वामनतात्यांचा गडी दत्तू विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेला होता. वामनतात्या खेडेवजा शहरात किंवा शहरवजा खेडेगावांत राहात होते . ते जिल्ह्याचे ठिकाण होते. काळ स्वातंत्र्यपूर्व होता.त्या काळी हल्लीं मोठ्या असलेल्या  शहरांचासुद्धा विशेष विकास झालेला नव्हता.मोटारी नव्हत्या. मोटारसायकली स्कूटर्स रिक्षा नव्हत्या.विशेष उद्योगधंदे नव्हते . रस्ते चांगले नव्हते. प्रवास बैलगाडीतून टांग्यातून किंवा शक्य असल्यास जलमार्गाने करावा लागे. तात्या रहात असलेल्या शहरात त्यांचे स्वतःचे घर होते .त्या शहरात घरांची रचना त्या वेळी  साधारणपणे पुढीलप्रमाणे होती .

कच्चा रस्ता, नंतर अंगण, त्यामागे घर, घरामागे पुन्हा अंगण ,नंतर विहीर व त्यानंतर माड पोफळी चिकू जांभूळ  इत्यादी झाडांची बाग होती.बागेच्या मधून एक पायवाट कुंपणाच्या टोकापर्यंत गेलेली होती.  कुंपणाला लागून संडास असे.त्यावेळी संडास, टोपली संडास होते .हल्ली जसा पाण्याचा टँकर असतो, त्याप्रमाणे मैला वाहून नेण्यासाठी टँकर असे.एक दोन दिवसाआड मैलावाहक येऊन टोपली टँकरमध्ये रिकामी करून पुन्हा जाग्यावर ठेवीत असे.शहरात मैला वाहून नेण्याची  ही सार्वत्रिक पद्धत होती .प्रत्येक खोलीला संलग्न  बाथरूम व त्यात कमोड, या जमान्यातील लोकांना, अश्या  पद्धतीची कल्पनासुद्धा करता येणे कठीण आहे. खेडेगावात तर कुठेही जा आणि कुठेही बसा अशी स्थिती होती.म्हणून थोडे विस्ताराने लिहिले आहे.

तर दत्तू गडी पाणी काढण्यासाठी विहिरीवर गेला होता .विहीर चौकोनी होती. त्यावर पायरहाट व हातरहाट होता.त्याने कळशी विहिरीमध्ये सोडली .कळशी अर्थातच हातरहाटाच्या राजूला(दोराला) बांधलेली होती.दोराला धरून हलकासा हिसका देऊन कळशी पाण्यात बुडविण्याचा प्रयत्न दत्तू करीत होता .त्यासाठी तो सहाजिकच विहिरीत डोकावून पाहत होता . दत्तूला आपल्या प्रतिबिंबाशेजारी माड पोफळी कडूनिंब या झाडांच्या प्रतिबिंबाबरोबरच  रमाक्काचे प्रतिबिंब पाण्यात दिसले.तो जसा पाण्यात डोकावून पाहात होता तशीच रमाक्काही पाण्यात डोकावून पाहत होती.

रमाक्काचा मृत्यू होऊन दोन महिने झाले होते. याच विहिरीत उडी टाकून तिने आपले जीवन संपविले होते .त्या काळी बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी  मुलींचे विवाह बालपणात होत  असत.जिला लग्न म्हणजे  काय हे कळत नाही  अश्या  आठ दहा वर्षांच्या मुलींचे विवाह होत असत.काही विवाह बिजवरांशी होत असत.  देवी प्लेग फ्लू अश्या  साथीच्या रोगांनी किंवा अन्य कारणाने मृत्यूचे प्रमाण फार मोठे होते. पतीच्या मृत्यूनंतर विशेषत: ब्राह्मण वर्गामध्ये केशवपन करून लाल लुगडे स्त्रिया नेसत असत. त्यांना सक्तीने संन्यस्त वृत्तीने राहावे लागत असे.हौस मौज खेळ हास्य आनंद करमणूक नटणे व्यवस्थित दिसणे या सर्वापासून त्यांना कटाक्षाने दूर ठेवले जाई.त्यांच्या जीवनातील सर्व आनंद हिरावून घेतला जात असे .अशी घाणेरडी प्रथा ब्राह्मणवर्गात होती.बाह्यरूप कसलेही घेतले तरी अंतरंग कुणालाही बदलता येत नाही . आपण मात्र नेहमी बाह्यरूप पाहात असतो लक्षात घेत असतो. वयानुसार त्या त्या वयसुलभ भावना सर्वांच्याच मनात आपोआप निर्माण होतात.या अपरिहार्य गोष्टींकडे पूर्णपणे कानाडोळा केला जात असे .सर्व भावना दडपून टाकल्या जात असत .त्यांचा केव्हां केव्हां आकस्मिक स्फोट होतो असे.त्या शे दोनशे वर्षांच्या काळात अशा अत्याचाराला किती स्त्रिया बळी पडल्या असतील ते देवच जाणे . 

ही रमा वामनतात्यांची मुलगी. तिचा विवाह बालपणात झाला होता .दुर्दैवाने तिचा पती वारला .सासरच्यांनी तिचा छळ केल्यामुळे तात्या तिला आपल्या घरी घेवून आले .तरुण वय, अनेक मोह , दुर्दैवाने तिचा पाय घसरला. याचा बोभाटा होण्याअगोदर तिला विहीर जवळ करण्याशिवाय दुसरा काही उपाय राहिला नाही.त्या काळी अनेक मुलींचे आयुष्य असे उजाड होत असे.त्यांना मृत्यूशिवाय दुसरा काही मार्ग शिल्लक रहात नसे.

तर दत्तूला आपल्या शेजारी उभी राहून पाण्यात डोकावताना रमाक्काचे प्रतिबिंब दिसले. गुळगुळीत गोटा केलेली, डोक्यावरून अलवणाचा(लाल लुगडे ) पदर घेतलेली, धारदार नाकाची, पाणीदार डोळ्यांची, उजळ वर्णाची, रमाक्का त्याला पाण्यात दिसली.त्याने दचकून आपल्या शेजारी वळून पाहिले तर तिथे कुणीही नव्हते .तो पुन्हा पाण्यात डोकावला तर तिथे त्याच्या शेजारी रमाक्काचे प्रतिबिंब होते .

एक मोठी किंकाळी फोडून दत्तू विहिरीवर रहाटाशेजारी बेशुद्ध पडला. आसपास काम करणारी माणसे, घरातील माणसे, धावत आली .दत्तू एकाएकी किंचाळी फोडून बेशुद्ध कां झाला ते कुणालाच कळेना.दत्तू पाणी मारल्यावर,  कांदा नाकाला लावल्यावर ,जरा वेळाने शुद्धीवर आला.असंबद्ध बडबड करत,चाचरत त्याने रमाक्काला पाहिल्याचे सांगितले .त्याच्या बोलण्यावर कुणाचाही विश्वास बसेना.सकाळची वेळ, ऊन सावल्यांचा खेळ, झाडांच्या सावल्या  यामुळे दत्तूला काही तरी भास झाला असावा असे सर्वांना वाटले .

परंतु खरोखरच रमाक्का भूत झाली होती याचा प्रत्यय थोड्याच दिवसांत सर्वांना आला.  

एक दिवस तिची आई पाणी काढण्यासाठी विहिरीवर गेली होती .तिलाही विहिरीत रमाचे प्रतिबिंब तिच्या शेजारी  डोकावून बघताना दिसले . एवढेच नव्हे तर रमाने तिला आई म्हणून हाकही मारली.तिला रमाचा स्पष्ट अावाज एेकू अाला.तिने दचकून शेजारी बघितले . तिथे कुणीही नव्हते .त्यानंतर प्रत्येकाला रमा कुठे ना कुठे दिसतच होती .केव्हां ती अंगणातील झोपाळ्यावर बसून झोका काढताना  दिसे.  तर कधी ती आगरामध्ये फिरताना दिसे.तिच्या दर्शनाने गडी माणसे भयभीत झाली . केव्हा ती तांबडे अलवण नेसलेली दिसे, तर कधी जुन्या रूपात परकर पोलक्यात दिसे.तिने कुणालाही काहीही केले नाही.भूत म्हटले की माणसे घाबरतात त्याला काय करावे? तात्यांकडे कामाला यायला माणसे घाबरू लागली .अजूनपर्यंत कुणाजवळही रमा काहीही बोलली नव्हती. फक्त एकदा तिने तिच्या आईला हाक मारली होती .

एक दिवस घरातील झोपाळ्यावर बसून रमा झोका काढताना दिसली .एवढेच नव्हे तर ती घडाघडा रामरक्षा म्हणत होती .भूत रामनामाला घाबरते असे म्हणतात. ही तर प्रत्यक्ष रामरक्षाच म्हणत होती !दिवसा उजेडी भूत दिसणे आणि त्याने रामरक्षा म्हणणे सर्वच अचंबित करणारे होते. 

एक दिवस ती आगरामध्ये स्तोत्र म्हणत झाडांना पाणी घालताना दिसली. आता मात्र हद्द झाली. जणू काही रमा मेलीच नव्हती, जिवंत आहे अशा प्रकारे, ती  घरात आगरात सर्वत्र वावरताना दिवसा व रात्री  दिसू लागली होती .फक्त लग्नापूर्वी ती परकर पोलक्यामध्ये फिरत असे. तर आता ती केव्हां परकर पोलका व केव्हां लाल अलवणामध्ये फिरताना दिसत होती.परकर पोलका असे त्यावेळी तिच्या डोक्यावर केशसंभारही असे.ती प्रत्यक्ष दिसत होती की लोकांची ही कल्पना होती कोण जाणे ?परंतु पाहणाऱ्यांना ती सत्य वाटत असे एवढे मात्र खरे . 

एक दिवस याच्या पुढची पायरी तिने गाठली. रमाच्या थोरल्या बहिणीचे लग्न झाले होते .ती सुखाने सासरी नांदत होती .कांही दिवस ती माहेरपणाला आली होती .तिला भेटायला गावातील तिच्या काही मैत्रिणी आल्या होत्या .त्यातील एकीचा तिने ताबा घेतला .त्यावेळी कुणालाच त्याची कल्पना आली नाही .ती मैत्रीण घरी गेल्यावर बडबडू लागली.ती मैत्रीण बोलताना चाचरत असे. तिला संस्कृत मुळीच येत नव्हते .घरी गेल्यावर ती घडाघडा स्पष्ट स्वच्छ बोलू लागली .त्याचप्रमाणे संस्कृत स्तोत्रे म्हणण्याला तिने सुरुवात केली.तिच्या घरातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला .त्या मैत्रिणीचे लग्न झाले होते .थोड्याच वेळात ,तिचा ताबा रमाने घेतला आहे हे सर्वांच्या लक्षात आले .मांत्रिकाला आणण्यात आले.त्याने तिला तुझ्या काय इच्छा आहेत ते सांग म्हणून विचारले .तिने ताईच्या  मैत्रिणीच्या शरीरात शिरून  तरुणपणातील सर्व सुखोपभोग भोगायचे आहेत .आता मी या झाडाला सोडणार नाही ,असे सांगितले .मी माझे केस काढू नका म्हणून आक्रंदत होते. कुणीही माझे ऐकले नाही .बळजबरीने माझ्या डोक्यावरील केस काढण्यात आले .झुळझुळीत रंगीत कपडे घालण्याच्या वयात मला तांबडे अलवण ऩेसायला लावले.मी इतक्या लहान वयात हसणे नाचणे मुरडणे जीवनाचा आनंद उपभोगणे याला वंचित का व्हावे ?असा सवाल ती  पुन्हा पुन्हा करीत होती.  आता मात्र गावातील सर्वच लोक हादरले .

मांत्रिकाचे ती काहीही ऐकेना.मांत्रिक त्या मैत्रिणीचा रमाने घेतलेला ताबा सोडवू शकला नाही. तात्यांचे तिच्यावर खूप प्रेम होते .तिचेही तात्यांवर खूप प्रेम होते .ती तात्यांचे ऐकेल .तात्यांना बोलवा असे कोणीतरी म्हणाले. शेवटी तात्यांना बोलावण्यात आले. तात्या त्या मुलीकडे गेले.त्यांनी त्या मुलीला म्हणजे रमाला खूप समजावून सांगितले.तिने मला पुन्हा आपल्या घरी घेऊन चला म्हणजे मी हे झाड सोडते असे सांगितले .  एवढे बोलून ती मुलगी बेशुद्ध झाली .बेशुद्धावस्थेत तिला पुन्हा तात्यांच्या घरी आणण्यात आले.घरी आल्या आल्या ती मुलगी शुद्धीवर आली .मधल्या काळातील त्या मुलीला काहीही आठवत नव्हते .जागी झाल्या झाल्या तिने बाकीच्या मुली कुठे गेल्या म्हणून विचारले.रमा वचन दिल्याप्रमाणे त्या मुलीच्या शरीरातून बाहेर पडली.ती मुलगी पहिल्यासारखी झाली .मधल्या काळातील तिला काहीही आठवत नव्हते .  

तेव्हांपासून तात्यांच्या घरी कुणीही मुलगी, बाई ,येत नाहीशी झाली.मोठी माणसे पुरुष माणसेही तात्यांकडे  जायला घाबरू लागली .तात्यांचे घर,रमाचे घर, म्हणून सर्व ओळखू लागले .

तात्यांनी समजून सांगितल्यापासून रमाने कुणालाही त्रास दिला नाही.रमा मुळातच अत्यंत समंजस होती .भूतयोनीमध्येही ती तशीच समंजस राहिली. सर्वजण तुला घाबरतात असे सांगितल्यावर तिने कुणालाही दिसायचे बंद केले .मात्र विहिरीच्या परिसरात ती नेहमी दिसत असे .

हळूहळू गावातील लोकांचा धीर चेपला .लोकांचे नेहमीप्रमाणे तात्यांकडे येणे जाणे सुरू झाले .तरीही मुली बायका तात्यांकडे यायला घाबरत असत.रमा आपला ताबा घेईल अशी भीती त्यांना वाटत असे.तात्यांनी समजून सांगितल्यापासून रमा  शांत शांत झाली होती.

हळू हळू मुलींचा स्त्रियांचाही धीर चेपला.नेहमीप्रमाणे त्यांचे येणे जाणे सुरू झाले. काही वर्षे विहिरीच्या परिसरात रमा दिसत असे .पाणी काढताना तिचे प्रतिबिंब हटकून दिसत असे.विहिरीत डोकवण्याचे कित्येक जणांनी बंद केले होते.

*नंतर नंतर केव्हातरी ती दिसण्याचे बंद झाले .बहुधा ती पुढील गतीला गेली असावी.*

* इतके शांत इतके समंजस इतके सुसंस्कृत भूत अजून तरी कुणी पाहिले नाही असे त्या काळचे जिवंत असलेले काही जण सांगतात.*

*भूत भयानक असते. ते तुम्हाला काहीही करू शकते.त्याला घाबरलेच पाहिजे.ही सर्वसाधारण जनमानसातील कल्पना तिने बदलून टाकली .*

*रमाक्काचे भूत ही एक अख्यायिका होऊन बसली आहे  .* 

३/१२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel