वृषाली आणि स्टिफन शांत होतात. शांतता फक्त सागरपुरतीच असते. स्टिफन आणि तिच्या नजरेत शांतपणे संवाद सुरु असतो. अर्ध संभाषण तर त्या दोघांच्या नजरेमध्येच होतं. जेवण झाल्यानंतर तिघे घराबाहेरील बगीच्यामध्ये येऊन बसतात.
स्टिफन, "बरं वृषाली. आता तुझ्या ग्रुपबद्दल सांग."
वृषाली, "पण तुम्ही मला त्या ग्रुपबद्दल का विचारताहेत? मी केव्हाच तो ग्रुप सोडलाय."
स्टिफन, "कारण शत्रूशी लढण्यापेक्षा स्वतःशी लढणं फार कठीण आहे. शत्रूशी लढताना होणाऱ्या हार-जीतच्या परिणामांना दोघांपैकीएकाला सामोरे जावे लागते. पण स्वतःशी लढत असताना होणारे परिणाम फक्त आपल्यालाच भोगावे लागतात."
सागर, "म्हणजे?"
स्टिफन, "कोणीतरी आहे जो स्वतः स्वतःशी झुंज देतोय आणि प्रत्येक क्षणाला स्वतःच्या हातून हरतोय. त्याच्या आयुष्यातून सुख हा शब्द कायमचाच मिटून गेलाय."
वृषाली, "कुणाबद्दल बोलताय तुम्ही?"
स्टिफन, "अभिजीत. तुमचा मित्र अभिजीत."
सागर आणि वृषाली तत्काळ आपल्या जागेवरुन उठून म्हणतात, "काय? अभिजीत जिवंत आहे अजून?"
स्टिफन, "हो. तो जिवंत आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये तो माझ्याच बरोबर काम करतो."
हातातून पाण्याचा ग्लास खाली पडावा तशी वृषाली खुर्चीवर पडते. तिच्या मनात वेगवेगळे विचार सुरु होतात आणि जून्या गोष्टी ताज्या होत तिच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब होऊन बाहेर येतात.
स्टिफन, "वृषाली, तो तुमचा मित्र होता आणि आहे. तो तुमच्यासोबत जितका खूश दिसत होता तितका तो ऑस्ट्रेलियाला खूश दिसत नाही. गेल्या पाच वर्षांत मी फक्त एक-दोन वेळाच त्याला हसताना पाहिलं. वृषाली, आज त्याच्याकडे सगळं काही आहे. पैसा, घर, सुखसोयींची त्याला कसलीही कमी नाही. पण मला असं वाटतं, त्याला तुमची आठवण कायम येत असते. तुम्हा सर्वांची कमतरता त्याला सतत जाणवत असते."
सागर, "वृषाली, तू बोल त्यांच्यासोबत, सगळं सांग त्यांना. मी निघतो. म्हणजे तुम्हा दोघांना व्यवस्थित बोलता येईल." एवढं बोलून सागर निघून जातो.
स्टिफन, "तो असा लगेच का निघून गेला?"
वृषाली, "कारण मी तुमच्यासोबत व्यवस्थित बोलू शकेन."
स्टिफन, "मग काय झालं ग्रुपमध्ये? मला सगळं सविस्तर सांगा, प्लीज."
वृषाली, "पाच वर्षांनंतर कुणीतरी मला त्या ग्रुपबद्दल विचारलंय. मी सांगेन तुम्हाला. आमचा ग्रुप होता तो. बदमाश ग्रुप. आम्ही सगळे कसे मित्र झालो, माहित नाही. पण झालो आम्ही सगळे मित्र. प्रसाद, अभिजीत, अजय लहानपणापासून एकत्र होते. एकत्र शिकले आणि ग्रुप वेगळा होईपर्यंत एकत्रच राहिले. मी आणि गौरी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होतो. प्रसादची बहीण काजल आमची चांगली मैत्रिण झाली. मग तिच्या घरी येणं-जाणं चालू झालं. बोलता बोलता कधी प्रसादशी आणि नंतर अभिजीत आणि अजयशी मैत्री झाली, कळलंच नाही. त्या वेळी आम्ही राहत असलेल्या ठिकाणच्या सगळ्या मुली दोन मुलांपासून कायम लांब असत. त्या दोघांनी एखाद्या मुलीकडे बघीतलं आणि त्या मुलीची नजर त्यांच्या नजरेला भिडली की त्या मुलीच्या वाईट दिवसांना सुरुवात व्हायची. आमच्या एरियातील मुलींना लागलेला व्हायरस होते ते दोघे."
स्टिफन, "कोण?"
वृषाली, "शरद आणि अशोक. कॉलेजमध्ये एकदा सर शिकवत होते, 'समजा एखाद्या मुलीला अस्थम्याचा अॅटॅक आला तर तिला खूप वेळ आपल्या ओठांनी श्वास द्या.' यावर शरद म्हणाला, 'ते ठिक आहे. पण असं काय करायचं की ज्याने मुलीला अस्थम्याचा अॅटॅक येईल.' असे ते दोघे होते, पण जेव्हा शरदने काजलला पाहिलं तेव्हापासून तो जरा चांगला वागू लागला. जय-विरुची दोस्ती असल्याने अशोक सुध्दा सुधारला. काही दिवसांनीच ते अभिजीतचे मित्र झाले. काजलचा वाढदिवस होता आणि आम्हाला पिकनिकला जायचं होतं, अभीने त्या दोघांना कसं आणलं आणि कसे ते दोघे आमचे मित्र झाले हा मला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. तरीही आम्ही सगळे एकत्र खूश होतो."
स्टिफन, "पुढे काय झालं?"
वृषाली, "प्रसाद, अभिजीत, शरद, अजय, अशोक आणि मी. आम्ही सहाच्या सहाजण त्यावेळचे बेरोजगार होतो. अभीला टेक्निकल नोकरी हवी होती आणि आमची परिस्थिती चांगली नव्हती म्हणून मी आणि प्रसादने मिळून 'श्री गणेश कला मंच' सुरु केला. शरदला गिटार वाजवता येत होतं आणि अशोक ड्रम चांगला वाजवायचा म्हणून ते दोघे लगेचच आमच्याबरोबर काम करायला तयार झाले. अजयला मार्केटिंगचा जॉब लागला होता. तो जॉब सोडून त्याने आमच्यासोबत काम करायचं ठरवलं. प्रसादने त्याला मार्केटिंगचंच काम करण्यासाठी खूप समजवलं होतं. त्याने प्रसादचं काहीएक ऐकलं नाही आणि तो आमच्या कलामंचामध्ये सामील झाला. प्रसादने आणि मी खूप स्ट्रगल करुन गणेश कलामंचाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. दोन-अडीच महिन्यांनंतर आम्हाला चांगलं इन्कम मिळू लागलं. आम्ही पाचही जण खूश होतो. तेव्हा सागर मला सोडायला आणि घ्यायला यायचा. तो ग्रुपपासून जरा लांबच असायचा. गौरी व्यवस्थित जॉबला होती. काजलने नुकतंच कॉलेज जॉइन केलं होतं. अभी नोकरी शोधतच होता. त्याला स्वतःच्या गुणवत्तेवर नोकरी मिळवायची होती, पण अपयश त्याच्या हाती येत होतं. त्याच्या वडिलांकडे पैसे होते म्हणून ठिक. नाहीतर आमच्यापेक्षा वाईट अवस्था झाली असती त्याची. मी मराठीतून बोलतेय तर तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतेय ते?"
स्टिफन, "हो... हो... अभिजीतने माझं मराठी चांगलंच पक्क केलंय."
वृषाली, "प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम होतेच. पण प्रत्येक रविवारी आम्ही सगळे एकत्र भेटायचो, मस्ती करायचो, एकमेकांना चिडवायचो, खरं म्हणायला गेलं तर आम्ही तेव्हाच मनसोक्त जगायचो. घरचे प्रॉब्लेम्स, बाहेरचं टेन्शन, सगळं विसरायचो त्या एका दिवसासाठी. खास आम्हा सगळ्यांना भेटता यावं म्हणून अजयने त्यांची जूनी खोली राखून ठेवली होती. शहरापासून जरा लांब, जिथे कोणीही नव्हतं अशा ठिकाणी झुडूपांच्या मध्ये त्याच्या नातेवाईकाचं एक घर होतं. ते वारल्यानंतर अजय कधी-कधी तिथे जायचा. नंतर ते आमच्या नेहमीच्या भेटण्याचं ठिकाण झालं. आम्ही त्या जागेला 'गरिबाच वाडा' म्हणू लागलो. एक दिवस अभी तिथेच जाऊन राहू लागला. नंतर आम्हाला कळलं, नोकरी नाही म्हणनू त्याला घरातून बाहेर काढलं होतं. मग शरदने त्याच्यासाठी जॉब बघीतला. गौरीने तर पैसेसुध्दा भरले होते त्याच्यासाठी. पण त्याला हे मान्य नव्हतं. तो तसाच बेरोजगार राहिला. नंतर त्याच्या आईवडीलांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी त्याला परत घरी नेलं. पुढे आमच्या कलामंचाची तालिम तेथेच व्हायची. अधून-मधून अभी, गौरी, काजल यायचे. अभीचं टेक्निकल नॉलेज आणि सागरचं मॅनेजमेंट यामुळे मी त्या दोघांना आमच्या कलामंचाच्या पुढच्या वाटचालीसाठी थोडं गाईडन्स देण्यासाठी बोलावलं होतं. दोघांनी चांगलं गाईडन्स केलं. तेव्हापासून प्रसाद आमच्या कलामंचातून गाणे गाऊ लागला."
प्रसादचं गाणं,
"स्वप्नी हे मन माझे, देह हा माझा सारा...
तुझ्या मैत्रीचा परिणाम झाला सारा...
गीत बेधुंद माझे, वाढला हा पसारा...
तुझ्या मैत्रीचा परिणाम झाला सारा..."
अभिजीत, "वा... वा... वा... प्रसाद. तूच खरा सिंगर. गाणं गायचं तर असं, पूर्णपणे प्राण ओतून."
प्रसाद, "तू कधी आलास?"
गौरी, "जेव्हा तुम्ही सगळे प्रॅक्टिस करत होते तेव्हाच आम्ही आलो. तुम्ही सगळे इतके गुंग होते की आम्ही आलो हे तुम्हाला कळलंच नाही."
शरद, "ये ना! नाश्ता करु. खूप भूक लागलीये मला."
प्रसाद, "ये अभी, ये गौरी, चल काजू आईने काही पाठवलं कां?"
काजल, "नाही दादा, आई जरा घाईतच होती. मी स्वतः बनवून आणलंय."
शरद, "तू बनवलंस. मग तर खायलाच पाहिजे."
अजय, "हो... हो... शरद तुच पहिले खा. म्हणजे आम्हाला कळेल आम्ही खायचं की नाही ते."
गौरी, "ए...... फालतू...... तिने प्रेमाने बनवलयं ते"
अजय, "मग?"
गौरी, "मग काय?"
अजय, "तुला खायचंय?"
गौरी, "नको. शरदला खाऊ दे अगोदर."
अजय, "मग कशाला मध्ये मध्ये बोलतेस?"
शरद, प्रसाद आणि अभिजीत तिघे जेवायला बसतात. जेवण चांगलंच झालं असतं म्हणून नंतर बाकीचे सगळे त्या जेवणावर तुटून पडतात. जेवण झाल्यानंतर,
वृषाली, "शलाका, उद्या यायला जमेल का? आमचा स्टेज शो आहे पार्ल्याला."
गौरी, "पार्ल्याला? माझा अभिजीतपण येणार का?"
पाणी पीत असलेल्या अभिजीतला जोराचा ठसका बसतो.
अभिजीत, "अगं ए महामाये, पुर्ण नाव घेत जा ना! फक्त तुझ्या त्या लाडक्या कलाकारचं नाव अभिजीत नाहीये. माझंसुध्दा नाव अभिजीत आहे."
गौरी, "मग? मी काय करु? मला तर आवडतो तो खूप."
वृषाली, "गौरी.... उद्या काय करतेस? मला तुझी मदत पाहिजे."
गौरी, "हो गं, येते मी. काळजी करु नकोस."
प्रसाद, "बरं मग आत्ता काय करायचं?"
अशोक, "आज कुछ तुफानी करते है।"
अजय, "तू काय तुफानी करणार आहेस?"
अशोक, "करायचंय ना! ठरवू तर दे."
गौरी, "ए... आज ना आपण बोटिंग करायला जाऊ."
प्रसाद-वृषाली, "नाही."
गौरी, "का?"
वृषाली, "अगं उद्या नाटकातले खूप मोठमोठी माणसं येणार आहेत तिथे. कदाचित आमच्यापैकी कुणाचा तरी जॅक लागेल."
अभिजीत, "जॅक लागेल?"
वृषाली, "अभी, आम्ही आमच्या परीने पुर्ण प्रयत्न करतोय सेटल होण्याचा. आमच्या घरी तुमच्यासारख्या सगळ्या गोष्टी फुकटात मिळत नाहीत."
वृषालीचे हे शब्द अभिजीतसोबतच इतर सर्वांना टोचतात. सगळे अभिजीतकडे बघतात, वाद होणार हे नक्की होतं. अभिजीत हसतच बोलतो, "Good, keep it up."
सगळे सुटकेचा नि:श्वास सोडतात. अभिजीत नेहमीच गंमतीने बोलत असतो. पण वृषालीच्या बाबतीत ही गोष्ट खूप गंभीर होती हे तो समजू शकला आणि चूक कबूल करुन त्याने वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. भेट झाल्यानंतर सगळे शांतपणे आपापल्याघरी निघून जातात. दुसऱ्या दिवशी पार्ल्याला श्रीगणेश कलामंचाचा कार्यक्रम सुरु होतो. गर्दी बऱ्यापैकी असते. वृषालीच्या बोलावण्यामुळे त्यांच्या मदतीसाठी गौरी ऑफिसमधून अर्ध्या दिवसाची रजा घेऊन आलेली असते. मराठी सिनेमातील काही कलाकारांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडतो. लग्नामध्ये असलेल्या सनईवादकाप्रमाणे त्यांची अवस्था झालेली असते. प्रसादचं गाणं चालू असतं आणि सगळे आपापल्या धुंदीत असतात. अजय फोटो घेत असतो. वृषाली आणि गौरी व्यवस्था पाहत असतात. गाणं गात असताना प्रसादला अपमानाची जाणीव होते. त्याच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात. 'हा कोणता संगीत कार्यक्रम नाहीये, तर या लोकांच्या प्रॉडक्शनच्या सक्सेसची पार्टी आहे. फक्त वातावरण संगीतमय असावं म्हणून आम्हाला इथे बोलावलं आहे. यांच्याकडे पैसा आहे, मी नसतो तर दुसरं कोणीतरी इथे यांचं मनोरंजन करायला आलं असतं. असो, थोडेफार तरी पैसे मिळतायत ना! फक्त कोणीतरी मला कॅच केलं पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये पुढे गेलो की सगळ्यांना बरोबर पुढे नेतो. फक्त आत्ता कोणीतरी आलं पाहिजे.' प्रसाद सिनेमातील नव्या भविष्याच्या हेतूने प्राण कंठाला लावून गाणं गात असतो आणि शेवटी एक दिग्दर्शक त्याच्याकडे येतो. प्रसादला जरा बरं वाटतं.
दिग्दर्शक, "लिड सिंगर तूच आहेस का?"
प्रसाद, "हो सर, मीच लिड आहे."
दिग्दर्शक, "मग जुने पुराने न ऐकलेले गाणे घेऊन गळा का फाडतोस? माझ्या मुव्हीची गाणे गाता येत नाही का तूला?"
प्रसाद, "सॉरी सर, तुमच्याच सिनेमाचं गाणं गातो आता."
पण प्रसादला त्या दिग्दर्शकाच्या सिनेमाचं नावदेखील माहित नसतं. गोंधळलेल्या अवस्थेत तो भलतंच गाणं गातो. मनातील चलबिचल त्याच्या गाण्यात जाणवते आणि तो अडखळत गाणं गातो.
वातावरणातला रंग निघून जातो, सगळी प्रतिष्ठीत मंडळी प्रसाद, त्याच्या बॅण्डकडे रागाने, तुच्छतेच्या भावनेने बघते. प्रसाद शांतपणे मान खाली घालून उभा राहतो. शरद आणि अशोक सुध्दा वाद्य वाजवणं बंद करतात. आयोजकाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो रागाने प्रसादजवळ येऊन वाईट शब्दांत त्याला शिव्या देऊ लागतो. अजय, वृषाली आणि गौरी मध्ये येऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. पण तो कुणालाही ऐकत नाही. तिथे काम करत असलेल्या नोकरांना बोलावून 'यांच्या सगळ्या वस्तू बाहेर फेकून द्या' असं बोलतो. कुणीतरी डी.जे. चालू करतं आणि मग तिथे असलेले सगळे आपापल्या गप्पांमध्ये रंगून जातात.
प्रसाद, "साहेब माफ करा. मी गात असताना त्या साहेबांनी मला दुसरं गाणं गायला सांगितलं. म्हणून मी जरा गडबडलो."
आयोजक, "अरे ***, ******* गाणं गाता येत नाही तर आलाच कशाला? कुठे गेली ती वृषाली?"
वृषाली, "सर मी इथेच आहे."
आयोजक, "तुझ्या या फालतू सिंगरला साधं गाणं गाताही येत नाही, तर कशाला माझ्याकडे आलीस?" वृषालीची मान सुध्दा खाली जाते.
आयोजक, "चालते व्हा इथून. बदमाश माझं इतकं नुकसान केलंत. ***** जाऊन पेमेंट घ्या."
अजय, "ओ भाई, लेडीज आहे सोबत. जरा व्यवस्थित भाषा वापरा. साधे-सूधे असलो तरी माणूसच आहोत आम्ही."
वातावरण आणखी तापतं. अगोदरच संगीताची रंगत भंग झाल्याने त्या आयोजकाच्या पार्टीचा सत्यानाश झालेला असतो. त्यात अजयचे हे शब्द त्याला इतके लागतात की, रागाच्या भरात तो अजयला जोरात धक्का देतो. अजयच्या मनाचा देखील ताबा सुटतो, तो सुध्दा आयोजकाला धक्का देतो. वातावरण चिघळतंय हे बघून सगळे त्या दोघांना अडवायला जातात. 'हे सगळे मला मारायला आलेत' असा अजयचा गैरसमज होतो आणि तो सर्वांवर हात उचलतो. शरद वृषाली आणि गौरीला ताबडतोब तिथून निघून जायला सांगतो. अशोकला घेऊन दोघीही लगेच निघतात. अजयला सोडवण्यासाठी प्रसाद आणि शरद पुढे येतात. तिघे मिळून दंगा करणार हे बघून बाहेर उभे असलेले सगळे त्यांना चांगलाच चोप देतात. शरदची गिटार आणि ड्रम तोडला जातो. तिघेही खूप मार खातात. त्यांचं सगळं सामान बाहेर फेकलं जातं. अजयच्या रागाचा पारादेखील चढलेला असतो. तो रागाच्या भरात रस्त्याजवळची दगडं तेथे आलेल्या गाड्यांवर फेकतो. प्रकरण आणखी वाढतं. पोलिस येतात. अजय कुणाचंही ऐकत नाही. पोलिसांना योग्य ते सहकार्य न केल्याने रात्रभर तिघांना चांगला चोप पडतो. अशोक ही बातमी फोन करुन अभिजीतला सांगतो. दोघेही त्यांना फोन करत असतात. पण फोन कोणीही उचलू शकत नव्हतं. पहाटे कळतं, तिघेही पोलिस ठाण्यात आहे. सार्वजनिक ठिकाणी अनैतिक वर्तन केल्यामुळे व पोलिसांशी गैरवर्तणूकीमूळे त्या तिघांना अटक झालेली असते. पहाटेच्या वेळी अशोक, काजल, अभिजीत पोलिस ठाण्यात येतात आणि त्या तिघांची जामिन भरुन सुटका करुन घेतात. सुटका झाल्याची बातमी काजल फोन करुन गौरी आणि वृषालीला कळवते. तेव्हा जाऊन त्या दोघींना धीर येतो. गौरी दुसऱ्या दिवशी सुट्टी घेते. काजल कॉलेजला जात नाही. उरलेले सगळे घरीच बसणारे असतात म्हणून सगळे गरिबाच्या वाड्यावर येतात.
अजय, "साला, मला बदमाश म्हणाला?"
शरद, "तुला नाही. आपल्या सगळ्यांना बदमाश म्हणाला."
अभिजीत, "अरे पण तुला त्यांच्यावर हात उचलण्याची गरजच काय होती?"
शरद, "अजयला कशाला बोलतोस? तू तिथे असता तर तू पण तेच केलं असतं."
अभिजीत, "आय नेव्हर ब्रेक द रुल्स."
वृषाली, "बंद करा तुम्हा सर्वांची फालतूगिरी. इथे माझ्या करियरचं नुकसान झालंय आणि तुम्ही असे मुर्खासारखे भांडत बसताहेत."
अजय, शरद आणि अभिजीत गप्प बसतात. प्रसादला गप्प बसायची गरजच नसते कारण रात्रीच्या प्रकरणापासून तो एकही शब्द बोललेला नसतो.
काजल, "दादा, काहीतरी बोल ना! रात्रीपासून काहीच बोलला नाहीस." तेव्हा काय सर्वांचं लक्ष प्रसादकडे जातं. सगळे प्रसादभोवती जमा होतात.
शरद, "काय झालं प्रसाद? रात्रीपासून बघतोय, काही बोललाच नाहीस तू."
गौरी, "पॅडी, झालं ते सोडून दे ना! कशाला उगाचच स्वतःला त्रास करुन घेतोस?"
अभिजीत, "हे प्लीज असा चेहरा करुन बसू नकोस. काहीतरी बोल."
कुठेतरी हरवल्यासारखा प्रसाद जमिनीकडे बघून गप्प बसलेला असतो. प्रसादची अवस्था समजून शेवटी सगळे तिथून बाजूला होतात इतक्यात,
प्रसाद, "काल मला जाणिव झाली, मी काहीच नाही. दोन-चार ठिकाणी गाणे गायलो म्हणजे खूप मोठा झालो असं समजत होतो. कालच्या कार्यक्रमात कळलं, या श्रीमंत लोकांसाठी आपण किती खालच्या पातळीचे आहोत ते. त्यांना काही फरक पडत नाही, आपण जगो वा मरो. त्यांच्यासाठी एक मेला तर दुसरा नोकर हा तयारच असतो."
सर्वांचे चेहरे आणखी गंभीर होतात.
प्रसाद, "कॉलेज सोडून तीन वर्ष होत आली, तेव्हा मी म्हणायचो, मी असा जॉब करेन, तसा जॉब करेन. अभी आणि मी शिक्षकांचे लाडके होतो. त्यांना नेहमी वाटायचं, कोणी नाही मात्र हे दोघे तरी चांगलं नाव कमावतील. कॉलेज संपलं, नवीन विद्यार्थी आले. अभीने अॅडव्हान्स कोर्ससाठी अॅडमिशन घेतलं, कारण त्याच्या वडिलांकडे फी भरायला पैसे होते. मी नोकरीसाठी बाहेर पडलो, इकडे तिकडे भटकू लागलो होतो. कुठेच नोकरी मिळाली नाही. कारण मला व्यवस्थित बोलतादेखील येत नव्हतं. घरी परिस्थिती बरी नाही म्हणून तुम्हा सगळ्यांपासून लपून वेटरचं काम केलं, थिएटरमध्ये तिकीटं वाटले, फिल्ड वर्क केलं, अशी छोटी-मोठी कामं करुन घरची परिस्थिती सांभाळली. कॉलेजमध्ये ओळखीने काजूचं अॅडमिशन केलं. पण, हे सगळं करत असताना सुध्दा मनाला वाटत होतं, मी सर्वांपासून वेगळा आहे. भविष्यात मी कुठे नोकरी करणार नाही, तर मी मालक असणार आणि माझ्या हाताखाली लोक काम करणार. तेव्हापासून नोकरीचं खूळ डोक्यातून काढून टाकलं. वृषाली आणि मी जेव्हा हा 'श्रीगणेश कलामंच' सुरु केला तेव्हा वाटलं, हा कलामंच माझ्या आयुष्याच्या नव्या वळणाला सुरुवात करेल. मी पूर्ण जीव ओतून कामात गुंतलो होतो. कालपर्यंत सगळं व्यवस्थित वाटत होतं. वाटायचं वेळ लागेल, पण वेळ लागतो म्हणूनच तर आंबे गोड लागतात. काल जेव्हा मी गात होतो, तेव्हा माझे डोळे त्या व्यक्तीला शोधत होते जी मला पुढे नेईल. जेव्हा तो डायरेक्टर मला भेटला तेव्हा माईकपासून माझं जेवढं अंतर होतं तेवढंच त्याचंही अंतर होतं. तो आणि आयोजक मला जे काही बोलले ते तिथल्या सर्वांनी ऐकलं. पुढे जाऊन मी मोठा जरी झालो तरी त्या सर्वांच्या डोळ्यासमोर माझा इतका वाईट अपमान झाला होता हे मी कधीच विसरु शकणार नाही."
प्रसादचे शब्द संपतात आणि सगळं शांत होतं. आता प्रसादची समजूत कशी काढावी हे कुणालाच सुचत नाही. अजय आणि गौरी अभिजीतकडे डोळ्यांनी इशारे करुन समजूत काढायला सांगतात. अभिजीतसुध्दा खांदे वर करुन 'मी एकटाच समजूत काढू?' असे प्रश्नार्थक हातवारे करतो. अजयचे मोठे डोळे पाहून तो लगेच खाली बसतो. प्रसादच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो,
"कोण म्हणालं की त्यांनी तुझा अपमान केला? त्यांना काय कळतं? पैसा आहे म्हणून ते असे वागतात. पॅडी, तुला माहितीये तुझ्यात मॅनेजमेंटचा खूप चांगला गूण आहे. तू चित्र चांगली काढतोस, गीत चांगले लिहीतोस, दिलेलं काम पूर्ण करतोस. हे सगळे तुझ्या मनात चाललेल्या हालचालीच दाखवतात ना! तुझं मन गौरीसारखं झोपलेलं नाहीये."
गौरी, "काय बोललास?"
अभिजीत, "अगं रात्री तू झोपली होतीस ना! तो नाही झोपला, म्हणून असं बोललो."
गौरी, "हं.... मग ठिक आहे."
सगळे हसतात, पण प्रसाद हसत नाही. मग काजल आणि अजयसुध्दा प्रसादच्या बाजूला येऊन बसतात. अभिजीत प्रसादच्या समोर गुडघ्यांवर उभा राहतो. प्रसादचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन म्हणतो,
"बघ, मला समजूत काढता येत नाही. पण प्रयत्न करतोय. एका अपघातामुळे स्वतःला एवढी मोठी शिक्षा का देतोस? पॅडी, हे बाहेरचं जग आपल्याला फक्त कामापुरतचं आहे. पण तू सगळ्यांना खूप चांगलं सांभाळून घेतोस. तू आम्हा सर्वांची जबाबदारी घेतोस. बघ जरा सर्वांकडे, वृषाली सोडली तर आमच्यापैकी कुणालाही घरी पोहोचायला थोडा सुध्दा उशीर झाला असेल तर आमच्या घरुन पहिला फोन हा तूलाच येतो. येतो ना!"
प्रसादचे डोळे पाण्याने भरुन आलेले असतात. तो हळूच गालातल्या गालात हसत होकार देतो.
अभिजीत, "मग अशी हार कां मानतोस? तूच म्हणाला होतास ना! या लाईनमध्ये अशा गोष्टी होतच असतात. जोपर्यंत लोकांना आवडेल असं तू देशील, तोपर्यंत तूला डोक्यावर घेतील. थोडासा पाय घसरला की, दुसऱ्याला डोक्यावर बसवतात. पण पॅडी तू तसा नाहीस. तू नक्की असं काही करुन दाखवशील की लोक कायम तूलाच डोक्यावर घेतील. बघ मी तूला प्रॉमिस करतो, तूला पुढे नेण्यासाठी मी पाहिजे ते करेन. पण प्लीज यार, वाईट काही मनात आणू नकोस."
काजल, "हो दादा. आम्हाला तुझी खूप गरज आहे."
अजय, "आता तरी हस ना पॅडी. अभीने सुध्दा तुला प्रॉमिस केलंय."
प्रसाद, "खरंच मला टेंशन घेण्याची गरज नाही. तुमच्यासारखे मित्र जवळ असताना अजून काय पाहिजे?"
गौरी, "वन डे हॉल्ट पिकनिक."
शरद, अशोक, "वा... वा... वा... मॅडम. पहिल्यांदा योग्य वेळी योग्य डायलॉग मारलात."
अभिजीत आणि प्रसादचे डोळे पाणावलेले असतात. अभिजीत नजरेनेच विचारतो, 'जाऊया ना पिकनीकला?' प्रसाद नजरेनेच होकार देतो.
सगळे खूश होतात. मस्ती करायला सुरुवात करतात. जसं की काल काही झालंच नाही. प्लॅन ठरतो, जागा ठरते, गाडीत डिझेल भरलं जातं, सगळे तयार होतात आणि गाडी कर्जतच्या दिशेने निघते. अशोक आणि शरद आळीपाळीने गाडी चालवतात. बाकी सगळे गाणे गातात, एकमेकांची चेष्टामस्करी करतात. मस्ती करत करत सगळे कर्जतला पोहोचतात. इथे मात्र गौरीचा प्लॅनिंग फसतो. हॉटेलचा मालक म्हणतो, "सॉरी मॅडम, मुझे लगा हर वक्त की तरह आप मजाक कर रही हो. इसलीय आप लोगों के लिए रुम नहीं रख पाया।"
आता मात्र सगळे गौरीवर चिडतात. गौरी हॉटेलमालकावर चिडते. सगळ्यांचे वाद सुरु होतात. अजय आणि अशोक आजूबाजूचा भाग बघण्यासाठी बाहेर गेलेले असतात. वातावरण शांत करण्याच्या हेतूने ते म्हणतात,
अजय, "आम्ही आजूबाजूला बघीतलंय, कुठेही राहण्याची व्यवस्था नाही. हॉटेलमध्ये कुठेतरी जागा द्या. तसंही तिने तुम्हाला फोन करुन अगोदर कळवलं होतं."
अभिजीतला दूर काहीतरी दिसतं. तो त्या दिशेने जातो. इथे सगळे त्या हॉटेलमालकासोबत भांडत असतात. थोड्या वेळाने अजयचा फोन वाजतो.
अजय, "हा भाई बोल."
अभिजीत, "समोर मशाल दिसतेय ना! तिथे सगळ्यांना घेऊन ये. राहण्याची व्यवस्था झालीये." अजय, "अरे मुली आहेत आपल्यासोबत."
अभिजीत, "इथे ये. बाबांना भेट. सगळ्यांना बरं वाटेल."
अजय फोन ठेवतो आणि सर्वांना गाडीमध्ये बसायला सांगतो. तिथून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका कुंपन घातलेल्या घरात ते शिरतात. अंधार असून देखील ते घर भिती वाटण्यासारखं नव्हतं. अभिजीत आणि एक वयस्कर माणूस तिथे अगोदरपासूनच असतात.
वृषाली, "कुठे आलोय आपण? मला तर भितीच वाटते."
अभिजीत, "हे रिटायर्ड शिक्षक आहेत. एकटेच आहेत म्हणून त्यांनी फक्त मशाल पेटत ठेवलीये त्यांनी, स्वतःपुरता उजेड मिळण्यासाठी."
अभिजीतसोबत असलेली व्यक्ती वयस्कर असली तरी विश्वास ठेवण्यासारखी दिसत होती. पायात कोल्हापूरी, पांढरा लेंगा, त्यावर पांढरा सदरा आणि तपकिरी स्वेटर घालून ते उभे होते. त्यांच्या डोळ्यांना गांधीजींप्रमाणे चष्मा होता. डोक्यावरील केसांचा थोडासा भाग काळा राहिला होता. त्यांना मकबून-फिदा-हूसेन यांच्याप्रमाणे दाढी होती. त्यांचा एकूणच पेहराव पाहिला तर ते एका चांगल्या घरातील सज्जन गृहस्थ दिसत होते. अजय, "सर, आपल्याकडे लाईट नाही का?"
अन्ना, "आहे. वीज आहे. गरज असेल तेव्हा मी ती वापरत असतो. तुम्ही सगळे आलात. माझ्या नातवंडांसारखेच आहात तुम्ही. या, बसा. आपलंच घर समजा." एवढं बोलून ते स्वीच ऑन करतात. घरी सर्व दिवे प्रकाशित होतात. उजेड पाहून गौरी, काजल आणि वृषालीला बरं वाटतं.
अन्ना, "बसा लेकींनो. पाणी हवं का तुम्हाला?"
वृषाली, "नको बाबा."
अन्ना, "तुम्ही मला अन्ना म्हणू शकता."
वृषाली, "अन्ना."
अन्ना, "हं... अस्सं..."
प्रसाद, "अन्ना, तुम्ही एकटेच राहता कां?"
अन्ना, "नाही तर, हे काय? माझं पुस्तकांचं कपाट. ही सगळी पुस्तकं आहेत ना माझ्या सोबतीला."
काजल, अभिजीत, प्रसाद आणि वृषाली लगेच त्या कपाटाकडे वळतात.
गौरी, "तरीपण... तुम्हाला खरंच भिती नाही वाटत कां?"
अन्ना नकारार्थी मान हलवतात.
अन्ना, "किचनमध्ये धान्य भरलेलं आहे. कुणाला स्वयंपाक येतो त्यांनी ताबडतोब स्वयंपाकघरात जा चला. बाकीच्यांनी माझ्यासोबत बसा."
सगळी मुलं जेवण बनवायला स्वयंपाकघरात जातात.
अन्ना, "लेकींनो, तुम्हाला जेवण बनवता येत नाही का? फक्त मुलंच स्वयंपाकघरात गेलेत."
काजल, "ते गेलेत म्हणून आम्ही थांबलो."
शरद, "नाही. आम्हाला भांडी नाही घासायची म्हणून आम्ही किचनमध्ये आलोय."
अन्ना हसतात.
वृषाली, "अन्ना, नॉनव्हेज चालतं का तुम्हाला?"
अन्ना, "नाही."
अन्ना मुलींसोबत सहज गप्पा मारण्यात गुंग होतात. थोड्याच वेळात मुलं जेवण बनवून आणतात. त्यांनी चूलीवर जेवण बनवलेलं असतं. जेवण चांगलं होतं. सगळे पोट भरुन जेवतात. नियमाप्रमाणे मुलींना भांडी घासावी लागते. मग रात्री सगळे अन्नांसोबत घराबाहेर मोकळ्या वातावरणात व सुंदर चांदण्यांच्या मंद प्रकाशात येतात. एक छोटीशी शेकोटी करुन बसतात. थोडीशी थंडी जाणवत असते. मच्छरदेखील आपली हजेरी लावत होते. पण अन्नांच्या बोलण्यात सगळे इतके गुंग होतात की, त्यांना वस्तूस्थितीचं भान नसतं. बोलता बोलता,
गौरी, "अन्ना, आम्ही सगळे एकमेकांचे खास मित्र आहोत."
अन्ना, "खास मित्र? ते कसं काय?"
गौरी आपली जीभ अर्धी बाहेर काढून चावते. सगळे हसतात, पण अन्नांचा हा प्रश्न गंभीर असतो. ते पुन्हा विचारतात,
"तुम्ही सगळे एकमेकांचे खास मित्र कशावरुन?"
अजय, "खास म्हणजे आम्ही सगळे एकमेकांच्या खूप क्लोज आहोत."
अभिजीत, "एकमेकांविषयी आम्हाला जिव्हाळा आहे."
शरद, "आम्ही प्रत्येक संडेला न चुकता भेटतो."
अन्ना, "अस्सं का? बरं... अजून काही सांगू शकता?"
प्रसाद, "आम्ही सगळे एकमेकांसोबत काम करतो."
वृषाली, "रोज रात्री आम्ही न चूकता एकमेकांना एस.एम.एस. करत असतो."
अशोक, "फेसबूकवर आम्ही एकमेकांचेच स्टेटस बघताच लाईक करतो."
काजल, "आम्ही एकमेकांचे प्रॉब्लेम्स शेयर करतो."
गौरी, "एकत्र आलो की खूप मज्जा करतो."
अजय, "इतकी वर्ष झाली तरी आज सुध्दा आम्ही सगळे सोबत आहोत."
शरद, "आम्ही आमचा भेटण्याचा अड्डा ठरवलाय."
अन्ना, "अजून काही?"
अभिजीत, गौरी, प्रसाद, "नाही."
अन्ना, "इतकी कारणं सांगितली तुम्ही. तुम्हीच स्वतःला विचारा. खरंच आम्ही इतके जवळचे मित्र आहोत का?"
सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघतात.
अन्ना, "बघा, क्लोज तर आपण आपल्या शेजाऱ्याशीही असतो, जिव्हाळा मुक्या प्राण्यांविषयी सुध्दा असतो, शनीदेवाच्या मंदिरात सुध्दा मी प्रत्येक शनीवारी जात असतो, एकत्र तर किती तरी लोक काम करतात, फेसबूकवर स्टेटस लाईक करनं, रात्री एस.एम.एस. करनं, मजामस्ती करणं याला मैत्री म्हणतात का?"
सगळे लक्षपूर्वक ऐकू लागतात.
अन्ना, "फेसबूक, एस.एम.एस. या गोष्टींचा शोध आत्ता काही वर्षांपूर्वी लागला. मैत्री तर मानवाच्या उत्क्रांतीपासून अस्तित्वात आहे. कृष्ण-सुदामा एकमेकांचे स्टेटस लाईक करत बसायचे कां? की राम आणि सुग्रीव एकमेकांना एस.एम.एस. करायचे? दुर्योधन आणि कर्ण एकत्र सहलीला आणि सिनेमा पाहायला जात होते कां?"
प्रसाद, "पण अन्ना काळाप्रमाणे बदलायला हवं ना!"
अन्ना, "हो. नक्कीच बदलायला हवं. पण याचा अर्थ तुमचं हल्लीचं वागणं जसं फोनवर तासन्तास बोलणं, बाहेर कुठे गेलात तर तिथला निसर्ग प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचं सोडून कॅमेऱ्यातील लेन्सचा आधार घेता. फक्त मौजमजा करणे आणि तंत्रज्ञानाच्या जाळ्यात मैत्रीचे पुरावे देणं यालाच मैत्री म्हणतात का? असं असेल तर आजपर्यंत माझा एकही मित्र नाही."
अभिजीत, "आणि तसं नसेल तर?"
अन्ना, "तसं नसेल तर जगातील सर्वांत चांगला मित्र आहे माझ्याकडे. आणि ते म्हणजे पुस्तकं. खरा मित्र तोच असतो जो आपल्याला सतत काही ना काही शिकवत असतो, आपल्या चुका, कमतरता आपल्याला समजावून त्यांवर मात करायला शिकवतो. आईवडील आपल्याला लहानाचं मोठं करतात, शिक्षक ज्ञान देतात पण मित्र आपल्याला जगायला शिकवतो. एक बळ मिळतं, एक विश्वास मिळतो आपल्याला आपल्या मित्राकडून. काही गोष्टी आपण फक्त मित्रांजवळच उघडपणे मांडू शकतो. एक गंमत सांगू?"
सगळे उत्सुकतेपोटी होकारार्थी मान हलावतात.
अन्ना, "मी जिच्याशी लग्न केलं, तीदेखील माझी मैत्रिणच होती."
सगळे मनापासून हसतात. अन्नांच्या विनोदामुळे सर्वांना जाणवतं, आता आम्ही का हसलो? हे हसणं कसं होतं? किती सहज हसणं होतं हे. समोरची व्यक्ती हसलीच पाहिजे कां? असा विचारसुध्दा केला नसेल. तरीही हसलो. अन्ना आमचे चांगलेच मित्र झाले वाटतं. असा विचार करुन सगळे एकमेकांचा हसरा चेहरा पाहतात.
प्रसाद, "तरीसुध्दा अन्ना, आम्ही सगळे मैत्री जगलोय."
अन्ना हसतात थोडं शांत बसतात. जागेवरुन उठतात आणि चालत चालत शेकोटीच्या जास्त जवळ जात आकाशाकडे वर बघून म्हणतात, "तुम्ही कधी पहाटे मंदिरात काकड आरती केलीये? भल्या पहाटे उठी-उठी गोपाळा या भूपाळीच्या स्वराने तुम्हाला कधी जाग आलीये? भल्या पहाटे एकमेकांना उठवून वासुदेवाचं गाणं ऐकलय कां? तुम्ही वारीमध्ये जाऊन ज्ञानोबा माऊली-तुकारामाचा गजर कधी केलायत? टाळ-मृदुंगाच्या तालावर तुमची पावलं कधी थिरकली आहे? थंडीत शेकोटी भोवती फेर धरुन तुम्ही मनसोक्त गप्पा मारल्यात? बहुरुप्याच्या गप्पा ऐकल्यात? तुम्ही कधी भजनात दंग झालात? अंधारात हिरव्यागार गवतावर पडून आभाळातल्या चांदण्यांशी कधी बोललात? सकाळच्या धुक्यात गवतावरुन अनवाणी पायाने कधी चाललात? पावसात कधी मनसोक्त भिजलाय? पावसाच्या कधी गारा वेचल्यात? विहिरीत पोहलात? नदीकिनारी जाऊन कधी मनसोक्त खेळला? समुद्राच्या किनारी समुद्राकडे पाहत शून्य नजरेत कधी हरवलात? पुराणातील दुर्योधन-कर्ण, राम-सुग्रीव, कृष्ण-सुदामा यांची खरी मैत्री कधी समजून घेतली? आमिर खानचा 'रंग दे बसंती', 'थ्री इडियट्स' कधी अनुभवलात? नाही... नाही... नाही... नाही...! तर मग तुम्ही अजून नीटसे जगलाच नाही आहात. खूप अनमोल, निर्मळ, निखळ अश्या आनंदापासून वंचित राहिला आहात. कधी मिळालीच संधी तर बघा हा वेडेपणा करुन, खऱ्या अर्थाने मैत्री घट्ट करतात या गोष्टी. आणि जगणं खऱ्या अर्थाने समृध्द करतात या गोष्टी."
सागर, "चहा."
अन्ना, "ते म्हणतात ना! Love is beautiful. Because it's a feeling controlled by Heart. But Friendship is very very Beautiful. Because it's a feeling that takes care of another Heart."
सागर, "चहा हवा का?"
अन्नांचे शब्द खरंच विचार करण्यासारखे होते. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट जरी केली तरी आयुष्य जगलो, असंच म्हणण्यासारखं होतं.
सागर, "चहा..."
त्या रात्री प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. मैत्रीची जागा वाढली होती. जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला सकारात्मक संदेश मिळाला होता.
सागर, "चहा......"
ती रात्र खरंच न विसरण्यासारखी होती.
सागर, "रात्रीचे पाऊनेतीन झाले, अजून तुम्ही दोघे झोपला नाहीत म्हणून विचार केला चहा बनवू तुमच्यासाठी."
स्टिफन, "सागर, उगाच मध्ये आलास. मी त्यांच्याच विश्वात रमलो होतो. खूप चांगला ग्रुप होता तुमचा."
वृषाली, "हो. आता तुमच्याशी बोलताना काही चांगले प्रसंग आठवले. खरंच खूप चांगला ग्रुप होता आमचा."
सागर, "अगोदर चहा प्या. उगाचच तुमची लिंक तोडली. सर तर पूर्णपणे गुंग झाले होते ऐकण्यात. पुढे काय होतंय याची उत्सूकताच होती त्यांना."
तिघेही चहा घेतात. चहा पित असताना स्टिफन, "तू म्हणालीस प्रसाद गात होता. मग अभिजीत कसा गाऊ लागला?"
वृषाली, "अहो, साखर जास्त झाली चहामध्ये. झोपेत होता का?"
सागर, "झोपलो होतो. तू नाही आलीस म्हणून परत जागा झालो आणि खाली आलो. म्हटलं, चला बघू काय बोलताय ते."
स्टिफन, "अभिजीत कसा गाऊ लागला?"
वृषाली, "अन्नांनी आम्हाला त्या गोष्टी सांगितल्या तेव्हापासून आमचा ग्रुप खूपच बदलला होता. एकमेकांच्या मैत्रीमध्ये आम्ही आणखी गुंतत गेलो होतो. गरिबाचा वाडा म्हणजे आमचं दुसरं घरंच झालं होतं. आणि आम्ही त्या घरातील सदस्य. मी आणि प्रसादने सुरु केलेला श्रीगणेश कलामंच त्या रात्रीपासूनच बंद झाला होता. त्यानंतर मी घरीच बसून होती, शरद आणि अशोक मॉलमध्ये कामाला लागले कारण तिथे भरपूर मूली असायच्या, प्रसाद त्याच्या वडिलांच्या दुकानात बसून इतरांकडून काम करवून घेत होता, अजय आणि गौरी तिथल्याच एकमेकांपासून जवळ असलेल्या कंपनीमध्ये कंप्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होते, अभिजीत त्याच्या कंप्युटरच्या सरांकडे सहाय्यक म्हणून काम करायचा. आपापली कामं करुन आम्ही प्रत्येक रविवारी गरिबाच्या वाड्यावर भेटायचो. त्यांना भेटून झाल्यानंतर मी सागरला भेटायची. आमच्यामध्ये जो तो स्वतःपूरता व्यवस्थित कमवत होता. पण कोणीही आपल्या नोकरीवर समाधानी नव्हतं. मी आणि प्रसादने श्रीगणेश कलामंच पुन्हा सुरु करण्याचा विचार केला. पण तो तसाच राहिला. गणेश चतुर्थी येईपर्यंत असंच चाललं होतं."
स्टिफन, "काय झालं गणेश चतुर्थीला?"
सागर आपला चहा संपवत, "गणपती बाप्पा पावला यांना."
स्टिफनला हे समजत नाही. तो चेहऱ्यावर विचित्र हावभाव करुन काही न समजल्यासारखा करतो.
वृषाली, "कळेल तुम्हाला. आम्हाला गणपती बाप्पा पावले असंच झालं. अभिजीतच्या घरी गणपती बसत असतो. दरवर्षी आम्ही त्याच्या घरी जागरणाला जायचो. त्या वर्षीदेखील आम्ही त्याच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरी गणेशोत्सवात पत्ते खेळणे, जुगार असा कोणताही प्रकार नसतो. पूर्णपणे मनोःभावाने ते तो सण साजरा करायचे आणि म्हणूनच आम्ही सगळे त्यांच्या घरच्या गणपतीसाठी खूप उत्सूक असायचो. अहो, त्या वर्षी तुम्ही सुध्दा होते ना!"
सागर, "हो. त्या रात्री मी आरती घेतली होती."
वृषाली, "हा, स्टिफन सर. अभिजीतच्या घरी फक्त पहिल्या दिवसाची पहिली आरती आणि 'शेवटच्या दिवसाची शेवटची आरती तो आणि त्याचे वडील करायचे. मधले सातही दिवस हजर असलेल्या कोणत्याही व्यक्तींना आरती करायला द्यायचे, ज्यांच्या घरी गणपती बसत नाही."
स्टिफन, "Yes I know. He likes to change the rules."
वृषाली, "तर त्या रात्री आरती झाल्यानंतर जेवणाची पंगत बसली. अभीने सांगितलं, दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील प्रसादच भजनाला सुरुवात करेल. आम्ही सगळे तिथे घरची कामं करायला, जेवण वाढायला होतो. पण प्रसादला भजन करायची इच्छा नव्हती. तो अभीला समजावत होता, त्याला भजन नाही गायचं म्हणून. पण अभी काही ऐकायला तयार नव्हता."
अभिजीत, "मला काही ऐकायचं नाही. पॅडी, वर्षातून एकदाच गणपती येतात. एका दिवसासाठी तूला गायला सांगतोय."
प्रसाद, "समजून घे ना अभी, गाणं गाऊ लागलो तर मला तो दिवस आठवतो."
अभिजीत, "आपण पाचवीला होतो तेव्हापासून तू भजनात भाग घेतोयेस."
प्रसाद, "अजय, तूच समजाव याला. हा काही माझं ऐकणार नाहीये."
अजय, "देवासाठीच गायला सांगतोय ना तो तूला. आणि जास्त नाही थोडाच वेळ भजन करणार आपण. अकरा वाजता स्टार्ट आणि दोन वाजता एन्ड. देवपण खूश आणि आपणही खूश."
प्रसाद, "अज्या..."
अभिजीत, "सोड अजय, आता तो आपलं कुठे ऐकणार? त्याचं लग्न ठरवलंय ना त्याच्या घरच्यांनी. काय नाव त्या मुलीचं? हा... मिनाक्षी. तिनेच सांगितलं असेल, गाऊ नकोस म्हणून..."
प्रसाद डोक्यावर हात मारतो. आता आपली सुटका होणार नाही, हे बघून प्रसाद तयार होतो. जेवणाची शेवटची पंगत उठते.
ढोल, मृदूंग, तबला आणला जातो. अभिजीतचे वडिल टाळ घेऊन तयार असतात. वृषाली आणि गौरी आपल्या कॅमेऱ्याने व्हिडीयो शुटींग करु लागतात. अजय आणि शरद अंगणात चटई अंथरतात. एका ठिकाणी घरातील सर्व स्त्रिया बसून गणपतीचं नामस्मरण करत असतात. थोडा वेगळेपणा म्हणून भजनामध्ये शरद गिटार वाजवण्याचा हट्ट धरतो. अभिजीत त्याला 'गिटार घेऊनच बस आणि मस्त वाजव' असं म्हणतो. घरातील मोठी मंडळी येते आणि पाठीमागे ठेवलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसते. मग शरद, अभिजीत, प्रसाद, अशोक आणि अजय गणपती बाप्पांच्या पाया पडतात. डोक्याला टिळा लावून अंथरलेल्या चटईवर जाऊन बसतात. प्रसाद सुरुवातीला पाणी पितो. देवाकडे बघून दोन्ही हात जोडून देवाला वंदन करतो आणि मोठ्याने बोलतो, "गणपती बाप्पाऽऽऽ...."
सगळे, "मोरयाऽऽऽ..."
प्रसाद, "वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।"
सगळे हात जोडतात.
अजय, शरद, "बोला गणपती बाप्पा... मोरया..."
प्रसाद अभिजीतकडे बघतो. अभिजीतच्या चेहऱ्यावर समाधान असतं. तो अभिजीतला भजन पुढे चालू ठेवायला सांगतो.
सगळे मिळून,
"गणपती बाप्पा मोरया। बाप्पा बाप्पा मोरया।। गणपती बाप्पा मोरया। बाप्पा बाप्पा मोरया।।"
अभिजीत,
"वाटा स्नेही खुल्या होती। दृष्टी नयन तुझे मज होसी।
देवा तुज मी आता देवा शरण होसी।।
हे वाटा स्नेही खुल्या होती। दृष्टी नयन तुझे मज होसी।
देवा तुज मी आता देवा शरण होसी।।"
म्हणत अभिजीत खूप सुंदर भजन गाऊ लागतो. नंतर सगळेजण आपापल्या पध्दतीने भजनात गातात. भजन झाल्यानंतर प्रसाद वृषालीला जवळ घेऊन म्हणतो, "तू पण तेच बघितलंस जे मी बघितलं?"
वृषाली, "तुझ्या मनात पण तेच विचार चाललेत का?"
प्रसाद होकारार्थी मान हलवतो. मग दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन केल्यानंतर वृषाली आणि प्रसाद ग्रुपमधल्या सर्वांना काल रात्रीच्या भजनाबद्दल असं रंगवून सांगतात की, सगळेच तयार होतात.
अजय, "पॅडी तू बिनधास्त रहे. भाई की बोली मतलब बंदूक की गोली. मी बोलेन त्याला. आणि तो तयार होणारच."
रविवारी अभिजीतला दिलेल्या वेळेच्या दोन तास अगोदरच सगळे वाड्यावर हजर असतात.
गौरी, "होईल रे. मला पण जॉब करायचा कंटाळा आलाय."
शरद, "तुला कंटाळा आलाय? मी आणि अशोक पुढच्याच महिन्यात जॉब सोडतोय."
काजल, "तुम्ही दोघं का मेड फॉर इच ऑदर आहात का? प्रत्येक वेळी एकमेकांसोबतच असतात."
शरद, "तुला काही प्रॉब्लेम?"
काजल डोक्याला हात लावून उगाच प्रश्न विचारला असा चेहरा करते.
अजय, "मुद्दाम त्याला दोन तास लेट बोलावलंय. म्हणजे आपल्याला व्यवस्थित बोलता येईल."
अशोक, "हा प्लॅन तुम्हाला सक्सेसफूल होई असं वाटतंय कां?"
अजय, "हे बघ. लावली ना पनवती! काल रात्रीचं जागरणाच्या वेळी अभीचं भजन ऐकलंस ना!" अशोक, "हो. सॉल्लीडच गात होता तो."
अजय, "मग? आपल्या मित्राच्या टॅलेंटला प्रोत्साहन देतोय मी."
प्रसाद, गौरी, वृषाली, "मी...?"
अजय, "मी म्हणजे आपण सगळे."
काजल बाहेरुन आत येते.
काजल, "गाईज... लवकर, अभी आलाय."
सगळे शांत बसतात.
अभिजीत फोनवर बोलतच आत येतो. "हा.... हा... हा... हा? नाही नाही, बाबांना सांगितलंय मी... संध्याकाळी येतील ना ते... हो हो.... चालेल... ठिक आहे... चला ठेवतो." फोन ठेवल्यानंतर,
अभिजीत, "बाप रे! वृषाली लवकर आली?"
गौरी, "लवकर कसली? एक तास झाला तिला येऊन. नेहमीप्रमाणे एक तास लेट."
अभिजीत, "एक तास लेट? आणि येऊन एक तास झाला? मला तर दोनचा टायमिंग सांगितला होता. म्हणजे तुम्ही सगळे बारा वाजताच आलात?"
सगळे गौरीकडे रागाने बघतात. नेहमीप्रमाणे गौरी आपली जीभ चावते आणि खाली बघते.
प्रसाद, "तू दुसऱ्यांना स्वतःसारखं का समजतेस?"
अजय, "इच्छाधारी नागीन आहे ती."
अभिजीत, "हॅलो? तिला काय बोलताय? काय चाललंय ते कळेल का मला?"
वृषाली, "तुला एक गुड न्यूज द्यायची आहे."
अभिजीत, "नाही. मी आहे तिथेच खूश आहे. मी कुठेही पैसे भरणार नाही."
वृषाली, "पैशांचं नाही रे. श्रीगणेश कलामंच पुन्हा सुरु करतोय आम्ही."
अभिजीत, "अरे वा. ग्रेट. अभिनंदन. मग आज पार्टी फिक्स समजायची?"
वृषाली, "तुला माहितीये का? कोण कोण आहे त्याच्यात?"
प्रसाद, "उभा का राहिलास? बस ना!"
प्रसाद आणि अजय शेजारीच बसलेले असतात. अभिजीत अजयच्या मांडीवर डोकं ठेवून लेटतो. अभिजीत, "मगं..."
शरद, "मगं..."
काजल, "डफ्फोर, मग काय? असं म्हणतोय तो."
शरद, "वृषाली सांगेल ना!"
वृषाली, "अभी..."
अभिजीत, "हा...?"
वृषाली, "ग्रुपमधले सगळे या कलामंचामध्ये जॉइन होतायेत."
अभिजीत, "गुड. किप इट अप."
वृषाली, "मी आणि पॅडी मॅनेजमेंट सांभाळणार."
अभिजीत प्रसादच्या पायावर जोरात थाप मारतो.
वृषाली, "शरद आणि अशोक पूर्णपणे म्युझिक सांभाळतील."
अभिजीत दोघांकडे बघून हळूवार टाळ्या वाजवून कौतूक करतो.
वृषाली, "काजल ड्रेसिंग सांभाळेल."
अभिजीत काजलकडे बघून फ्लाय किस करतो.
वृषाली, "सॉंग कलेक्शन सुध्दा प्रसादच करेल."
अभिजीत प्रसादकडे बघून फ्लाय किस करतो.
वृषाली, "अकाउंटचं सगळं काम गौरी सांभाळेल."
अभिजीत अगोदर गौरीकडे बघतो आणि मग वर देवाकडे बघून दोन्ही हात जोडून 'माफ करा' असं म्हणतो.
वृषाली, "फोटो आणि शुटिंगचं काम अजय करेल."
अभिजीत अजयचे गाल ओढतो.
वृषाली, "आम्ही नवीन सिंगर घेतोय."
अभिजीत प्रश्नार्थक नजरेने वृषालीकडे पाहतो.
वृषाली, "तो तयार होईल ना!"
अभिजीत, "कुणाची हिंमत आहे तुम्हाला नाही म्हणायला?"
वृषाली, "मग मी त्यालाच फायनल समजू?"
अभिजीत, "एकदम डन. पण कोण आहे तो?"
कोणीही काहीही बोलत नाही. सगळे अभिजीतकडे गंमतशीर हसून एकटक बघत राहतात. अभिजीत सुध्दा त्या सर्वांकडे बघतो. 'सगळे माझ्याकडेच का बघताहेत?' नंतर सगळा प्रकार त्याच्या लक्षात येतो आणि अजयच्या मांडीवरुन तो तत्काळ उठतो. अभिजीत, "नाही...!!"
सगळे, "हो...!!"
अभिजीत, "नाही... नाही... नाही..."
सगळे, "हो... हो... हो..."
प्रसाद, "जागरणाला तर मस्त गात होतास."
अभिजीत, "अरे प्रत्येक वर्षी आपण गात असतो. त्यात एवढं काय? आणि त्या एका गोष्टीवरुन तुम्ही मला सिंगर म्हणून का घेता? हे पहिलंच वर्ष नाहीये की मी त्यात भजन करतोय."
अजय, "आमच्याकडे तेव्हा ती नजर नव्हती ना!"
अभिजीत, "साल्यांनो, एका रात्री तुम्हाला नजर आली?"
शरद, "साल्यांनो...? साक्षात अभीने हा शब्द वापरला?"
अभिजीत, "यार प्लीज, गोंधळ करु नका. मी मस्करीच्या मुडमध्ये नाहीये."
प्रसाद पुढे येतो.
प्रसाद, "अभी, तुझा आवाज चांगला आहे. विश्वास ठेव. तू नक्कीच चांगला सिंगर बनशील"
अभिजीत, "तीन लाख घरांमध्ये आणि दिड लाख मंडळांमध्ये गणपतीत भजनं होतात. मग काय सगळ्यांचेच आवाज चांगले असतात?"
प्रसाद, "पण अभी, तुझ्यात टॅलेंट आहे. तू चांगला सिंगर बनू शकतो"
अजय, "अभी, मी एक क्लिप रेकॉर्ड केलीये. ती क्लिप ऐकशील तर तू शंभर टक्के तैयार होशील विथ चॅलेंज."
अभिजीत, "मी? आणि शंभर टक्के तयार? दाखव तर...?"
अजय त्याच्या मोबाईलमध्ये थोडा वेळ काहीतरी चाळत बसतो. मग शरदला लॅपटॉप मागतो. लॅपटॉप ऑन केल्यानंतर ब्लुटूथने तो आपल्या मोबाईलमधली क्लीप लॅपटॉमध्ये टाकतो. अभिजीतला लॅपटॉपसमोर बसवलं जातं. आणि सगळे त्याच्या मागे उभे राहतात. अजय ती व्हिडीओ सुरु करतो.
व्हिडीओ सुरु होतो.
व्हिडीओमध्ये त्याच ठिकाणी अभिजीत प्रसादच्या समोर गुडघ्यांवर टेकून उभा आहे.
अभिजीत "कोण म्हणालं की त्यांनी तुझा अपमान केला? त्यांना काय कळतं? पैसा आहे म्हणून ते असे वागतात. पॅडी, तुला माहितीये तुझ्यात मॅनेजमेंटचा खूप चांगला गूण आहे. तू चित्र चांगली काढतोस, गीत चांगले लिहीतोस, दिलेलं काम पूर्ण करतोस. हे सगळे तुझ्या मनात चाललेल्या हालचालीच दाखवतात ना! तुझं मन गौरीसारखं झोपलेलं नाहीये."
गौरी, "काय बोललास?"
अभिजीत, "अगं रात्री तू झोपली होतीस ना! तो नाही झोपला, म्हणून असं बोललो." गौरी, "हं.... मग ठिक आहे."
सगळे हसतात, पण प्रसाद हसत नाही. मग काजल आणि अजयसुध्दा प्रसादच्या बाजूला येऊन बसतात. प्रसादचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन म्हणतो,
अभिजीत, "एका चूकीमूळे स्वतःला एवढी मोठी शिक्षा का देतोस? पॅडी, हे बाहेरचं जग आपल्याला फक्त कामापुरतच आहे. पण तू सगळ्यांना खूप चांगलं सांभाळून घेतोस. तू आम्हा सर्वांची जबाबदारी घेतोस. बघ जरा सगळ्यांकडे, वृषाली सोडली तर आमच्यापैकी कुणालाही घरी पोहोचायला थोडा सुध्दा उशीर झाला असेल तर आमच्या घरुन पहिला फोन हा तूलाच येतो. येतो ना!"

अभिजीत, "मग का अशी हार मानतोस? तूच म्हणाला होतास ना! या लाईनमध्ये अशा गोष्टी होतच असतात. जोपर्यंत लोकांना आवडेल असं तू देशील, तोपर्यंत तूला डोक्यावर घेतात. थोडासा पाय घसरला की, दुसऱ्याला डोक्यावर बसवतात. पण पॅडी तू तसा नाहीस. तू नक्की असं काही करुन दाखवशील की लोक कायम तूलाच डोक्यावर घेशील. बघ मी तूला प्रॉमिस करतो, तूला पुढे नेण्यासाठी मी पाहिजे ते करेन."
व्हिडीओ संपते.
अजय, "ऐकलंस, शेवटचं वाक्य काय म्हणालास ते? तुला पुढे नेण्यासाठी पाहिजे ते करेन."
अभिजीत धक्क्यातून सावरत, "अज्या, साल्या हरामखोरा कुठल्या जन्माचा बदला घेतोयेस? तू अशा सिच्युएशनला सुध्दा क्लिप काढतोस?"
अजय काही बोलत नाही. फक्त अभिजीतकडे बघून डोळा मारतो.
वृषाली, "मग आम्ही डन समजू ना!"
अभिजीत थोडा वेळ शांत बसतो, "आता काही उरलंय का? (मान खाली घालून) डन."
सगळे आनंदाने उड्या मारतात. आता ग्रुप एकत्र काम करेल. आठवड्याचे सातही दिवस एकत्र असेल. शरद, अजय आणि अशोक आनंदाने मद्यधुंद झालेल्या व्यक्तीप्रमाणे विचित्र प्रकारे नाचू लागतात. प्रसाद अभिजीतला मिठीत घेतो. 'थॅंक्स अभी.'
अभिजीतला काही सांगायचं होतं. तो ज्या व्यक्तीसोबत फोनवर बोलत होता, ती व्यक्ती त्याची कार्यक्षमता बघून त्याला नोकरीवर घेण्यासाठी तयार झाली होती. हीच आनंदाची बातमी सांगण्यासाठी अभिजीत तिथे आला होता. पण मित्रांच्या हट्टापुढे आणि आनंदापुढे त्याच्या त्या नोकरीचा पहिला दिवसही भरता भरता राहून गेला.
अभिजीतने त्यावेळी प्रसादचा विचार केलेला असतो. दोन वर्षांच्या धडपडीनंतर आता प्रसादचं लग्न ठरलं होतं. गावचीच मुलगी होती, मिनाक्षी. तिने शेतीविषयाचा चांगला अभ्यास केला होता. काळासोबत पुढे जाणारे संस्कार कायम सोबत ठेवले होते. इतरांना आदर देणे, प्रेमळ बोलणं यांमुळे ग्रुपमधील सर्वांना तिचा स्वभाव आणि प्रसादसाठी ती आवडली होती. आता तिच्या आणि प्रसादच्या नव्या संसाराची चांगली सुरुवात व्हावी. तिला प्रसादसोबत कधीही असुरक्षिततेची जाणिव न व्हावी, यासाठी मला नक्कीच काहीतरी करता येईल. जर त्यांची इच्छा असेल, मी गाणं गावं, तर मी ते देखील करेन.
दुसरा दिवस उजाडतो. सकाळपासून अभिजीत वेगवेगळे गाणे ऐकायला सुरुवात करतो. सकाळचा नाश्ता करुन तो आपल्या सरांकडे जाऊन उद्यापासून कामावर येणार नाही, असं सांगतो. प्रसाद त्याची गाडी घेऊन येतो. दोघेही गरीबाच्या वाड्यावर जातात. प्रसाद अभिजीतला संगीताचे प्रकार शिकवतो. हळूहळू संपुर्ण ग्रुप तिथे येतो. दुपारी काजल सर्वांसाठी जेवणाचे डब्बे घेऊन येते. सगळेजण जेवायला बसतात. मुद्दाम अभिजीतला चांगलं आणि सर्वांपेक्षा वेगळं जेवण दिलं जातं. अभिजीत अगोदर नाही म्हणतो. नंतर सर्वांच्या आग्रहाखातर त्याला चांगलं जेवण जेवावं लागतं. मग अभिजीत व प्रसाद बाहेर अंगणात जाऊन गाण्यातील स्वर यांबाबत बोलतात. प्रसाद त्याला स्वर गाऊन दाखवतो. तर आतमध्ये वृषाली आणि गौरी आर्थिक गोष्टींचा अभ्यास करत असतात. गौरीने आपल्या पी.एफ.चे रु.६५,००० आणलेले असतात. अजय रु.३,०००, प्रसाद-काजल रु.१६,०००, शरद रु.७,०००, अशोक रु.६,५००, अभिजीत रु. १,४५,०००, वृषाली रु.४२,५०० असे एकूण रु.२,८५,००० जमा झालेले असतात. प्रसाद, अजय आणि गौरीने आपल्या आयुष्यातील शेवटची कमाई पूर्णपणे ग्रुपसाठी दिलेली असते. फक्त एकमेकांच्या समाधानासाठी खोटं सांगतात घरीसुध्दा थोडेफार दिले म्हणून. तीन लाखांच्या जवळपास रक्कम जमा होते तरी ती कमीच असते. आणि तीन लाखांच्या जवळपास रक्कम जमा झाली म्हणजे ही काही कमी रक्कम नाही. या गोष्टीची जाणीव प्रत्येकामध्ये होती. जो तो काटकसरीने वागत होता. गौरी आणि वृषाली व्यवस्थितपणे अकाउंट सांभाळतात. प्रसाद आपल्या जुन्या मंडळांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. पण प्रसादचेच शब्द असतात, 'या लाईनमध्ये अशा गोष्टी होतच असतात. जोपर्यंत लोकांना आवडेल असं तू देशील, तोपर्यंत तूला डोक्यावर घेतात. थोडासा पाय घसरला की, दुसऱ्याला डोक्यावर बसवतात....!'
कुठूनही चांगला प्रतिसाद येत नाही. अभी आता चांगला गाऊ लागला होता. शरद आणि अशोकने वाद्यांवर चांगलाच हात बसवला होता. प्रसादाला घेऊन अजयच सगळीकडे फिरत असे. कोणताही कार्यक्रम मिळत नसल्याने काजल घरीच होती. दोन आठवडे उलटून जातात. कुठूनही प्रतिसाद न आल्याने शेवटी अभिजीत प्रसादला प्रश्न विचारतो, "काय झालयं? दोन आठवडे झालेत आणि अजून एकही ऑर्डर आली नाही?"
प्रसाद, "सांगतो असं म्हणाले, बघूया आता."
अभिजीत, "ते असंच बोलतील. ऑर्डर घेण्यापेक्षा आपणच ऑर्डर तयार करुया."
प्रसाद, "मला समजलं नाही."
अभिजीत, "तुम्हा सर्वांना वाटतं ना! माझ्यात टॅलेंट आहे म्हणून...?"
प्रसाद, "हो."
अभिजीत, "मग आपण स्वतः स्टेज शो ठेवूया."
प्रसाद, "स्टेज शो आपण ठेवायचा?"
अभिजीत, "नाही ठेवू शकत का?"
प्रसाद, "ठेवायला हरकत नाही, पण खर्च खूप येतो."
अभिजीत, "किती असेल अंदाजे?"
दोघे बोलत असताना दरवाजा उघडून गौरी आत येते, "पेढे घ्या."
प्रसाद, "कसले पेढे?"
गौरी, "माझी लहान बहीण आहे ना, रुपाली. ती ना पास झाली."
प्रसाद, "ना पास झाली?"
अभिजीत, "तुझी बहीण नापास झाली आणि तू पेढे वाटतेस?"
गौरी, "नापास नाही रे, ती पास झाली."
अभिजीत, "पास झाली? कुठे पास झाली?"
गौरी, "अरे परिक्षेमध्ये पास झाली."
अभिजीत, "अरे वा! तिलाच पाठवायचं मग पेढे घेऊन."
गौरी, "आलीये ती... बाहेर काजल आणि अजयसोबत बोलतेय."
प्रसाद आणि अभिजीत पेढे घेतात.
प्रसाद, "किती टक्के मिळाले?"
गौरी, "८७ टक्के."
अभिजीत, "एक मिनीट, आज दहावीचा रिझल्ट नाहीये."
गौरी, "हो... ती सातवीला होती."
प्रसाद आणि अभिजीत एकमेकांकडे बघून डोक्यावर हात मारतात आणि हसू लागतात. दोघेही बोलण्याचा मुळ मुद्या विसरतात आणि गौरीला चिडवतात. रुपाली पहिल्यांदाच आल्याने तिला घेऊन सगळे हॉटेलमध्ये जातात.
वृषाली, "तू नॉनव्हेज खातेस का?"
रुपाली, "नाही."
शरद, "बंद करा तूमचं ते व्हेज-नॉनव्हेज. एकतर खूप भूक लागलीये."
मित्रमैत्रिण म्हटलं तर मस्ती, मौज-मजा आलीच. रुसवे फुगवे असतात. खोडकरपणा असतो. बदमाश ग्रुपचं देखील असंच होतं. त्या सर्वांनी मिळून आपलं एक वेगळंच विश्व निर्माण केलं होतं. विश्व निर्माण करत असताना त्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागूणांना देखील चालना दिली होती. प्रत्येकजन आपल्यातील कौशल्य दाखवत होतं. कौशल्य नसेल तर प्रोत्साहन देत होतं. दिवसामागून दिवस जात होते. अभिजीतचे शब्द प्रसादच्या लक्षात होते. पण प्रत्यक्षात काही होत नव्हतं. प्रत्येकाच्या कलेला गंज लागत होता. मौजमजा करण्यातच सगळे रमले होते. आणि एक दिवस अचानक
काजल, "गाईज, हे बघा, युथ म्युझिकल स्पर्धेचा अॅप्लिकेशन फॉर्म."
प्रसाद तिच्या हातून फॉर्म घेतो.
प्रसाद, "तूला कुठे मिळाला?"
काजल, "आमच्या कॉलेजमध्ये आले होते ते. कोणी इंटरेस्टेड असेल त्यांना सांगायला सांगितलं. मग मी पण एक घेतला."
प्रसाद, "हे बघ अभी"
अभिजीत फॉर्म हातात घेतो.
वृषाली, "स्पर्धा कसल्या करता? आपण हे सगळं इन्कमसाठी करतोय. ते सोडून कॉम्पिटीशन करत बसायचं का?"
अभिजीत, "मला वाटतं, पार्टिसिपेट करायला काही हरकत नाही."
गौरी, "का? त्याने काय होईल?"
अभिजीत, "नाहीतरी इथे बसून दिवस ढकलतोच आहोत ना आपण! एकदा स्टेज शो केला तर आपल्याला आईडिया येईल आपण नक्की कुठे आहोत ते."
प्रसाद, "मला अभीचं बोलणं पटतंय."
शरद, "तो माझा डायलॉग आहे."
प्रसाद, "उधार घेतला असं समज. मित्रांनो पार्टिसिपेट करुन बघू. चांगलं झालं तर चांगलं. तिथे आपल्याला इतर ग्रुपबद्दल सुध्दा कळेल."
गौरी आणि वृषाली एकमेकींकडे बघतात. त्या दोघींना देखील प्रसाद आणि अभिजीतचं बोलणं पटतं. दोघी तयार झाल्या म्हणजे सगळे तयार. काजल लगेच फोन करुन तिच्या मैत्रिणीला भाग घेत आहे असं सांगते. स्पर्धा रविवारी म्हणजेच पाच दिवसांनी असते. स्पर्धेच्या निमित्ताने मॅनेजमेंटची क्षमता किती आहे हे कळतं. प्रसाद भाग घेताना भरावयाची रक्कम भरतो, ग्रुपमधील सर्वांची नावे आणि श्रीगणेश कलामंच हे नाव अर्जावर लिहीलेलं असतं, अजय कॅमेऱ्याची तयारी करतो, अशोक आणि शरद सर्व वाद्ये दुरुस्त आहेत की नाही हे तपासून पाहतो, प्रसादने लिहीलेली गीतं अभिजीत पाठ करतो. काजल तिच्या कॉलेजमधील मैत्रिणींसोबत सर्वांच्या वेशभूषेची तयारी करते.
क्षणातच पाच दिवस निघून जातात. युथ म्युझिक स्पर्धा सुरु असते. पण श्रीगणेश कलामंचातील सर्वांवर दडपणापेक्षा निराशाच जास्त असते. इतर स्पर्धकांची नावं हे त्यांचा वेगळेपणा दाखवत होतं. सर्वांकडे त्यांची स्वतःची वाद्ये होती, आपल्या मित्रांच्या नावावरुनच सगळे हसत होते. 'श्रीगणेश कलामंच' आणि वाद्ये कुणीतरी वापरुन टाकलेली, तीच विकत घेतलेली. दडपणासाठी हेच कमी होतं की त्यांचा परिक्षक हा प्रसादचा अपमान करणारा मराठी दिग्दर्शक होता. त्याचं नाव प्रमोद पाटील होतं. जेव्हा श्रीगणेश कलामंचाचं नाव स्टेजवर घेतलं जातं तेव्हा सर्वप्रथम प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडतात. वृषाली तर स्पर्धा सोडून निघायला सांगते. पण प्रसाद नाही म्हणतो,
"हे जे सगळे हसताय ना, तेच बघ थोड्या वेळाने, 'वन्स मोअर, वन्स मोअर' म्हणतील."
वृषाली, "पॅडी, अभीचा हा पहिला स्टेज शो आहे. तो या सर्वांना नाही सामोरं जाऊ शकणार."
अभिजीत, अशोक आणि शरद स्टेजवर जातात. त्यांच्या चालण्यात देखील साधेपणा असतो. समोर प्रेक्षकवर्ग हा पाश्चिमात्य विचारांचा असतो. ते सगळे चिडवायला सुरुवात करतात. 'आता असे लोक सुध्दा भाग घेणार?', 'पैशांसाठी कुणालाही स्टेजवर आणतात.', 'नाव पण किती ओल्ड फॅशन आहे.' प्रेक्षकांमध्ये उभा असलेल्या अजयपासून स्टेजमागे असलेल्या प्रसाद, गौरी, वृषाली, काजलपर्यंत हे सगळं ऐकू येत असतं. आणि अभी, त्याचा तर पहिलाच स्टेज शो होता. एका स्पॉटबॉयला तो माईक हातात घेऊनच आवाज देतो, "दादा, जरा याचं स्टॅंड आणाल का?"
परिक्षक असलेले प्रमोद पाटील देखील डोक्याला हात लावतात. स्पॉटबॉय माईकसाठी स्टॅंड लावून जातो. स्टेजवर अभिजीत,
"मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार, हा माझा पहिलाच स्टेज शो आहे."
"मग नाचू कां?" प्रेक्षकांमधून एकजण ओरडला.
ज्याप्रमाणे मागच्या वेळी प्रसादच्या अपमानाबद्दल अभिजीतला राग आला होता, त्याप्रमाणे प्रसादला या वेळी अभिजीतच्या अपमानाबद्दल राग आला. अभिजीत मात्र शांतच होता. त्यावर कुणाचंही आणि कसलंही दडपण नव्हतं. मनात फक्त एकच गोष्ट होती, इथून निघाल्यावर माझ्या सर्व मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे.
अभिजीत, "नाही मित्रा, नाचू नकोस. फक्त गाणं ऐक."
प्रमोद पाटील, "तुमचं गाणं सुरु करा."
अशोक ड्रम वाजवायला सुरुवात करतो,
ढिक् टाक... ढिक् ढिक् ढिक् टाक...,
ढिक् टाक... ढिक् ढिक् ढिक् टाक.....
मग शरद,
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग
संगीतात दोघांचीही नाळ जूळलेली असते. दोघांमध्ये अशी जुगलबंदी जमते की, सर्व प्रेक्षक नकळतपणे टाळ्या वाजवू लागतात. प्रत्येक सेकंदाला प्रसाद आणि वृषालीच्या हृदयाचे ठोके वाढत असतात. गौरी तर डोळे बंद करुन देवाकडे प्रार्थना करत असते. श्रीगणेश कलामंचाच्या सर्वांमध्ये जिंकण्याची इच्छा नसते, त्यांना काळजी असते ती अभिजीतची. त्याचा पहिलाच स्टेज शो आणि बिघडलेलं वातावरण. पण अशोक आणि शरदने संगीताच्या आधारावरच प्रेक्षकांना मुग्ध केलं होतं. आता मात्र आपण गाणं गाऊ शकतो असा अंदाज बांधून अभिजीत सुरु होतो.
अभिजीत, "Yo everybody, are you enjoy this?"
प्रेक्षक, "Yes."
अभिजीत, "My Friends… Say Hi…"
प्रेक्षक, "Hi…"
अभिजीत, "You wanna loud?"
प्रेक्षक, "Ya…"
अभिजीत, "Ok. Say गा..."
प्रेक्षक, "गा...."
अभिजीत, "Then सा...."
प्रेक्षक, "सा..."
अभिजीत, "रे..."
प्रेक्षक, "रे..."
अभिजीत, "सा.. गा.. रे.."
प्रेक्षक, "साऽऽ.. गाऽऽ.. रेऽऽ.." अभिजीत,
" सा रे सा रे गारे...
गाऽऽ साऽऽ रेऽऽ माझ्यासंग गा रे...
गा सा रे सा रे सारे गारे...
नवचैतन्य वेडे रे... ते तिथे जे इथे...
बावरे वेड कसे हे... ते तिथे जे इथे...
सांगे तुम्हा आम्हा...
गा सा रे सा गा रे...
वैरी जे काही असे... सोडून दे तू...
गाऽऽ सा रेऽऽ माझ्यासंग गा रे...
गा सा रे सा रे सारे गारे...
सांगे तुम्हा आम्हा...
माझा मित्र बोले...
तू दोसती भी कर ले... हो जाऊ दे मी आणि तू...
गा सा रे सा रे सारे गारे... माझ्यासंग गा रे...
सा रे सा रे सारे गारे... माझ्यासंग गा रे...
जुन्या रुढी सोड तू... खोट्याा बेड्या तोड तू...
तू मी आणि आपूली... ही मैतरी...
ते तूला ही जानवे...
जे मला ही जानवे... तू मी आणि आपूली... ही मैतरी...
गा सा रे सा रे सारे गारे... माझ्यासंग गा रे..."
अभिजीत माईकवर हात ठेवतो आणि दिर्घ श्वास घेत डोळे बंद करुन माईकवर डोकं टेकवतो. प्रेक्षकांमधून 'वन्स मोअर... वन्स मोअर...' असा आवाज येतो.
गाणं इतकं चांगलं होतं की, फोटो काढायचं सोडून अजय सुध्दा स्टेजवर उभा असलेल्या अभिजीतकडे पाहत उभा असतो. प्रसाद वृषालीकडे बघत चेहऱ्यावर अभिमान असल्यासारखा भाव दाखवतो. काजल आणि गौरी एकमेकींना मिठी मारतात. प्रमोद पाटील स्वतः उभे राहून श्रीगणेश कलामंचाच अभिनंदन करतात. स्टेजच्या पाठीमागे तर अश्रूंचा पुरच लागलेला असतो. अर्थातच आनंदाश्रूंचा. प्रसाद, वृषाली आणि गौरी गाण्याने भारावून गेले असतात. श्रीगणेश कलामंच स्टेज सोडून आत जात असतो तेव्हा,
प्रमोद पाटील, "हे मुला, तू."
अभिजीत, "हो सर...?"
प्रमोद पाटील, "कोण आहेस तू? कोण आहात तुम्ही?"
अभिजीत, "मी अभिजीत देशमुख आणि हा आमचा ग्रुप. सर्वांना स्टेजवर बोलावू का?"
प्रमोद पाटील, "हो नक्कीच."
अभिजीत सर्वांना स्टेजवर येण्यासाठी आग्रह करतो. प्रसादपासून अजयपर्यंत सगळे स्टेजवर येतात.
अभिजीत, "सर, ओळखलंत का तुम्ही या चेहऱ्यांना?"
प्रमोद पाटील, "नाही."
अभिजीत अजयच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, "हाच तो मुलगा ज्याला तुम्ही तीन महिन्यापूर्वी एका पार्टीमध्ये बदमाश म्हणाले होते."
प्रमोद पाटील, "अच्छा... अच्छा.. तर ते तुम्ही होतात?"
अभिजीत, "हो. झाला तो प्रकार मी आता इथे सांगणार नाही..."
प्रमोदला त्याची चूक कळलेली असते, "मी माफी मागतो तुम्हा सर्वांची. मी तुमच्यावर अन्याय केला होता. पण आता ती चूक मी भरुन काढेन. मित्रांनो, माझ्या पुढच्या सिनेमामध्ये मी अभिजीत देशमुखला लॉंच करतोय."
प्रेक्षक टाळ्या वाजवून श्रीगणेश कलामंचाचं अभिनंदन करतात.
प्रमोद, "कारण देखील स्पष्ट आहे. ज्या व्यक्तीने विरोध करणाऱ्यांना वन्स मोअर बोलण्यासाठी भाग पाडलं त्या व्यक्तीकडे किती चांगली कार्यक्षमता असेल?"
काहीजण लगेचच त्या ग्रुपचा फोटो काढतात. श्रीगणेश कलामंचाचं नाव व्यवस्थित न कळल्याने एक प्रेक्षक ओरडून विचारातो, "सर, व्हॉट्स युअर ग्रुप नेम?"
प्रसाद, "श्रीगणेश क..."
अभिजीत, "बदमाश ग्रुप."
खाड्कन मान फिरवून पूर्ण ग्रुप अभिजीतकडे बघतो. कोणी काही बोलणार इतक्यात, प्रेक्षक, "बदमाश... बदमाश... बदमाश... बदमाश..."
प्रमोद पाटील, "अभिनंदन बदमाश ग्रुप. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!"
शक्यता नसताना देखील श्रीगणेश कलामंच बदमाश ग्रुप ती स्पर्धा जिंकतो. ग्रुपला एक नवी ओळख मिळते. पण क्षणार्धात झालेलं नामकरण सर्वांना धक्का देणारं असतं. अभिजीतने नाव का बदललं, यासाठी सगळे जवळच्या मॉलमध्ये बसून बोलतात.
गौरी, "काय फालतूगिरी चाललीये ही तुझी?"
अभिजीत, "कसली फालतूगिरी?"
वृषाली, "तुला ग्रुपचं नाव चेंज करायला कोणी सांगितलं?"
गौरी, "कुणाला विचारुन तू ग्रुपचं नाव चेंज केलंस?"
वृषाली, "नाव चेंज करायचं तर कर ना, पण हे काय? बदमाश."
गौरी, "चांगलं देवाचं नाव होतं ना! तो पाटील जरा काय बोलला तर मोठं नको समजू स्वतःला."
अभिजीत, "हे नाव मी नाही, त्या लोकांनी आपल्याला ठेवलंय."
गौरी, "कोणी काही बोलू दे ना! नाव चेंजच का करायचं? बदमाश. इऽऽ.... याक्स."
अभिजीत, "खरंच तुम्हाला हे नाव नाही आवडलं?"
वृषाली आणि गौरी रागाने 'नाही' म्हणतात. अभिजीत शांतपणे त्या दोघींकडे बघत राहतो. नंतर त्या दोघीही एक एक करुन इतर सर्वांकडे बघतात.
शरद, "मला काही प्रॉब्लेम नाही."
अजय, "ते लोक कसे हसत होते बघीतलं ना, मग आपल्याला हेच नाव ठिक आहे."
अशोक, "थोडातरी चेंज हवा."
काजल, "बदमाश तर आहोत आपण."
रुपाली, "मी फस्र्ट टाईम तुमच्यासोबत आलीये, मला काही विचारू नका."
प्रसाद, "माझ्याकडे काय बघताय? तुम्हा दोघींना आवडलं नाही? मग तुम्ही नाव सुचवा."
गौरी, "अरे पण बदमाश का? आपण समजू शकतो. पण लोक काय म्हणतील?"
शरद, "तू लोगोंको छोड दे, कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना।"
हॉटेलमध्ये काही कॉलेजचे विद्यार्थी आलेले असतात. बराच वेळ ते या ग्रुपकडे पाहत असतात. न राहवून त्यांपैकी तीन-चार जण ग्रुपजवळ जातात आणि त्यांपैकी एक म्हणतो, "सर, बदमाश ग्रुप का?"
प्रसाद दोघींकडे बघून मान फिरवतो. अभिजीत आणि प्रसाद, "हो."
पहिला मुलगा, "सर तुमचा परफॉर्मन्स चांगलाच झाला. म्युझिक आणि सॉंग दोन्हीही मस्तच होतं."
शरद, "या... या... या... थॅंक्स."
पहिला दुसऱ्याकडे बघतो, 'तू विचार ना!' दुसरा, 'नको, तू विचार.'
प्रसाद, "काही बोलायचंय का?"
दुसरा मुलगा, "आमच्याकडे तुमच्या परफॉर्मन्सची क्लिप आहे. आम्ही ती फेसबूकवर अपलोड करु शकतो का?"
अजय, "हा बघा, कलयुगातला राजा हरिशचंद्र, अरे आपण कितीतरी पोस्ट अपलोड करत असतो. त्यावेळी आपण कुणाची परवानगी घेतो का? फेसबूक काय? यु-ट्याूब वर पण अपलोड करा."
पहिला मुलगा, "थॅंक्स सर. आणि अभिनंदन तुमच्या पहिल्या मुव्हीसाठी."
अभिजीत, "थॅंक्स."
दोघेही निघून जातात. अभिजीत आणि प्रसाद वृषाली-गौरी कडे बघतात.
वृषाली, "ठिक आहे. आता मी तरी काय बोलणार? बदमाश तर बदमाश."
रुपाली, "वॉव, आपण बदमाश म्हणून ओळखले जाणार?"
वृषाली रुपालीकडे रागाने बघते. अजय तो क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करतो.
काही दिवसांनी प्रमोद अभिजीतला आपल्या सिनेमामध्ये गाणी गाण्यासाठी बोलावतो. पहिला अनुभव असून देखील अभिजीत मुक्तपणे वावरत होता, स्टूडियोमध्ये गेल्यावर त्याला दिलेल्या बोलांचा कागद समोर घेऊन तो गाऊ लागतो,
"सौर्षा नव क्षितीजी येई... जातभेदी अस्त होती...
का कसे... तुझे हे मन सांगे... हा हर्ष जो मला सांगे..."
स्टूडियोमध्ये अभिजीत चांगलं गाणं गातो. अशोक आणि शरद सुध्दा म्युझिक देण्यासाठी मदत करतात, अजय कार्यक्रमाव्यतिरीक्त फोटो काढू लागतो. ग्रुप हळूहळू प्रकाशझोतात येत होता. बदमाश ग्रुपला फेसबूकवर लाईक्स मिळत होते, यु-ट्यूबवर हिट्स मिळत होत्या. जे कोणी त्यांना आधी नाही म्हणाले ते सर्व आता जास्त पैसे देऊन दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी त्यांना विचारत होते. प्रसादने त्या सर्वांना नकार दिला. गौरीने आपलं पूर्ण लक्ष बदमाश ग्रुपच्या जाहिरातीवर केंद्रित केलं. सागर नाशिकहून परत आल्याने वृषाली थोडा कमी वेळ द्यायची.
बघता बघता प्रसादचं लग्न झालं. त्याच्या लग्नात बदमाश ग्रुपने भरपूर धमाल केली. हळूहळू मान्यवर होण्याच्या दिशेने वाटचाल करणारे त्या दिवशी निरागस मुलांप्रमाणे धमाल करत होते. लग्नानंतर ग्रुप काही दिवसांसाठी प्रसादला सुट्टी देतो. महिनाभराच्या सुट्टीवरुन आल्यानंतर प्रसाद पुन्हा त्याच जोमाने कामाला लागतो, या वेळी कारण असतं ते घर चालवायचं. मिनाक्षीदेखील ग्रुपसोबत चांगली मिसळली होती. हॉटेल्स असताना देखील अनेकदा ग्रुप प्रसादच्या घरी जेवायला जायचा.
वृषाली, "तुम्ही नॉनव्हेज खाता का?"
मिनाक्षी, "नाही तर..."
वृषाली फक्त मान हलवते आणि ग्रुपमधील सर्वजण डोक्याला हात लावतात.
प्रमोद पाटील यांच्या सिनेमाचं संगीत चांगलंच गाजतं. त्यामध्ये अभिजीतने गायलेलं आणि शरद-अशोकने संगीत दिलेलं गाणं चांगलंच लोकप्रिय होतं. अभिजीतला, अशोक, शरद यांना इतर सिनेमांसाठी प्रस्ताव मिळत होते. काही दिवसांतच तिघेही कमालीचे लोकप्रिय होतात. दुसरीकडे अजय प्रेमात गुंततो. दिल्लीमध्ये फोटोग्राफी असल्याने तिथे गेल्यावर महाराष्ट्रातून आलेल्या नम्रतावर त्याचा जीव जडतो. नम्रतादेखील त्याच्यावर प्रेम करु लागते. हे सर्व कधी आणि कसं होतं हे कुणालाही कळत नाही. पण अजय आता नम्रताच्या प्रेमात असतो. वृषालीच्या घरी सागर आणि तिच्या लग्नाचा मुहूर्त पाहणं चालू असतं. गौरीचंही काही वेगळं नसतं, लग्नाच्या धावपळीत तिचेही आईवडील पुढेच असतात. प्रत्येक दिवशी कुणा ना कुणाचा फोटो दाखवनं सुरुच असतं. तर मैत्रीची ही गोष्ट पोहोचते लग्नाच्या बेडीपर्यंत.
स्टिफन, "मग? पुढे काय?"
वृषाली, "आमच्या लग्नासाठी सात महिन्यांनंतरचा मुहूर्त शुभ होता. म्हणून लग्न पुढे ढकललं होतं. गौरी लग्नासाठी दोन वर्ष तरी थांबायला सांगते. तिला स्वतःच्या कर्तुत्त्वावर काही करायचं असतं. नम्रताचे वडील परदेशात असल्याने दिड महिन्यानंतर त्यांची भेट होणार होती. शरद, अशोक आणि अभिजीत प्रसिध्दीझोतात होते, पण प्रेम-लग्न या प्रकारापासून लांब."
स्टिफन, "बरं मग पुढे काय झालं?"
सागर, "सर, पहाटेचे साडेचार झाले. थोडं झोपूया. आपण परत उठल्यानंतर बोलू."
स्टिफन, "तुम्हा दोघांना झोप आली?"
सागर, "म्हणजे तुम्हाला नाही आली?"
स्टिफन, "नाही. तुम्हाला आली असेल तर ठिक आहे. आपण उठल्यानंतर बोलू. उत्सूकता होती म्हणून जागा राहीलो. नाहीतर प्रवासाने माझं अंग खूप दुखत होतं. इथे उष्णता खूप जास्त आहे."
तिघेही अंगणातून घरात शिरतात.
सागर, "सर, तरी तुम्ही नाशिकसारख्या थंड हवेच्या ठिकाणी आहात. तुम्ही त्या बेडरुममध्ये झोपू शकता."
स्टिफन, "माझं लगेज?"
सागर, "त्याच रुममध्ये ठेवलंय."
स्टिफन, "ओ.के. गुड नाईट."
सागर मनातल्या मनात, 'ही काय गुड नाईट बोलायची वेळ आहे?' नंतर त्याला आठवतं वृषाली बेडरुममध्ये गेलीये. स्टिफनचा विषय सोडून तो धावत बेडरुममध्ये जातो आणि दरवाजा बंद करतो.
स्टिफन त्याच्या रुममध्ये पलंगावर हलकेच अंग टेकवतो. डोक्याखाली उशी घेऊन विचार करतो, 'भारतात येऊन फक्त चोवीस तास झाले असतील मला. सकाळी मुंबईला आलो. ताजमध्ये थांबलो. मग सागर सोबत संपर्क झाला. दुपारी नाशिकला पोहोचलो, त्याचा सेमिनार पाहिला. संध्याकाळी त्याच्या घरी आलो. रात्री इथेच जेवलो. म्हणजे मध्यरात्रीपासून ते आता पहाटेपर्यंतच मला जे हवं होतं ते मिळालं, ते देखील अर्धवट. बघूया आता, सकाळी वृषाली काय सांगते ते, वरवरचे मित्र होण्यापेक्षा मैत्री जगणारे ते मित्र होते. त्यांच्याही मैत्रीला तडा गेला? काय असावं नक्की? मी सकाळी.....' विचार करता करता स्टिफन झोपी गेला.
सकाळचे साडेअकरा वाजलेले असतात. स्टिफन जागा होतो. उशीरा उठल्याने त्याचा अंगात आळस भरतो. आंघोळ वगैरे करुन झाल्यानंतर तो त्याच्या खोलीतून बाहेर येतो.
स्टिफन, "सागर..."
वृषाली, "उठलात तुम्ही? ते गेलेत ऑफिसला."
स्टिफन, "ऑफिस. हं..."
वृषाली, "जेवायला आणू का?"
स्टिफन, "तू सोबत बसणार असशील तर नक्कीच."
वृषाली, "आलेच. तुम्ही नॉनव्हेज खाता का?"
स्टिफन, "नाही. कालच तर म्हणालो."
वृषाली, "अच्छा. विसरलेच होते मी."
दुपारी स्टिफन आणि वृषाली जेवायला बसतात. जेवण संपेपर्यंत वृषाली ग्रुपचा विषय टाळते. नंतर, "तुम्हाला पंचवटी, शिर्डीला जायचं होतं ना!"
स्टिफन, "मला ग्रुपबद्दल पूर्ण सांगशील तर मला नक्कीच जायला आवडेल."
वृषाली, "तुम्ही ग्रुपबाबत इतके इंटरेस्टेड का आहात?"
स्टिफन, "आयुष्यात गरजेच्या वेळेस जर योग्य प्रेम व आधार मिळाला नाही तर माणसाचा माणूस राहण्यात मदत होते. आज माझ्या मित्राला मदत करताना मला त्याच्या भुतकाळाची माहिती असावी, असं मला तरी वाटतं."
वृषाली, "त्याला काय प्रॉब्लेम आहे?"
स्टिफन, "तुमचा आणि माझा अभिजीत एक असला तरी तो वेगवेगळा आहे."
वृषाली, "ठिक आहे. बसा, मी सांगते. कुठे होतो आपण?"
स्टिफन, "अभिजीत... प्रेम... असंच काहीतरी सांगणार होत्या."
वृषाली, "अच्छा, सुवर्णाबद्दल बोलत होते मी."
स्टिफन, "ही सुवर्णा कोण?"
वृषाली, "गौरीचं काम वाढल्याने तिने आपल्या कामात हातभार लागावा म्हणून सुवर्णाला सोबत घेतलं. ती गौरीच्या घराजवळच होती रहायला. काही काम नाही म्हणून गौरीने सहजच तिला कामावर घेतलं होतं. प्रसाद, अभिजीत आणि अजयने त्यांना मिळणाऱ्या मानधनातून बदमाश फ्रेंड्स एज्युकेशनल ट्रस्ट सुरु केली होती. तिथून शैक्षणिकच नाही, तर भरपूर अशा सामाजिक कार्यांसाठी आर्थिक मदत दिली जात होती. गौरीच्या हाताखाली सुवर्णा ते ऑफिस सांभाळायची. दिसायला सोज्वळ होती, डोळे कसे पाणीदार, तिच्या त्या निरागस हसण्याने समोरच्या व्यक्तीच्या मनातील रागच नाहीसा व्हायचा, वयाने तरुण असली तरी लहान मुलांप्रमाणे तिचे चाळे असायचे, एखाद्या लहान मुलीप्रमाणेच ती बोलायची, अजय आणि प्रसाद लाडाने तिला 'वेडी' म्हणायचे."
अजय, "ए वेडी..."
सुवर्णा, "बोला साहेब."
अजय, "तूला कोणी विचारलं? मी माझा मेसेज वाचतोय."
सुवर्णा, "तुमच्याशी कोण बोलतंय? मी प्रसाद सरांना आवाज देतेय."
अजय, "उत्तर तयारच असतं तुझ्याकडे."
सुवर्णा, "जा चला. काम करा तुमचं. आधीच मला खूप काम असतं."
एवढं बोलून सुवर्णा कंप्युटरवर काम करु लागते. अजय गालातल्या गालात हसतो आणि प्रसादसोबत ऑफिसमधून निघून जातो. गौरी उशीरा येणार असते. दहा-पंधरा मिनीटे काम करुन झाल्यावर ती तिच्या प्रियकराला, आयुशला फोन करते. थोडा वेळ त्याच्याशी बोलते आणि अजय समोर असल्याने फोन उचलता आला नाही, म्हणून रडतच आयुशला सॉरी म्हणते. ती खोडकळ असूनही प्रेमाच्या बाबतीत खूप गंभीर होती. आयुशला ती प्रियकराऐवजी तिचा पती मानत होती. म्हणूनच त्याला दुखावणं किंवा त्याच्या मनाविरुध्द जाणं तिला आवडत नव्हतं. बोलता बोलता आयुश रागाने फोन ठेवून देतो. माझ्यामुळे तो दुखावला असं मनाशी समजून ती टेबलावर डोकं ठेवून रडू लागते. इतक्यात जोरात दरवाजा उघडला जातो. नेहमीप्रमाणे अभिजीत आपल्या वेगळ्याच चालीने सॉफ्टी खात आतमध्ये येतो. कोणीही दिसत नाही म्हणून तो गौरीच्या कॅबीनमध्ये जाऊ लागतो.
सुवर्णा, "ओ मिस्टर, कोण आहात तुम्ही?"
अभिजीत, "हाच प्रश्न मी तुला केला तर? कोण आहेस तू?"
सुवर्णा, "हॅलो, हे माझ्या मॅडमचं ऑफिस आहे. तुम्ही कोण ते सांगा अगोदर."
अभिजीत, "तुझ्या बिनडोक मॅडमला विचार जा."
सुवर्णा, "माइंड युअर लॅंगवेज. एक तर न विचारता ऑफिसमध्ये घूसलात. वर आमच्या मॅडमला नको ते बोलता?"
अभिजीत, "तुझी मॅडम म्हणजे मोठी व्ही.आय.पी. आहे का? बोल जा तिला, अभिजीत आलाय म्हणून."
सुवर्णा, "कोण अभिजीत?"
आश्चर्याने अभिजीतचे डोळे बाहेर येतात.
अभिजीत, "तुला खरंच माहित नाही का? मी कोण आहे ते?"
सुवर्णा, "नाही."
अभिजीत, "मी अभिजीत देशमुख."
सुवर्णा, "हा ना... मग काय झालं?"
अभिजीत, "तुझ्या त्या फालतू मॅडमला बोलाव जा."
सुवर्णा, "आता जास्तच होतंय तुमचं. निघा चला."
बाहेर चाललेला वाद ऐकून आतमध्ये कंप्युटरसमोर बसून गेम खेळणारी रुपाली बाहेर येते.
रुपाली, "अभी... इतक्या दिवसांनी?"
अभिजीत, "हाय डियर, मीस यू सो मच." म्हणत रूपालीला प्रेमाने अलिंगन देतो.
रुपाली, "बरोबर एक महिना झाला आपल्याला शेवटचं भेटून."
अभिजीत, "अगं कामच तसं होतं. आणि ही कोण आहे?"
रुपाली, "ताईची असिस्टंट."
अभिजीत, "काय तुझी ताई. सगळे तिच्यासारखेच जमा करते का?"
सुवर्णा आता घाबरलेली असते. अगोदरच आयुशचं टेन्शन आणि आता हा कुठला अभिजीत?
रुपाली, "नवीन आहे ती."
अभिजीत, "अरे नवीन असो वा जूनी. तिला अभिजीत देशमुख माहित नाही?"
रुपाली, "अभ्भी... सोड ना. बघ मी नवीन गेम आणलाय. चल ना आत."
अभिजीत, "ताई कुठेय तुझी? मगापासून या मुलीला दोनदा हा प्रश्न विचारुन झाला. ही काही सांगेल तर ना!"
सुवर्णा, "सर, मॅडम आज उशीरा येणार आहेत."
अभिजीत, "तुला दोनदा विचारलं तेव्हा काही सांगितलं नाही. आणि आता का सांगतेस? मी तुला विचारलं का? काम कर तुझं."
अभिजीत गौरीला फोन करतो. तिला यायला पंधरा मिनिटे आणखी लागणार असतात. मग अभिजीत आणि रुपाली गौरीच्या कॅबीनमध्ये जाऊन बसतात. सुवर्णा बाहेरच थांबलेली असते. एकाच वेळी दोन मुलांमुळे तिला रडावं लागतं, आयुश आणि अभिजीत. आता आपली नोकरी जाणार, आई-बाबा घरीच आहेत, ताईचा पगार देखील पुरत नाही. अशात मला कामावरुन काढून टाकलं तर माझं काय होईल? कोण हा पनवती अभिजीत देशमुख? एवढा कसला अॅटिट्यूड त्याला? मॅडमबद्दल वाईट बोलला म्हणून मी ओरडली ना त्याला? मग इतकं का भडकायचं? थोड्या वेळाने गौरी तावातावाने ऑफिसमध्ये येते आणि आत कॅबिनमध्ये शिरते. तिच्या ओरडण्याचा आवाज इतका मोठा असतो की, रुपालीला 'घरी जा.' सांगितलेलं सुवर्णाला देखील ऐकू येतं. रुपाली शाळेची बॅगघेऊन घरी निघून जाते.
आता ऑफिसमध्ये अभिजीत, गौरी आणि सुवर्णा हे तिघेच असतात. काम भरपूर असल्याने गौरी सुवर्णाला थांबवते. कॅबीनचा दरवाजा बंद करुन आतमधून जोरात कानाखाली वाजवण्याचा आवाज येतो. सुवर्णा आणखीच घाबरते, आता त्याने मॅडमच्या कानाखाली का मारलं? आतमध्ये काय चाललंय हे ऐकण्यासाठी ती ऑफिसचा मुख्य दरवाजा बंद करते आणि कॅबीनच्या दरवाजाजवळील कंप्युटरसमोर बसून आत काय चाललंय हे ऐकण्याचा प्रयत्न करते. आतमध्ये,
गौरी, "अभी, खोटं बोलू नकोस."
अभिजीत, "कोण तूला असं बोललं? मी खोटं बोलत नाहिये."
गौरी, "आता अजून एक कानाखाली खाशील तू. मला तुझ्या बाबांनी सांगितलं."
आतमध्ये थोडा वेळ सगळं शांत होतं. सुवर्णा हळूच दरवाजा बाजूला सरकावून आतमध्ये डोकावते. अनुत्तरीत चेहरा करुन अभिजीत खुर्चीवर बसलेला असतो आणि संतापलेली गौरी त्याच्यासमोरच उभी असते. आतमध्ये नक्की काय झालंय हे तिला काही समजत नाही.
अभिजीत, "प्लीज, कुणाला काही सांगू नकोस."
गौरी, "का नको सांगू? तूला ही गोष्ट सांगता नाही आली का?"
अभिजीत, "तेव्हा तुम्हा सर्वांना माझी गरज होती. मी एवढंसुध्दा करु शकलो नसतो का तुमच्यासाठी?"
गौरी गप्प राहते.
अभिजीत, "बाबांनी तुला आत्ताच का सांगितलं?"
गौरी, "मी ऑफिसच्या कामातून जरा फ्री झाली होती म्हणून सहजच तुझ्या घरी गेलेली. घरी फक्त तुझे बाबा होते. त्यांना बरं वाटावं म्हणून विचारलं, आता अभीच्या कामावर खूश आहात ना! तो आता स्टार झालाय..."
टेबलावर हात ठेवून अभिजीत आणि दरवाजा हलकेच बाजूला सरकावलेली सुवर्णा हे शांतपणे ऐकत होते.
गौरी, "त्यांनी सरळ मला सांगितलं, तुमच्यामुळे माझ्या मुलाच्या करियरचं नुकसान झालंय. लहानपणापासून त्याला इंजिनियर व्हायचं होतं, काहीतरी वेगळं करायचं होतं, सतत दोन वर्ष मुलाखती दिल्यानंतर माझ्या मुलाला त्याच्या आवडत्या कंपनीमध्ये पैसे न भरवता त्याच्या कर्तृत्त्वावर, त्याच्या कौशल्यावर आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या इच्छेनुसार नोकरी मिळाली होती. हीच गोष्ट सांगायला तो तुमच्याकडे आला होता आणि तुम्ही त्याला नको ते नाच-गाणं करायला लावलं. असं किती दिवस तो गाणं गात राहणार? अभीच्या आयुष्याचा तमाशा करुन टाकला तुम्ही मित्रमैत्रिणींनी. नंतर मी बोलली त्यांना, नाही काका, त्याने आम्हाला असं काही सांगितलं नव्हतं, त्याला काही प्रॉब्लेम असता तर आम्ही हे सगळं करणार नव्हतो. तुला नाही माहित अभी..."
अभिजीत, "आता शांत बस, मला माहितीये घरी काय वातावरण आहे ते."
गौरी, "मग अभी, तुला सांगावसं वाटलं नाही का? आणि तुला पहिलाच जॉब लागला होता ना! तुझे बाबा काही चुकीचं बोलले नाही. चूक आमचीच आहे."
अभिजीत, "गौरी... प्लीज. तुमची कुठे काय चूक आहे? तुम्ही सर्वांनी मला विचारलं आणि मी 'हो' म्हणालो."
गौरी, "अरे पण तुला काय गरज पडली एवढी महान व्हायची? तू नाही म्हणाला असता तर मेलो नसतो आम्ही."
अभिजीत खुर्चीवरुन उठतो, गौरीला पकडतो आणि जबरदस्तीने तो बसला होता त्या खुर्चीवर बसवतो. मग तिच्यासमोर गुडघ्यांवर उभा राहून हळू आवाजात म्हणतो, "चूप... चूप... परत असं बोललीस तर.. तू काय बोललीस याचा विचार तरी केलास का? इतकी वर्ष झाली आपल्या सर्वांच्या मैत्रीला, मी जॉबला नव्हतो तेव्हा तुम्ही सर्वांनीच समजून घेतलं ना मला? तू तर माझ्या जॉबसाठी स्वतःजवळचे पैसे देत होतीस. माझ्या अभ्यासामध्ये, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी तुम्ही सर्वांनी मला मदत केली तेव्हा जाऊन मी इतका मोकळेपणाने जगत होतो ना! तेव्हा मी असं म्हणालो होतो का? की तुम्ही कोणी मदत केली नाही तर मेलो नसतो."
गौरी जरा शांत होते. पण तिचा राग गेलेला नसतो. ती अभिजीतच्या चेहऱ्याकडे पाहत सुध्दा नाही.
अभिजीत, "तुला माहितीये, ज्यावेळी वृषाली म्हणाली, मी सिंगर होणार, तेव्हा तुम्हा सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. वाटलं हाच तो क्षण आहे जिथे तुम्हा सर्वांना माझी गरज आहे. मी सहजच 'नाही' म्हणू शकलो असतो. माझ्याकडे तसं कारण देखील होतं. पण जर मी 'नाही' म्हणालो असतो तर गरजेच्या वेळी मित्रांच्या उपयोगी नाही आलो, असंच शेवटपर्यंत वाटलं असतं मला. तो जॉब लागल्यावर मी सेटल झालो असतोच. पण मग तुम्हा सर्वांचं काय? मी तुम्हा सर्वांसोबत काम करणार हा विश्वास शरद आणि अशोकच्या मनात होता म्हणून त्या दोघांनी अगोदरच जॉब सोडला होता."
गौरी, "आणि घरच्यांचचं काय?"
अभिजीत, "महाभारतात तर कर्णाने दुर्योधनच्या मैत्रीसाठी आपल्या सख्ख्या भावांविरुध्द लढला होता. इथे मला फक्त घरच्यांचचं लेक्चर ऐकावं लागतं. बस्स्..."
गौरी, "नौटंकीच आहेस तू. आपला विषय चालू होता. महाभारतात कुठे पोहोचलास?"
अभिजीत, "महाभारतात मैत्रीसाठी एवढं काही होऊ शकतं तर आत्ता का नाही?"
गौरी, "आणि तुझा जॉब? त्यासाठीच एवढा शिकला होतास ना!"
अभिजीत, "जॉब करुन माझ्याकडे बंगला, गाडी, पैसा, सगळंकाही असतं, फक्त माझे मित्र नसते."
गौरी, "खरंच, तू पक्का वेडा आहेस. गेल्या जन्मात काय पाप केले असतील की, तुझ्यासारखा मित्र मिळाला."
अभिजीत, "मग आता राग शांत झाला ना!"
गौरी, "अं.... झाला... आणि नाही झाला असेल तर..."
अभिजीत, "आय नेव्हर ब्रेक द रुल्स. पर रिश्वत देना अपना फर्ज है। हे घे लिटिल हार्टस्."
अजून काय? अभिजीतने तिच्या घरी चोरी करुन तिला लिटिल हार्टस् दिले असते तरी तीने त्याला माफ केलं असतं. तिच्या चेहऱ्यावरील आनंद मैत्रीच्या नजरेतून सुख देणारा होता आणि ती मैत्री अभिजीतच्या डोळ्यात सुवर्णाला स्पष्टपणे दिसत होती.
अभिजीत, "मैत्री फक्त बोलण्याने केली जात नाही. त्यासाठी त्यागाची तयारीसुध्दा असावी लागते. गौरी, जसं प्रेमाचं असतं तसंच मैत्रीचं सुध्दा असतं. एक ना एक फक्त दिवस मैत्रीसाठी नियती आपली परिक्षा घेते. तेव्हा तू विचार कर, मला शक्य आहे मदत करनं. मी त्याला मदत करु शकते. पण लोक काय बोलतील, या पेक्षा मी त्यावेळी मदत नाही केली तर मैत्रीचं नातं काय म्हणेल हा विचार कर."
दोघांचं निरागस मित्रप्रेम पाहून सुवर्णाच्या डोळ्यातून पाणी येतं. पण तिच्या टेबलावर ठेवलेल्या मोबाईलवरुन मेसेजचा आवाज येतो आणि ती दरवाजापासून बाजूला आपल्या टेबलाजवळ जाते. आयुशचा मेसेज असतो, 'मी फोन कट केला तर तूला परत फोन करता येत नाही का?' सुवर्णा लगेचच त्याला फोन करते,
आयुश, "बोल."
सुवर्णा, "सॉरी जानू. परत असं नाही करणार. आमचे नवीन सर आलेत ना, त्यांचा जरा प्रॉब्लेम झाला होता."
आयुश, "त्या सर लोकांपासून लांबच राह. मी मघाशी फोन केला तेव्हाच तुझे अजय सर निघून गेलेले ना!"
सुवर्णा, "ते सर नाही. देशमुख सर."
आयुश, "आता हा कोणता सर?"
सुवर्णा, "मला पण माहित नाही, कोणीतरी अभिजीत देशमुख सर म्हणून आहेत. पहिल्यांदाच पाहिलं मी त्यांना."
आयुश, "अभिजीत देशमुख? तिथे? कसं शक्य आहे?"
सुवर्णा, "हो. मॅडमची बहीणच म्हणाली तसं."
आयुश, "प्लीज एक काम करशील?"
सुवर्णा, "प्लीज, मला असं बोलू नकोस. तुझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे मी."
आयुश, "असं काय बोललो मी?"
सुवर्णा, "प्लीज म्हणालास ना!"
आयुश, "ए... बंद कर जरा ते. त्याची आणि माझी भेट करुन दे अगोदर."
सुवर्णा, "ओरडतो कशाला? पहिल्यांदाच भेटले ना त्याला."
आयुश, "तो ऑफिसलाच आहे का?"
सुवर्णा, "हो."
आयुश, "बघ हां... तोच अभिजीत देशमुख आहे ना! बदमाश ग्रुपचा सिंगर."
सुवर्णा, "तोच असावा."
आयुश, "शाब्बास. दहा मिनिटं थांबव त्याला. मी आलोच माझ्या मित्रांसोबत."
सुवर्णा, "जानू...."
आयुश, "हो... हो... आय लव्ह यू... चल बाय."
आयुश फोन ठेवतो. सुवर्णाला आता पुढचं टेन्शन येतं. नक्की ते सर माझ्याशी व्यवस्थित बोलतील का? मघाशी मी त्यांच्याशी खूप वाईट वागले. तेवढ्यात गौरी आणि अभिजीत बाहेर येतात.
सुवर्णा, "सर.. सर.. सर.."
अभिजीत, "बोल."
सुवर्णा, "सर, मघाशी जे काही झालं त्यासाठी सॉरी."
गौरी, "काय झालं मघाशी?"
अभिजीत, "काही नाही. तुझी वकिली करत होती."
गौरी, "सोड गं सुवर्णा, याचं काय ऐकतेस? बरं आम्ही बाहेर चाललोय. तू सुध्दा घरी जाऊ शकतेस."
सुवर्णा, "सर प्लीज थोडं थांबता का?"
अभिजीतला तिच्या डोळîात वेगळंच काहीतरी जाणवतं. नकळत तो विचारतो, "कां?" सूवर्णा, "माझे काही फ्रेंड्स येताहेत तुम्हाला भेटायला."
गौरी, "का? याने कोणता मोठा तीर मारलाय?"
अभिजीत, "हॅलो, मघाशी मी तुला सहजच ओरडलो होतो. मला मारायला मुलं नाही ना बोलावलीस?"
सुवर्णा, "तुम्ही बदमाश ग्रुपचे अभिजीत देशमुख आहात का?"
अभिजीत, "तू कोणत्या ऑफिसमध्ये काम करतेस?"
सुवर्णा, "गौरी मॅडमच्या."
अभिजीत, "बघ गौरी, बोललो ना, तुझ्यासारखाच सॅम्पल उचलून आणलायस."
गौरी, "गप रे."
सुवर्णा, "बदमाश फ्रेंड्स एज्युकेशनल ट्रस्ट."
गौरी, "मग त्या ट्रस्टचा मुख्य ट्रस्टी आणि एकूलता एक अभिजीत कोण असणार गं माझी बाय? हाच तो."
सुवर्णा, "सॉरी सर, मला खरंच माहित नव्हतं. फक्त माझ्या फ्रेंड्सला भेटा ना थोडा वेळ. मग लगेच निघा. जवळपासच आलेत ते."
गौरी, "अरे पण तूला कोणी सांगितलं त्यांना इथे बोलवायला?"
अभिजीत, "राहू दे. येऊ दे त्यांना."
आयुश त्याच्या सात-आठ मित्रमैत्रिणींसोबत येतो. समोर साक्षात अभिजीत देशमुख असल्याने त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही.
अभिजीत, "काय सुवर्णा? मित्रांशी ओळख नाही करुन देणार कां?"
सुवर्णा, "हो ना! हा जयेश, ती निकीता, ही माझी खास फ्रेंड आरती, हे माझे आयुश, हा अमोल, सागर आणि हा विशाल."
अभिजीत, "ओ.के. आयुश? आयुशच ना!"
आयुश, "हो सर."
अभिजीत, "बेस्ट ऑफ लक. अगोदर मी सुध्दा तुझ्यासारखाच दिसायचो. गर्लफ्रेंड वगैरे आहे की नाही तुझी?"
अभिजीतच्या या प्रश्नावर सुवर्णा जरा लाजतेच. पण आयुश स्पष्टपणे बोलतो, "नाही."
सुवर्णा जरा दचकतेच. खरंतर मागच्या दहा दिवसांपासून आयुशच्या वागण्यात बदल झालेला होता. दोन वर्षांचं त्यांचं प्रेम अचानक संपण्याच्या मार्गावर होतं. तसा तो वागत देखील होता, त्याच्या आयुष्यात एक नवीन मुलगी आली होती. म्हणूनच त्याला आता सुवर्णामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. सुवर्णा पुन्हा तिच्या विचारांत हरवते. आयुश आणि त्याचे मित्र अभिजीतसोबत फोटो काढून निघून देखील जातात, पण तो सुवर्णाकडे पाहत देखील नाही.
अभिजीत, "हॅलो मॅडम, आता खूश ना!"
सुवर्णा शुध्दीवर येते, "हो.. थॅंक यू सर."
अभिजीत, "थॅंक यू कसली म्हणतेस? ऑफिस बंद कर आणि शांतपणे आमच्यासोबत चल."
गौरी, "आता काय झालं?"
सुवर्णा, "मला नाही माहित मॅडम."
अभिजीत, "येऊ दे तिला. गाडीत सांगतो."
गौरीला काही कळत नाही. पण काहीतरी नक्की आहे आणि म्हणूनच तो तिला बोलावतोय म्हणून ती सुध्दा सुवर्णाला सोबत यायला सांगते. ऑफिस बंद करुन तिघेही निघतात. सुवर्णा अभिजीतच्या गाडीमध्ये बसते. अभिजीत गाडी सुरु करतो.
गौरी, "बोला आता."
अभिजीत, "तुमच्यात भांडण झालंय का?"
गौरी, "नाही तर..."
अभिजीत, "मी सुवर्णाला विचारतोय. सुवर्णा, तुझ्यात आणि आयुशमध्ये भांडण झालंय का?"
सुवर्णा, "नाही सर. आम्ही जस्ट फ्रेंड्स आहोत."
अभिजीत, "हे सगळं तू तुझ्या या मॅडमला सांगत जा. ती जागेपणी झोपलेली असते आणि मी झोपेत सुद्धा जागा असतो."
गौरी, "अभी...."
अभिजीत, "सॉरी, तुला का मी तुझ्या मॅडमसारखा दिसतोय? काहीही न कळायला?"
गौरी, "पण तो स्वतः बोलला ना, त्याची कोणी गर्लफ्रेंड नाहीये, उगाच कशाला हिच्या मनात काहीतरी भरतोस? बिचारी लहान आहे ती."
अभिजीत, "लहान? आणि ती? विचार तिलाच, तिचं आयुशवर प्रेम आहे की नाही ते."
गौरी सुवर्णाकडे बघते, सुवर्णा खाली मान घालते आणि डोळ्यातून पाणी काढते.
अभिजीत, "बघितलं? तो आयुश हिचा बॉयफ्रेंड आहे आणि दोघांमध्ये काहीतरी भांडण झालंय. म्हणून मला फोटो काढण्यासाठी थांबवलेलं हिने."
गौरी, "तू हिला अगोदरपासून ओळखतोस का?"
अभिजीत, "नाही. आजच पहिली भेट झाली."
गौरी, "पहिल्याच भेटीत एवढं कळलं? कसं रे?"
अभिजीत, "पहिली गोष्ट म्हणजे तिला मी कोण ते माहित नव्हतं. मी तिला लेक्चर दिलं म्हणून ती शांतपणे बसली होती. तिने फक्त आयुशचाच फोन उचलला. जेव्हा त्याला कळलं मी तिथे आहे तेव्हा तो लगेचच आला. आणि ही जेव्हा मला म्हणाली, हिचे मित्र येताहेत, तेव्हा हिच्या डोळ्यात मित्र येण्याचा आनंद कमी आणि 'माझं प्रेम येतंय' याचाच आनंद जास्त होता. म्हणून मी तिथे थांबलो. जेव्हा ते सगळे आले तेव्हा ओळख करुन देताना ही सगळ्यांना 'हा, ही, तो, ती' म्हणत होती, फक्त त्याला 'हे' म्हणाली."
गौरी, "काय सुवर्णा?"
अभिजीत, "तिला काय विचारतेस? हेच आहे. मित्र मस्ती करत होते. ही अशीच शांत बसणार का? मित्रांसोबत हिनेसुध्दा मस्ती करायला पाहिजे होती. पण नाही, हिचं लक्ष त्या आयुशकडेच होतं. आता काय झालं ते विचार तिला. मी हायवेवरुन गाडी घेतो."
गौरी, "हा. ठिक आहे. सुवर्णा, मला तुझी मोठी बहिण समज आणि सांग मला. अभिजीत सुध्दा चांगला आहे, त्याच्यापासून काही लपवू नकोस. लपवून सुध्दा त्याला एवढं कळलं बघ."
सुवर्णाचा उर दाटून येतो. ती गौरीच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि मोठमोठ्याने हुंदके देऊन रडू लागते. अभिजीत मागे बघतो.
गौरी, "अरे ए... एन.बी.बी. पुढे बघ ना! गाडी चालवतोएस तू."
अभिजीत, "तिला सांभाळ अगोदर."
सुवर्णा रडणं थांबवत नाही. शेवटी अभिजीत तिथून जवळ असलेल्या नदीकिनाऱ्याजवळ गाडी थांबवतो. तिघेही नदीच्या किनाऱ्यावर बसतात. पाच-दहा मिनिटं सगळं शांत असतं. कोणीही काही बोलत नाही.
गौरी, "सांगणार आहेस का? तुला वाटत असेल आम्ही तुझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करतोय तर नको सांगूस."
एवढं बोलून गौरी उठते.
सुवर्णा तिचा हात पकडून म्हणते, "मॅडम प्लीज नका जाऊ. आतापर्यंत कोणीच मला इतकं समजून घेतलं नाही. एकटीच हे सगळं सहन करतेय. घरी आणि मित्रांमध्ये कुठेही मी हे बोलू शकत नाही...." सुवर्णा पुन्हा गप्प बसते.
अभिजीत, "मी जरा गाडीचं इंजिन चेक करतो. तुम्ही दोघी बोला तोपर्यंत."
गौरीला समजतं अभिजीत का गेला म्हणून, "बोल आता, तो पण गेलाय."
रडल्याने सुवर्णाचे डोळे लाल झालेले असतात. गौरी आणि सुवर्णा, दोघींचेही रुमाल ओले झालेले असतात. काहीतरी मोठ्ठंच कारण असेल म्हणून गौरी सुध्दा गंभीरपणे तिच्याशी बोलत असते.
सुवर्णा, "दोन वर्षांपूर्वी मी आणि आयुश आम्ही मित्रमैत्रिण होतो. पण का आणि कसं इतरांनी आमच्या मनात एकमेकांविषयी इतकं भरलं की, मी त्याच्यावर प्रेम करु लागले. त्यांनी मला लग्नाची मागणी घातली. मी पूर्णपणे त्यांच्या प्रेमात होती. 'हो' म्हणाली मी त्यांना. माझं सर्वस्व दिलं मी त्यांना. गेली दोन वर्ष..."
गौरी तिच्या डोक्यावर हात ठेवते, ती लगेच गौरीला बिलगते. तिच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणते, "मॅडम, गेली दोन वर्ष त्या मुलाने माझा वापर करुन घेतला. रोज कॉलेज सुटल्यावर माझ्या घरी, त्याच्या घरी नाहीतर कुठेतरी लॉजवर तो मला..." आणि सुवर्णा रडू लागते.
गौरीला भरपूर संताप येतो. ती सुवर्णाला लगेच बाजूला करते, "तुला अक्कल नावाची गोष्ट नाहीये का?"
सुवर्णा, "माझं लग्न त्याच्याशीच होईल. हे धरुनच मी चालली होती. लग्नानंतर सुध्दा या गोष्टी त्याच्यासोबत होणारच होत्या म्हणून मी त्याला कधी अडवलं नाही."
गौरी, "आणि हे सगळं तुमच्यात किती वेळा झालं?" सुवर्णा गप्प बसते.
गौरी, "आता सांगतेस का? की देऊ एक उलट्या हाताची?"
सुवर्णा, "दिवसातून कमीत कमी एक वेळा."
गौरी डोळे बंद करुन घेते. जोरात स्वतःच्या कपाळावर मारुन घेते, "हलकट, साली, एन.बी.बी. आईवडिलांचा विचार तुझ्या मनात आला नाही का? ज्यांनी तुला लहानाचं मोठं केलं ते... सोड तुला सांगून काय उपयोग? मग आता काय म्हणतोय तो?"
सुवर्णा, "माझ्या दादाला त्याच्याबद्दल कळलं तेव्हा त्याने त्याला मारायला मुलं पाठविली. असं तो म्हणतोय, मी दादाला विचारलं तेव्हा दादा म्हणाला, त्याने असं काही केलंच नाही."
गौरी, "तुझा सख्खा भाऊ का?"
सुवर्णा, "नाही, मी मानलेला भाऊ."
गौरी, "तुला कुणावर विश्वास आहे?"
सुवर्णा, "माझा दादा कऽऽधीच खोटा नाही बोलणार."
गौरी, "म्हणजे एका अर्थाने तू असं म्हणतेस की, आयुश खोटं बोलतोय."
सुवर्णा, "पण तो माझ्याशी खोटं का बोलेल? जेव्हा जेव्हा आम्ही दोघं जवळ आलोय तेव्हा तेव्हा त्याने मला लग्नाचं वचन दिलंय."
गौरी, "देवा... काय करु मी या मुलीचं? जास्त काही झालं नाही का या दोन वर्षात?"
सुवर्णा, "मला काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे म्हणून तो प्रत्येक वेळी काळजी घ्यायचा. अगदी न चुकता. फक्त मागेच मला पिरियेड्स आलेले तेव्हा त्याने जबरदस्तीने करायला सांगितलं. आणि सोबत नसल्याने..."
गौरी, "म्हणजे, तू..."
सुवर्णा, "त्याने पिल्स दिली नंतर."
गौरी, "अभीऽऽऽ... इकडे ये लवकर नाहीतर मी हिचा जीव घेईन."
अभिजीत गाडीचा दरवाजा अर्धा उघडून गाडीमध्ये बसलेला असतो. गौरीच्या आवाजाने तो लगेच त्या दोघींकडे जातो.
गौरी, "मी हिच्या प्रकरणात पडणार नाही. तिने स्वतः धोंडा मारुन घेतलाय स्वतःच्या पायावर"
अभिजीत, "काय झालं?"
गौरी, "त्या साल्याने हिला प्रेग्नंट केलं. आणि आता तिच्या मानलेल्या भावाचं नाव पुढे करुन हात वर करतोय."
अभिजीत, "म्हणजे तो तिच्या भावावर नाव घेतोय?"
गौरी, "तसं नाही रे, तिच्या भावाने त्याला मारायला मुलं पाठवले असं सांगून सगळं संपवायला सांगतोय."
अभिजीत, "चांगलंच आहे ना! संपव मग."
सुवर्णा, "नाही. तो घाबरलाय म्हणून असं बोलतोय. तो नक्कीच माझ्याशी लग्न करणार."
गौरी, "तुमच्या दोघांबद्दल घरी तरी माहित आहे ना!"
सुवर्णा, "नाही. घरच्यांना फक्त एवढंच माहित आहे, की तो माझा मित्र आहे."
अभिजीत, "मैत्रीसारखं चांगलं नातं तुम्हा सर्वांमुळे खराब आहे."
गौरी, "मैत्री म्हणजे काय ते तरी माहित आहे का विचार. प्रेम आंधळं असतं हे माहितीये. ही तर डोकं बाजूला ठेवून सगळं करते."
अभिजीत, "गौरी, ही बिचारी खरं प्रेम करत होती. जीव तर त्याचा घेतला पाहिजे."
एवढं बोलून अभिजीत गाडीच्या दिशेने वळतो. सुवर्णा त्याचा हात धरुन रस्ता अडवते, "सर, तुम्ही जर त्याला काही केलं तर पहिले मी माझं काहीही करुन घेईन. प्रेम आहे माझं त्याच्यावर. प्रत्येक वेळी तो असा करतो, पण सोडून जात नाही..."
गौरी, "ए नाटकी, आपल्या जुन्या प्रेमाकडे सतत जाणं म्हणजे वेडेपणा असतो. कारण तसं करणं म्हणजे एकच पुस्तक सारखं सारखं वाचण्यासारखं असतं. ज्यात तुम्हाला आधीच माहित असतं की याचा शेवट कसा आहे. तो तूला या साठी नाही सोडून जात, कारण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. तो तुला या साठी नाही सोडून जात कारण त्याला तुझ्याकडून न मागता सारं मिळतंय."
अभिजीत, "तुला वाटतंय ना, तो तुझ्याशीच लग्न करेल. चल मग, आत्ता तुम्हा दोघांचं लग्न लावून देतो. आहेस का तयार? वाटतं का तूला, तो तुझ्याशी लग्न करेल ते?"
सुवर्णाला आता काहीच कळत नाही, अभिजीतचा हात तिने पकडलेला असतो. तो तिचे डोळे पुसायला जातो तेव्हा ती त्याला मिठी मारुन पुन्हा रडू लागते. अभिजीत तिच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवतो, मग तो आणि गौरी प्रेमाने तिची समजूत काढतात.
वृषाली, "अभिजीत आणि सुवर्णाची पहिली भेट झाली, तोच दिवस तिचा ऑफिसमधला शेवटचा दिवस होता. तो, गौरी आणि सुवर्णा काय बोलले हे आमच्यापैकी कुणालाही माहित नव्हतं आणि अजूनही माहित नाही तिला कामावरुन का काढून टाकलं. पण त्यानंतर ती कधीच ऑफिसमध्ये आली नाही."
स्टिफन, "मग पुढे काय झालं?"
वृषाली, "नाही, पुढचं मला काही माहित नाही. नंतर माझं ग्रुपमध्ये भांडण झालं आणि मी ग्रुप सोडला."
स्टिफन, "काहीतरी माहित असेल तुम्हाला."
वृषाली, "नाही, खरंच मला माहित नाही. जेवढं माहित होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. अजून माहिती करुन घ्यायचं असेल तर प्रसाद आणि अजयला भेटा."
स्टिफन थोडावेळ शांत बसतो,
"ते दोघे कुठे भेटतील?"
वृषाली, "अजय दिल्लीला आहे असं माहित होतं. बाकी कुणाचंही काही माहित नाही."
स्टिफन, "मला थोडी मदत कराल का त्या सर्वांना शोधायला?"
वृषाली, "मी काहीच करु शकत नाही. तुम्ही यांच्याशी बोला."
स्टिफन, "ठिक आहे. मी तुम्हाला जास्त आग्रह करणार नाही." विचारमग्न झालेला स्टिफन तिथून उठून निघून जात असतो तेव्हा,
वृषाली, "एक विचारु?"
स्टिफन, "हो?"
वृषाली, "तुम्हाला नक्की काय करायचंय?"
स्टिफन, "माझा मित्र फक्त श्वास घेतोय. इतरांना वाटतंय तो जगतोय. पण नाही, सध्या तो निद्रावस्थेत आहे. वास्तविक जगाशी त्याचा काहीही संबंध नाहीये. थोडक्यात, त्याचा आत्मा बेशुध्द आहे. त्याला जागं करायचंय. त्यासाठी मला जे काही करता येईल ते मी नक्की करेन." बस्स, स्टिफनचे शब्द संपतात. तो आपल्या बेडरुममध्ये जातो. शांतपणे सोबत आणलेलं सामान घेतो, वृषालीला काही डॉलर्स देतो, "ठेव."
स्टिफन, "माझा मित्र म्हणतो, पहिल्यांदा चेहरा दाखविल्यानंतर काहीतरी द्यायचं असतं. काल गोंधळ असल्याने देता आलं नाही."
आत्ता वृषालीला काहीच सुचत नाही. ती त्याला थांबवू शकत नव्हती आणि त्याने निघून जावं असंही तीला वाटत नव्हतं. पण ती काहीच बोलत नाही. बघता बघता स्टिफन त्याच्या ड्रायव्हरसोबत पुन्हा मुंबईच्या दिशेने निघून जातो. संध्याकाळी ही गोष्ट सागरला समजते तेव्हा तो इंटरनेटवरुन प्रसादच्या सध्या राहत असलेल्या ठिकाणाचा पत्ता मिळवून लगेच स्टिफनला फोन करतो.
स्टिफन, "बोल सागर."
सागर, "न सांगताच निघालात तुम्ही."
स्टिफन, "नाही रे, मी जरा घाईतच होतो."
सागर, "सर, मला कळतंय, तुम्ही या सर्वांचा ग्रुप एकत्र करण्यासाठी आले आहात. पण आता खूप उशीर झाला आहे. कितीही काही झालं तरी वृषाली त्या ग्रुपमध्ये पुन्हा जाणार नाही."
स्टिफन, "इट्स ओ.के. यासाठी मी तिला जबरदस्ती देखील नाही केली."
सागर, "आता कुठे जाणार?"
स्टिफन, "दिल्ली."
सागर, "दिल्ली लांब आहे सर. अगोदर तुम्ही ठाण्याला जा."
स्टिफन, "ठाणे? कुठे आलं हे ठाणे?"
सागर, "मुंबईपासून जवळच आहे. प्रसादचं घर आहे तिथे."
स्टिफन, "गुड... मला लगेच त्याचा पत्ता दे."
सागर, "मी तुम्हाला त्याचा पत्ता मेल करतो आणि सर प्लीज, तुम्ही आम्हाला भेटला होतात हे कुणालाही सांगू नका. आम्ही असेच खूश आहोत."
स्टिफन, "It's all right. But in future, whenever you face any problem, contact me."
सागर, "नक्कीच सर."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.