कार्यालयातून वेळ मिळाला की ते संशोधनपर लेख लिहीत. त्यांचे ते लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रकाशित झाले. मद्रास येथील गणिताच्या क्षेत्रात त्यांना प्रसिद्धी मिळाली. लवकरच काही प्राध्यापकांना व शिक्षणतज्ज्ञांना त्यांचे काम व बैद्धिक कैशल्य ज्ञात झाले. त्यांच्या शिफारशीमुळे १ मे, १९१३ पासून गणितातील आपले संशोधन चालू ठेवण्यासाठी त्यांना मद्रास विद्यापीठाकडून मासिक ७५ रु. शिष्यवृत्ती देण्यात आली. तोपर्यंत त्यांच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची कोणतीच पदवी नव्हती. काही हितचिंतकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काही महान गणितज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला. त्या काळी इंग्लंड हे गणिताचे केंद्र मानले जाई. रामानुजन यांनी आपली १२० प्रमेये व सूत्रे (थिअरम्स व फॉर्म्युले) केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिप्टी महाविद्यालयातील फेलो, प्रसिद्ध गणितज्ञ प्रा. गॉडफ्रे एच. हार्डी यांना पाठवली. पोस्टाने मिळालेल्या या वह्या न्याहाळल्यावर त्यांनी आपले सहकारी प्राध्यापक लिटलवुड यांच्याशी याविषयी चर्चा केली. या वह्या लिहिणाऱ्या लेखकाची प्रतिभा त्यांना जाणवली. लवकरच हार्डी व रामानुजन यांच्यात पत्रव्यवहार सुरू झाला. हार्डी यांनी रामानुजन यांच्या इंग्लंड दौऱ्याची व्यवस्था केली. याच दरम्यान केंब्रिज विद्यापीठाचे प्रा.ई. एच. नेविले मद्रास विद्यापीठाच्या दौऱ्यावर आले. हार्डी यांनी त्यांना रामानुजन यांची भेट घेऊन त्यांना इंग्लंडला येण्यास तयार करण्यास सांगितले. स्थानिक मित्र आणि हितचिंतक रामानुजन यांना इंग्लंड दौऱ्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्यास तयार होते.
अशा संयुक्त प्रयत्नांमुळे मद्रास विद्यापीठ रामानुजन यांना दोन वर्षांसाठी २५० पौंडांची शिष्यवृत्ती देण्यास राजी झाले. हार्डी यांनी रामानुजन यांचा प्रवास खर्च व इंग्लंड मधील वास्तव्याचा खर्च यांची जबाबदारी घेतली होती. परंतु त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. परंपरावादी वैष्णव कुटुंबातील मुलाने समुद्र ओलांडण्यास धर्माची अनुमती नव्हती. अखेरीस, हितचिंतकांनी समजावून सांगितल्यामुळे रामानुजन यांचे पालक सहमत झाले व त्यांना परदेशी जाण्याची परवानगी दिली. १७ एप्रिल, १९१४ रोजी ते इंग्लंडला पोहोचले. नंतर हार्डी व लिटलवुड यांच्या मार्गदर्शनाखाली रामानुजन यांनी पद्धतशीर अभ्यास व संशोधनास सुरुवात केली. याच दरम्यान पहिल्या जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली. लिटलवुड युद्धक्षेत्रावर गेल्या नंतर प्राध्यापक हार्डी यांनी त्यांची देखभाल करण्याचे काम सांभाळले व मार्गदर्शन केले.