गावाकडच्या जगण्याची दुसरी एक मजा म्हणजे ब्रेक मध्ये लगबग सिगारेट ओढल्याप्रमाणे इथे कुणीही जगत नाही. इथे जगण्याची कला हि हुक्का बार मध्ये हळुवार गुडगुडी ओढत जगणे. मग वारंवार कोळसा हलवत धुराचे ढग निर्माण कारण आस्वाद घेत जगणे. इथे बांगडा फक्त ताटांत पाहून खाऊन ढेकर द्यायचा नसतो. तर त्याची प्रोसेस बाजारांत बांगडा आणि तो विकणारी मासेवाली ह्यावरून सुरुवात होते. मग पोट दाबून (माश्याचे, मासेवालीचे नव्हे) बांगडा फ्रेश आहे का नाही हे पाहणे. मोठा असेल तर बांगडा, छोटा असेल तर बांगडुली, जास्तच मोठा असेल तर बांगडाच पण इथे नाक थोडे मुरडयाचे असते. मग बाजारांत जाऊन फक्त बांगडा आणला म्हणून होते नाही, आधी तो विकत घेत्तल्यानंतर (दोन तारले घाल मगे) म्हणून बांडगेवालीकडून काही छोटे मासे फुकट मिळवायचे असतात. मग शेजार्यांना आज आम्हाला १०० रुपयांत ४ बांगडे भेटले हो म्हणून सांगायचे आणि पूर्वीसारखे बांगडे मिळत नाहीत हो म्हणून खंत व्यक्त करायची.
मग काय तो बांगडा तळायचा, तणात भाजायचा, केळीच्या पानात बेक करायचा कि भरलेला (लाल किंवा हिरवा) करायचा ह्यावर चर्चा. मग ते बांगडे वडील तोंडात घालताना मातोश्री असा चेहरा करून पाहायची जसे श्रीराम हनुमान लक्षिमनाच्या तोंडांत संजीवनी घालताना पाहत असावेत. मग समेवर येताना तबलजी आणि तंबोरा वाले जसा चेहरा करतात तसा वडिलांचा चेहरा झाला कि मातोश्री तृप्त. एकदा मातोश्रींच्या हातून मोरी ची शाकुती अशी जबरदस्त झाली कि घरांतील सर्वानी इतकी स्तुती करून खाल्ली कि आजसुद्धा मला आठवण येते. त्यानंतर शेकडो वेळा मोरी आणून पुन्हा तीच चव निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल पण घरातील सर्व माणसे वारली तरी पुन्हा तशी शाकुती जमली नाही.
संध्याकाळी पुरुष मंडळींचे एक काम असायचे. दुधाला जाणे. ह्याचा अर्थ रिकामी बाटली घेऊन दूध विकणाऱ्या परिवाराकडे जाऊन गप्पा वगैरे मारून आरामांत संध्याकाळी परत यायचे. एका निमित्ताने आम्हा लहान मुलांना मजा. दूध विक्रीचा धंदा बहुतेक वेळा गांवातील काही मंडळींकडेच असायचा. आमच्या काही गायी असल्या तरी आम्हला दूध खूप लागायचे त्यामुळे संध्याकाळी आम्ही दुधाला जायचो. २० रुपयांचे दूध आणायला २ तास खर्च.
बाजारांत गेलो तरी संथपणा हा सर्वत्र वास करून असायचा. कुठल्याही दुकानात जाऊन कोणीही सामान घेऊन येत नसे. काही तरी काव्य शास्त्र विनोद किंवा चहाड्या केल्याशिवाय दुकानदार जणू सामान देणाराच नाही असा नियम असायचा. आणि बोलणी तरी कसली. "आमचे ५०० नारळ पडून होते, मंगलदास मागत होता अडीच रुपयांना मी साफ नाही म्हटले. सुकवून खोबरे करिन पण अडीच ला विकणार नाही.", वेणकु गाडेवाला मग हळुवार डोके हलवून "बरोबर आहे. सदानंद मास्तरांनी कालच सव्वातीन ला नारळ दिला.", "कोणाला दिला ठाऊक आहे का हो ? " असे विचारतांत मात्र तो नकारार्थी मान हलवायचा. मग नारळवाले मंडळी १ तास चालत सदानंद मास्तरांच्या घरी जाऊन चौकशी करून यायची. मग कुना हॉटेलवाल्याला दिले असे लक्षांत येतात बस धरून तालुक्याच्या गावी जाऊन त्या हॉटेलवाल्याला विचारायची. मग तो सुद्धा "आता तीन रुपयांना परवडते" असे सांगायचा. मग पुन्हा घरी येऊन ५०० नारळ सोलून कुणाची तरी रिक्षा मिळवून ते हॉटेलांत विकायचे आणि वर हा सर्व द्राविडी प्राणायाम करून मी २५० रुपयांचा फायदा कसा केला हे चार लोकांना बाजारभार फिरत सांगायचे हा एके काळचा गावचा प्रमुख धंदा होता असे वाटते.
अनेक वर्षांनी गावांत गेले तेंव्हा बाजारांत गाडी पार्क करत होते. वेणकु बराच वृद्ध होऊन त्याचा १३-१४ वर्षांचा मुलगा दुकानात धावपळ करत होता. हिरव्या डियो वरून एक कुल वाटणारा पोरटा आला आणि "लो फेट योगर्ट" आहे का म्हणून विचारणा करून विकत घेऊन गेला. मला काही क्षण गरगरले. मी दुकानात जाऊन "सॅनिटरी पॅड" पाहिजे असे वेणकु ला म्हटले अन त्याने सुद्धा "आहे ना" म्हणून तो आंत गेला कागदांत बांधून घेऊन आला. प्लास्टिक कमी आणि अश्या गोष्टी थोड्या गुप्तच ठेवण्याची लोकांची मानसिकता मला अपेक्षित होती पण. गाडेवाला वेणकु सॅनिटरी पॅड हे काय आहे हे जाणतो ह्यावरून मला आनंद झाला. मी पैसे बाहेर काढणार इतक्यांत त्यांचा मुलगा थोडा धावपळत आला. "अहो ताई थांबा" थोडासा ओशाळून त्याने वडिलांकडून कागदाची पुडी ओढून घेतली आणि त्यातील माल काढून पुन्हा शेल्फवर ठेवला. सॅनिटरी पॅड म्हणून वेणकु मला स्क्रोच पॅड (भांडी धुण्याची हिरवी लादी) देत होता. पण पोराने खूप चांगल्या पद्धतीने विचारणा करून योग्य ती गोष्ट दिली आणि वरून चार वेळा सॉरी म्हणाला.
--
एक गाव बारा भानगडी म्हटले जाते पण भानगडी शिवाय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गांवातील भुते. प्रत्येक गावांत भुते हि असतातच. आणि त्यांची रिअल इस्टेट म्हणजे वापरात नसलेली विहीर, चिंच, वडाचे झाड वगैरे. आपल्यापैकी बहुतेक लोकांना अश्या गोष्टींचा अनुभव असेलच. प्रत्येक भुताच्या मागे एक कथा. गावांत काहीतरी गोष्ट घडते आणि त्याचा इतिहास म्हणून उल्लेख केला जातो, लोक त्याला मिर्च मसाला लावून सांगतात आणि इतिहासाची बनते कथा. हि कथा मग पिढ्यान पिढ्या चालू राहते.
हि कथा फारच जुनी आहे आणि आजी सांगत असे. ह्यातील काही पात्रे मला माहिती आहेत. आमच्या गांवातील एक व्यक्ती ब्रम्हदेशाला व्यापारा निमित्त गेली आणि तेथून एका बर्मीज मुलीशी लग्न करून गावांत आली. काळाच्या ओघांत गंगा वाहिनी गावांतीलच एक झाल्या अगदी हळदी कुंकू सुद्धा करू लागल्या आणि अस्सलखीत मराठी कोकणी बोलू वाचू लागल्या. दिवस गेले आणि गंगावाहिनी वयस्क झाल्या. पीतवर्णीय रंग आणि कद फारच छोटे. त्याशिवाय चेहेरा चिनी व्यक्तीप्रमाणे म्हणजे एकूण त्या विचित्र दिसत (नवख्या लोकांना). मी ह्यांना पहिले तेंव्हा त्या अगदीच म्हाताऱ्या झाल्या होत्या.
दुसरी व्यक्ती म्हणजे आमचा गुराखी शानू. हा बुद्धीने तल्लख आणि चांगला शिकलेला होता. स्वभावांत प्रचंड आळस त्यामुळे गुराख्याचे सर्वसाधारण काम पत्करले. आमच्या जागेंत राहायचे, जेवायचे आणि पैश्यातून स्वस्त आणि मस्त पुस्तके आणून वाचायची आणि शब्दकोडी वगैरे सोडवायची ह्याचा भयंकर नाद. दुसरा नाद म्हणजे लहान मुलांना वगैरे घाबरवून टाकणाऱ्या कथा. (हिंदी मासिकांतील कथा घेऊन तो त्याला आपल्या गावाची फोडणी देऊन सांगायचा).
आमच्या शेजारच्या काकांचे नातलग मुंबईत होते. त्यांचे दोन जुळे मुलगे उन्हाळ्यांत गावांत येत. हे दोघेही मग त्याकाळची फॅशन करून काळा चष्मा वगैरे लावून गांवभर उनाडक्या करत फिरत. पण संपूर्ण बालपण मुंबईत गेल्याने गावांत येऊन हे अगदीच भित्रे व्हायचे. बाजारांत जाऊन मुबंईत सर्व काही छान आहे ह्याच्या बढाया दिवस भर मारायचे (म्हणे). ह्यातील एक व्यक्ती बरीच मोठी होऊन लग्न होऊन लहान पोराला घेऊन आमच्या घरी आली होते. बाहेर वऱ्हांड्यात बसून शानू त्याच्या बायकोला गांवच्या कथा सांगत होता. मी छोटी तिथेच बसून ऐकत होते. तो आता माकड कसे त्रास देतात, वाळत घातलेले कपडे कसे चोरून नेतात हे सांगत होता. आपली चड्डी घालून माकड हनुमानाच्या मंदिराच्या जवळ दिसले होते असे कोणी तर सांगितले म्हणून मग मी बंदूक घेऊन रागाने गेलो, पाहतो तर काय ? अहो माकड नव्हता. हिरबू गवळ्याचा पोर होता त्याने चोरली होती. दिसायला माकडच आहे तो. वगैरे वगैरे.
मग ती सुनबाई सुद्धा. तुम्हाला भीती नाही वाटत अश्या मुलांना बाहेर ठेवायला ? माकडाने येऊन चावा वगैरे घेतला तर ? ती मला बघून विचारत होती.
"अहो सुनबाई. चावा घेतला तर काय ५ इंजेक्शन घेऊन मामला संपला. पण मी २ वर्षांचा होतो बघा, अंगावर एक कापड नव्हते. बांधावर बसलो होतो. आणि इथे ना मोट्ठी केळ्यांची बाग. माकडांनी हल्ला केला. दादासाहेबांनी तात्काळ बंदूक आणून जोरदार बार काढला. केली चोरणारे माकड गांगरले आणि आपल्या पोरांना पकडून पोबारा कि नाही. पण एक माकडिणीचे मूळ काही सापडेना ती घाबरली. तिला बांधावर मी दिसलो. मग काय ? माझा रंगही काळाच, तिने मलाच उचलले. मी रडून आकांत केला. ती घेऊन वर झाडावर चढली. दादासाहेबांनी पाहिलं, लोकांना बोलावले. मग माकडिणीलाच आपली चूक समजली, तिने मला जमिनीवर सोडून मग ती पळून गेली."
आपल्या सुनबाई आ वासून थक्क होऊन आपल्या पोराला घट्ट कवटाळून ऐकत होत्या. अर्थांत हि सर्व अतिशयोक्ती होती असे आता जरी वाटले तर त्याकाळी शानू च्या कथाशैलीवरून सर्व काही खरेच वाटायचे.
तर आता येते जुळ्या पोरांच्या कथेंत. दोघेही दिवसभर उनाडक्या करत असले तरी रात्र होताच मात्र ह्यांची पाचवर धारण बसायची. त्याकाळी संडास घराच्या बाहेर असायचा आणि बहुतेक धडधाकट मंडळी उघड्यावरच आपली क्रिया उरकायची. बंद संडास बहुतेक महिलाच आणि त्याही सधन घरांतील वापरायच्या. हे दोन्ही तरुण चार वाजतांच संडास करून रात्री कमी जेवून आणि पाणी न पिता झोपायचे (म्हणे). इतके घाबरट.
उन्हाळ्यांत एक जत्रा व्हायची. रात्रभर इथे काही ना काही प्रोग्रॅम. मुलांसाठीच पर्वणीच. (हि जत्रा हा वेगळा लिहिण्याचा विषय आहे त्यावर लिहीन). पण तयारी ३-४ दिवस. सर्व महिला आणि पुरुष मंडळी किमान काही तास देवालयांत जाऊन श्रमदान करायची. हि दोन्ही पोरे आधी गेली पण चांगलेच शारीरिक कष्टाचे काम पडतेय म्हटल्यावर गुपचूप घरी आली. रात्री जत्रेला जायचे होतेच. मग प्रचंड हिम्मत करून ह्यांनी टॉर्च घेऊन (अल्युमिनियम चा असायचा. प्रचंड महाग. बहुतेक लोक मेणबत्ती किंवा माडाच्या पानाची मशाल करून फिरायचे.) देवालयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली.
ज्यांना शेतीचा अनुभव आहे अश्या व्यक्तीना ठाऊक असेल कि प्रत्येक शेतकऱ्याची बाग हि वेगळी असते. काही लोक नारळ पोफळी बरोबर मिरी, अननस, केळी सुद्धा पिकवतात तर काही लोकांना आपली बाग स्वच्छ पाहिजे असते त्यामुळे ते लोक आणखीन काहीही पेरत नाहीत. काही लोक छोटी झाडे मारत नाहीत तर काही लोक सर्व छोटी झुडुपे मारून बाग अगदी मिलिटरी कॅम्प प्रमाणे स्वच्छ ठेवतात. मग ह्यावरून बागेंत काय पक्षी येतील, काय कीटक असतील हे निर्धारित होते. वाटेवर होती कोसतानीची नारळांची बाग. कोस्तान हा एके काळचा साधन हिंदू ब्राह्मण, मोठे चौकीचे घर, ह्याचे कुटुंब कसे ख्रिस्ती झाले असावे कुणास ठाऊक पण एके काली जिथे सोवळ्याने जेवणे होते तिथे आता ऑम्लेट पाव खाल्ला जात होता हे नक्की. कोस्तान आपल्या बागेला अगदी म्हणजे अगदी स्वच्छ ठेवायचा. त्यामुळेच कि काय ह्याच्या बागेंत कीटकांचा आवाज अजिबात नसायचा. किंवा इतर काही कारण असेल. अनेक वर्षानंतर कोस्तान मरून जाऊन त्याच्या जमिनीचे ५ तुकडे झाले जरी असले तरी त्याच्या बागेंत एक निरव शांतता असायची हे मी सुद्धा अनुभवले आहे आणि घाबरून गेले होते. पण आम्हाला हि माहिती होती. नवीन कोणी माणूस असायचा तर त्याला समाजायचे सुद्धा नाही कि ह्या बागेंत इतके विचित्र का वाटत आहे.
तर दोन्ही जुळे भाऊ घाबरत घाबरत ओहोळाच्या बाजूने चालत चालत कोस्टानीच्या बागेंत पोचले. आणि इतर सर्वांप्रमाणेच त्यांच्या मनावर सुद्धा त्या शांततेचा गंभीर परिणाम झाला. त्यांत ओहोळाची एक भयानक कथा शानूने ह्यांच्या डोक्यांत घातली होती. ओहोळांत एक तोंड नसलेली भयानक हडळ राहते. हि तरुण बाई फक्त पाठमोरी दर्शन देते अन पुरुषांना ती मोहित करून ओहोळांत ओढून नेते अशी कथा होती.
दोन्ही तरुण कदाचित हनुमान मंत्र म्हणत कोस्टानीच्या बागेतून मार्गक्रमण करत होते इतक्यांत त्यांना दूरवर एक बाई चालत जाताना दिसली. आता सोबत आहे म्हटल्यावर ह्यांना प्रचंड हायसे वाटून ह्यांनी चालण्याचा वेग वाढवला, पण पाहतो तर कर त्या बाईने सुद्धा वेग वाढविला. ह्यांनी आणखीन वेग वाढविला. मग बाई सुद्धा तितक्याच वेगाने पुढे. ह्यांनी मग चक्क पाळायला सुरुवात केली तर बाई सुद्धा आणखीन दूर. दोघेही घाबरून थांबले तर. बाई सुद्धा स्तब्ध. इतक्यांत त्यांना हडळीची कथा आठवली. हि नक्कीच हडळ असावी आणि त्यांना ओढून नेत असावी हे ऐकू नेते आणखीन घाबरले. थोडे जवळ जाऊन हिच्या तोंडावर उजेड मारावा तर हिच्या डोक्यावर दोन भली मोठी शिंगे आणि भयानक तोंड.
सुदैव म्हणजे शानूने ह्यांना हडळीला ठरविण्याचा उपाय सुद्धा सांगितला होता. आता ह्यांच्याकडे तो जालीम उपाय करण्यापलीकडे काहीही पर्याय नव्हता. आणि तो उपाय शानू महाराजांनी सांगितला होता, हडळीला ठरविण्याचा एकमात्र उपाय म्हणजे सर्व कपडे काढून, पूर्णपणे निर्वस्त्र होणे. तेंव्हाच पुरुष तिच्या मोहातून सुटतो आणि त्यानंतर मागे ना पाहता घरी जाणे. ह्या दोघांनी तात्काळ आपली बेलबॉटम पॅन्ट आणि अक्षरशः सर्व कपडे उतरवले आणि बोंब मारत दोघेहि भाऊ ताडडकरून घरी. ह्यांना त्या दिगंबर अवस्थेंत सुदैवाने कोणीही पहिले नाही. वाटेत कुणी तरी कपडे वाळत घातले होते ते ह्यांनी उचलले.
इकडे गंगुबाई देवालयांत पोहचून गोंधळ घालत होत्या. अहो दोन लोकांनी हल्ला करायचा प्रयत्न केला माझ्यावर कोस्टानीच्या बागेंत.दोन भुरटे मागून पळत येत होते. मी जाम घाबरले, पण भिणारी नव्हते, तिथे माडाची एक झावळी होती ज्याला पिड्डे म्हणतात ती उचलून दोघांनाही मारणार होते पण निर्लज्ज मेले दोघेही आपले कपडे काढू लागले.किमान ५० मीटर तरी अंतर होते आमच्यांत म्हणून मी ओरडत पळत आले. आता गावांत असला भयानक प्रकार कधीच घडला नव्हता त्यामुळे अनेक मंडळींनी पेट्रोलमास चे दिवे आणि बंदुका वगैरे घेऊन त्या बागेंत कूच केले. वाटेत पहिले तर चामड्याचे भूत, हिरोवले शर्ट पेन्ट आणि (त्या अंधारात खिश्यांत कला चष्मा) आणि भोक पडलेली अंतर्वस्त्रे पाहून हे मुंबईचे पाहुणे होते हे समजले. आधी लोकांना प्रचंड संताप आला, ह्याच्या घरी गेले तर भीतीने दोघांची बोबडी वळलेली. त्यांची आजी दृष्ट काढत होती.
मग घडलेला प्रकार सर्वांना समाजाला. केले. मग अनेक वर्षे दोघेही भाऊ गावाकडे फिरकले नाहीत. (नक्की काय घडले होते हे हे त्यांनाही कुणी सांगितले नाही)