मी नोकरीला लागण्याच्या काही महिन्यांपूर्वीचा हा प्रसंग आहे.घरची परिस्थिती नाजुक होती.काही हातभार घरासाठी लागावा, ह्यासाठी मी कोणतीही कष्टाची कामे करण्यास तयार होतो.इतरही चांगली कामे मिळू शकली असती, पण शारीरिक कष्टांच्या कामाची सवय असावी ह्या हेतूने मी मोलमजुरी,हमाली अशी कामेही करत होतो, अधूनमधून. मला त्यात कमीपणा तेव्हा कधी वाटलाच नाही.
वडनेर भैरव हायस्कूलसमोरच अशोक वक्ते यांचे खताच्या दुकानाचे मोठे गोडावून होते. तिथे खतांच्या गाड्या खाली होत.ह्या गाड्या खाली करण्यासाठी आम्ही अधूनमधून जात.तिथे मी कायम पेपर वाचायला देखील जायचो.तसा तो व्यक्ती मला इतरांपेक्षा खूप मानायचा.विशेषतः मी खताची गाडी खाली करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच आनंदी भाव उमटायचे,मी एवढा डी. एड. झालेलो आहे.चांगल्या बाता करतो, सामाजिक विषयांवर चर्चा करतो व तरीही असा व्यक्ती गाड्याही खाली करतो.याचे त्यांना कौतुक वाटायचे.
असेच एकदा गाडी खाली करत होतो.गोण्या गाडीतून पाठीवर घ्यायच्या व गोडावून मध्ये थप्पीवर थप्पी लावायच्या. अर्थात हे काम मी एकटा नव्हे तर आठ ते दहा जणांनी मिळून करावे लागायचे.
एकदा असेच गाडी खाली करून झाली.एक जुना मित्र. प्राथमिक शाळेतील classmate भेटला.त्याने विशेष असे काहीच कर्तृत्व केलेले नव्हते तसे.10 वी नापास विद्यार्थी. साधारण शेतकरी. त्याने मला पाहिले,त्याच्या मनात थोडेसे हायसे त्याला वाटत होते.त्याने तत्क्षणी प्रश्न केला.काय रे सुभाष शेवटी एवढे शिकून काहीच उपयोग झाला नाही.शेवटी हमालीच. त्याला नेहमीप्रमाणे हेच सुचवायचे होते की ह्या शिक्षणाचा,हुशारीचा काय उपयोग? नेहमीप्रमाणे मलाही त्यावर काही असे प्रत्युत्तर करता आले नाही किंवा करावेसे वाटले नाही.
हा तोच मुलगा होता जेव्हा आम्ही पाचवीला सोबत आलो तेव्हा 1 ली ते 4 थी पर्यंत शिक्षकांनी माझा जो नेहमी गौरव केला,स्टेज वर सत्कार केला,त्याला ते खुपत होते.पण वैयक्तिक त्याच्या ह्या इर्षालू वृत्तिकडे माझे ध्यानच गेले नाही,पण पाचवीला आल्यावर समजले की अरे हा माझ्याविषयी असा विचार करत होता तर.. पुढे जेव्हा डी. एड. नंतर तो आता भेटला तर त्याला माझ्याविषयी बाहेरून दया तर आतून हायसे वाटत होते.असो,
पण मी समस्थितीत होतो.मला फारसे वाईट वाटलेही नाही,कारण मला खात्री होती की हे असे काम मोजून एखाद महिनाच करावे लागणार आहे.कुठे आयुष्यभर करायचे आहे?
परिस्थिती ही सदा सर्वकाळ एकसारखी राहत नाही हे बालपणापासून मी शिकत आलेलो होतो,तेव्हा ह्या गोष्टीचा काय खाक परिणाम माझ्यावर होणार होता? बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या विपरीत प्रसंगी मी जेव्हा काहींच्या कुचेष्टाचा विषय झालो असेल तेव्हा तेव्हा मला माहित असायचे ही परिस्थिती कायम राहणार नाही.परिस्थिती बदलत असते,ती शाश्वत नाही तर अशाश्वत असते,ती सतत बदलत असते.हा निसर्गाचा नियम आहे.
चांगल्या लोकांच्या आयुष्यात चांगले बदल होण्यासाठी निसर्ग कायम आसुसलेलाच असतो. झोपड्यांचे महाल बनतात तर बंगल्याची झोपडी होते.काळ हा कठोर लोकांसाठी अत्यंत कठोर पावले उचलत असतो तर साध्या भोळ्या सोज्वळ लोकांसाठी अत्यंत अनुकूल पावले उचलत असतो,निसर्गाचे हे रहस्य आपण लक्षात घ्यायला हवे.
लोक खूप जवळचा विचार करतात. आता संपलं, आता कशाचं काय असे अनेकांना वाटत असते.परिस्थिती जी आता समोर दिसते आहे,तशीच कायमस्वरूपी राहत नाही. हा सर्वसाधारण नियम अनेकांच्या गावी नसतो.ते जसे समोर दिसते तसेच पाहतात. भगवान श्री कृष्णांनी गीतेत सांगून ठेवले आहे,’जो हुआ वह अच्छा हुआ। जो हो रहा है वह अच्छा हो रहा है। जो होगा वह भी अच्छा ही होगा।’
हे तत्व जीवनात अंतर्बाह्यरित्या रुजवायला हवे,जेणेकरून जीवनातील वाटचाल ही अनुकूल वा प्रतिकूल अशा कोणत्याही स्थितीत सुखकारक झाल्याशिवाय राहणार नाही.
लेखक:सुभाष पवार
9767045327