सत्यजीत भारत
( नवीन पनवेल )
७२०८७८९१०४

"सत्यजिता उठ...आरं उठ....सूर्यनारायण कलतीला झालाय...साऱ्या गावात दिवे लागल्यात...उठ बाळा....आसं  तिनसांजेच्या यळी झोपू नये" आजी आपल्या नातवाला उठवत होती.

"आजे...माझी झोप नाही पुरी झाली...थोड्या वेळाने उठतो..." सत्यजीत म्हणाला.

"आरं असं सणासुदीला सांजच्या यळी झोपून राहणं ग्वाड नव्ह"

"पण... आज कोणता सण आहे...दिवाळी तर परवा दिवशी आहे..."

"न्हाय पोरा दिवाळीची सुरवात आजपासून होते. आज दिवाळीचा पहिला दिवा आजपासून सात दिवस अशीच दिव्यांची आरास करायची असते..."

"सात दिवस....?आम्ही मुंबईला तर फक्त दोनच दिवस सेलिब्रेट करतो...एक लक्ष्मी पूजन अन् भाऊबीज बस्स..."

"काय करतो म्हणालास....?"

आजीला सेलिब्रेट म्हणजे समजलं नव्हतं

"अगं सेलिब्रेट म्हणजे साजरी..."

"फकस्त दोन दिस....काय म्हणावं आता...आरं पोरा दिवाळी सात दिसाची असते. "

सात दिवसाची दिवाळी हे ऐकून सत्यजीतच्या मनात कुतूहल निर्माण झालं अन् तो ताडकन उठून बसला आणि म्हणाला....

"आजे तुम्ही सात दिवस काय म्हणून दिवाळी साजरी करता....?""पहिल्यांदा तोंड, हात, पाय धुन ये....मी आता देवपूजेला बसत्या...लवकर पूजेला ये....मग म्या तुला सविस्तर दिवाळी संबंधी कथा सांगते"

सत्यजीतला आधीपासूनच कथा-कादंबऱ्यांची आवड म्हणून सत्यजीत चटकन उठून बाहेर गेला. दारात ठेवलेल्या डेऱ्यातून पाणी घेऊन स्वच्छ हात,पाय,तोंड धुतले. तोवर आजीने आतून आवाज दिला.

"...आर दारातली रांगोळी विस्कटू नकोस."

सत्यजित म्हणाला..."नाही आजी नाही विस्कटली रांगोळी..."

आजी शांतपणे देवाची पूजा करत होती. तिने देवऱ्या समोर खूप सुंदर रांगोळी काढली होती. रांगोळी पाहून मन अगदी प्रसन्न  होत. सोबत देव्हाराच्या दोन्ही बाजूस दोन समया तेवत होत्या. सत्यजीत आजीसोबत देवासमोर बसला. अजीने एक एक करून पूजेचे सर्व सोपस्कार पूर्ण केले. दोन तेलानं भरलेले  दिवे सत्यजीत कडे देत म्हणाली...

"जा दारात दिवे लाव जा"

सत्यजीत हि खूप खुश झाला. पटकन दिवे घेऊन उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला दिवे ठेवून प्रज्वलित केले. आज सकाळीच आजीने शेणाने ओटा सारवलेला होता... त्या सारवलेल्या शेणाचा वास सुद्धा छान वाटत होता... मुंबईला या सर्व गोष्टी नसतात. मुंबई म्हणजे फ्लॅट सिस्टिम ओट्याच्या नावाखाली फक्त एक छोटीशी जागा. तीही चार घरांनी  मिळून वापरायची. एकानं रांगोळी काढली की दुसऱ्याची पंचायत. पण गावी तसं नाही. किती सुंदर मोठी लाट रांगोळी काढली होती आजीनं . मन मोहून टाकणारी रांगोळी...

सत्यजीत आजीच्या बाजूला जाऊन बसला आणि म्हणाला "दिवाळी संबंधी गोष्ट सांगणार ना.....?"

" होय कि बाळा... जरा धीर धर"

आजीनं देवाला नमस्कार केला सत्यजीतने ही देवासमोर हात जोडले. आजीने दिवाळीची गोष्ट सांगायला सुरुवात केली....

"दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास. दिवाळी हा एक सण नसून सात छोट्या छोट्या सणांचा समूह आहे. या सातही सणांमध्ये समान एकच गोष्ट आहे ती म्हणजे साजरी करण्याची पद्धत. फुलांचे तोरण, प्रज्वलित दिव्यांचा मंद प्रकाश, रांगोळीची आरास आणि खमंग फराळ.

दिवाळीचा पहिला दिवा म्हणजे आश्विन कृष्ण एकादशी. ही भगवान विष्णूंना समर्पित तिथी. या दिवशी व्रत केलं जातं व दुसऱ्या दिवशी या व्रताचे पारण केले जाते. या दिवशी भगवान विष्णूंचे अखंड नामस्मरण करणं श्रेयस्कर आहे. या एकादशीस रंभा एकादशी सुद्धा म्हणतात."

सत्यजित ने विचारले.... "रंभा एकादशी ते का म्हणून ?"

आजी सांगू लागली....."मुचकुंद  राजाचा जावई शोभन याने या दिवशी एकादशी चा उपवास केला होता. भूख सहन न झाल्याने तो मरण पावला. एकादशी व्रताच्या पुण्यामुळे त्याला मृत्यूनंतर मंदार पर्वतावरील देव नगरीत राहायला जागा मिळाली आणि सेवेला रंभादि अप्सरा. म्हणून या तिथीला रंभा एकादशी म्हणतात..."

" वाह! छान कथा आहे आजी. ही झाली पहिल्या दिवसाची कथा दुसऱ्या दिवसाची काय कथा आहे ?"   सत्यजीतने आजीला विचारले.

आजी म्हणाली, "अरे हो जरा दम धर. दिवाळीचा दुसरा दिवस हा गोवत्सद्वादशी अर्थात वसुबारस हा आश्विन कृष्ण द्वादशी चा दिवस या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. बऱ्याच ठिकाणी या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.

दूधदुभत्या साठी होणारा गायीचा उपयोग. शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत. ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची केलेली ही कृतज्ञता पूजा. "

"Wow! किती छान गाईंसाठी सुद्धा आपण सेलिब्रेशन करतो"

"हो बाळा वर्षभर गाई-बैल आपल्यासाठी मेहनत करतात म्हणून वसुबारस दिवशी त्यांना कामापासुन सुट्टी दिली जाते. आता दिवाळीच्या तिसऱ्या दिवसाची कथा ऐक"

"सांग सांग खूप इंटरेस्टिंग आहे दिवाळीच्या गोष्टी" , सत्यजित उत्सुकतेने म्हणाला....

आजीने कथा सांगायला सुरुवात केली...."धनत्रयोदशी हा दिवाळीचा तिसरा दिवस. धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी. धनत्रयोदशी बद्दल अशी कथा आहे की जेव्हा देवांनी व असुरांनी समुद्र मंथन केले तेव्हा त्यातुन या दिवशी भगवान धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले. धन्वंतरी हे देवांचे वैद्य म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक म्हणून डॉक्टर व वैद्य समाज धन्वंतरीची विशेष पूजा करतात. "

आजी पुढे सांगू लागली...

"दिवाळीसा चौथा दिवस नरक चतुर्दशीचा. अश्विन महीन्याच्या कृष्णपक्षातील चौदावी तिथि. या दिवशी पहाटे लवकर उठून शरीराला उठने लावुन व संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून स्नान केले जाते. यास अभ्यंग स्नान असे म्हणतात.

पुराणानुसार नरकासुर प्राग्ज्योतिषपुर राज्यचा राजा होता. त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुरने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना  बंदी बनवून ठेवले. अगणित संपत्ति लूटली व अश्याच हवेपोटी  त्याने मानवांना व देवांना त्रास दिला.

अनेक गिरीदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपुर हे नगर वेगवेगळ्या खंदकांनी, अग्नि, पाणी इत्यादिंनी सुद्धा वेढलेले होते.

भगवान श्रीकृष्णाने नरकासुराकड़े संदेशदूत पाठवून सर्व बंदीवासातील स्त्रियांना मुक्त करण्यास व अन्य राज्यांमध्ये चालवलेली जुल्मी लयलूट थांबवण्याची विनंती केली. पण आतातायी नरकसुराने ही विनंती धुडकावून लावत श्रीकृष्णास युद्ध करण्याचे आव्हान दिले. नाईलाजास्तव भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन प्रागजोतिषपुरावर आक्रमण केले व नरकासुर वधाने सर्व प्रजेला आनंदी केले. नरकासुराच्या बंदिवासातील स्त्रियांना मुक्त केले. पण त्यांचे कुटुंबीय त्यांस स्वीकारण्यास तयार नव्हते हे जाणून श्रीकृष्णांनी त्या १६१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. मृत्यूसमयी नरकासुराने श्री कृष्णास प्रार्थना केली होती की त्याच्या मृत्यूनंतर कोणीही शोक करू नये तर त्याच्या मृत्यूला एखाद्या उत्सवाप्रमाणे आनंदाने साजरे करावे. श्री कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात. असं म्हणतात की नरकासुराचा वध करताना कृष्णाच्या शरीरावर त्याच्या रक्ताचे शिंतोडे उडाले होते. हेच रक्त साफ करण्यासाठी श्रीकृष्णांनी तेल व उटणे लावून स्नान केले होते. तेव्हापासून त्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा सुरू झाली.

सत्यजीत म्हणाला, "आजी किती छान कथा आहे भगवान श्रीकृष्णांची. काही मूर्ख लोक भगवान श्रीकृष्णांनी १६१०० कन्यांन सोबत विवाह केला म्हणून त्यांची चेष्टा करतात. त्यांनी नरकासुर संहाराचा नीट अभ्यास केला पाहिजे.

आजी म्हणाली, "हो अगदी बरोबर बोललास तू. आता ऐक दिवाळीचा मुख्य दिवस हा लक्ष्मीपूजन.अर्थात अश्विन अमावस्येचा. या दिवशी माता महालक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. पुराणानुसार समुद्रमंथनातून माता महालक्ष्मी या तिथिला प्रकट झाली होती. द्वापार युगात द्यूत खेळात पांडव आपलं सर्व राजवैभव हरले तेव्हा वनवासात असताना युधिष्ठिर व द्रोपदी ने अश्विन अमावस्या तिथिला माता महालक्ष्मीची विधिवत पूजा करून गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे अशी प्रार्थना केली. माता महालक्ष्मीच्या आशीर्वादाने पांडवांना पुन्हा राज्य, धन, दौलत व वैभव पुन्हा प्राप्त झाले.

असं म्हणतात त्रेतायुगात श्रीराम आपला चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून ह्याच तिथिला अयोध्यास परतले होते. तेव्हा अयोध्यावासीयांनी रोषणाई करून त्यांचे स्वागत केले.

दिवाळीचा सहावा दिवस हा बलिप्रतिपदेचा. बलिप्रतिपदा कार्तिक शुद्ध प्रतिपदे दिवशी साजरी करतात. या दिवसा संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. सत्ययुगात बळी नावाचा एक दैत्य राजा होता. तो दानशूर, प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता. महाराज बळी शेतकऱ्यांप्रती विशेष स्नेहभाव ठेवत म्हणून बळी हा एक शेतकऱ्यांचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. एकदा दैत्य गुरु शुक्राचार्य च्या सांगण्यावरून बळीने शंभर यज्ञांचा संकल्प केला. यज्ञाच्या प्रभावाने बळी हा अजय होणार होता. त्यामुळे देवतांनी भगवान विष्णूंना साकडे घातले. भगवान विष्णु बटुक ब्राम्हण (भगवान वामन) अवतार धारण करून बळीकडे याचक म्हणून गेले. तेव्हा तुला काय हवे ते माग असे बळीराजाने विचारले. यावर फक्त तीन पद भूमीच मला हवी असे वामनदेव उत्तरले.भगवान वामणांनी मागितलेली तीन पद भूमीचे दान ऐकून महाराजबली अहंकाराने हसू लागला. तीन पद काय....हवी तेवढी भूमी घ्या असे अहंकारपूर्ण उद्गार काढले. पण वामन देवाने फक्त तीन पद भूमीचा आग्रह धरला. तेव्हा मी तुला तीन पद भूमि देत आहे असं बळी महाराज म्हणाले व त्यांनी तसे वचन दिले. वचन प्राप्त होतास वामनदेवांनी विश्वरूप धारण करून एका पदात संपूर्ण पृथ्वी व दुसऱ्या पदार्थ संपूर्ण स्वर्गलोक व्यापला व मी तिसरे पद कुठे ठेवू अशी विचारणा बळी महाराजास केली. तेव्हा राजा बळीचा अहंकार नष्ट झाला व हा कोणी साधारण बटुक ब्राह्मण नसून साक्षात नारायण आहेत हे त्यास उमगलं. त्याने विनम्रतेने आपले शीश सादर करत तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा अशी प्रार्थना केली. राजा बळीचा नम्र स्वभाव पाहून वामन देवाने त्यांना पाताळाचे राज्य बहाल केले. तसेच बळीराजाची सत्वशीलता पाहून स्वतः त्याचे द्वारपाल झाले. तसेच बळीराजास चिरंजीव होण्याचे वरदान दिले.

त्रेतायुगात याच दिवशी वनवासातुन परत आल्याच्या दूसर्या दिवशी श्रीरामांचा राज्याभिषेक झाला.

द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून देवराज इंद्राच्या कोपापासून गोकुळवासीयांचे संरक्षण केले आणि इंद्राचा अहंकार नष्ट केला. उत्तर भारतात या दिवशी गाईच्या शेणाचा गोवर्धन पर्वत बनवून पूजा केली जाते व अनेक पक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो.

म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केली जाते.या दिवशी नवीन विक्रम संवत सुरू होतो. गुजराती समाजामध्ये या दिवसा पासून नवीन वर्षाची सुरुवात करतात. बलिप्रतिपदा हा साडे तीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे. या दिवसापासून व्यापारी वर्ग नवीन वही खात्याची सुरुवात करतात.

दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीयस भाऊबीज साजरी करतात. याला यम द्वितीया असेही म्हणतात. त्या मागील पौराणिक कारण असं सांगतात की या दिवशी यम आपली बहिन यमुना हिच्या घरी गेला. तिने यामाला ओवाळून त्याच्या प्रति शुभकामना प्रकट केल्या. यमाने ही अपली बहिन यमुनेस भेटवस्तू देऊन तिच्या सुखसमृद्धिसाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली. हेच कारण आहे की या दिवशी बहिन भावाला ओवाळून त्याच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ  मग  ओवाळणीच्या ताटात 'ओवाळणी ' देऊन बहिणीचा सत्कार करतो.

" वाह! अाजी दिवाळीच्या संदर्भात किती छान-छान कथा आहेत... " सत्यजीत म्हणाला.

"....आणि हो दिवाळी फक्त हिंदू धर्मियच नव्हे तर  जैन, बौद्ध आणि शिख धर्माचे अनुयायी सुद्धा साजरी करतात. "

"जैन धर्मिय का म्हणून दिवाळी साजरी करतात....?",  सत्यजीत  ने उत्सुकतेपोटी प्रश्न केला.

आजी सांगु लागली,  " लक्ष्मी पूजनाच्याच तिथिला भगवान महावीरांना निर्वाण प्राप्त झाले होते.

थाईलैंड मधील बौद्ध धर्मिय सुद्दा दिवाळी साजरी करतात.

शीख समाज दिवाळी बंदी छोड़ दिवस म्हणून   साजरा करतात. शीखांचे सहावे गुरु हरगोविंद यांना १६१९ साली मुगल बादशाह जहांगीर याने अन्य ५२  राजांना सहित आपल्या कैदेतून मुक्त केले होते.

तेव्हा अमृतसरच्या  स्वर्णमंदिररात रौशनाई करून दीपोत्सव साजरा केला होता. तिच परंपरा अजून ही शीख धर्माियां मध्ये आहे. "

"Wow!! किती छान माहिती दिलीस आजी "...  सत्यजीत आनंदाने म्हणाला.

आजी म्हणाली, "तर मग सत्यजीता करनार ना दीपावळी आजपासून साजरी....? "

"हो नक्की...मी दिवाळीचे सात ही दिवस साजरे करणार. "

" फक्त साजरी नव्हे तर या पौराणिक कथांमधुन योग्य तो बोध घ्यायला हवा. तर  सांगशीला का तू या कथांमधुन काय शिकलास....? "

सत्यजीत विचारात पडतो. मग अाजीच त्याला सांगु लागते.

"एकादशी ची कथा आपल्याला सांगते कि, ईश्वरा प्रति केलेलं, भक्तिपूर्ण कर्म आपल्याला नक्कीच योग्य फळ प्रदान करते.

वसुबारस पासून आपण अबोध प्राण्यां प्रति कृतज्ञता बाळगण्यास शिकतो.

धनत्रयोदशीच्या धन्वंतरि पूजे मधुन अापन आरोग्याची महत्ता जानतो.

नरक चतुर्दशी कथेमधून आपण स्त्रियांचा सम्मान करणे व त्यांच्या प्रति असलेली सामाजिक संरक्षण प्रदान करण्याचे दायित्व समजतो.

लक्ष्मीपूजन पासून आपण शिकतो की लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी आपल्याला परिश्रम केला पाहिजे व प्राप्त लक्ष्मी अर्थात  प्राप्त धनाचा योग्य विनीयोग केला पाहिजे.

बलि प्रतिपदेच्या कथे मधुन शेतकर्यांचा सन्मान करने व दानधर्म करण्याचे महत्व शिकतो.

भाऊबीजेच्या कथेतून आपल्याला भाऊ व बहिणीच्या नात्यातील प्रेम व कर्तव्य उमगते.... "

सत्यजीत म्हणाला... " अाजी किती सुंदर दीपावलीचे विश्लेषण केलेस तु"

"अरे बाळा दिवाळी सण मोठा

नाही आनंदाला तोटा"( वाचकांना नम्र विनंती आहे कि त्यांनी वरील लेखा संदर्भात आपला अभिप्राय लेखकास व्हाट्सएप च्या माध्यमातून नक्की कळवावा)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel