाधान ॥३॥

नामदेव म्हणे उदईक जाईन । एका जनार्दनीं आण वाहातसे ॥४॥

३५८१.

प्रात:काळ झाला । स्नान करुनि नामा आला ॥१॥

जाऊनियां राउळासी । घाली लोटांगण देवासी ॥२॥

जेवूनियां जातों बाजारा । त्वरित येईन माघारा ॥३॥

ऐसें बोलोनि नामा आला । एका जनार्दनीं जेवला ॥४॥

३५८२.

घेऊनि कापड निघे बाजारासीं । आठवी देवासी वेळोवेळां ॥१॥

व्यापार तो कैंचा मज नाहीं ठावा । काय वो केशवा करुं आतां ॥२॥

माझी हे फ़जितीं होईल पांडुरंगा । काय या प्रसंगा करुं जातां ॥३॥

एका जनार्दनीं ऐसा नामा कष्टी । होऊनी हिंपुटी चालिलासे ॥४॥

३५८३.

जाऊनियां माळीं नामा तो बैसला । व्यापार तो केला पाषाणाशीं ॥१॥

देऊनि कापड सुखें आला घरां । सर्व समाचारा विदित केलें ॥२॥

धोंडोबा गणोबा आले ते व्यापारी । तयांचे पदरीं कापड दिलें ॥३॥

आठ दिवसां ऐवज घेऊनियां जावा । एका जनार्दनीं पहावा हस्त त्याचा ॥४॥

३५८४.

आठ दिवसांची ऐवजाची बोली । आहे ते नेमिली नामा सांगे ॥१॥

सांगोनियां नामा राउळासी आला । वृत्तांत सांगितला विठोबासी ॥२॥

कापड विकिलें धोंडोबा गणोबासी । ऐवज आठवे दिवशीं आपुला घ्यावा ॥३॥

एका जनार्दनीं सर्वांचा तो आत्मा । सांगतांचि नामा देव हांसे ॥४॥

३५८५.

देव म्हणे नाम्या व्यापार बरवा केला । दामशेटी तुला रागावती ॥१॥

जाहले आठ दिवस जाईं तूं लौकरी । द्रव्य घेउनी झडकरी यावें मागें ॥२॥

वंदूनि श्रीविठ्ठला घरीं आला नामा । त्याला बोले दामा जाईं आधीं ॥३॥

एका जनार्दनीं आठ दिन जाहले । नाम्या जाय वहिलें ऐवज आणीं ॥४॥

३५८६.

येऊनी नामदेव बोले धोंडोबासी ऐवज आमुचा आम्हांसी द्यावा आतां ॥१॥

तुमचा तो करार जाहलासे संपूर्ण । ऐवज आमुचा जाण आम्हां द्यावा ॥२॥

परि तो प्रत्यक्ष धोंडोबा दगड । अचेतन मूढ जीव नाहीं ॥३॥

धोंडोबा गणोबा एके ठायीं केले । कांहीं तुम्ही वहिलें बोलानाची ॥४॥

एका जनार्दनीं घेउनी धोंडोबासी । आपुले घरासी नामा आला ॥५॥

३५८७.

आणुनी धोंडोबा कोंडियेला घरीं । मात सांगे हरिजवळी नामा ॥१॥

दामशेटी गेला आपुले कारणा । मागें आणिलें जाणा धोंडोबासी ॥२॥

देव म्हणे नाम्या बरें नाहीं केलें । एका जनार्दनीं बोले काय तेव्हां ॥३॥

३५८८.

धोंड्यासी व्यापार कोणी नाहीं केला । आज म्यां ऐकिला वृत्तांत तुझा ॥१॥

उभयतां ऐसी बोलती पैं गोष्टी । तंव दामशेटी घरीं आला ॥२॥

गोणाईनें सर्व सांगितलें त्यासी । पुत्र व्यापारासी उत्तम जाहला ॥३॥

एका जनार्दनीं ऐका त्याचा व्यापार । बुडविलें घर सर्व आपुलें ॥४॥

३५८९.

ऐवजानिमित्त धोंड्यासी आणिलें । कोंडोनी घातिलें घरामाजीं ॥१॥

ऐकतांचि दामा क्रोधयुक्त जाहला । पुसे गोणाईला नाम्या कोठें ॥२॥

बैसला जाउनी काळ्याचे शेजारीं । फ़जिती ती थोरी मांडिली तेणें ॥३॥

एका जनार्दनीं ऐकोनियां मात । दामा आला धांवत राउळासी ॥४॥

३५९०.

येवोनियां रागें नाम्यासी बोलत । व्यापार बहुत निका केला ॥१॥

चतुर व्यापारी जाहलासी सुजाण । आतां आम्हांकारण काय कमी ॥२॥

तुझिये व्यापारें भोपळा हा घ्यावा । भिकेसी बरवा उपाय असे ॥३॥

एका जनार्दनीं दामा बोले क्रोधें । नामा तो सद्वदे उत्तर देत ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel