ती म्हातारी आठवते तुम्हाला, भोपळ्यात बसून लेकीकडे जाणारी? किडकिडीत कृश अशक्त तरीही चिवट! किर्र जंगलातून मोठ्या चिकाटीने हिमतीने,चतुराईने संकटांचा सामना करत, सोबतची शिदोरी पाण्याबरोबर खात,  दूरचे गाव गाठण्यासाठी,न थकता न थांबता झपा झपा पावलं टाकत रस्ता जवळ करणारी . ' लेकीकडे जाईन,तूप रोटी खाईन,जाड जुड होईन' असं ज्याला त्याला विश्वासाने सांगणारी! लहानपणी ऐकलेली गोष्ट ...जरा कल्पना करु या ....

हो,तीच! आठवली ना! दिवस बदलले,म्हातारीची अन भोवतालचीहि परिस्थिती बदलली. गतीचा प्रगतीचा,मुलगा मुलगी समान मानण्याचा हा काळ...

ही हल्लीची म्हातारी निघते पंख असलेल्या, लांबुळक्या भोपळ्या मधून..लेकाच्या गावाकडे. मनाचा वेग अन पंखांची गती तिला घेऊन निघते ,अगदी अलगद आरामात.. ....

आकाशातून.कुठल्यातरी  नावाच्या कुठल्यातरी एका ' विमान भोपळ्यात' बसून म्हातारी निघते दूरच्या प्रवासाला. अहो,मुंबईहून पार अमेरिकेला कि अजून कुठे ! एक नव्हे दोन नव्हे अनेक जंगले,प्रचंडकाय वाळवंट, सात अथांग विशाल महासागर ,भल्या भल्या नद्या,,अजस्त्र पर्वतरांगा,दोन चार मोठमोठे खंड,खंडप्राय देश,त्यांच्या आभाळ सीमा,निरनिराळी अवकाशं ओलांडत,पांढऱ्या शुभ्र कापूस पिंजलेल्या गालिच्यांवरून,ढगांना आरपार छेदत, सूर्य देवाच्या सहस्त्र रश्मी रथाबरोबर,वाऱ्याशी स्पर्धेच्या गुजगोष्टी करत,पवनपुत्र हनुमानाला स्मरत तिची मार्ग क्रमणा सुरु असते.म्हातारीची खाण्या पिण्याची,चहा कॉफीची उत्तम सोय ,नव्हे सरबराई च असते.जणू लेकानेच आईच्या तैनातीसाठी माणसं नेमून ठेवलीत .

महिनाभर चालत लेकीकडे पोचणारी ही म्हातारी अवघ्या तीस तासांत पोहोचते .....

लेकाच्या गाव परिघात.सीमारेषेवर म्हणजेच पोर्ट ऑफ़ एण्ट्री वर म्हातारीला भेटतातच भटोऱ्या डोळ्यांचे, धष्ट पुष्ट ,मिशांवाले पट्टेरी वाघोबा. बिचारीला अडवून म्हणतात कसे," पकडू का तुला? खाऊ का तुला?"म्हातारी बिचकत नाही,घाबरत नाही.वाघोबाला म्हणते ," मी कुठले नियम मोडले नाही,बागेत वावगे आणले नाही,तू मला का न कसा पकडणार?  लेकाकडे राहीन, तूप रोटी खाईन, तुमचा देश बघीन,शिस्त पाळीन, तू जा तुझ्या कामाला".

वाघाला लिलया ओलांडत,माय लेक भेटतात.. नजरेनं,स्पर्शानं,आतड्यांनं,हृदयानं अगदी काळजाच्या पोटतिडीकेनं !! लेकाच्या डोळ्यात ती स्वतःला बघते ,हरखून जाते,. लेकाच्या आडून डोकावणाऱ्या सुनेची अवस्थाही काहीशी ... अशीच होते. ती ही म्हातारीच्या उबेला बिलगते. तिच्या सहवासाला भुकेली म्हातारी प्रवासाचा.. jet lag नावाचा शीण केव्हाच विसरते. विमानात Checkin केलेल्या मोठ्ठ्या पेटाऱ्यातून हातानं करून वाळवून आणलेले पापड पापड्या कुरडई सांडगे  मिरच्या पोरीच्या हातात ठेवते. छोटीशी परात, लोखंडी तवा, कालथा ,खलबत्ता तिच्या मॉडर्न किचन मध्ये ठेवते. ओझरच्या गणपतीचा अंगारा , माहुरचे हळद कुंकू दोघांच्या भाळी लावून पुडी देव्हाऱ्यात ठेवते. सुट्टीचे मजेचे सुखाचे  सोनेरी रुपेरी फुलपाखरी दिवस... रांगेने सुरु होतात. आनंदाच्या क्षणांची  एकमेकात जणू चढाओढच लागते.

तूप रोटी रोजचीच पण त्याबरोबरीने देशोदेशीचे खाद्यपदार्थ जेवणात जमू लागतात. लेक न सून एकमेकांच्या मदतीनं," तू कांदा काप,मी लसूण सोलतो" ह्या  रथाच्या दोन चाकांच्या भूमिकेतून पदर(?) खोचून... उत्साहाने मेनू ठरवतात..बनवितात. अव्हाकडोचं ग्वाकेमोल,ब्लॅक बीन्स,ग्रीन सॅलड, सोर क्रिम,चीझ  हे ब्राउन राईस वर टाकून केलेला  व्हेजी बाउल,रोस्टेड टरटल्स,नाचोझ, टाकोझ्, मंस्ट्रोल सूप,बोबोई घातलेली कोल्ड कॉफी,लाव्हा केक, रेड वेलवे ट केक.., कस्टमाइझ्ड सँडविच,पिझ्झा ,बर्गर।                           अशी किती पदार्थांची मांदियाळी पानात सजते .म्हातारीचे जिलेबी,शेंगोळी, धिरडी  गुळवणी,पूरणपोळी ह्यांचीही वर्दळ एकीकडे सुरु असते.  सारं करताना म्हातारी तरुण होत असते , दमत बिमत नसते कारण म्हाताराही असतोच ना हो, पुढे होऊन  तिच्या  हरेक कामात समरसून मदत करायला! गेले कित्येक वर्षाचं त्यांचं टीम वर्क !.. कुठल्याही कामात " तू कांदा काप,मी लसूण सोलतो"हे ठरलेलंच!म्हातारी म्हणते, पोरांनी  म्हाताऱ्याकडूनच  घेतला आहे ..हा मदतीचा वसा.

... दिवस एक,दोन,तीन... पंधरा करत पुढे पळत असतात.दररोज नेमानं पाच किमी चालणं,पार्क मध्ये फिरणं, पोहणं, स्पा मध्ये रेंगाळण,वाचन करणं,closet नावाच्या कपाटातला कपड्यांचा पसारा आवरणं आणि ऑफिस मधून येणाऱ्या लेकासुनेची वाट पहात बाग काम करणं असा दिनक्रम असे.

वीकएंड ला झू, समुद्र किनारा, वॉटरस्पोर्टस,मॉल्स,वेग वेगळ्या cusien ची हॉटेल्स अशी सारी धम्माल.
म्हातारा म्हातारी नी नुसतं काही म्हणायचं,मागायचं,नि पोरांनी पूर्ण करायचं ,बस!  नायगारा धबधबा,रिव्हर फ्रंट,बर्नेट वूड असो, वॉशिंग्टन , नुयॉर्क शहराचा फेर फटकाअसो वा बरलिंग्टन कोट फॅक्टरीतील शॉपिंग, सगळ्याला भर भरून न्याय!
खरंच, वय स्थळ काळ  मर्यादा विसरूनच गेली दोघे. पालकत्वाच्या भूमिकांची ही अशी अदलाबदल कधी झाली, कळलंच नाही दोघांना..आणि कळलं,तेव्हा कौतुकानं मुलं गालातल्या गालात मिश्किल हसायची.

सुट्टी संपली, जवाबदारयांच्या जाणिवेनं म्हातारी पुन्हा सज्ज झाली.. परतीच्या  प्रवासासाठी. लेक तयारीला लागला,  'लेक'  हिरमुसली. जिन्यातून पळत वर येणारी तिची पावले  अडखळती झाली . जड मनानेच ती प्रवासात न्यायला झिपलॉक मध्ये,खारे दाणे, चिवडा,चटणी,पराठे, ब्रेड बटर भरू लागली. स्वेटर,कानटोपी ,पासपोर्ट,पेनच्या जागा नक्की करू लागली.म्हातारा तिला हसवत,स्वतःच्या पापण्या टिपत,कडेला थांबत होता.

..... निघण्याचा दिवस उजाडला,जपून जा, सांभाळा, करमणुकी साठी सिनेमा बघा, व्यवस्थित खा- प्या, मिस्ड कॉल द्या, असं बजावत, गुणी शहाण्या जबाबदार 'पालकांनी' म्हातारीला पुन्हा सोडलं,विमान तळावर..तिच्या ठरलेल्या ' भोपळ्यापाशी' !निरोपाची गळा भेट झाली. नजरानजर न होता, हात हलले." आई ग, बॅग च्या बाहेरील कप्प्यात एक surprise ठेवलंय, बघ हां, आणि एन्जॉय कर ग, आम्ही नीट राहू , काळजी करायचं सोड " काचेपलीकडून लेक सांगत होता.

तूप रोटी खाऊन जडावलेली लाडा कोडानं सुखावलेली म्हातारी आता मात्र फुटू पाहत  होती.वाघोबाने तिला अडवलं नाही,काही नाही. उलट,पुन्हा कधी? असं विचारलं देखील,पण म्हातारीलाच  त्याचं बोलणं ऐकू आलं नाही.साऱ्या गोंगाटात, 
ती  पुन्हा एकाकी झाली. अनिच्छेने बसली जाऊन जागेवर,न स्वतःला  बांधून घेत म्हणालीही," चल बाबा भोपळ्या, टुणुक..भुर्रर्र, ने सुखरूप"

... आभाळ गच्चं झालं ,मळभ दाटलं, क्षितिज दूर गेलं,धुसरलं ,जंगल समुद्र वाळवंट ... अंगावर येऊ लागले. लेकापासून लांब घेऊन जाणाऱ्या भोपळ्यावर रुसावं की स्वतःवर ? या विचारातच म्हातारीच्या हाताला बॅग मधलं पार्सल लागलं. घाई घाई ने तिनं ते उघडलं ,बघते तर काय..  फोटोजचा मोठा गठ्ठा! अधाशासारखा तिने म्हाताऱ्यालाही दाखवला. आनंदाच्या क्षणांची उजळणी सुरु झाली. ढगांच्या खालून उसळणाऱ्या अटलांटाच्या लाटा,दोघांच्या डोळ्यात मावेना झाल्या. फोटोतून बाहेर येत लेक सून म्हातारीच्या कुशीत शिरली.  आपुलकी असेल तर ...Distance doesnt matter...पुन्हा पुन्हा मनोमन पटलं. तन मन डोकं शांत झालं...  म्हातारीला डुलकी येऊ लागली अन कुणीतरी तिला विचारलं ," would you like to have black tea or coffee ?" म्हातारी हसून म्हणाली, " yes coffee please"!

© मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel