सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति ।

अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि ॥४१॥

नव्हतें केव्हां च । ओळखिलें देवा । ऐशा तुज सर्वा । सर्वात्मका ॥१०८८॥

म्हणोनियां सखा । सोयरा तूं साच । नातें एवढें च । बाळगोनि ॥१०८९॥

केलें तुजपाशीं । तैसें च वर्तन । थोरवी नेणोन । प्रभो तुझी ॥१०९०॥

सडासंमार्जनीं । वेंचिलें अमृत । झालें अनुचित । केवढें हें ! ॥१०९१॥

गेलें मी भुलून । शिंगरूं घेऊन । टाकिली देऊन । काम - धेनु ॥१०९२॥

जोडला खडक । दैवें परिसाचा । परी नाहीं साचा । ओळखिला ॥१०९३॥

म्हणोनियां तया । फोडोनियां वायां । दडपिला पाया - । भरणींत ॥१०९४॥

दिव्य कल्पतरु । तोडोनियां जाण । शेतासी कुंपण । घातलें मीं ॥१०९५॥

भाग्यें हातीं आले । चिंतामणी भले । परी ते फेंकिले । मूढपणें ॥१०९६॥

तैसें नोळखून । तुझें प्रभुपण । सखा चि मानून । वागलों मी ॥१०९७॥

पाहें उघड हें । येथें चि सांप्रत । कायसी ही मात । संग्रामाची ॥१०९८॥

परी तयासाठीं । तुज जगजेठी । आपुला सारथी । केलें आम्हीं ॥१०९९॥

कराया शिष्टाई । कौरवांच्या घरा । तुज सर्वेश्वरा । पाठविलें ॥११००॥

ऐशा रीती । खर्चीं । घातलें गा तुज । व्यवहार - काज । आधावया ॥११०१॥

समाधि - सुख तूं । होसी योगियांचें । नेणोनि हें साचें । मूर्खपणें ॥११०२॥

थट्टाविनोदांत । तुझा वेळोवेळां । अवमान केला । वासुदेवा ॥११०३॥

यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु ।

एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ‍ ॥४२॥

विश्वाचें तूं मूळ । अनादि अनंता । सहजें बैसतां । समेमाजीं ॥११०४॥

सोयरे संबंधें । तेथें हि स्वच्छंदें । हवे तें विनोदें । बोलिलों मी ॥११०५॥

जात असूं आम्ही । तुझ्या घरीं जेव्हां । सन्मानिसी तेव्हां ॥ आम्हांसी तूं ॥११०६॥

न मानिसी तरी । रुसावें श्रीहरी । प्रेमें तुजवरी । केव्हां केव्हां ॥११०७॥

मग घालावी तूं । माझी समजूत । पायांसी हि हात । लावोनियां ॥११०८॥

अजाणतां ऐशा । किती झाल्या गोष्टी । सर्व हि तूं पोटीं । घातल्या त्या ॥११०९॥

बैसें तुजपुढें । पाठ फिरवून । सौंगडी मानून । तुजलागीं ॥१११०॥

योग्यता ही माझी । नव्हे नव्हे स्वामी । परी चुकलों मी । वासुदेवा ॥११११॥

देवा तुझ्या संगें । करूं दंगामस्ती । दांडपट्टा कुस्ती । खेळोनियां ॥१११२॥

करोनि धिःकार । आवेशें भांडावें । खेळतां स्वभावें । सारीपाट ॥१११३॥

चांग वस्तु ती ती । एकाएकीं मागूं । तुज गोष्टी सांगूं । पांडित्याच्या ॥१११४॥

तेविं तुझें काय । लागतसों आम्हीं । ऐसें पुसों स्वामी । तुजलागीं ॥१११५॥

ऐसे अपराध । तुज सांगूं किती । जे न सामावती । त्रि - भुवनीं ॥१११६॥

परी नेणतां चि । घडले हातून । देवा तुझी आण । वाहतसें ॥१११७॥

आठवण माझी । करिसी श्रीहरी । लोभें अवसरीं । भोजनाच्या ॥१११८॥

परी तुजवरी । रुसूनफुगून । बाजूसी बैसून । रहावें मीं ॥१११९॥

अंतःपुरामाजीं । राहतां खेळत । आशंकेना चित्त । माझें देवा ॥११२०॥

तुझ्या शय्येवरी । तुझ्या चि शेजारीं । झोंपलों श्रीहरी । निःसंकोच ॥११२१॥

अरे कृष्णा ऐसी । मारितसूं हांक । समजोनि एक । यादव तूं ॥११२२॥

निघालासी तरी । होतों बैसवीत । आपुली शपथ । घालोनियां ॥११२३॥

सांडोनियां भीड । तुझ्या समवेत । होतों मी बैसत । एकासनीं ॥११२४॥

न मानावी तुवां । बोलिली जी गोष्ट । प्रभो ऐसा धीट । झालों होतों ॥११२५॥

ऐसें अनुचित । घडलें बहुत । परिचय दाट । म्हणोनियां ॥११२६॥

तरी एक एक । किती गोष्टी ऐशा । सांगूं ह्रषीकेशा । तुजलागीं ॥११२७॥

आतां एकदां चि । टाकितों बोलून । मीं तों असें पूर्ण । अपराधी ॥११२८॥

समक्ष वा पश्चात । ऐसें अनुचित । घडलें समस्त । जें जें काहीं ॥११२९॥

तें तें सर्व पोटीं । घालावें श्रीहरी । मातेचिया परी । कृपामूर्ते ॥११३०॥

गढूळ उदक । घेवोनि सरिता । मिळावया जातां । सागरातें ॥११३१॥

तियेचा स्वीकार । केल्याविना कांहीं । अन्य गति नाहीं । तयालागीं ॥११३२॥

प्रमादें वा प्रेमें । बोलिलों विरोधें । तुवां दया - निधे । क्षमावें तें ॥११३३॥

तुझ्या क्षमा - वृत्ति - । बळें त्रिविक्रमा । धरी भूत - ग्रामा । धरित्री हि ॥११३४॥

म्हणोनियां तुज । विनवावें किती । प्रभो रमा - पति । अप्रमेया ॥११३५॥

झाले अपराध । क्षमा करी आतां । शरण अनंता । आलों तुज ॥११३६॥

पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान ।

न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः ॥४३॥

तुझें थोरपण । जाणिलें मीं साचें । होसी तूं जगाचें । जन्म - स्थान ॥११३७॥

हरि - हरादिक । सर्व हि देवांची । देवता तूं साची । होसी थोर ॥११३८॥

शब्द - ब्रह्मातें हि । पढविता साच । आदिगुरु तूं च । वासुदेवा ॥११३९॥

सर्वां भूतीं एक । सारिखा साचार । होसी तूं गंभीर । रमा - कांता ॥११४०॥

होसी अद्वितीय । सर्वगुणश्रेष्ठ । श्रीहरी वैकुंठ - । नायका तूं ॥११४१॥

प्रभो सर्वव्यापी । होसी तूं अजोड । मज हें उघड । दिसतसे ॥११४२॥

तुझ्या चि पासोनि । आकाश हें झालें । ज्यांत सांठवलें । चराचर ॥११४३॥

ऐशा तुज जोड । पहावया जावें । तंव परतावें । लाजोनियां ॥११४४॥

मग तुझ्याहून । असे कोणी श्रेष्ठ । नको च ही गोष्ट । बोलावया ॥११४५॥

तुजऐसा किंवा । तुजहून थोर । नाहीं च साचार । त्रि - भुवनीं ॥११४६॥

ऐसा अ - द्वितीय । एक तूं श्री - पति । तुझें वानूं किती । थोरपण ॥११४७॥

तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीडयम् ‍ ।

पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ‍ ॥४४॥

मग तो अर्जुन । ह्यापरी बोलून । पुन्हां लोटांगण । घालीतसे ॥११४८॥

तों चि सात्त्विकांचें । येवोनि भरतें । भक्ति - प्रेमें दाटे । कंठ त्याचा ॥११४९॥

ऐसा तो सद्नद । म्हणे जगन्नाथा । प्रसन्न हो आतां । कृपा - सिंधो ॥११५०॥

अपराधार्णवीं । बुडालों दातार । करोनियां त्वरा । उद्धरावें ॥११५१॥

आमुचा तूं सखा - । सोयरा म्हणोन । नाहीं दिला मान । जगब्दंधो ॥११५२॥

देवदेवा तुज । सारथी करून । आम्हीं स्वामीपण । गाजविलें ॥११५३॥

प्रभो तूं चि एक । वर्णनीय साच । परी तूं मातें च । वाखाणिसी ॥११५४॥

ऐसा मजवरी । तुझा लोभ तरी । मी च गर्व करीं । सभेमाजीं ॥११५५॥

ऐसे अपराध । माझे अगणित । परी पदरांत । घ्यावें मज ॥११५६॥

प्रमादापासोन । करावें रक्षण । होवोनि प्रसन्न । जगन्नाथा ॥११५७॥

हें हि तुम्हांलागीं । विनवाया साच । योग्यता नाहीं च । माझ्या अंगीं ॥११५८॥

परी होय जैसें । लडिवाळपणें । बापाशीं बोलणें । बाळकाचें ॥११५९॥

किंवा जिवलग । सखा भेटतां च । सर्व हि संकोच । सोडोनियां ॥११६०॥

जीं जीं सुखदुःखें । भोगिलीं आपण । करावीं कथन । तीं तीं जैसीं ॥११६१॥

प्राणनाथालागीं । तन - मन - प्राण । सर्व समर्पण । करी जी का ॥११६२॥

ऐशा कान्तेलागीं । एकांतीं तो कान्त । भेटतां गुपित । बोले जैसी ॥११६३॥

तैशा परी तुम्हां । विनविलें देवा । हेतु पुरवावा । आणिक हि ॥११६४॥

अद्दष्टपूर्वं ह्रषितोऽस्मि द्दष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे ।

तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगान्निवास ॥४५॥

निज - विश्वरूप । दाखवावें मज । ऐसें प्रेमें तुज । विनविलें ॥११६५॥

तुवां माझा छंद । पुरविला साचा । होसी तूं भक्तांचा । मायबाप ॥११६६॥

कामधेनु - वत्स । खेळावया द्यावें । अंगणीं लावावें । कल्प - वृक्ष ॥११६७॥

नातरी मांडावा । नक्षत्रांचा खेळ । चंद्रमा निर्मळ । यावा हातीं ॥११६८॥

ऐसा तरी माझा । छंद आगळा च । पुरविला साच । माउली तूं ॥११६९॥

जया अमृताचा । पावावया लेश । लागती सायास । करावया ॥११७०॥

तया अमृताचा । तुवां चातुर्मास । पाडिला पाऊस । देव - देवा ॥११७१॥

भूमि चोखाळून । वाफ्यावाफ्यांतून । टाकिले पेरून । चिंतामणी ॥११७२॥

प्रभो ऐसें मज । केलें तूं कृतार्थ । सर्व मनोरथ । पुरवोनि ॥११७३॥

शिव - ब्रह्मयातें हि । नाहीं ज्याची वार्ता । रूप तें अनंता । दाविलें तूं ॥११७४॥

उपनिषदांसी । नाहीं ज्याची भेटी । पडे ना जें द्दष्टी । ब्रह्मादिकां ॥११७५॥

तें चि अंतरींचें । तुवां निज गुज । उकलोनि मज । दाखविलें ॥११७६॥

कल्पादिपासोन । आजवरी माझे ! होवोनियां जे जे । जन्म गेले ॥११७७॥

तया सर्वांचा हि । वाचोनियां पाढा । घेतला मीं झाडा । तरी देवा ॥११७८॥

तुझें विश्व - रूप । देखिलें ऐकिलें । ऐसें आढळलें । नाहीं मज ॥११७९॥

जया स्वरूपाचें । अंगण हि ठावें । नाहीं च स्वभावें । बुद्धीलागीं ॥११८०॥

आणि चित्तालागीं । जया स्वरूपाची । कल्पना हि साची । करवे ना ॥११८१॥

तया स्वरूपाची । द्दष्टीलागीं भेट । नको च ही गोष्ट । बोलावया ॥११८२॥

आजवरी नाहीं । देखिलें ऐकिलें । ऐसें जें आपुलें । विश्वरूप ॥११८३॥

तें चि मज डोळां । दाखविलें देवा । म्हणोनियां जीवा । हर्ष झाला ॥११८४॥

परी कराव्या गा । तुजसवें गोष्टी । ऐसें जगजेठी । वाटे मज ॥११८५॥

प्रेमानंदें तुज । द्यावें आलिंगन । सन्निध । राहून । निरंतर ॥११८६॥

तरी तुझीं मुखें । अनंत अपार । बोलावें साचार । कोणापाशीं ॥११८७॥

तुज मिठी देऊं । तरी ह्रषीकेशी । सर्वथा तूं होसी । अनावर ॥११८८॥

कैसें वार्‍यासंगें । घडावें धांवणें । किंवा मिठी देणें । आकाशासी ॥११८९॥

महा - सागरांत । कैसी भगवंता । येईल खेळतां । जल - क्रीडा ॥११९०॥

प्रभो विश्वरूप । हें तुझें पाहून । गेलों मी भिऊन । एकाएकीं ॥११९१॥

तरी आतां घेई । आवरोनि ह्यास । एवढी च आस । पूर्ण करीं ॥११९२॥

कौतुकें करोनि । जगाचा प्रवास । सुखें स्व - ग्रृहास । यावें जैसें ॥११९३॥

तैसें प्रभो तुझें । रूप चतुर्भुज । आम्हासी सहज । विसावा तो ॥११९४॥

आम्ही योगजात । अभ्यासावें साड्‍ग । अनुभव मग । हा चि घ्यावा ॥११९५॥

रूप चतुर्भुज । सांवळें सगुण । विश्रांतीचें स्थान । तें चि एक ॥१९९६॥

आम्ही सर्व शास्त्रीं । व्हावें पारंगत । एक हा सिद्धान्त । जाणावया ॥११९७॥

आणि यज्ञ - याग । करावे सकळ । परी हें चि फळ । मिळवाया ॥११९८॥

सकळ हि तीर्थें । हिंडावीं पावन । घ्यावया दर्शन । रूपाचें ह्या ॥११९९॥

आम्हीं दान - पुण्य । करावें जें कांहीं । व्हावें तें सर्व हि । ह्या चि साठीं ॥१२००॥

रूप चतुर्भुज । सांवळें सुंदर । भेटावें माहेर । विश्वांतीचें ॥१२०१॥

घेतली आवडी । ही च माझ्या जीवें । पुरवावी देवें । झडकरी ॥१२०२॥

माझ्या अंतरींचा । जाणसी तूं भाव । देवांचा तूं देव । पूजनीय ॥१२०३॥

होवोनि प्रसन्न । पुनरपि मज । रूप चतुर्भुज । दाखवीं तें ॥१२०४॥

किरीटिनं गदिनं चक्रहस्त -- मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।

तेनैव रुपेण चतुर्भुजेन सहस्त्रबाहो भव विश्वमूर्ते ॥४६॥

शोभे अंग - कांति । नील - वर्ण कैसी । जणूं आकाशासी । रंगवीत ॥१२०५॥

नीळ - कमळातें । जी का भूषविते । निळी झांक देते । इंद्रनीळा ॥१२०६॥

सुटावा सुगंध । जैसा मरगजा । फुटाव्या कीं भुजा । आनंदासी ॥१२०७॥

तैसें मदनासी । लाधलें सौंदर्य । घेवोनि आश्रय । जानूंवरी ॥१२०८॥

कैसें मुकुटातें । मस्तकीं ठेवितां । मस्तकें मुकुटा । शोभविलें ॥१२०९॥

जया अंगाचिया । सुतेजें सहज । चढलासे साज । शृंगारासी ॥१२१०॥

इंद्रधनुष्याच्या । कमानींत चांग । आवरिला मेघ । नभामाजीं ॥१२११॥

तैसी शोभे मूर्ति । सांवळी सुंदर । वैजयंती हार । घालोनियां ॥१२१२॥

दैत्यांतें हि सदा । देई मोक्ष - पदा । उदार ती गदा । विराजते ॥१२१३॥

कैसें सुदर्शन - । चक्र तुझ्या हातीं । मिरवे श्री - पति । सौम्य तेजें ॥१२१४॥

काय सांगूं फार । ऐसें मनोहर । रूपडें साचार । तुझें देवा ॥१२१५॥

पहावया जीवा । लागली उत्कांठा । म्हणोनियां आतां । तैसा होईं ॥१२१६॥

विश्व - रूपाचे हे । सोहळे भोगून । निवाले नयन । ह्रषीकेशा ॥१२१७॥

आतां कृष्ण - मूर्ति । देखावयासाठीं । जाहले ते अति । उतावीळ ॥१२१८॥

गोजिरें तें रूप । पाहिल्यावांचोन । नाहीं समाधान । चित्तालागीं ॥१२१९॥

सगुण साकार । कृष्णमृर्तीपुढें । विश्वरूप थोडें । वाटे मज ॥१२२०॥

तरी आतां भोग - । मोक्षाचिया ठायीं । हरिविण नाहीं । दुजें कांहीं ॥१२२१॥

म्हणोनि तैसा चि । साकार तूं होईं । आवरोनि घेईं । विश्व - रूप ॥१२२२॥

श्रीभगावनुवाच --

मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात ‍ ।

तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न द्दष्टपूर्वम् ‍ ॥४७॥

भक्त अर्जुनाचे । ऐकोनि हे बोल । वाटलें नवल । देवालागीं ॥१२२३॥

म्हणे पार्था कोणी । ऐसा अविचारी । नाहीं आजवरी । देखिला मीं ॥१२२४॥

केवढी ही वस्तु । लाभली अगाध । परी तो आनंद । भोगिसी ना ॥१२२५॥

नेणों कां गा ऐसा । हेकाड तूं होसी । काय हें बोलसी । भिवोनियां ॥१२२६॥

देतसों सगुण । साकार दर्शन । प्रसन्न होवोन । भक्तालागीं ॥१२२७॥

निज अंतरींची । परी गूढ खूण । ठेवितों राखून । जीवापाड ॥१२२८॥

परी तुझी आस । पुरवावी आज । म्हणोनि हें निज - । विश्व - रूप ॥१२२९॥

पार्था तुजपुढें । प्रकटिलें साच । जीव - प्राणाचें च । ओतलें जें ॥१२३०॥

कैसी नेणों तुझी । घेवोनि आवडी । प्रसन्नता वेडी । झाली माझी ॥१२३१॥

म्हणोनियां गूढ । विश्व - रूपाची हि । जगीं गुढी पाहीं । उभारिली ॥१२३२॥

तें हें परात्पर । अपारां अपार । जेथोनि अवतार । कृष्णादिक ॥१२३३॥

धनंजया शुद्ध । ज्ञान - तेजाचें च । ओतलें हें साच । विश्व - रूप ॥१२३४॥

सर्वांसी हें मूळ । अनंत अढळ । अखंड केवळ । विश्वात्मक ॥१२३५॥

नानाविध केलीं । साधनें बहुत । तरी नव्हे प्राप्त । म्हणोनियां ॥१२३६॥

तुजविण कोणी । विश्वरूप भलें । ऐकिलें देखिलें । नाहीं च हें ॥१२३७॥

न वेदयज्ञाध्ययनैर्न दानै -- र्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः ।

एवंरूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥४८॥

पार्था वेद ह्यासी । पहावया गेले । तों चि स्वीकारिलें । मौन त्यांनीं ॥१२३८॥

यज्ञ - याग ते हि । स्वर्गापावेतों च । जावोनियां साच । परतले ॥१२३९॥

योग - साधक ते । देखोनि सायास । गेले योगाभ्यास । सोडोनियां ॥१२४०॥

कोणी जन्मवेरीं । केलें अध्ययन । नव्हे च दर्शन । तरी ऐसें ॥१२४१॥

सकळ सत्कर्में । झालीं उत्कंठिट । रूप हें अद्बुत । देखावया ॥१२४२॥

परी सत्य लोका - । पलींकडे कांहीं । धांव गेली नाहीं । तयांची हि ॥१२४३॥

तपें उग्रपण । टाकिलें सांडून । ऐश्वर्य देखून । आगलें हें ॥१२४४॥

विविध साधनां - । पासोनि साचार । ऐसें फार दूर । राहिलें जें ॥१२४५॥

तें हें विश्वरूप । तुवां अनायासें । आज येथें जैसें । देखिलें गा ॥१२४६॥

तैसें मृत्युलोकीं । कोणासी हि साच । पहाया नाहीं च । सांपडलें ॥१२४७॥

देखें सृष्टिकर्त्या । ब्रह्मदेवातें हि । लाधलें हें नाहीं । श्रेष्ठ भाग्य ॥१२४८॥

घ्यान - संपत्तीचा । एकटा तूं धनी । होसी त्रिभुवनीं । पार्था आज ॥१२४९॥

मा ते व्यथा मा च विमूढभावो द्दष्टवा रूपें घोरंमीद्दङ्ममेदम् ‍ ।

व्यपेतभीह प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥४९॥

म्हणोनि तूं मानीं । धन्य आपणातें । देखोनि हे येथें । विश्व - रूप ॥१२५०॥

विश्व - रूपाचि ह्या । आपुलिया चित्तीं । नको धरूं भीति । लेशमात्र ॥१२५१॥

विश्व - रूपाहून । दुजें कांहीं आतां । नको पंडु - सुता । मानूं चांग ॥१२५२॥

अथांग सागर । अमृतें भरला । दैवें प्राप्त झाळा । एकाएकीं ॥१२५३॥

मग बुडायाचें । बाळगोनि भय । कोणी निघे काय । सोडोनि तो ॥१२५४॥

किंवा सुवर्णाचा । लाभतां डोंगर । एवढा हा थोर । नको आम्हां ॥१२५५॥

ऐसा अविचारें । देवोनि नकार । तयाचार अव्हेर । करावा का ॥१२५६॥

दैवयोगें हाता । येतां चिंतामणी । भार तो म्हणोनि । फेंकावा का ॥१२५७॥

ना तरी ती कैसी । पोसावी म्हणोन । द्यावी हाकलोन । काम - धेनु ॥१२५८॥

किंवा शीत - रशिम । चंद्र आला घरा । न जातां सामोरा । तयालागीं ॥१२५९॥

म्हणेल का कोणी । नीघ होईं दूर । तुझा । उष्मा फार । तप देई ॥१२६०॥

पलीकड जाईं । पाडितोसी छाया । म्हणावें का सूर्या - । लागीं ऐसें ॥१२६१॥

महा - तेजाचा हा । ठेवा तैसा आज । लाधला सहज । तुजलागीं ॥१२६२॥

तरी आतां ऐसी । नको कासाविसी । गांवढा तूं होसी । कां गा पार्था ॥१२६३॥

सोडोनियां अंग । आलिंगिसी छाया । काय धनंजया । कोपूं आतां ॥१२६४॥

कां गा येथें ऐसा । होसी तूं अधीर । त्यजावया सार । विश्व - रूप ॥१२६५॥

चतुर्भुज रूप । माझें वरिवरी । परी तुज भारी । आवडे तें ॥१२६६॥

विश्वरूप घोर । चतुर्भुज थोर । सोडीं हा विचार । अजूनी हि ॥१२६७॥

नको नको तुज । सगुणाची गोडी । विश्वरूपीं बुडी । दिल्यावीण ॥१२६८॥

पार्था विश्वरूप । जरी हें विशाळ । अक्राळविक्राळ । महा - घोर ॥१२६९॥

तरी पूजनीय़ । हें चि एक साच । निश्चय ऐसा च । असों देईं ॥१२७०॥

कृपणाचा देह । वरीवरी नाचे । परी चित्त त्याचें । ठेव्यापाशीं ॥१२७१॥

किंवा फिरे जैसी । पक्षिणी आकाशीं । जीव पिलांपाशीं । ठेवोनियां ॥१२७२॥

किंवा जैसी धेनु । चरे रानींवनीं । परी ओढ मनीं । वासराची ॥१२७३॥

तैसें तुझें प्रेम । पार्था निरंतर । जडूं दे अपार । विश्व - रूपीं ॥१२७४॥

मग ब्राह्मात्कारीं । सख्यत्वाचें सुख । भोगावया देख । श्रीहरीतें ॥१२७५॥

सगुण साकार । सांवळें सुंदर । रूप मनोहर । चतुर्भुज ॥१२७६॥

परी सत्य नित्य । विश्वरूपाठायीं । सदा असों देईं । सद्भाव तूं ॥१२७७॥

सांगतसें तुज । हें चि वारंवार । न पडो विसर । बोलाचा ह्या ॥१२७८॥

नव्हतें हें पूर्वीं । रूप तूं देखिलें । म्हणोनियां भ्यालें । चि त्त तुझें ॥१२७९॥

तरी पार्था आतां । सोडोनियां भय । ठेवी तूं अक्षय । प्रेम येथें ॥१२८०॥

पार्थालागीं ऐसें । सांगोनियां सार । देव सर्वेश्वर । काय बोले ॥१२८१॥

म्हणे करूं आतां । तुझी इच्छा - पूर्ति । सुखें कृष्ण - मूर्ति । न्याहाळीं तूं ॥१२८२॥

संजय उवाच ---

इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ।

आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥५०॥

ऐसें बोलतां च । देवांचा तो देव । जाहला मानव - । देह - धारी ॥१२८३॥

नवल ना येथ । श्रीहरि समर्थ । परी हें अद्भुत । भक्त - प्रेम ॥१२८४॥

श्रीहरि प्रत्यक्ष । पूर्ण पर - ब्रह्म । दाखवी परम । विश्व - रूप ॥१२८५॥

परी तयाचें तें । स्वरूप थोरलें । नाहीं आवडलें । पार्थालागीं ॥१२८६॥

जैसी वस्तु एक । हातीं घेवोनियां । नको म्हणोनियां । टाकावी ती ॥१२८७॥

किंवा रत्नालागीं । ठेवावें दूषण । कीं वधू पाहून । नाकारावी ॥१२८८॥

तैसी अर्जुनाची । तेथें झाली स्थिति । विराट श्रीमूर्ति । पाहोनि ती ॥१२८९॥

देवें तत्त्व - सार । तया सांगितलें । दावोनि आपुलें । विश्व - रूप ॥१२९०॥

स्वयें कृष्णदेव । झाला विश्व - मूर्ति । पार्थावरी प्रीति । केवढी ही ! ॥१२९१॥

आपुलिया हौसे - । सारिखा बरवा । साज घडवावा । सुवर्णाचा ॥१२९२॥

परी पुनरपि । नावडे म्हणून । जैसा आटवून । टाकावा तो ॥१२९३॥

तैसा शिष्याचिया । प्रीतीसाठीं भला । विश्व - रूप झाला । कृष्णदेव ॥१२९४॥

परी तयाच्या तें । मना नाहीं आलें । अद्भुत आगळें । विश्व - रूप ॥१२९५॥

म्हणोनि तो देव । पुन्हां कृष्ण झाला । प्रेमें प्रकटला । पार्थापुढें ॥१२९६॥

येथवरी त्रास । सुखें जो साहेल । ऐसा का लाभेल । गुरु कोठें ॥१२९७॥

परी तो संजय । म्हणे नेणों केसी । आवडी देवासी । अर्जुनाची ॥१२९८॥

व्यापोनियां विश्व । भोंवतीं जें भलें । होतें प्रकटलें । दिव्य तेज ॥१२९९॥

तें चि सांठवलें । मागुतीं सहज । तिये चतुर्भुज । कृष्णरूपीं ॥१३००॥

‘ त्वं पद ’ तें जैसें । ‘ तत्पदीं ’ सामावे । बीजांत सांठवे । वृक्षाकार ॥१३०१॥

ना तरी जीवाची । जागृति साचार । स्वप्नाचा विस्तार । गिळी जैसी ॥१३०२॥

तैसा देवें मग । विश्वरूप - योग । आवरिला चांग । कृष्णरूपीं ॥१३०३॥

सूर्यप्रभा बिंबीं । हारपावी जैसी । नातरी आकाशीं । मेघ - माला ॥१३०४॥

किंवा जैसी राया । सागराच्या पोटीं । रहावी भरती । जिरोनियां ॥१३०५॥

तैसी विश्वरूपी । वस्त्राची जी घडी । कृष्णरूपीं दही । देवोनियां ॥१३०६॥

होती राहिली ति । देवें उकलून । दाविली भुलून । पार्थ - प्रेमें ॥१३०७॥

दिव्य वस्त्राची त्या । लांबी रुंदी रंग । न्याहाळीलीं चांग । धनंजयें ॥१३०८॥

मग तयाचिया । पसंतीस भलें । नाहीं उतरलें । म्हणोनियां ॥१३०९॥

तया विश्वरूप - । वस्त्राचि स्वभावें । पुनरपि देवें । घडी केली ॥१३१०॥

तों च विश्व - व्यापी । विश्व - रूप घोर । सगुण सुंदर । सौम्य झालें ॥१३११॥

काय सांगूम फार । श्रीहरीनें थोर । विश्वरूप घोर । आवरोनि ॥१३१२॥

चतुर्भुजरूपीं । पुन्हां प्रकटून । दिलें आश्वासन । अर्जुनासी ॥१३१३॥

स्वप्नामाजीं कोणी । विलोकावा स्वर्ग । येतां चि तो मग । जागृतींत ॥१३१४॥

व्हावा अकस्मात । आश्चर्यचकित । तैसा तो विस्मित । पार्थ झाला ॥१३१५॥

ना तरी सद्‍गुरु । होतां चि प्रसन्न । सर्व भव - ज्ञान । ओसरावें ॥१३१६॥

आणि जैसें व्हावें । तत्त्वाचें स्फुरण । श्रीहरि - दर्शन । तैसें पार्था ॥१३१७॥

श्रीहरीच्या आड । विश्व - रूप थोर । सरतां तें दूर । सुखावे तो ॥१३१८॥

जणूं काळालागीं । जिंकोनियां यावें । मागें हटवावें । महा - वाता ॥१३१९॥

किंवा बाहु - बळें । सप्त हि सागर । उल्लांघोनि पार । व्हावें जैसें ॥१३२०॥

तैसें पार्थालागीं । झालें समाधान । मागुतीं देखून । हरि - रूप ॥१३२१॥

मावळतां सूर्य । जैशा प्रकटती । तारका मागुतीं । साकाशांत ॥१३२२॥

तैसा देखूं लागे । पार्थ चराचर । लोक हि साचार । तिये वेळीं ॥१३२३॥

पाहे तंव देखे । तें चि कुरु - क्षेत्र । तैसें चि तें गोत्र । दोहीं भागीं ॥१३२४॥

आणि शस्त्रास्त्रांचा । समृह अपार । वर्षती सु - धीर । वीर तेथें ॥१३२५॥

मग पार्थ तया । शर - मंडपांत । तैसा चि तो रथ । उभा देखे ॥१३२६॥

देखे धुरेवरी । कृष्ण वनमाळी । तेवीं रथा - तळीं । आपणातें ॥१३२७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel