अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति ।

स्वस्तीत्य्क्त्वा महर्षिसिद्धदंघाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः ॥२१॥

तयामाजीं भले । ज्ञान -संपन्न हे । पलीकडे पाहें । सुर -संघ ॥६७६॥

सर्व हि कर्मांचीं । जाळूनियां बीजें । तुझ्या मूळ -तेजें । विश्व -रूपा ॥६७७॥

सद्भावाच्या बळें । तुझ्या चि रूपांत । मिळोनियां जात । स्वभावें तें ॥६७८॥

आणि कोणी एक । सहजें भिऊन । सर्वस्वीं धरून । तुझा पंथ ॥६७९॥

उभे तुजपुढे । जोडोनियां हात । प्रार्थना करित । मनोभावें ॥६८०॥

प्रभो , अविद्येच्या । महा -सागरांत । गटंगळ्या खात । आहों आम्ही ॥६८१॥

विषयांच्या जाळ्या - । माजीं सांपडून । कैसे अडकून । गेलें येथें येथें ॥६८२॥

अहं -ममत्वानें । होवोनियां भ्रांत । स्वर्ग -संसारांत । सांकडलों ॥६८३॥

दीन -दयाघना । आतां तुजवीण । सोडवील कोण । आम्हांलागीं ? ॥६८४॥

तुज जीवेंभावें । येतसों शरण । ऐसी आळवण । करिती ते ॥६८५॥

महर्षि आणिक । सिद्ध विद्याधर - । समूह साचार । विविध हे ॥६८६॥

विश्वरूपा तुझें । इच्छुनी कल्याण । करिती स्तवन । नाना स्तोत्रीं ॥६८७॥

रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोष्मपाश्च ।

गन्धर्वयक्षासुरसिद्दसंघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥२२॥

अकरा रुद्र आणि । बारा आदित्य हे । अष्ट वसू पाहें । साध्य देव ॥६८८॥

अश्चिनीकुमार । मरुद्नण सर्व । आणि विश्वेदेव । सुसंपन्न ॥६८९॥

यक्ष -राक्षसांचे । समुदाय देख । पितर आणिक । गंधर्व हि ॥६९०॥

तेविं सिद्ध आणि । देव हि अनेक । जयांत प्रमुख । महेंद्र हा ॥६९१॥

आपुलाल्या लोकीं । राहोनि हे सर्व । उत्कंठेनें विश्व -। रूप तुझें ॥६९२॥

पाहतां पाहतां । क्षणोक्षणीं मनीं । थक्कित होवोनि । आश्चर्यानें ॥६९३॥

प्रभो तुजपुढें । आपुलीं मस्तकें । नमविती देखें । प्रेमादरें ॥६९४॥

जय जय मंजु -घोष । करोनियां मग । गाजविती स्वर्ग । सर्व हि ते ॥६९५॥

आणि दोन्ही कर । जोडोनि बरवे । तुज नक्ति -भावें । वंदिती ते ॥६९६॥

तयांच्या विनय - । वृक्षांच्या बागें । पातला वसंत । सात्त्विकांचा ॥६९७॥

म्हणोनियां तया । पालवी साचार । फुटोनियां कर - । संपुटाची ॥६९८॥

तुझिया निर्मळ । स्वरूपाची भली । फळ -प्राप्ति झाली । अनायासें ॥६९९॥

रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम् ‍ ।

बहूदरं बहुदंष्ट्राकरालं द्दष्टवा लोकाः प्रव्यथितास्तथाहम् ‍ ॥२३॥

वाटे देवांचिया । लोचनांचें दैव । आज अभिनव । उगवलें ॥७००॥

देखोनि हें तुझें । स्वरूप गहन । सुखाचा सुदिन । मनालागीं ॥७०१॥

कोठोनि पाहिलें । तरी हि सन्मुख । त्रैलोक्य -व्यापक । रूप तुझें ॥७०२॥

म्हणोनि देव हि । दचकले मनीं । थक्कित होवोनि । देखतां चि ॥७०३॥

एक चि तूं परी । मुखें भयानक । विचित्र अनेक । तुझीं देवा ॥७०४॥

नेत्र हि बहुत । आणि शस्त्र -युक्त । ह्सत अगणित । तुझे देवा ॥७०५॥

असंख्यात मांडया । उदरें चरण । नानाविध वर्ण । तुझे देवा ॥७०६॥

प्रत्येक तें मुख । भासे बुभुक्षित । खावया उठत । जणूं सारें ॥७०७॥

मह -कल्पाचिया । अंतीं प्रळ्याग्नि । येई उफाळोनि । चहूंकडे ॥७०८॥

तैसीं तुझीं घोर । मुखें अनिवार । भासती चौफेर । परसरलीं ॥७०९॥

नातरी संहार - । रुद्राचीं उदंड । भासती प्रचंड । यंत्रें च तीं ॥७१०॥

भृत -भक्षणार्थ । युगान्तशक्तीचीं । जणूं ताटें साचीं । वाढिलीं तीं ॥७११॥

नातरी प्रळय - । भैरवांचीं क्षेत्रें । तैसीं वक्त्रें । सर्वत्र हीं ॥७१२॥

न मावती सिंह । दरीमाजीं जैसे । भासती हे तैसे । उग्र दंत ॥७१३॥

नाचती उल्हासें । पिशाच्चें तीं दुष्ट । दाट अंधारांत । काळ -रात्रीं ॥७१४॥

तैशा मुखीं दाढा । भासती अपारें । कल्पान्त - रुधिरें । माखल्या ज्या ॥७१५॥

काळानें च दिलें । युद्धाचें आह्रान । मातलें मरण । प्रळयान्तीं ॥७१६॥

तुझिया मुखांचें । भयानकपण । तैसें च दारुण । दिसतसे ॥७१७॥

आतां बापुडया ह्या । लोकसृष्टीवर । फेंकिली नजर । अळुमाळ ॥७१८॥

तंव दुःखरूप । कालिंदीच्या तटीं । पादपांची दाटी । तैसें भासे ॥७१९॥

तूं जो महामृत्यु - । रूपी महार्णव । तयामाजीं नाव । त्रैलोक्याची ॥७२०॥

सांपडोनि दुःख - । रूपी वादळांत । लाटांसवें होत । खालींवरी ॥७२१॥

तुज त्रि -लोकांशीं । काय असे काज । भोगीं तूं सहज । ध्यान -सुख ॥७२२॥

ऐसें एकाएकीं । कोपोनि श्रीहरी । म्हणशील जरी । मजलागीं ॥७२३॥

तरी लोकांचें तों । निमित्त हें साच । कांपती माझें च । प्राण येथें ॥७२४॥

ज्या मज पाहोनि । काळ -रुद्र धापे । मृत्यु तो हि लपे । भिवोनियां ॥७२५॥

तो मी भयें येथें । कांपें चळचळां । ऐसें श्रीगोपाळा । केलें तुवां ॥।७२६॥

नवल हें नव्हे । का ही महामारी । म्हणावें हें जरी । विश्वरूप ॥७२७॥

तरी भेसूरते - । माजीं तें साचार । पाववितें हार । भयातें हि ॥७२८॥

महा -काळाशीं हि । खेळावया झुंज । क्रोधावेशें सज्ज । जाहलीं जीं ॥७२९॥

नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ‍ ।

द्दष्टवा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥२४॥

तया मुखांचा हा । वाढला विस्तार । अनंत अपार । नभाहूनि ॥७३०॥

त्रिलोकांचा वारा । जयां वेंटाळी ना । ऐसीं जीं गगना - । हूनि थोर ॥७३१॥

आपुल्या वाफांनीं । अग्नीसी जाळीत । कैसीं धडाडत । राहिलीं हीं ॥७३२॥

दिसती ना एका - । सारिखीं हीं एक । वर्ण हि अनेक । मुखांचे ह्या ॥७३३॥

ऐसीं महाघोर । फार सांगूं काय । होती जीं साहाय्य । काळाग्नीसी ॥७३४॥

एक एक मुख । ऐसें दीप्तिमंत । जाळील क्षणांत । त्रैलोक्यासी ॥७३५॥

तया मुखांमाजीं । आणिक हि मुखें । दांत दाढा देखें । आणिक हि ॥७३६॥

जैसा वार्‍यानें च । वारा चाळवावा । सागरासी यावा । महा -पूर ॥७३७॥

वडवाग्निमाजीं । नातरी साचार । पडावी ती भर । विषाग्नीची ॥७३८॥

किंवा हालाहलें । पावकासी प्यावें । मृत्यूसी भेटावें । मृत्यूनें च ॥७३९॥

तैसें हें संहार - । तेज अनिवार । मातलें साचार । मुखामाजीं ॥७४०॥

आणि मुखें तीं हि । केवढीं विस्तीर्ण । तुटोनि गगन । पडे जैसें ॥७४१॥

किंवा नभासी च । सर्व हि बाजूंनीं । जणूं कवळोनि । राहिलीं तीं ॥७४२॥

ना तरी धरित्री । घालोनि काखेंत । शिरे विवरांत । हिराण्याक्ष ॥७४३॥

पाताळापर्यंत । होतें जें विस्तृत । हाटकेश्वरांत । उघडलें ॥७४४॥

तैसा मुखांचा हा । अफाट विस्तार । जिह्वांचा हि जोर । आगळा चि ॥७४५॥

विश्व एका घांसा । अपुरें म्हणोन । नातरी गिळोन । टाकिता तें ॥७४६॥

पाताळींचे नाग । फूत्कारतां जैशा । झोंबती आकाशा । विष -ज्वाळा ॥७४७॥

तैशा पसरल्या । जिह्ला खालींवरी । मुखाचिया दरी - । माजीं येथें ॥७४८॥

कल्पांत -विजांचें । बांधोनि जुंबाड । आकाशींचे गड । शृंगारावे ॥७४९॥

तैसीं धगधगीत । दाढांचीं हीं टोंकें । विराजती देखें । ओष्ठ -प्रांतीं ॥७५०॥

आणि ललाटींच्या । खोळेमाजीं द्दष्टि । भयातें हि भीति । दाविते जी ॥७५१॥

जणूं भ्रू -तळीं ती । राहिली लपून । उसळी भयाण । मृत्यूची च ॥७५२॥

ऐसें उग्र रूप । घेवोनियां येथें । काय साधायातें । पाहतोसी ॥७५३॥

नेणें चि हें कांहीं । ओढवलें परी । आज मजवरी । मृत्यु -भय ॥७५४॥

देवा विश्वरूप । पाहायाची आस । केली ती फळास । आली ऐसी ॥७५५॥

पाहोनि हें रूप । देवा चांगले च । शांत झालें साच । माझे डोळे ! ॥७५६॥

पार्थिव हा देह । नासेल निभ्रांत । कोण काकुळत । करी त्याची ॥७५७॥

परी आतां माझ्या । चैतन्याची येथ । नाहीं घडगत । ऐसें वाटे ॥७५८॥

सर्वांग हें देख । भयें कैसें कांपे । अतिरेकें तापें । मन तें हि ॥७५९॥

दचकली बुद्धि । रूप हें पाहून । गेला अभिमान । गळोनियां ॥७६०॥

परी अंतरात्मा । आनंद -स्वरूप । तो हि जणूं कंप । पावतसे ! ॥७६१॥

तुझें विश्वरूप । पहावें ह्या डोळं । छंद हा आगळा । घेतला मीं ॥७६२॥

परी तेणें कैसें । झालें विपरीत । देशोधडी जात । ज्ञान माझें ॥७६३॥

ऐसा गुरु -शिष्य - । संबंध आगळा । असेल विरळा । ऐसें वाटे ! ॥७६४॥

तुझें विश्वरूप । पाहोनि अद्‍भुत । व्याकुळलें चित्त । माझें देवा ॥७६५॥

तया सांवराया । धैर्य आणूं पाहें । तंव गेलें आहे । आधीं च तें ॥७६६॥

त्या हि वरी । विश्व - । रुप देखतां च । घाबरलों साच । त्याहुनी हि ॥७६७॥

विश्वरूपीं मज । ऐसें गोंविलेंस । भला उपदेश । तुझा देवा ! ॥७६८॥

पूर्ण विश्वांतीची । धरोनियां हांव । धडपडे जीव । बापुडा हा ॥७६९॥

परी तुझ्या उग्र । रूपीं जनार्दना । आसरा दिसेना । कोठें हि तो ॥७७०॥

विश्वरूपाचिया । महामारीमाजीं । सांकडलें आजि । चराचर ॥७७१॥

तरी करूं काय । कैसा राहूं स्वस्थ । न सांगूं हें येथ । जरी तुज ॥७७२॥

दंष्ट्राकरालानि च ते मुखानि द्दष्ट्वैव कालानलसन्निभानि ।

दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥२५॥

जणूं काळाचें च । फुटोनियां भांडें । उडावे तुकडे । चोहींकडे ॥७७३॥

अक्राळविक्राळ । तैसीं तुझीं मुखें । पसरलीं देखें । निरंतर ॥७७४॥

तयांमाजीं दांत - । दाढांची तीदाटी । कैसी दोन्ही ओठीं । सामावे ना ॥७७५॥

प्रळय -शस्त्रांचें । जणूं विलक्षण । घातलें कुंपण । ऐसें वाटे ॥७७६॥

तक्षकाच्या तोंडीं । भरावें जहर । पिशाच्चसंचार । काळरात्रीं ॥७७७॥

किंवा वज्राग्नीनें । अघोर आवेशें । परजावेम जैसें । पावकास्त्र ॥७७८॥

तैसीं तुझीं तोंडें । भासती प्रचंड । जेथोनि उदंड । त्वेष वाहे ॥७७९॥

आम्हांवरी लोंढे । मृत्युरसाचे च । ओढवले साच । ऐसें वाटे ॥७८०॥

कल्पान्तींचा वायु । आणि प्रळयाग्नि । दोन्ही हि मिळोनि । येती जेव्हां ॥७८१॥

तेव्हां काय एक । जळायाचें राहे । दग्ध होत आहे । विश्व सारें ॥७८२॥

तैसीं संहारक । मुखें अनिवार । देखोनियां धीर । गळे माझा ॥७८३॥

दिसती ना दिशा । गेलों मी भुलोन । नाठवे मी कोण । तें हि आतां ॥७८४॥

तुझें विश्वरूप । देखिलें अळुमाळ । सुखाचा दुष्काळ । तों चि झाल ॥७८५॥

आतां अस्ताव्यस्त । आवरीं आवरीं । आपुलें श्रीहरी । विश्वरूप ॥७८६॥

ऐसें भयानक । दाविशील कांहीं । स्वप्नांत हि नाहीं । कल्पिलें हें ॥७८७॥

एर्‍हवीं हें रूप । दाखवा म्हणोन । हट्ट घेता कोण । तुजपाशीं ॥७८८॥

आतां ह्या स्वरूप - । प्रळयापासून । वांचवी हे प्राण । एक वेळ ॥७८९॥

आमुचा तूं धनी । प्रभो चक्र -पाणी । तुज विनवणी । एवढी च ॥७९०॥

आतां विश्वरूप - । महामारींतून । बाहेरी काढोन । मजलागीं ॥७९१॥

श्रीहरी सत्वर । वांचवी दातारा । पसारा हा सारा । आवरोनि ॥७९२॥

देवदेवा विश्वा - । जीवन तूं होसी । आधार विश्वासी । तूं चि एक ॥७९३॥

परी कैसा करूं । पाहसी साचार । तयाचा संहार । आज येथें ॥७९४॥

आपुली ही माया । घेईं आवरून । होवोनि प्रसन्न । देवराया ॥७९५॥

आतां महा -भया - । पासोनि श्रीहरी । त्वरें मुक्त करीं । मजलागीं ॥७९६॥

येथें तुजप्रति । देवा ऐशा रीती । यावें काकुळती । वारंवार ॥७९७॥

घोर विश्व -रूप । तुझें हें देखून । एवढा भिऊन । गेलों आज ॥७९८॥

येतां इंद्र -पुर । जिंकाया दानव । केला पराभव । तयांचा मीं ॥७९९॥

काळाचें हि भय । वाटेना अंतरीं । जरी तो सामोरीं । उभा ठाके ॥८००॥

परी हें तों नव्हे । तैसें साधारण । काळावरी ताण । झाली येथें ॥८०१॥

तुझें विश्वरूप । घेऊं पाहे घोंट । आमुच्यासकट । विश्वाचा हि ॥८०२॥

देवा नसतां ही । प्रळ्याची वेळ । मध्येंच तूं काळ । पातलासी ॥८०३॥

बापुडें त्रैलोक्य । अल्यायुषी झालें । रूप हें थोरलें । देखतां चि ॥८०४॥

हाय ! हाय ! ! कैसें । भाग्य विपरीत । विघ्न अवचित । पातलें हें ॥८०५॥

तुझें विश्व -रूप । देखोनियां शांत । व्हावें ऐसा हेत । मनीं होता ॥८०६॥

परी येथें कैसा । अरेरे ! तूं ग्रास । करूं लागलास । विश्वाचा ह्या ॥८०७॥

चार हि बाजूंनीं । व्यापोनि ही सेना । आपुल्या वदना - । माजीं घेसी ॥८०८॥

तुझ्या विश्वरूपीं । येथें भगवंता । प्रत्यक्ष हें आतां । देखतसें ॥८०९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel