मी साधारण चौथीला असेल तेव्हाचा एक प्रसंग.तेव्हा गावातील हायस्कूल ची दगडी इमारत होती.आम्ही पाच सहा जण गच्चीवर गप्पा मारत होतो.आम्ही होतो खूप लहान पण विषय सरकला होता एका गंभीर विषयावर.तो पिरियडच असा होता की बालपणापासून जीवनाविषयी गंभीरपणे विचार करण्यास परिस्थिती भाग पाडत होती.

मोठेपणी काय होणार,काय बनणार ह्यावर चर्चा चालू होती.मी चटकन सांगितले मी तर शिक्षकच बनणार.त्यावेळचे क्षत्रीय गुरुजी यांचा माझ्यावर खूप प्रभाव असावा,कदाचित त्यामुळे ही इच्छा.पण माझे हे उत्तर सर्वांच्या कुचेष्टेचे कारण बनले.
हे..,छा..अरे भौ काsच्या नोकऱ्या अन काsच काय? शिकून कायी उपेग नई. नोकरी लागणं ही काय सोपी गोष्ट हा ये का?मी खूपच नाराज झालो होतो.त्यांच्या ह्या प्रतिक्रिया ऐकून.तोंड उतरले होते.
हे पोरं माझं का ऐकत नाही.वर्गात तर निमूटपणे सगळं ऐकून घेतात,गल्लीत सर्वांसमोर ऐकतात आणि कोणी मोठी माणसे नसली की हे माझी हेटाळणी करतात.

पण मला आतून पूर्ण माहीत होते की मी मोठेपणी चांगल्या नोकरीला लागणार,शिक्षक बनणार किंवा काहीतरी बनणार.माझ्या मनावर त्यांनी आघात केला पण माझा आतला आवाज ते दाबू शकले नाही.माझा आतला आवाज सांगत होता तू काहीतरी नक्की बनणार.माझी हुशारी बघून व अनेक लोक माझे कौतुक करत हे बघून ही मुले असे कधी कधी नेहमी माझ्याकडे तिरस्कृत भावनेने पाहत व व माझा मुद्दा कधी एकदाचा खंडित करता येईल याच्या शोधात ते असत.पण खेळण्याच्या वेळेला हे आम्ही सगळे विसरून पण जायचो हे विशेष.

माझ्या दूरदृष्टीविषयक बोलण्याला कवडीची किंमत न देण्याची त्यांचे हे आचरण मात्र मला माझ्यातील आतला आवाज अत्यंत प्रबळपणे ऐकण्यास खरे तर सहाय्यकाच ठरत गेला.मी अधिकाधिक अंतर्मुख बनत गेलो, व जीवनाविषयीच्या लोकांच्या व माझ्या भावना ज्या नेहमी अंतरविरोधात्मक होत्या त्या भावना उत्तरोत्तर निकोप बनत गेल्या.

पुढे नवोदयमध्ये शिक्षण घेत होतो.10 वीला गेलो.सुट्ट्यांमध्ये घरी आलो. एक हितचिंतक भेटले,परिचित.त्याने चौकशी केली.काय सुभाष काय म्हणते,शाळा?कितविला गेला?मी-10 वी ला.
तो-अरे बाबा 10 वी म्हणजे खूप कठीण काम असतं बरं का?10 वी पास होणे म्हणजे खायची गोष्ट नाही.चांगले,चांगले थप्पीला पडतात.त्यावेळची नवोदय सोडून ग्रामीण भागात अशीच स्थिती होती.त्याने अनेक पोपटासारखे बोलणारे मुले नापास होतांना पाहिली होती.

अप्रत्यक्षपणे त्याला हेच सांगायचे होते की तू 10 वी पास होऊ शकत नाही.पण मी मात्र निश्चिन्त होतो.माझ्यासाठी 10 वी हा काही turning पॉईंट ही नव्हता,जसे इतर इयत्ता मी प्रमोट होत राहिलो तसेच दहावीचेही,मी इतर इयत्ता व 10 वी ह्यात कोणत्याच बाबतीत काही फरक असा केलाच नाही. त्याचा बाऊही केला नाही.अप्रत्यक्षपणे माझ्या आतील आवाजाचे म्हणणे होते की its simple. its not thats much hard as the people feel.10 वी पास,नापास,चांगले मार्क ,कमी गुण ह्यात काही फरकच वाटत नव्हता. किंबहुना त्यात तिर मारण्यासारखे काही नाही हे मी जाणून होतो.’नेमीची येतो पावसाळा’त्याप्रमाणे हे आहे असे वाटत.

झालो. अपेक्षेप्रमाणे साधारण गुणांनी मी 10 वी पास झालो.

पुढे 12 वी.तोच हितचिंतक परत भेटला.सुट्ट्यांमध्ये. as usual मला साहित्याची,भाषेची आवड असल्याने आर्टस् कडे गेलो. तो पुन्हा मनात भीती घालू लागला.

अरे सुभाष,ठीक आहे 10 वी झाला.पण 12 वी अशक्य.12 वी पास होणे अशक्य आहे.अनेक जण जे दहावीला पहिल्या पाच मध्ये होते शाळेत ते सुद्धा 12 वी नापास झाले.

आता मी नाराज तर झालोच पण इथे मला पास होणे हा खूपच outdated विषय वाटत होता कारण मी फर्स्ट class किंवा distinction च्या तयारीत होतो.व समोरील व्यक्ती अजूनही जुन्या विचारातून बाहेर आलेला नव्हता याची थोडी दया आली मलाच.

12 वी झाली.त्यावेळी उठसुठ केवळ average मार्क्स वर डी एड होण्याइतपत अवाच्या सव्वा कॉलेजेस नव्हती.गुणवत्ता यादीनुसारच डी एड ला नंबर लागत.
परजिल्हा एस सी कॅटेगरीत गुणवत्ता यादीत माझे पहिल्या क्रमांकावर नाव होते.ग्रंटेड कॉलेज ला नंबर लागला.

डी एड च्या दरम्यान पुन्हा त्याच हितचिंतकाने सध्याच्या परिस्थितीवर अर्धा तास lecture झोडले.
अरे बाबा,ठीक आहे डी एड ला तुझा नंबर लागला चांगली गोष्ट आहे. पण एक ध्यानात घे डी एड झाले म्हणजे लगेच नोकरी लागली असं काही नसतं.बरेच डी एड वाले घरी बसलेले आहेत,एक जण तर सायकल दुकानात puncture काढायच्या कामाला आहे.डी एड करतो चांगली गोष्ट आहे.पण नोकरी लागणे आजिबातच शक्य नाही.

आता त्याच्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास होता.इतक्या दिवस थोडं सहजपणे बोलत होता.पण आता छातीठोकपणे सांगत होता.त्याच्या बोलण्यात तथ्य ही होते.तशी परिस्थिती देखील होती.पण मला माहित होते.डी एड नंतर घरी बसण्याची वेळ सर्वांवरच येत नाही.त्यातले काही जण तर लागतातच ना नोकरीला.मग त्या काही जनांमधीलच मी आहे.हे फक्त मी आतून जाणत होतो.व्यक्त केले तर तो वादविवाद जेवढा वाढवला तेवढा वाढू शकतो.मग कशाला म्हणायचे ठीक आहे सर्वच नाही पण मी तर लागेल.प्रश्न कोणताही उपस्थित होवो त्याच्या येस नो च्या बाजू असंख्य असतात.हो च्या बाजूने जेवढी मते,प्रमाणे,सिद्धता असतात त्याहीपेक्षा नो च्या बाजूने अधिक असतात मग कशाला त्या फंद्यात पडायचे,मी फक्त हो हो म्हणत सगळं lecture ऐकून कल्टी मारली.

आता डी एड झाले.बाह्य जगताचा अजूनही म्हणावा तेवढा अनुभव नव्हताच.काही जण नकारात्मकच्या बाजूने इतके हुशार असतात की मला याचे नेहमी कुतूहल वाटत आले आहे.कारण त्यांच्या प्रश्नांना उत्तरेच मला आजपर्यंत देता आली नाहीत. खूप उजव्या मेंदूचा वापर करावा लागतो यासाठी.

डी एड झाले.काहीच दिवसांवर आमदारकीचे election होते.1999.शिरीष कोतवाल हे राष्ट्रवादीकडून उभे राहणार होते. त्यांच्या वडनेर भैरवला ह्यानिमित्त भेटी व्हायच्या. मराठा विद्या प्रसारक समाजाचे ते चांदवड तालुक्याचे डायरेक्टर देखील होते. त्यावेळी अरुण नाना तारकुंडे यांनी दोन तीन वेळेस त्यांची भेट घालून दिली होती.साधारणपणे एक दोन महिन्यात संस्थेत खूप जागा निघणार होत्या.झेड पी ची निवड मंडळ परीक्षा त्याच दरम्यान बंद झाली होती. तिथे किमान दोन तीन वर्षे जागा निघणार नव्हत्या.शिरीष कोतवालांच्या प्रचार सभेत एकदा नानांनी मला भाषणही करायला लावले होते.त्यावेळेस वडनेर मधून आमची किती मते आहेत ह्याचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख करायला लावला होता.त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुरेख असे भाषणही केले.

संस्थेत माझे 100 टक्के काम होणार याची मला पूर्ण खात्री होती.वडनेरचेच सेवक डायरेक्टर पाचोरकर मामा ह्यांचाही मोठा पाठिंबा होता.माझ्या मोठ्या भावाला त्यांनी शब्द दिला होता की हे काम आपण करू.

ठरल्याप्रमाणे कॉल लेटर आले,interveiw दिला.व माझ्या पहिल्याच उत्तरावर मुलाखतकार खुश झाले.कारण माझ्या file वर पहिलेच सर्टिफिकेट होते.national selection ऑफ एस यु पी डब्लू
त्यांना एस यु पी डब्लू म्हणजे काय हे माहीत नव्हते.

मी अर्थ स्पष्ट केला.supw means social useful prodactive work.

पुढे सर्व interveiw च ह्या विषयावर झाला.नवोदयमधील वाघचौरे सरांच्या मार्गदर्शनाखालील माझी ही नववीतील acheivement इथे कामाला आली.अर्थात काम होणारच होते.हे पाचोरकर मामांनी अगोदरच सांगितलेले होते त्यामुळे ही formality होती.,

पहिलीच appointment खेडगाव येथील प्रशस्त शाळेत श्री सी एस विद्यालय खेडेगाव येथे झाली जुलै 1999.

आता नोकरीला तर लागलो व ते ही एका चांगल्या संस्थेत व चांगल्या शाळेत.वयाच्या 19 व्या वर्षीच.

त्या हितचिंतकाने नंतर माझी भेट घेणे टाळले.

नोकरी तर लागली.आता एक दुसरा मित्र जो स्वतःला माझा मार्गदर्शक समजत असे व मी ही त्याला त्या अंगानेच समर्थन दिले होते. मित्राने पार्टी मागितली. वडनेर मधील तांबे च्या हॉटेल मध्ये जिलेबी व पाववडा अशी पार्टी ..आम्ही बसलो. येणारे, जाणारे कौतुक करत होते.अभिनंदन करत होते.पण ह्या आनंदावर(तांबेंच्या व इतरांच्या)त्याने काहीसे विरजण टाकले.

तो म्हटला, अरे सुभाष हे एम व्ही पी त नोकरी करणे सोपे नाही.हजार,बाराशे वर काम करावे लागते.बरेच जण 10, 10 ,15 वर्षांपासून घासू राहिले अजून permanant नाही.आता घ्या.त्याला म्हणायचे होते की तुला 10,12 वर्षे अशीच काढावी लागतील.पण माझा आनंदच इतका मोठा होता व आतला आवाजच इतका काही प्रबळ होता की त्याच्या त्या बोलण्याचा थोडाही परिणाम माझ्यावर झाला नाही.मी प्रसन्न चित्ताने त्याला सांगत होतो.हो ना खरंय बाबा,खरंय बाबा.

माझे हे बाह्य समर्थन देखील इतके आनंदाच्या कारंज्यात होते की त्याचे मला शहाणपण सुचवणारे शब्द कुठल्या कुठे विरून गेले.तो येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत होता.ते ही आतून त्यालाच बावळट म्हणत होते.आता बाजी माझ्या हातात होती.लोक त्याच्याकडे नव्हे तर माझ्याकडे कौतुकाने व धन्यतेने पाहत होती.

राहिला त्याच्या अज्ञानाचा प्रश्न..आमची सर्वांची नियुक्ती scale वर झालेली होती.हे त्याला माहित नव्हते पण तो बाता झोडीत होता.
सहा महिन्यांनी approval पण आले झेड पी चे permanant चे.मागील फरकासह पूर्ण पगारही सुरू झाला.कुठे 15 वर्षे व कुठे सहा महिने…
शैक्षणिक व प्रोफेशनच्या संदर्भातील मागील ह्या सर्व घटना जेव्हा एकत्रितपणे मी बघू लागतो तेव्हा त्यातून एकच सार मला पहावयास मिळते ते म्हणजे आपल्याला स्वतःला काय वाटते?आपला आतील आवाज काय सांगतो?
लोक तर आपला फुटबॉल बनवायला तत्परच असतात.पण आपण आतून कसे react होतो हे महत्वाचे आहे.आपला आतील आवाज हा आपल्या वाटचालीतील यशाचा मुख्य सहाय्यक असतो,इतर आवाज नव्हे किंवा इतरांचा सल्ला नव्हे.

व दुसऱ्यांचे आपल्यावरील आरोपन हे त्याच्या चुकीच्या समजूतीचे बोचके असतात निव्वळ. हे लक्षात घ्यायला हवे. आपण इतरांच्या मेंदूने जर वावरायला लागलो तर आपण आहे त्याच ठिकाणी थांबून राहू जिथे ते थांबलेले आहेत.आपण जसजसे पुढे जाऊ लागतो तसेतसे आपल्याला बोलणारे,इतरांना नको ते ज्ञान देणारे हे कुठे असतात? हे दूर कुठेतरी मागेच रखडलेले दिसतात.अर्थात वेळोवेळी त्यांनी दिलेला पूर्वग्रहदूषित सल्ला हा परिस्थितीनुरूप असतो.

अवतीभोवती चे अनुभव त्यात असतात.हे खरे आहे, म्हणून मग आपणही तसेच भरडले जाणार हा विचार आपल्याला करायची बिल्कुल जरुरी नसते.गोष्टी आहे तशाच नेहमी असत नाही.अनेक बदल होतात व हे अनुकूल बदल आपल्या हिताच्या दृष्टीने होत आहेत याची खात्री ठेवायला हवी.दुर्दम्य ईच्छाशक्ती असेल, आतला आवाज प्रबळ असेल तर नकारात्मक दृष्टीने होणारे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सर्वच बदल जे इतरांना वाटतातत ते तसे बिल्कुल नसतात.

काळानुरूप होणारे बदल ते प्रतिकूल जरी भासत असले तरी ते अनुकूल ही होऊ शकतात एवढी शक्ती आतल्या आवाजात असते.ह्यासाठी ह्या आवाजाचेच म्हणणे आपण ऐकायला हवे.असे झाले तर आपली एकूणच सर्व वाटचाल ही यशस्वीतेकडे झेपावणारी बनू लागते. आज खरे तर frustration, नूनगंड, स्वतःविषयी कमीपणाची भावना,नैराश्य ह्या गोष्टीत वाढच होत आहे.आपण स्वतःला ओळखत गेलो तर ह्या समस्या जाणवणार नाही.निसर्गतः अनुकूल बदल आपल्यासाठी आपल्या चांगल्या विचारांनीच होऊ शकतात.आपले विचार हे अधिकाधिक बहिर्मुख,इन्स्टंट reactive स्वरूपाचे असल्याने आपल्याला आतला आवाज ऐकू येत नाही.

यासाठी मनाला शांत व संतुलित ठेवण्याचे प्रशिक्षण आपण स्वतःच स्वतःच्या पातळीवर घेत राहायला हवे.संतुलित विचारसरणी आपल्याला आतल्या आवाजाकडे घेऊन जाते.भविषयाविषयी निश्चित मार्गदर्शन करते.घटनांची सुसंगती घडवून आणते.आयुष्यात चांगले बदल घडवून आणते.आपली वाटचाल सुखकारक बनवते.

लेखक:सुभाष पवार
9767045327

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel