अजय बॅग घेऊन निघतो. निघताना तो पुन्हा मागे वळून बघतो, नम्रता झोपलेली असते. चेहरा लहान करुन तो आपल्या खिशातून सिगारेट काढतो आणि गाडीत बसतो. गाडीत बसल्यावर वेगळ्याच विचारात तो हरवून जातो. सिगारेट विझवून तो गाडी स्टार्ट करतो. रात्री उशीर रस्त्यावर गाडी चालवत असताना थंड हवेची झुळूक त्याला वेगळाच स्पर्श करीत होती. हवेचा तो प्रत्येक स्पर्श त्याला जाणवत होता.

मुंबई जसजशी जवळ येत होती, तसतशी त्याच्या छातीतली धडधड वाढत होती. मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत होते, 'कुणी मला ओळखलं तर त्या व्यक्तीसोबत बोलावं का?', 'एखादा जुना मित्र भेटलाच तर त्याच्याशी काय बोलणार?', 'जुन्या रस्त्यावरुन गाडी चालवताना त्या आठवणी मनात आल्या तर त्यांचा सामना कसा करणार?', 'पॅडी नाहीतर अभी समोर आले तर त्यांना मिठी मारणार की त्यांच्या पाया पडणार?', 'ते आत्तासुध्दा तिथेच राहत असतील का?', 'शरद मला त्याच्या फोडलेल्या मोबाईलचे पैसे मागणार का? नको मी त्याला स्वतःहून पैसे देणार.', 'पण त्या सर्वांसमोर जाण्याची हिंमत माझ्यात आहे का? नाही! मी त्यांच्या समोर जाण्यालायक आहे का?' अशा असंख्य विचारांनी तो भरकटून जातो.

समोरुन येणारा ट्रक पाहून तो जोरात ब्रेक लावतो आणि त्याची गाडी रस्त्याच्या एका कडेला जाऊन थांबते. अजय गाडीच्या स्टेअरिंगवर दोन्ही हात ठेवतो आणि मान खाली घालून दिर्घ श्वास घेत थोडा वेळ निश्चिंत बसतो. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांच्या आवाजाने तो थोडाफार भानावर येतो तेव्हा गाडीबाहेर पाहिल्यावर त्याला कळतं आपण मुंबईपासून ६५ कि.मी. दूर आहोत.

थोड्याच वेळाने मी मुंबईला पोहोचणार. छातीतली धडधड वाढतच होती. तो घड्याळीकडे बघतो. त्यावेळी रात्रीचे ३.५७ झाले असतात. तरीही तो आपल्या सरांना फोन लावतो.

सर, "हा अजय बोल. इतक्या रात्री फोन केलास." अजय, "हो सर."

सर, "काही प्रॉब्लेम आहे का?"

अजय, "नाही सर, म्हणजे हो."

सर, "कुठे आहेस तू?"

अजय, "थोड्या वेळात मुंबईला पोहोचेन."

सर, "बोल. काय झालं."

अजय, "सर, हिंमत होत नाही तिथे जायला."

सर, "अजय, माय सन. तू बाकीच्या गोष्टींकडे लक्ष नको देऊस. तुझं काम कर आणि निघ तिथून. शर्मा सुट्टीवर गेलाय म्हणून तूला पाठवलंय. फक्त दोन तासांचं काम आहे तुझं तिथे."

अजय, "ओ.के. सर, सॉरी तुम्हाला रात्रीचा त्रास दिला." सारवासारव करत अजय बोलू लागतो. सर, "It's ok. But take care. Good night."

अजय, "Good night, Sir."

अजय फोन ठेवतो आणि रात्रीच्या त्या भयान शांततेत रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करुन दगडावर एकटाच बसून सिगारेटचे झुरके सोडतो.

शरद अजयला आवाज देतो, "ए... अजय इकडे ये लवकर."

अजय, "काय झालं?"

शरद, "ते बघ, सूर्य पाण्यात बुडताना दिसतोय. मी इथे उभा राहतो. तू समोरुन फोटो काढ माझा."

अजय, "असा तो हात बाजूला घे. दुसऱ्या हाताने सुर्याकडे बोट दाखव आणि इकडे बघ. मी डाऊन साईडने कॅमेरा राईट अँगलला फिरवून तुझा फोटो काढतो."

फोटो काढून झाल्यावर, "काढलास का? बघू?"

अजय, "थांब ना. अजून एक घेऊ दे."

शरद, "हा... घे."

अजय, "आता दोन्ही हातांनी केस मागे घेतोय असं दाखव आणि त्याच पोझमध्ये उभा राह." शरद, "असा?"

अजय, "हा, बरोबर. असाच."

प्रसाद, "काय चाललीए तुमची ही फालतुगिरी?"

शरद, "अरे फोटो काढतोय."

गौरी, "ए.... मी पण...."

वृषाली, "अजय, पहिले माझा फोटो काढ."

अजय, "एक काम करा. तुम्ही सगळे उभे रहा. मी एक एक करुन तुम्हा सगळ्यांचे फोटो काढतो. ये अभी तू पण."

अभिजीत, "सॉरी, ते वाच. फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. I never break the rules."

सगळे अभिजीतकडे बघून तोंड वाकडं करतात आणि त्याला चिडवतात. अजय वेगवेगळ्या अँगलने सगळ्यांचे फोटो काढतो.

शरद, गौरी आणि वृषाली, "ए, मला दाखव पहिले." तिघेही भांडू लागतात. प्रसाद त्यांच्याकडून कॅमेरा हिसकावून घेतो आणि फोटो पाहू लागतो. अजयने काढलेले फोटो त्याला खूप आवडतात.

प्रसाद, "अजय...! काय फोटो काढलेस तू यार...!"

सगळेजण फोटो बघतात आणि अजयने काढलेल्या फोटोंचं कौतूक करतात. अभिजीत सुध्दा तिथे जातो आणि फोटो पाहतो. सगळेच फोटो मस्त आलेले असतात. अभिजीत हळूच अजयकडे जातो आणि त्याच्या कानात म्हणतो,

अभिजीत, "अज्या, माझा पण एक फोटो काढ. माझं लक्ष नाहीए असं दाखव. मी म्हणेन माझ्या नकळत काढलास फोटो."

अभिजीत स्पॉटवर जाऊन उभा राहतो आणि सगळ्यांच्या नकळत अजय अभिजीतचा फोटो काढतो, अभिजीतचा फोटो पाहून नंतर स्वतःशीच हसतो. रात्री जेवताना सगळे अजयने काढलेल्या फोटोंचं कौतूक करतात. तेव्हा प्रसाद अजयला म्हणतो,

"तू फोटोग्राफी का नाही करत? तुझे सगळे क्लिक्स मस्त आहेत."

सगळेच प्रसादच्या 'हो' ला 'हो' लावतात आणि अजयसाठी आणलेला कॅमेरा त्याला गिफ्ट म्हणून देतात. अजयसाठी हा आश्चर्याचा सुखद धक्का असतो. मित्रांकडून मिळालेली एवढी महागडी वस्तू हातात घ्यायलाही त्याला भिती वाटते. माझ्यासाठी एवढं का? सगळ्यांनी जरी एकत्र घेतली असेल तरी ती वस्तू महागाची आहे. मी ती कशी वापरु? अजय कॅमेरा वापरायला नकार देतो.

प्रसाद, "काय प्रॉब्लेम आहे तुला? आम्ही असंच म्हणून दिलाय तुला. मला माहितीये, तुला फोटो काढायला खूप आवडतात."

अजय, "अरे पण मी कधी इतका महागाचा कॅमेरा वापरलेला नाहीये."

शरद, "स्वस्तातला कॅमेरा सुध्दा तू कधीतरी पहिल्यांदाच वापरला होतास ना! हा पण तसाच वापरशील."

सगळे शरदकडे बघून टाळ्या वाजवू लागतात.

सर्वांना आवरत अजय, "नाही रे. चुकून माझ्याकडून फुटला वगैरे तर?"

शरद, "मग दुसरा घेऊन देऊ." सगळे शरदकडे रागाने बघतात.

अजय, "नको मला. प्लीज."

अभिजीत, "काय चाललंय. किती वेळपासून नको नको म्हणतोएस. तुला नसेल पाहिजे तर तसं सांग. मी घेतो."

प्रसाद, "तू काय करशील कॅमेऱ्याचं."

अभिजीत, "काही नाही. जस्ट दाखवेल, माझ्याकडे महागाचा कॅमेरा आहे"

शरद, "बघ अजय, तू हा कॅमेरा वापरला नाहीस तर ह्या कॅमेऱ्याची अवस्था काय होईल."

अभिजीत, "शांतपणे हा कॅमेरा घे. आम्ही गिफ्ट म्हणून दिलाय. बाहेर बघ कुठेही आणि तुला वाटेल त्या क्षणाला ह्या कॅमेऱ्यामध्ये कैद कर. नसेल काही जमत तर आमचे फोटो काढ."

शरद, "हो. तेवढाच तुझा हात साफ होईल."

प्रसाद, "मुलींना खाण्याशिवाय काही कामच नाही."

गौरी, "अरे तुम्ही बोलताय ना त्याच्याशी म्हणून आम्ही शांत बसलोय. अजय घे तू तो कॅमेरा."

वृषाली, "हो अजय, घेत तो कॅमेरा."

काजल, "घे रे अजय भाय. पहिला फोटो माझाच काढायचा हं...."

अजयचे डोळे पाणावतात आणि तो प्रसाद, अभिजीत, शरदला मिठी मारतो.

एक ट्रक वेगाने हॉर्न वाजवत निघून जातो आणि शांतता भंग पावते. अजय शुध्दीवर येतो. इकडेतिकडे बघतो. आपण आयुष्याच्या रस्त्यावर भरकटलो आहोत. मित्रांशिवाय आयुष्य अंधःकारमय झालंय. आपण एकटे पडलो आहोत ही जाणीव त्याला होते आणि तो गाडीत जाऊन बसतो. मित्रांशिवाय आयुष्यातील रंग उडू गेलेत आणि हा अंधार माझ्या वाट्याला आलाय. जुन्या आठवणींच्या नव्या जगात जायचं असेल तर मला पुढे जाऊन संकटांचा सामना करावा लागेल नाहीतर मागे परतून वर्तमानातील दडपणांवर आणि सासऱ्याने केलेल्या उपकारांवर जगावं लागेल.

कोणताही माणुस हा आयुष्यभर सुखी नसतो. दुःख हे थोडा वेळ का होईना, त्याच्या आयुष्यात येतचं. बऱ्याचदा आलेलं दुःख घेऊन आपण आयुष्यभर रडत बसतो. पण आलेल्या दुःखातून मार्ग काढून मिळेत त्या सुखावर समाधान माननं किंवा दुःखाचं सुखात रुपांतर करनं आपल्याच हातात असतं. अजय घड्याळीकडे पाहतो, पहाटेचे ५:२४ वाजले असतात. त्याच्या मनात एक सकारात्मक विचार येतो. पहाटेच्या शुध्द आणि प्रसन्न अशा वातावरणात त्याच्या मनातील वाईट विचार हळूहळू कमी होऊन नाहीसे होतात. आज ही नवी पहाट झाली आहे. आयुष्याच्या वळणावर अजून एक पहाट माझी वाट पाहत आहे. फक्त मी त्या दिशेने प्रवास केला पाहिजे. त्या मार्गावरील संकटांना तोंड दिलं पाहिजे. मी त्या वेळी चुकीचा होतो मात्र, आता मला माझ्या चुकांची जाणिव झाली आहे. मला माझ्या चुकांचं प्रायश्चित करायचंय. माझे मित्र माझा स्विकार नक्कीच करतील. उत्साहाने भारावून गेलेला अजय सिगारेटचं पाकिट गाडीबाहेर फेकतो आणि मुंबईच्या दिशेने वळतो.

मुंबईत आल्यावर अजयला भरपूर बदल जाणवतात. रस्त्यांवरील खड्डे त्याला दिसत नाही. ट्रॅफिक जॅमचं प्रमाण कमी झालेलं असतं. अनेक कंपन्या आणि खासगी वसाहतींनी सौर-उर्जेचा वापर केलेला दिसतो. घड्याळीच्या काट्याावर काम करीत असले तरी सतर्कतेचं आणि सुशिक्षीत नागरिकत्वाचं शिक्षणच जणू काही मंुबईकरांनी घेतलंय. आता मुंबईला दहशतवादाचा धोकाच उरला नव्हता. तशी व्यवस्थाच मुंबईमध्ये त्याला दिसत होती. रस्त्याने तो बिनधास्तपणे आणि व्यवस्थित गाडी चालवत होता.

त्याने बाहेर पाहिले. एक गाडी त्याला ओव्हरटेक करुन जाते आणि ती गाडी अशोक चालवतोय. प्रसाद त्याच्या बाजूला बसून गाडीबाहेर हात काढलाय. गौरी, काजल, वृषाली त्यांच्या पाठीमागे बसल्या आहेत. आणि शेवटी गाडीचा दरवाजा उघडून अभिजीत, शरद आणि अजय स्वतः त्याला हात दाखवताहेत हे चित्र आपोआप त्याच्या डोळ्यासमोर तयार होतं आणि लगेच अदृश्य होतं.

मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वे यांच्या माध्यमाने मुंबईला घातलेली नवी माळ लक्ष वेधून घेत होती. मुंबईची एक वेगळी ओळख आणि एकविसाव्या शतकातील इंजिनिअर्सचा आविष्कार असलेला वांद्रे-वरळी सागरी सेतू (सी-लिंक) यावरुन तो त्यांच्या कंपनीमध्ये जातो आणि आपलं काम अकरा वाजेपर्यंत पूर्ण करतो.

काम झालं होतं. तरीही तो ऑफिसमध्ये बसून होता. त्याने आपल्या जुन्या ई-मेल आय.डी.चा वापर करुन फेसबूक उघडलं तर प्रसाद, शरद, अभिजीत, गौरी, वृषाली, अशोक, काजल, रुपाली, सागर यांपैकी कोणी एखाद्या ऑनलाईन असेल तर त्या व्यक्तीशी संपर्क साधता येईल, या अंधूक आशेवर तो राहतो. साडेअकरा वाजतात, बारा मग एक, दिड, अडीच. अजय जेवत सुध्दा नाही. सतत लॅपटॉप रिफ्रेश करत असतो. जवळजवळ चार तास सतत चालू राहिल्याने त्याच्या लॅपटॉपचा प्रोसेसर गरम झालेला असतो. ऑफिसमधून एक व्यक्ती त्याच्यासाठी बर्गर घेऊन येते.

अजय, "पण मी तर काही मागितलं नाही."

कामगार, "हो सर, पण आपण दिल्ली ऑफिसमधून आला आहात. आपला योग्य तो पाहूणचार व्हायला हवा. बाहेर विचारलं तेव्हा कळलं तुम्ही त्या प्रोजेक्ट संदर्भात दिल्लीहून आलात इथे. सर, प्लीज हा बर्गर घ्या. तुमच्यासाठीच आणलाय."

अजय स्मितहास्य करतो आणि बर्गर घेतो. त्याचं ऑफिसमधल्या त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तो फेसबूकमध्येच गुंतलेला असतो.

तर दुसरीकडे प्रसाद आपल्या घरी शांतपणे झोपलेला असतो. शरद आणि काजल, अनामिकासोबत बाहेर खेळत असतात. अशोक गाडी धूत असतो. अनामिकासोबत खेळत असताना शरद जोरात बॉल फेकतो. बॉल गाडीजवळ येतो. अशोक रागाने तो बॉल काजलकडे फेकतो. शरद गंमत म्हणून त्याच्याकडे जातो आणि विचारतो,

शरद, "एवढी काय गाडीची काळजी घेतोस? इतक्यात एखादी पोरगी पटवली असतीस."

अशोक, "पटवायला काय पटवली असती. पण त्यांचे चोचले पुरविण्याची कॅपिसिटी माझ्यात नाही."

शरद, "कॅपिसिटी?"

अशोक, "हा... कॅपिसिटी."

शरद हसतो आणि अशोकला गाडी धुवायला मदत करतो. दोघेही गप्पा मारण्यात गुंग होतात. शरद, "अशोक, कालच्या मॅचचं काय झालं?"

अशोक, "पंजाब जिंकला."

शरद, "पंजाब जिंकला?"

अशोक, "हो..."

शरद, "हं.... पंजाब संघ टेनिस कधीपासून खेळायला लागला?"

अशोक, "टेनिस? मला वाटलं आय.पी.एल.बद्दल विचारतोएस."

शरद, "तू कधीपासून आय.पी.एल. बघायला लागलास?"

अशोक, "तू कधीपासून टेनिस बघायला लागलास?"

शरद, "जेव्हापासून बाजूच्या सोसायटीतल्या मुली बॅडमिंटन खेळायला लागल्या."

दोघेही हसतात.

अशोक, "पण टेनिसचा आणि बॅडमिंटनचा संबंध काय?"

शरद, "सारखंच तर आहे. आपल्याकडे रॅकेट वापरतात आणि बाहेरच्या देशात टेनिस बॉल."

अशोक, "असू दे. तुझ्याशी वाद घालत बसलो तर माझं टेनिसचं नॉलेज कमी होईल."

शरद, "तू त्या काजलच्या मैत्रिणीची डिटेल्स घेतलीस का?"

अशोक, "मला फक्त तिचं नाव कळलं. अं...... हा... सारिका नाव आहे तिचं."

शरद, "सारिका.... आणि मागे-पुढे काही नाही का?"

अशोक, "फेसबूकवर चेक कर ना. तिच्या अकाउंटमध्ये सापडेल ती तूला."

शरद, "हा. बेस्ट आईडिया आहे."

शरद त्याचा मोबाईल चालू करतो तर त्याचं बॅलेन्स संपलेलं असतं. मग तो अशोकला त्याचा मोबाईल मागतो. अशोक नाही म्हणतो. शरद काजलला विचारतो, कंप्युटरचा पासवर्ड काय आहे? काजल अनामिकाचं नाव टाईप कर, असं सांगते. घरात शिरल्यावर प्रसादने मिनाक्षीला मिठीत घेतलेलं असतं. तो डोळे बंद करतो आणि तसाच घरातून बाहेर निघतो.

अशोक, "काय रे? काय झालं?"

शरद, "काही नाही. चल गाडी धुवूया."

अशोक, "आणि सारिका?"

शरद, "आपला बॅडलकच खराब आहे."

दोघेही गाडी धुवू लागतात. काजल अनामिकाला घेऊन बाहेर निघते.

शरद, "कुठे चाललीस?"

काजल, "वाजले बघा किती? रोज सहा वाजता मी अनूला गार्डनमध्ये घेऊन जाते."

शरद - अशोक हात जोडून, "जाऽऽ..."

काजल निघते आणि ती जात असताना दोघे तिच्याकडे मागून (पुरुषांच्या नजरेने) बघत राहतात. अशोक, "माल काय मस्त दिसतोय ना मागून."

शरद, "एकदम कडक."

अशोक, "च्यायला, पण ती आपल्या मित्राची बहिण आहे रे." दोघे थोडा वेळ शांत होतात.

शरद, "तुझ्यासाठी दुसरी बघ. ती तुझी होणारी वहिनी आहे."

अशोक, "लग्न झालेले लोक किती सुखी असतात ना, शरद."

शरद, "हो ना. आणि ज्यांच्याकडे गर्लफ्रेंड आहेत ते सुध्दा किती सुखी असतील."

शरद, "खरचं, काय बनवलं असेल ना देवाने ह्या मुलींना? कुठल्याही अॅंगलने बघा. मजा येतेच"

अशोक, "हो रे..."

गाडी धुवायचं सोडून दोघेही स्वर्गात पोहोचून बोलू लागतात, दोघांच्या अवतीभोवती अप्सरा फिरू लागतात, सफेद धुक्यांमध्ये त्या अप्सरा त्या दोघांचं मनोरंजन करीत होत्या, इतक्यात यमाप्रमाणे प्रसाद घरातून धावत धावत बाहेर निघतो आणि अशोकला लगेचच गाडी सुरु करायला सांगतो. अशोक गाडी स्टार्ट करतो. शरद आणि प्रसाद गाडीमध्ये बसतात. शरद, "काय झालं?"

प्रसाद, "गरिबाच्या वाड्यावर चल."

अशोक, "आत्ता? गाडीमध्ये डिझेल नाहिये."

प्रसाद, "मी भरतो."

शरद, "तूच भरणार आहेस. आमच्याकडे कुठे पैसे आले?" शरद आणि अशोक एकमेकांना टाळ्या देत हसू लागतात.

"फालतूगिरी बंद करा जरा." एवढं बोलून प्रसाद फोनवर बोलू लागतो. "हा.... हो.... ओ.के..... ठिक आहे.... तू पोहोच तिथे, आम्हाला अजून पाऊन तास लागेल.... चालेल.... हो.... हो.... चल बाय."

अशोक, "कोण येतंय?"

प्रसाद, "येतंय नाही, आलंय. अजय आलाय."

अशोक - शरद, "काय...!!"

अशोक, "तुला कसं कळलं?"

प्रसाद, "रुपालीचा फोन आला होता. ती फेसबूकवर ऑनलाईन होती तेव्हा अजयने तिच्याशी जुन्या अकाउंटवरुन चॅटिंग केली. त्याने तिला माहिती सांगितली आणि तिने लगेच कॉन्टॅक्ट करुन मला सगळं सांगितलं. शिका जरा त्या मुलीकडून. इतक्या लांब राहून काहीतरी करुन दाखवलं तिने."

शरद, "मी पण फेसबुकवरुन करुन दाखवलं असतं. पण तेव्हा तूच घरात काहीतरी करुन दाखवत होतास."

प्रसाद. "काय? समजलं नाही."

शरद, "नाही, काही नाही."

बोलता बोलता तिघेही गरिबाच्या वाड्याजवळ येतात. दरवाजा उघडा असतो आणि बाहेर मोठ्ठी गाडी उभी असते. न सांगताच समजून जातं, ती गाडी अजयची आहे. तिघेही आतमध्ये शिरतात तेव्हा,

अजय, "चहासोबत बिस्कीट घेणार की सिगारेट?"

तिघेही अजयला पाहून खूश होतात. आनंदाने भारावून अजय आणि तिघेही एकमेकांकडे धावून एकमेकांना घट्ट मिठीत घेतात. चैघांचे डोळे पाण्याने भरतात.

अजय, "भाई, ओरडणार नाही का?"

प्रसाद, "आलास ना परत, ओरडायचं कशाला?"

अजय, "प्लीज, कोणीतरी कानाखाली वाजवा माझ्या."

शरद, "किती अशक्त झालास रे तू."

प्रसाद, "सगळं इथेच बोलशील का? घरी नाही यायचं?"

अजय, "नाही."

अशोक, "का?"

अजय, "मी... त्या लायकीचा नाही."

प्रसाद, "मागचं सगळं विसरुन जा."

अजय, "कसं विसरणार मी पॅडी? माझ्या एका चुकीमूळे आज आपला ग्रुप वेगळा झाला आहे. पैशाच्या मागे लागलो नसतो तर आज आपण सगळे सोबत असतो."

शरद, "आता तरी सोबत आहोत ना! चल आता डोळे पूस आणि घरी चल."

अजयचा चेहरा थोडा प्रसन्न होतो. चौघेही घरी निघतात.

मिनाक्षी, "कुठे गेला होतात इतक्या घाईघाईत? फोन पण नाही उचललात. जीव किती घाबरला होता माझा."

काजल, "काय झालं दादा?"

प्रसाद, "जरा बाहेर बघ कोण आलंय ते?"

काजल बाहेर जाते तेव्हा शरद आणि अशोकसोबत अजय घरी येत असतो. काजलला संताप येतो. ती तशीच दरवाजात उभी राहते.

काजल, "थांब तिथेच."

शरद, "काय झालं काजू?"

काजल (रागाने), "तो इथे का आलायं?"

प्रसाद आतमधून बाहेर येत, "काय करतेस तू? येऊ दे ना त्याला आत."

प्रसादच्या मागून मिनाक्षी अनामिकाला घेऊन येते.

काजल, "त्या माणसाला सांग ताबडतोब इथून निघून जायला."

अजय, "काजू, माझं ऐकण्याचा..."

काजल, "तुझ्या तोंडून नाव घेऊ नकोस माझं."

प्रसाद, "तुला काय झालंय?"

काजल, "त्याच्यामुळे माझ्या वहिणीने आणि दादा तू, तूमचं मूल गमावलंय."

मिनाक्षीच्या आणि तिथे उभ्या सगळ्यांच्या काळजाला ही गोष्ट लागते.

मिनाक्षी, "जुन्या गोष्टी काढून नक्की काय करायचंय तूला?"

काजल, "वहिनी हा हत्यारा आहे."

प्रसाद, "काजल, तू आत जा अगोदर."

अजय, "नको प्रसाद, बोलू दे तीला. ती चूकीचं काय बोलतेय? हत्याराच आहे मी. फक्त पैशांसाठी पहिले मैत्रीतील विश्वासाचा खून केला. त्यानंतर एक मित्राच्या प्रेमाचा, मग एकाच्या..." अजयच्या डोळ्यातून पाणी येतं. थोडा वेळ तो शांत होतो.

काजल, "एका आईला तिचं मूल गमावन्याचं दुःख काय असतं हे तूला काय माहीत?"

मिनाक्षी मागून येते आणि जोरात काजलच्या कानाखाली वाजवते. चौघेही बाहेरच स्तब्ध उभे राहतात. काजलला रडू येतं. अचानक वातावरण गंभीर झालेलं पाहून अनामिका घाबरते आणि काजलला रडलेलं पाहून तीसुध्दा मोठ्याने रडू लागते.

मिनाक्षी, "काय तमाशा चाललाय हा तुझा? नक्की तुला काय म्हणायचंय? जुन्या गोष्टी परत काढायच्या नाहीत असं ठरलं होतं ना! मूल गमावन्याचं दुःख हे त्या आईपेक्षा जास्त कुणालाही कळत नसतं." मिनाक्षी एकाएकी थांबते.

प्रसाद पुढे होतो आणि काजलसमोर हात जोडून, "गैरसमजातून मागे मी माझं मूल गमावलं होतं तसं मी माझा मित्रदेखील गमावला होता. दोन्ही दुःख माझ्यासाठी सारखीच होती. आता ते मूल तर परत येऊ शकत नाही. पण मित्र तर परत आलाय. त्याला..." प्रसादचा आवाज एकाएकी बंद होतो. काजलला राहवत नाही. ती लगेच प्रसादचे हात झटकते आणि रडत घरात आपल्या बेडरुममध्ये जाते.

शरद, "तुम्ही बोला, मी समजावतो तिला."

अजय तसाच स्तब्धपणे उभा असतो. प्रसाद, अशोक आणि मिनाक्षी त्याच्याजवळ येऊन त्याच्याशी काय बोलताहेत हे त्याला ऐकू येत नाही. तो भुतकाळात जातो.

प्रसाद, "अजय, प्लीज यार असं करु नकोस."

अजय, "अरे मग दुसऱ्यांकडे जा ना ! नशीब माझ्याकडे चालून आलंय, अभिजीतसारखा मुर्खपणा मला करायचा नाहीये."

प्रसाद, "माझी पत्नी हॉस्पीटलमध्ये अॅडमिट आहे."

अजय, "मग मी आता काय करायला हवं?"

प्रसाद, "असा सगळ्यांना सोडून जाऊ नकोस. तुझी गरज आहे आम्हाला."

अजय, "पॅडी हे बघ. वहिनी हॉस्पीटलमध्ये अॅडमीट आहेत, त्यांना तुझी गरज आहे. मला परत न्यायचा विचार करु नकोस. मी नाही येणार."

प्रसाद, "अजय, तुझं चुकतंय, अभीसारखी चूकी तुझ्याकडून होतेय म्हणून मी तूला अडवतोय."

अजय, "ए भाई, तो साला प्रेमात वेडा झालाय. मी माझी लाईफ सेट करतोय."

प्रसाद, "मुलीच्या मागे लागूनच पैशाच्या मागे चाललास ना तू."

अजय, "तूला जे समजायचंय ते समज. नाऊ गेट लॉस्ट."

प्रसाद, "तू जोपर्यंत माझ्यासोबत येणार नाहीस तोपर्यंत मी इथून जाणार नाही."

मिनाक्षी, "अजय...."

अजय एकाएकी शुध्दीवर येतो. "हा वहिणी..."

मिनाक्षी, "कुठे हरवला होतास?"

अजय गुडघ्यांवर बसतो, हात जोडून प्रसाद आणि मिनाक्षीची माफी मागू लागतो, "माफ करा मला. भरकटलो होतो मी तेव्हा. मला माहितीये मी माफीच्या लायक नाही."

शरद काजलला घेऊन बाहेर येतो.

प्रसाद, "अजय, एकमेकांबद्दलचे गैरसमज हे नात्याला नेहमी मारक ठरतात. तेव्हा वेळीच खरं काय हे जाणून घेतलं तर तूटणारी नाती वाचवता येऊ शकतात. एक गोष्ट लक्षात ठेव, नात्यांना कधीच 'नैसर्गिक मृत्यू' येत नाही तर त्यांचा 'खून' केला जातो. त्या वेळी मी माझं मूल गमावलं तेवढंच दुःख मला तुला गमावण्याचं होतं. ते मूल परत येऊ शकत नाही," काजलकडे बघून,

"पण काजल, माझा मित्र तर परत आलाय ना." काजल होकारार्थी मान हलवते.

मिनाक्षी, "शी बाबा, इतक्या दिवसांनी भेटले आणि हे कसले विषय काढत बसले तुम्ही सगळे. चला आत, दमलेले असाल, फ्रेश व्हा. मी जेवायला ताटं करते."

अजय, "काजल?"

काजल स्वतःचा राग आवरत, "ये ना! तुझ्याच मित्राचं घर आहे."

घरात प्रवेश केल्यानंतर सगळे अगोदर फ्रेश होतात. प्रसादच्या घरी अजयच्या घराप्रमाणे डायनिंग टेबलची सोय नसते. सगळे खाली जमिनीवर बसून जेवत असत. या वेळी सुध्दा सगळे खालीच बसले.

शरद, "काय झालं?"

अजय, "काही नाही, बरेच दिवस झाले जेवायला कसं बसतात, तेच विसरलो होतो. आज मी खूप दिवसांनी मनासारखं जेवणार आहे."

प्रसाद अनामिकाला घेऊन किचनमध्ये येतो आणि अजयच्या बाजूला बसतो. तेव्हा त्या सर्वांच्या महत्त्वाच्या गप्पांना सुरुवात होते.

अशोक, "असा अचानक कसा आलास मुंबईला?"

अजयने जेवण करायला सुरुवात देखील केलेली नसते. पुन्हा सगळे अशोककडे रागाने बघतात. अजयचं मन देखील याच प्रश्नाची वाट पाहत असतं. तो म्हणतो, "भरकटलो होतो मी त्यावेळी..."

प्रसाद, "हा... जेवून घे अगोदर. मग आपण बोलू."

अजय, "नाही प्रसाद. नाहीतर मला जेवण जाणार नाही. प्लीज ऐक. त्यावेळी भरकटलो होतो मी. फक्त फोटोग्राफी करतो यावर घर चालणार नाही असं ते मला म्हणायचे. रोज रात्री घरी भांडणं व्हायची. पैसा, पैसा आणि फक्त पैसाच पाहिजे होता त्यांना. तसं बघायला गेलं तर त्यांचं काही चूकीचं नव्हतं. रिटायरमेंटला दोन वर्ष बाकी होती. अजून साडेअठरा लाखांचं भलंमोठ कर्ज फेडायचं राहिलेलं. त्यातच माझ्या लग्नासाठी धावपळ. या सगळ्या गोष्टी तेव्हा मला मनातल्या मनात खूप टोचत होत्या. त्यावेळी मी ठरवलं. काही करुन पैसा कमवायचाच. आई-बाबांना खूश ठेवायचंच. पण माझं ऐकणारं कोणीही नव्हतं. अभी आपला खास होता. मी त्याला सर्व सांगायचो. पण नंतर तो स्वतःची वाट लावून बसला होता. मी पूर्णपणे एकटा पडलो होतो. तेव्हा मला नम्रता भेटली."

शरद, "वहिनी, डाळ वाढा ना!"

आता सगळे शरदकडे रागाने बघतात. शरद मान खाली घालतो. सगळे पुन्हा अजयच्या बोलण्याकडे लक्ष देतात.

अजय, "नकळत मी तिच्याकडे आकर्षित झालो. तेव्हा आपल्या ग्रुपचं खूप नाव होतं. तिच्या वडिलांना देखील मी पसंत होतो. ते खूप श्रीमंत होते. माझ्या घरची परिस्थिती बघून मी तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. ती सुध्दा तयार झाली. पण तिच्या वडिलांनी एक अट सांगितली. लग्न करायचं असेल तर तुला ग्रुप आणि फोटोग्राफी दोन्हीही सोडावी लागेल. तुमच्या ग्रुपमधल्या अभिजीतने त्याच्या प्रेयसीबरोबर जे काही केलं ते पाहता माझी मुलगी तुझ्यासोबत खूश राहील असं मला वाटत नाही. तुला नम्रता हवी असेल तर त्या सर्वांना विसरावे लागेल आणि माझ्या बिझनेसमध्ये लक्ष द्यावे लागेल. पॅडी तूला माहित नाही. माझा सासरा हाच माझा बॉस आहे."

प्रसाद समजून घेत होकारार्थी मान हलवतो.

अजय, "तुम्हाला नाही माहित, मी विचार केला. लग्न झाल्यावर मी बाबांचं सर्व कर्ज फेडून टाकेन. नम्रता सुध्दा मला मदत करेलच. शेवटी मी तुम्हा सगळ्यांना सोडून नम्रताकडे गेलो. तिच्याशी लग्न करुन बाबांचं सगळं कर्ज फेडलं. बाबांना आणि आईला आमच्यासोबत दिल्लीला घेऊन गेलो. पण अगोदरपासून स्वाभिमानी जीवन जगत आलेले माझे बाबा माझ्या या निर्णयाशी सहमत नव्हते. मी बिझनेसमध्ये शिरलो. एक एक करुन तुम्हा सगळ्यांना विसरलो. बिझनेसमध्ये इतका गुंतलो की..." अजय डोळ्यात आलेलं पाणी पूसतो.

काजल काळजीने विचारते, "इतका गुंतलो की, पुढे काय?"

अजय, "आई-बाबांच्या देहाचा अंत्यसंस्कार सुध्दा मला करता आला नाही." अनामिका झोपलेली असते. सर्वांचे डोळे पाण्याने भरतात.

प्रसाद, "मागे आपल्या सर्वांकडून खूप चुका झाल्या, ज्याची शिक्षा आज आपण सगळे भोगत आहोत. तुम्ही सगळे लांब गेल्यावर अनेकांनी माझ्याकडे बोट दाखवलं. मी पूर्णपणे खचून गेलो होतो. तरीही मला विश्वास होता की, माझा मित्र नक्कीच परत येईल. आणि बघ तू आलास."

अशोक, "हो, आपली म्युझिक कॉम्पिटीशनची आयडिया सक्सेसफूल झाली असं म्हणावं लागेल." शरद, "हो रे."

अजय, "नाही. बाबांनी लिहिलं होतं त्यांच्या पत्रात."

काजल, "काय लिहिलं होतं?"

अजय खिशातून एक कागद काढतो, "माझ्या लाडक्या लेकरा, माझ्यासाठी तू एकूलता एक आहेस. तुझे सगळे हट्ट आम्ही पूर्ण केले कारण तूला होणारा छोटासा त्राससुध्दा आमच्यासाठी खूप वाईट होता. मी इतकी वर्ष टपालात काम करत होतो, मला सतत वाटायचं, माझ्या मुलाची एक वेगळी ओळख असावी. माझ्यासारखं आयुष्य त्याच्या वाट्याला येऊ नये. आणि अजय, तुझे मित्र आणि तू माझ्या मनाला समाधान द्यायचे. तुम्हा सर्वांची मैत्री हे दाखवून देत होती की, मित्रच असा असतो जो आईवडिलांनंतर आपल्यावर संस्कार करत असतो. त्याच्या पुढच्या आयुष्यात आलेलं यश हे त्याच्या मैत्रीच्या संस्कारातून आलेलं असतं. आणि तू आमच्यासाठी तुझ्या जीवाभावाच्या मित्रांना गरजेच्या वेळी सोडलंस. मला हे अजिबात आवडलं नाही. माझ्या शवाला अग्नी दिल्याने माझ्या आत्म्याला शांती मिळेल असं तू समजत असशील तर ते चूकीचं आहे. तू तुझ्या मित्रांकडे परत जा. प्रत्येक आईवडील त्यांच्या मुलाचं भलंच चिंतीत असतात. तू तुझ्या मित्रांकडे परत गेलास तर मला आनंद होईल. आणि तूला फोटो काढायला आवडतात ना! काढ, बिनधास्तपणे फोटो काढ."

काजलचा अजयबद्दल आलेला राग शांत होतो.

अजय, "एक वर्ष झालं बाबांना जाऊन. खूप आठवण काढत होते ते तुझी आणि अभीची. शेवटच्या क्षणाला देखील त्यांच्या तोंडात तुमच्याच दोघांचं नाव होतं. बाबा गेल्याचं दुःख आईला सहन नाही झालं आणि आईसुध्दा गेली. नम्रता सोबत असून देखील मी पूर्णपणे एकटा पडलो होतो. प्रसाद..."

प्रसाद, "प्रसाद नाही, पॅडी."

अजय, "पॅडी, मला सुध्दा तुम्हा सर्वांची खूप गरज होती."

प्रसाद अजयच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, "आता आहोत ना आम्ही. सगळं व्यवस्थित होईल. जेव आता, खूप बोललास."

जेवून झाल्यावर मिनाक्षी आणि काजल जेवणाची भांडी उचलतात. मिनाक्षी म्हणते, "तुम्ही सगळे गच्चीवर जा. बोला थोडावेळ. आम्ही इथलं आवरतो."

प्रसाद, "काजू, आज तू अनू आणि मिनूसोबत झोप. आम्ही सगळे टॅरेसवर झोपतो."

मिनाक्षी, "गच्चीवर चालले का? मी चादर पाठवते काजलकडे"

प्रसाद, अजय, अशोक आणि शरद टॅरेसवर जाऊन बसतात.

अजय, "मस्त वाटतं ना. थंडगार हवा. आकाशात तारे स्पष्ट दिसताय. खूप बरं वाटतंय."

प्रसाद, "इथे जास्त गजबज नाही म्हणून ठिक आहे. नाहीतर मुंबईला सुध्दा काही स्पष्ट दिसतच नाही आकाशात."

अजय, "पॅडी, एक विचारायचंच राहिलं."

प्रसाद, "बोल."

अजय, "आपला बॅंण्ड परत सुरु का केला?"

शरद आणि अशोक प्रसादच्या चेहऱ्याकडे बघत बसतात.

प्रसाद, "आपला ग्रुप तुटला तेव्हा मी सुध्दा चुकलो होतो. स्पर्धेत टिकून रहायचं म्हणून मी स्वार्थी झालो होतो. आपल्या अभीच्या प्रेमाचा बळी दिला मी. मीच जर तेव्हा हट्ट धरुन बसलो नसतो तर आज अभी आणि तू, तुम्ही दोघेही खूप खूश असता. आपला ग्रुप पूर्णपणे वेगळा झाला तेव्हा मी इथे राहायला आलो. दिड वर्ष सगळ्यांपासून तोंड लपवून बसलो होतो मी. मिनूला दिवस गेले आणि मी घराबाहेर पडायचं ठरवलं. दिड वर्षांनंतर सुध्दा बाहेर माझा चेहरा भरपूर लोकांनी ओळखला. पण मी माझी ओळख लपवली. बाहेरचं जग खूप भयानक आहे म्हणून मी सगळ्यांपासून लपून बागेत माळ्याचं काम करु लागलो. इथे मला कोणीही ओळखत नव्हतं. अशोक आणि शरद एकाच ठिकाणी जॉबला होते. मी काम करत असलेल्या बागेत ते सहजच आले. त्यांच्याजवळचं पाणी संपल्याने त्या दोघांनी माझ्याकडे पाणी मागीतलं. तेव्हा त्यांना कळलं, मी प्रसाद आहे. नंतर आम्ही तिघं भेटू लागलो. मी बागेत काम करतोय हे त्या दोघांना अजिबात आवडलं नाही. मग आम्ही तिघांनी मिळून कंप्युटर क्लास सुरु केला. तिथून सगळं व्यवस्थित चालत होतं. पण नशिबसुध्दा काय खेळ खेळत असतं. आताच चार महिन्यांपूर्वी आपल्या पहिल्या म्युझिक कंपनीने आम्हाला बोलावलं आणि आपल्या ग्रुपबद्दल विचारलं. आपला भुतकाळ त्यांना माहित होता. त्यांनी मला ह्या  कॉम्पिटीशनच्या खोट्या सहभागाची आयडिया सांगितली. ते म्हणाले. एकदा स्टेजवर उतरुन तर बघ. कदाचित तुझे मित्र परत येतील."

अजय, "त्या दिवशीचा परफॉर्मन्स म्हणजे फक्त एक नाटक होतं? आपण यापुढे परफॉर्मन्स करणार नाही?"

अशोक, "अभीशिवाय आपल्याला कोणी अॅक्सेप्ट करेल का? त्या दिवशी तरी कुठे केलं? सगळ्या स्टेडियमवर अभीचंच नाव ऐकू येत होतं."

अजय, "अरे यार, अभीबद्दल विचारायचं राहूनच गेलं. अभीचा काही पत्ता लागला का? मी गुगल आणि फेसबूकवर सुध्दा सर्च केलं. त्याचं नाव टाईप केलं की झिरो रिझल्ट येतो."

शरद, "आपला अभी आता ऑस्ट्रेलियाला आहे."

अजय, "काय बोलतोस?"

अशोक, "त्याने खूप मोठी रिस्क घेतली."

अजय, "काय केलं त्याने?"

शरद, "त्याने गौरी सोबत लग्न केलं."

अजय, "काय बोलतोस? म्हणजे त्यांचं अफेअर होतं?"

तिघेही हसू लागतात. प्रसाद शांत बसलेला असतो. हसतच अजय प्रसादकडे जातो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारतो,

"काय झालं?"

प्रसाद, "तू इथे आम्हाला भेटायला आलास हे नम्रताला माहितीये का?"

अजय, "नाही. का?"

प्रसाद, "नम्रतासोबत बोल जरा. उगाच आमच्यामुळे तुमच्यात प्रॉब्लेम्स नको व्हायला."

अशोक, "याचं पण ना. चोवीस तास साला स्वतःपण रडत असतो आणि दुसऱ्यांना पण रडवत असतो."

शरद, "नाहीतर काय?"

अशोक, "बघ ना! मित्रांसोबत आनंदात आहे हे बघवत नाही त्याला. उगाच अजयला बायकोचे बोलणे ऐकायला लावतोय."

शरद, "नाहीतर काय?"

प्रसाद, "नाहीतर काय? काय प्लॅनिंग आहे तुम्हा दोघांचा?"

शरद, "इतक्या दिवसांनी आपण भेटलो आहोत. थोडीशी घेतली तर..."

अशोक, "माझ्या मनातलं बोललास."

अजय, "माझ्यापण."

प्रसाद, "सुधरणार नाही कधी. कुठे बसायचं."

अशोक, "ये हूई ना बात. चला."
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel