गांव आणि शहराचा मुख्य फरक म्हणजे गांवात सर्वच लोक एकमेकांवर अवलंबून राहतात. पापड करायचे म्हटल्यावर ४-५ बायका घरी आपले स्वतःचे लाटफळे घेऊन घरी हजर. मग आमहा मुलांची जबाबदारी पापड सुखावयाची आणि फी म्हणून काही "गुळ्या' मटकावयाची. कोहोळ्याच्या वड्या माझ्या मते कोंकण प्रांताचे विशेष व्यंजन म्हणून प्रसिद्ध असायला पाहिजे होते. ते करणे हि मोठी जबाबदारी. एक टेफळ चे झाड पाडायचे (शेंझूवां पेपर) मग एका पैलवानाला आणून त्या झाडाच्या बुंध्यावर अक्खा कोहोळा घासून त्याचा किस पाडायचा आणि त्यातून त्या वोडया बनवायच्या. ह्या खाल्यास आता किमान १० वर्षें तरी झाली असतील. हे असले प्रकार करायचे तर मनुष्यबळ पाहिजे. पैसे देऊन लोक आणलेले चालत नाही. त्याला आपुलकीने जबाबदारी घेऊन फुकट काम करणारी माणसेच पाहिजेत.
अश्या गरजेच्या वेळी माणसे पाहिजेत तर त्यांच्याशी चांगला संबंध असला पाहिजे. त्यांना प्रेमाने वागवले तर पाहिजेच पण त्याशिवाय त्यांच्या नजरेत आपली किंमत जास्त आहे ह्याचा सुद्धा पुरेपूर खायला ठेवला पाहिजे. खोटारडे पणा, फसवणूक असल्या गोष्टींना गांवांत थारा नसतो. लोक ओळखतात. शहरांत गोष्ट वेगळी.
पण प्रत्येक गांवांत एक एक बिलंदर, खोटारडा भामटा असतोच. इथे मी चोरांची गोष्ट बोलत नाही. चोर वेगळे आणि भामटे वेगळे. भामट्याकडे स्किल असते, तो तुमच्या घरी येऊन आर्जवे करून पैसे उधार मागून नेतो आणि परत देण्याचे नाव घेत नाही. ४ वेळा फसवून सुद्धा हि व्यक्ती तुम्हाला ५ व्या वेळी सुद्धा गंडवते. तुमच्या परिवाराचे विकनेस ह्याला ठाऊक. वाहिनी देणार नाहीत हे ठाऊक असल्याने तो काकांना एकटा गाठतो. तुम्ही आजच सकाळी नारळ विकून पैसे घरी आणले आहेत हे ह्याला आधीच ठाऊक असते. असा हा भामटा गांवात टिकून कसा असतो ? तर कुठे अपघात झाला तर पहिला पोहोचणार माणूस हा. कुणी वारले तर लाकूड रचणारा माणूस हा आणि कुणाला रक्त पाहिजे म्हटल्यास पोचणार तो हा म्हणून गांव ह्याची भामटेगिरी सहन करत असतो.
काशिनाथ हा आमच्या गावांतील भामटा. काशिनाथ घरजावई म्हणून नायकांच्या घरी आला. नायकांची मुलगी गोदा "मी नाही त्यातली काडी लावा आतली" ह्या प्रकारची होती आणि कुणीही तिच्याशी लग्न केले नसते हे गावाला ठाऊक होते. तिचा भाऊ विनायक हा पूर्णपणे नालायक होता. म्हणजे गोविंदाच्या चित्रपटांत शक्तीकपूर जसा साला म्हणून असायचा त्या प्रकारचा. नायकानी म्हणूनच कुठून तरी काशिनाथला गांवांत आणून लग्न करून दिले. काशिनाथने आल्या आल्या सर्व घराची सूत्रे हाती घेऊन विनायकाला त्याच्याच घरांत नोकरा प्रमाणे ठेवले. एक गोष्टीची मात्र दाद द्यावीच लागेल. थोरले नायक आणि त्यांची बायको ह्यांना काशिनाथ देवा प्रमाणे मानत असे. एका रात्री आपल्या सासूला बरे नाही म्हटल्यावर ह्याने तिला अक्षरशः उचलून २ किलोमीटर चालून डॉक्टरांच्या घरी नेले. काशिनाथ ला मी लहान असताना पहिले तेंव्हा तो साधारण ५५ वर्षांचा असावा.
काशिनाथा ला सिगारेट चे व्यसन. पण जो पर्यंत पैसा हातांत आहे तो पर्यंतच. त्यानंतर विडी आणि विडी संपल्यास मग हाच माणूस अंगणात पडलेली सिगारेटींची थोटके उचलून त्यांत काही आहे का बघायचा. जेंव्हा ह्याच्या हाती पैसा तेव्हा कुणीही ह्याला ओळख द्यावी आणि हा त्याला हॉटेलांत घेऊन चांगली भाजी वगैरे खावऊन चारमिनार सिगारेट वगैरे देत असे. आणि खिशांत पैसे नसले तर मग उधार करून चहा मागत फिरत असे.
काशिनाथ ची गोदा राम बनाये जोडी होती. डांबिस माणसाची महाडांबीस बायको. हि इंग्रजीत सांगायचे तर nymphomaniac होती. सविताभाभी सारखे पात्र हिच्यासारख्याना पाहूनच सुचले असावे. काशीराम भाऊंनी २ मुले झाल्यानंतर सरकारी इस्पितळांत जाऊन नसबंदी करून घेतली तरी ह्यांच्या घरी पाळणा हलण्याचे बंद झाले नाही. एकूण ५ मुलांचा भार ह्यांना उचलावाच लागला. ह्यांचा एके सत्य विनोद आहे. काशिनाथ कधी कधी कुणाकडून सोन्याचा हार वगैरे अशी मौल्यवान भेटवस्तू भाड्याने आणायचा, रात्री बायकोला देऊन तिला खुश करून आपण खुश व्हायचा आणि तिला झोप लागली कि ती भेटवस्तू घेऊन पोबारा. मग सकाळी ह्यांचे महाप्रचंड भांडण. असल्या शिव्या मी सर्वप्रथम एका ब्राम्हण स्त्रीच्या तोंडून ऐकल्या असतील. काशिनाथ नारळावर सत्ता चालवत असे तरी गोदा ची सत्त्ता काजूवर. विनायक बिचारा मिरी, केळी हि नेवून आपली गुजराण करायचा. काजूची बागायत हि नेहमी जंगलांत असते. इथे बहुतेक करून दुसरी पिके घेतली जाऊ शकत नाहीत म्हणजे वर्षातून १-२ महिनेच इथे लोकांचा वावर असतो. बाकी वर्षभर "काजूत जाणे" ह्याचा अर्थ आमच्या गावांत "उसाच्या मळ्यामंदी" प्रकार होता. सूज्ञांस सांगणे न लगे. "गोदाबाईना, आज अमुक ठिकाणी "पकडण्यात" आले" अशी कुजबुज मला कुठे कुठे ऐकू यायचीच.
गोदाबाईला गांवातील सभ्य पुरुष एकदम टरकून असायचे. कुणी दुचाकीवरून दिसला तरी ह्या बिनधास्त लिफ्ट मागायच्या. मग मागील सीटवर ह्यांना पहिले कि आपली बदनामी होईल ह्या भीतीने पुरुष मंडळी मग वेगळ्याच वाटेने जात. तरी सुद्धा, काही लोकांच्या वाहनात ह्या हमखास दिसायच्या. शिर्डीला ह्यांची वारी वर्षाला असायचीच पण बहुतेक ती जीवाची मुंबई करण्यासाठीच जात असावी. हळदीकुंकूला कुणी तरी ह्या बाईला काही सेफ्टी पिन वाटल्या पाहिजेत हीचा पदर नेहमी ढळत असतो असे आमच्या मातोश्री महिन्याच्या.
काशिनाथ आणि गोदाबाई ह्यांचे ओपन मॅरेज असावे. कारण काशिनाथ अगदी त्याच प्रकारचे होते. शेतांत काम करणाऱ्या तारण्याताठ्या पोरिंजवळ ह्यांचे घुटमळने असायचेच. त्यांची थट्टा करणे, कुणाला भेटवस्तू देणे हे चालूच असायचे. पण कधीच कुणावर जबरदस्ती नाही केली. कुठे आपला बाण लागेल आणि कुठे लागणार नाही हे त्यांना व्यवस्थित माहित होते. त्यांच्या दिल दर्या बाकी सब समंदर प्रकारचा फायदा घेणाऱ्या महिलाही होत्याच, नाही असे नाही. काशिनाथांचे मित्र सुद्धा तसलेच. केनेडी नावाचा त्यांचा एक मित्र होता जो मला फक्त ऐकून ठाऊक. केनेडी चे नाव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष केनेडी वरून ठेवले होते. खरे त्याचे नाव कधीतरी हिंदू होते. ह्याने काशिनाथला पार्टनर घेऊन काशिनाथच्या नावाने लोन घेऊन मुबईला जाणारी प्रायव्हेट बस घेतली होती. काशिनाथने केनेडीबरोबर धंदा करावा म्हणजे भूत का गवाह प्रेतात्मा, असे आमचे तीर्थरूप म्हणायचे. केनेडी ह्या माणसाला आमच्या घराच्या अंगणात सुद्धा प्रवेश करायला दिला नसता त्यामुळे मी त्याला कधीच पहिले नाही. पण ह्या बस च्या धंद्याच्या नादांत हि मंडळी कुठे कुठे जाऊन "बसायची". माझ्या वडिलांनी मला तिथे काय होते ह्याचा अंदाज दिला होता पण माझ्या तीर्थरुपांना स्वतः त्या क्षेत्रांतील काहीच अनुभव नसल्याने त्यांच्या त्या फक्त अटकळी होत्या असे मला वाटत आले. पण काशिनाथ साहेबांच्या बऱ्याच "ठेवलेल्या" किंवा "ठराविक" होत्या अशी वंदता गावांत होतीच.
ज्या वेळी काशिनाथ ह्यांच्या खिश्यांत पैसे खुळखुळायचे तेंव्हा हि व्यक्ती निळीने धुतलेला (रॉबिन छाप नीळ) पांढरा शुभ्र शर्ट, लेदर बेल्ट, रेमंडची शिवलेली पेंट आणि पोलिश केलेले काळे शूज छुज घालून फिरायची. हे दारांतून चालून गेले कि ह्यांच्या अत्तराचा वास आमच्या व्हरांडावर यायचा. दाढी हे नेहमी घरीच करत. मग इतका छान पोशाख करून हे जात कुठे असत ? तर ह्यांच्या हातांत एक लेदर ची फाईल होती. ती घेऊन हे नेहमी कोर्टाच्या आवारांत दिसत. नक्की कुठले खटले हे चालवायचे ठाऊक नाही पण लोक विनोदाने म्हणायचे कि कोर्ट हे ह्यांचे दुसरे घरच आहे. मला त्या विषयांतील काहीही ज्ञान नसल्याने विशेष माहिती नाही पण हजार खटले हे चालवायचे. असल्या वायफळ कोर्टकचेर्यांना आम्ही कोंकणीत "डेमाद" म्हणत असू. सर्व खटले आपल्याच फायद्यासाठी असे नाही. इतरांचे खटले सुद्धा हे बेगानी शादी मे अब्दुला दिवाना ह्या पद्धतीने चालवयायचे. घटस्फोट हि ह्यांची पेशालिटी. कुना अबलेला पतीने घराबाहेर हाकलले तर हे हजार होऊन तिला न्याय मिळवण्याची धडपड करत. आश्चर्याची गोष्टी अशी होती कि ह्यांचे स्वतःचे चारित्र्य डागाळलेले असले आणि ह्यांचे डोळे इथे तिथे फिरत असले तरी विधवा किंवा परित्यक्ता स्त्रियांना न्याय मिळवून देण्यात ह्यांचा तासाला अँगल कधीच नसत असे. गांवाला सुद्धा हे ठाऊक होते कि त्यांची हि निव्वळ पोटतिडक आहे. ह्या प्रकारचे मला नेहमीच विलक्षण आश्चर्य वाटत आले आहे.
गांवात काहीही जमिनीची देवाण घेवाण होत असली तर ह्यांची कायदेशीर नोटीस आधी जायची. हि जागा आपली आहे. आपल्या वडिलांनी मरताना मला देतो म्हणून सांगितले होते किंवा मूळ मालकाचा मी दूरचा होऊ आहे वगैरे ह्यांचे ऑब्जेक्शन असायचेच. आणि मग काही हजार रुपये ह्यांना तीर्थ म्हणून पाजले कि मग हि नोटीस ते मागे घ्यायचे.
गांवांत ऑर्केष्ट्रा, सुगम संगीत वगैरे असले तरी तरुण गायिकेला "बक्षिशी" ह्यांच्याकडून हमखास. गांवातील प्रत्येक बँकेत लोन आणि हजार लोकांना ह्यांनी जामीन (नक्की मराठी शब्द वेगळा असेल कदाचित) म्हणून ठेवले असायाचे. मग ह्यांनी हप्ते बुडवले कि बँकांची पत्रे ह्या लोकांना जायची. माझ्या वडिलांना किमान दोन तरी पत्रे यायची. माझे वडील ह्यांना "काशिनाथ ची लव्ह लेटर" म्हणायचे. "काशिनाथ, तुमची प्रेमपत्रे येत आहे बरे, लोन कधी भरणार ?" असा प्रश्न भर बाजारांत केल्यावर आणखीन कुणाला लाज येईल पण काशिनाथ ना नाही. "अहो उगीच लिहितात हो हि मंडळी, ह्यांना कागद आणि पोस्टाचे स्टॅम्प स्वस्थ झाले आहेत. त्या सदानंदभाऊंना ४ वर्षे झाली पत्रे येत आहेत, बँकांनी कुठे काय. केले? " असे ह्यांचे उत्तर.
राष्ट्रीय बँकांत ह्यांना उभे सुद्धा करून घेत नसत. ह्यांनी बायकोचे दागिने जॉईंट अकाऊंट वर बँक ऑफ महाराष्ट्राच्या लोकर मध्ये ठेवले. बायकोची समजूत हि कि दोघेजि आल्याशिवाय लॉकर उघडता येणार नाही. ह्यांनी कधीतरी जाऊन लॉकर उघडून माल लंपास केला. मग एक दिवस बायकोला पैश्यांची गरज तर हिला वाटले मॅनेजर वर काही विभ्रम फेकून लॉकर नवर्याच्या अनुपस्थितीत ओपन करावा. तेंव्हा बँक मॅनेजर ने सांगितले कि कोणी एक व्यक्ती आली तरी पुरे. मग हिला आनंद झाला, वाटले आता सर्व सोने गुपचूप विकू, लोकर उघडले तर आतील माल कधीच गायब. मग म्हणे बँकेत गॉडझिला यावा तसा प्रकार घडला. गोदाबाईनी मॅनेजरला अक्षरशः चपलांनी मारले.
मी सांगितले तर अतिशयोक्ती वाटेल पण गोदाबाईनी घरी येऊन नवऱ्याला खांबाला बांधले दोरीने आणि छडी घेऊन यथेच्छ धुतले. हो आणि हा प्रकार काशिनाथांच्या आयुष्यानं ३-४ वेळा घडला. काशिनाथ स्वतः हाडकुटे होते तर गोदाबाई गोदावरी नदीप्रमाणेच विस्तीर्ण. त्यांना काही चान्सच नव्हता. विनायकाने बिचार्याने वाचवण्याचा प्रयत्न केला पण मग नंतर त्यानेही कदाचित मजा घेतली असावी.
पैश्यांची गरज पडली कि काशिनाथ सर्वप्रथम आमच्या घरी हजर होत असावेत. नायकानी आमच्या घराकडे खूपच चांगले संबंध ठेवले होते, ते भांडवल काशिनाथ चांगले व्याज लावून उकळत होता. आमच्या वऱ्हांडावरून काशिनाथ येताना दिसला कि वडील मग घाई घाईने शर्ट घालून मागील दारांतून कामानिमित्त गायब व्हायचे. माझी आई तर "आमचे हे, आमच्याकडे एक पैसा सुद्धा ठेवत नाहीत" असे म्हणून पेडगावला जायची. आजी मात्र चांगलीच खडूस होती. "काय रे काश्या, परवाच नारळ विकले ना ? कुठे गेले पैसे ? आता ह्या वेळेस मी पैसे देणार नाही" असा डायलॉग मनात ठेवून ती बिचारी बाहेर यायची. पण काश्या वस्ताद. "काय आई ? कशी आहेस ? गुडघे काय म्हणतात ? मी पर्वा बेळगांवला गेलो होतो तिथे मत्तिकोपकर म्हणून एक वैद्य आहेत, त्यांना मी म्हटले आहे आमची एक शेजारी तिला गुढग्यांचा त्रास आहे, आणि माझ्या सासूबाईला सुद्धा आहे. तर त्यांनी हे मोठे औषध दिले आहे. ते तुम्हाला द्यायला आलो होतो आणखी काही नाही" असे म्हणून तेच खिश्यांतून एक बाटली काढून आजीच्या हाती ठेवत.
मग आजीच ओशाळून "अरे नको" म्हणत असतानाच, ते बाटली वऱ्हांडावर ठेवत असत. आणि साहानेचे वडील भेटले होते आत्ता बाहेर निघाले होते. त्यांनी म्हटले आईकडून १०० रुपये घेऊन जा आणि आणखीन दोन बाटल्या आण. मग आजीसुद्धा भिडेने १०० रुपये द्यायची. वडील मग घरी आलयावर कळायचे कि काश्याने थाप मारली. आम्ही कितीही प्लॅनिंग केले तरी काशिनाथला कुणाची बटणे केंव्हा कशी दाबायची ह्याचे पुरेपूर ज्ञान होते. एखाद्या होणार चित्रपटात एक लोकांचा समूह कुठे तरी अडकतो आणि आम्ही दर्शक कपाळावर हात मारत असताना "हमे स्प्लिट होके अलग अलग दिशामे जाना चाहिये" असे म्हणून ह्या व्यक्ती वेगवेगळ्या दिशेंत एकत्र जातात आणि सर्वजण मरतात. तसा हा प्रकार होता. ह्या वेळेस ह्याला एक रुपया सुद्धा देणार नाही म्हणून ठाम राहिलेले लोक शेवटी जाऊ हि पीडा म्हणून दहा रुपये तरी ह्यांना देऊन बोळवण करत.
बरे फुकट चा काढावा धुकट ह्या न्यायाने काशिनाथ ५ रुपयांना सुद्धा नको म्हणायचा नाही. गांवात कुठेही लग्न असो, बोलावले नाही तरी जाऊन जेवून, कोल्डड्रिंक पिऊन हा घरी आणि ती सुद्धा लिफ्ट मागून. निवडणुकीच्या वेळी दोन्ही बाजूने ह्याचा प्रचार. कुणीही उमेदवार काहीही फुकट देत असेल तर ते घेऊन मोबदला म्हणून "हातावरच मत द्या" म्हणून ओरडत फिरणारा काशिनाथ दुसऱ्या दिवशी धनुष्य बाणाचा प्रचार करताना दिसायचा.
आम्हाला तरी ह्या गोष्टी ठाऊक होत्या म्हणून बरे. कधी कधी मुलगी पाहायला म्हणून गांवात पाहुणे यायचे. हि मंडळी मग मुलीच्या घरी आली कि गांवात कुजबुज असायचीच "शांताराम भाऊंच्या वत्सलेला पाहायला म्हापश्यातून कोणी तरी आलंय". मग हा समारंभ चालू असतानाच काशिनाथ तिथे टपकायचा. "अहो शांताराम, तुम्ही केळ्यांचा घड शोधत होता नव्हे ? हा आणलाय बघा." मग पाहुण्यांकडे दृष्टी टाकून "ह्यांच्यासाठी का ? आमची वत्सला म्हणजे अत्यंत गृहकर्तव्य दक्ष आहे हो ?" असे त्यांना सुनावत. आता हि अवदसा ऐन वेळी आली म्हणजे शांताराम भाऊ कडे हसून वेळ मारून देण्याशिवाय पर्याय नसायचा. सर्वानाच ठाऊक होते कि हा देवचार १०० रुपये दिल्याशिवाय येथून जायचा नाही. मग तेच "अहो उपकार झाले काशिनाथ भाऊ. हे घ्या केळ्यांचे १०० रुपये". म्हणून हातावर पैसे टेकवत. मग पाहुणे जाताना काशिनाथ पुन्हा उपस्थित होत असे. बोलणे लाघवी, इंग्रजीत आपण ज्याला स्मूथ टोकर म्हणतो तसले. त्यांत हे पाहुण्याची ओळख करून त्यांच्या बॅगा वगैरे उचलून त्यांना गाडींत, एसटी मध्ये बसवून निरोप देत. जाताना जखमेवर मीठ चोळल्या प्रमाणे पाहुणे मग "तुमच्या गावातील सर्वच माणसे हि काशिनाथ प्रमाणे प्रेमळ आहेत का हो?" असे म्हणून जात. आणि हा प्रकार इथे संपतो असे समजू नका. वत्सलेचे लग्न होऊन ती सासरी गेली तरी हे तिथे पोचत. अहो तुमच्या गावी कामानिमित्त आलो होतो, माझे खिश्यांतील पैसे कुठे तरी पडले. मला घरी जायला थोडे पैसे द्या मी तुम्हाला मनीऑर्डने ने पाठवतो असे म्हणून काही पैसे घेऊन जात. पुणे, मुंबई, बेळगांव, पणजी, मडगांव, हर ठिकाणी ह्यांनी असे देणेकरी निर्माण केले होते.
अनेक देणेकरी ह्यांच्या घरी ये जा करत. प्रत्येकाला कसे गंडवायचे ह्याचे ज्ञान इतके उत्तम होते कि अनेकदा देणेकरीच आणखीन उधारी देऊन जात. अशोक सराफ आणि सुधीर जोशी ह्यांचा एक चित्रपट आहे ज्यांत अशोक सराफ भाडेकरू म्हणून राहतो आणि घर मालकाला गोड बोलवून वारंवार फसवतो. https://www.youtube.com/watch?v=fdbBp-WxgMY अगदी तसेच.
व्याजाने पैसे देणारे सावकार, गावगुंड अश्या लोकांकडून काशिनाथ कधीच पैसे घेत नसत. कारण एक म्हणजे ते ह्यांना पैसे देणार नाहीत, आणि दुसरे म्हणजे परत नाही दिले तर ह्यांना मार पडेल. हे ठाऊक असल्याने ह्यांची सावजे नेहमीच सभ्य माणसेच असायची. पण नाही म्हणायला हयांना मार अनेकवेळा पडला आहेच. मुले मोठी झाली तेंव्हा आपल्या वडिलांनी कुठे कुठे शेण खाल्ले आहे हे त्यांना वारंवार ऐकायला यायचे. इतर लोक अपमान करायचे. त्यामुळे त्यांना वडिलांच्या विषयी प्रचंड संताप होताच त्यामुळे काही वेळा स्वतःच्या मुलांच्या हातून मार ह्यांनी खाल्ला आहे. पण किमान दोन पोरे ह्यांचीच असल्याने ह्यांच्यावर गेली होती. त्यांना सुद्धा काशिनाथने गंडवले.
कुणाकडून तरी फोन केला आपल्याच घरी. "हे काशिनाथ ह्यांचे घर का ? मी भेंडे वकील बोलतोय. त्यांना मेसेज द्या कि मुंबईहून जी पार्टी मागे तुमची जमीन पाहून ग्रेलीय त्यांना ती पसंद आहे आणि २५ लाखांत डील पक्की झाली आहे. सर्व कागद घेऊन तुम्ही ह्या सोमवार मुंबईला आमच्या ऑफिस मध्ये या, सोपस्कार करू". मग तो मी नव्हेच ह्या पद्धतीने काशिनाथ घरी येत. थोरला पोरगा मग आनंदाने "बाबा, डील पक्की झालीय म्हणून भेंडे वकिलांनी फोन केला होता" वगैरे सांगत असे आणि हे अनिच्छेने, "अरे नको. ती नको विकायला." असे बोलत. मग काही वेळाने "भेंडे वकिलांनी ऍडव्हान्स मध्ये १ लाख दलाली मागितली आहे. मी कुठून देणार. नको ते २५ लाख रुपये. त्यापेक्षा मी इथेच असाच जगेन." मग एक दोन दिवसांत आशेखोर पोरे कुठून कुठून एक लाख रुपये गोळा करून ह्यांना देत आणि हे "भेंडे वकिला कडे" म्हणून जे मुंबईला जात ते आठवडा भर गायब. मग "डील झाली नाहीए पोरांनो. पैसे मी त्या अमुक अमुक ची उधारी फेडण्यात घालवले" असे सांगत. कधी कधी मोठ्या पोराला धाकट्याला सांगू नको, मी फक्त तुला शेयर देतो म्हणून प्रॉपर्टीची खोटी डील करत तरी कधी कधी मोठ्याला सांगू नको म्हणून धाकट्याला गंडवत. मग दोन्ही भाऊ भांडत बसले के हे गेले मुंबईला. तृतीय नंबरवर एक कन्या होती ती तशी साधी भोळी असावी. लोकं हुंडा देऊन पोरींचे लग्न करतात पण ह्या व्यक्तीने मुलीचे लग्न साधारण १७ वर्षांचे असताना करून दूरवर दिले आणि जावयाला वारंवार ठगले. शेवटी तो भांडून एक शेत नावावर करून गेला. आणखीन दोन पोरे खूपच लहान होती पण त्या पैकी एक कन्या गोडावरी बाईचाच वारसा पुढे चालवेल अश्या पद्धतीने वागत होती तर सदानंद मास्तरांसारखा दिसणारा धाकटा शिकण्यात थोडा हुशार होता. गोदाबाईचे दूरचे नातलग पोलिसांत होते आणि मुंबईत कुठे तरी होते, त्यांनी ह्याला दत्तक घेतला. त्याचे दत्तक वडील पुढे फार मोठे अधिकारी झाले आणि रिटायर होऊन एका विदेशी कंपनीचे सुरक्षा अधिकारी बनले. त्यातून त्यांनी अफाट पैसा कमावला. त्यांच्याकडून पैसे उठवायला काशिनाथ आणि गोदा दोन्ही पोचल्या पण त्यांनी म्हणे ह्यांना अश्या भाषेंत समजावले कि पुन्हा आपल्याला ५ वे मूल आहे हेच हे दाम्पत्य विसरून गेले.
काशिनाथ ह्यांच्या स्वभावांतील एक अत्यंत प्रशंसनीय गोष्ट म्हणजे त्यांची भूतदया. कुणाची गाय असो व भटका कुत्रा. ज्या प्राण्याला कोणीच नाही त्याचे काशिनाथ असायचे. कुना भटक्या गायीच्या पायांत किडा पडला तर हे आपल्या खर्चाने तिला घरी आणून शुश्रूषा करत. कुठे जखमी कुत्रा दिसला तर स्वतः हाताने त्याला उचलून त्याला योग्य तो उपचार देत. स्वतःला काही खायला असो वा नसो कुत्री मांजरे ह्यांना ते बिस्कीट देतच. कुणी चार दिवस गावाबाहेर जात आहेत तर हे स्वतःहून त्यांच्या कुत्रांची किंवा गुरांची जबाबदारी घेत.
बाप कामाला नाही आला तरी गोदावरी बाईंनी आपले "वजन" वापरून दोन्ही थोरल्या मुलांना चांगल्या बिनकामाच्या सरकारी नोकरींत चिकटवले. एकटा RTO मध्ये ड्रायवर म्हणून कामाला लागला आणि त्याने बक्कळ पैसा केला. दुसरा लाईनमन म्हणून वीज खात्यांत होता. त्याने आपली नोकरी आऊटसोर्स केली आणि तो उनाडक्या करत फिरतो.
काशिनाथ आता बरेच वयोवृद्ध झाले आहेत. पोरें काही तुकडे फेकतात त्यावर ह्यांचे दिवस जातात. काहीहि असले तर थोरले नायक आणि त्यांची पत्नी ह्यांना काशिनाथने आपल्या आईवडिलांप्रमाणेच वागवले आणि त्यांची प्रचंड सेवा केली. सासूबाई खूप वर्षे अंथरुणावर होत्या तेंव्हा त्यांची सुश्रुषा स्वतः केली, त्यांना दररोज शिवलीला वाचून दाखवली. ह्यामुळेच कि काय पण विनायक आणि गांवातील इतर लोक ह्यांना सन्मान देतात. एकेकाळी भामटा म्हणून ह्यांची ओळख होती. पण त्यांना लाजवेल असे भामटे गांवात उत्पन्न झाले आणि त्यांच्या फसवणुकीच्या व्यवहारांत काशिनाथ ह्यांची देणी रौण्डिंग ऑफ एरर प्रमाणे वाटतात. आता गांवातील लोक ह्यांना आपणहून १०० रुपये काढून देतात आणि हे सुद्धा त्यातून सिगारेट वगैरे घेऊन ओढतात.