(ही गोष्ट काल्पनिक आहे यदाकदाचित स्थळ नाव इत्यादीबद्दल साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
सूर्योदयानंतरच त्यांची त्या वाडय़ाच्या पकडीतून सुटका झाली . वाड्याच्या बाहेर पडल्याबरोबर त्यानी लगेच जवळच्या पोलिस स्टेशनची चौकशी केली .
दोघेही पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले .
ड्युटीवर असलेल्या पोलिसाने त्यांच्याकडे पाहून , काय तक्रार आहे अश्या अर्थाने प्रश्नार्थक मुद्रा केली . दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता.रात्रीच्या घटना त्यांना आठवत होत्या .पाच खून एकाचे उडालेले मुंडके दुसऱ्याच्या छातीत असलेली कुर्हाड सर्वत्र रक्ताचा झालेला शिडकावा,सर्व काही त्यांना डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होते .भीतीने आणि रात्रभर झालेल्या जागरणाने दोघेही विचित्र दिसत होते. दोघांनीही घाबरत घाबरत एका घरात पाच खून झाले आहेत असे सांगितले.ते ऐकल्याबरोबर ड्युटी ऑफिसर खुर्चीतून ताडकन उडालाच .या दोघांनीच खून केले आहेत अशा दृष्टीने तो ड्युटीऑफिसर त्यांच्याकडे पाहू लागला.
चला काहीही लपवू नका. कसे खून केलेत ते पटापट सविस्तर सांगा. काहीही न लपविता सर्व हकीकत सविस्तर सांगा .तुम्ही काही लपविले असे नंतर कळले तर तुमची खैर नाही .ड्युटी ऑफिसरने दम दिला .
त्यावर दोघांनीही चाचरत चाचरत घाबरत घाबरत आम्ही खून केलेले नाहीत .आम्ही खुनाचे फक्त साक्षीदार आहोत असे सांगितले .
ड्युटी ऑफिसरचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता तो त्यांच्याकडे संशयाने पाहत होता .पोलीस आपल्याला खुनात अडकवतील यांची त्यांना थोडीबहुत कल्पना होतीच .ती प्रत्यक्षात उतरत असलेली पाहून त्यांचे धाबे दणाणले .कुठून या परिक्रमेची आपल्याला बुद्धी झाली . कुठून आपण रस्ता चुकलो . कुठून आपण नेमके त्या वाड्यात गेलो .आपले नशीबच खोटे होते. वाईट मुहूर्तावर आपल्याला परिक्रमेची कल्पना सुचली. इत्यादी विचार त्यांच्या मनात येत होते.
चला लवकर लवकर बोला या ड्युटी ऑफिसरच्या वाक्याने ते भानावर आले व त्यांनी बोलण्यास सुरूवात केली .
मध्यरात्री अकस्मात आलेले तीन दरोडेखोर ,त्यानी तात्यांना दिलेले आव्हान ,कुऱ्हाडीचे घाव घालून तोडलेला दरवाजा ,तात्या व सुधाकर आणि ते तीन रामोशी यांच्यात झालेले घनघोर युद्ध, त्यात तात्या व सुधाकर यांचा झालेला मृत्यू, नंतर त्या रामोशानी घरातील सर्वांचा केलेला वध, इत्यादी घटना सविस्तर सांगितल्या .
ड्युटी ऑफिसरने त्यांना तुम्ही तिथे कसे काय होता असा पुढचा प्रश्न विचारला .त्यावर त्यांनी मुचकुंदी नदीला परिक्रमा करण्यासाठी ते कसे निघाले, वाट कसे चुकले ,रानात रात्र काढण्याची वेळ कशी आली, नंतर त्यांना उजेड कसा दिसला,आणि शेवटी ते तात्यांकडे कसे पोचले, त्यांचे आगत स्वागत कसे झाले, इत्यादी गोष्टी सांगितल्या .
त्यावर ड्युटी ऑफिसरने तुम्ही खून कशावरून केले नाहीत? खून करून आता तुम्ही हा बनाव कशावरून करीत नाही ?तुम्ही खून केले नाहीत याचा पुरावा काय? इत्यादी प्रश्नांच्या फैरी झाडल्या .हा ऑफिसर आपल्याला या खुनात अडकवणार यामुळे दोघे आणखीच अस्वस्थ झाले.
सुदैवाने तेवढ्यात तिथे आणखी एक पोलीस आला.या पोलिस स्टेशनमध्ये तो दीर्घ काळ होता . ड्युटी ऑफिसर नवीनच बदलून आलेला होता .त्या पोलिसाने पुन्हा एकदा सर्व हकीकत विचारली .ही घटना कुठे घडली ते त्याने विचारले .त्यांनी साधारण स्थान सांगितल्यावर तो थोडा गंभीर झाला आणि नंतर हसत हसत पुढे म्हणाला .
तुम्ही भुतांच्या वाड्यात वस्तीला गेला होतात .काल अमावस्या होती .दर अमावास्येला हे सर्व नाटक तिथे घडते.
पंधरा वर्षांपूर्वी या सर्व घटना तिथे प्रत्यक्ष घडल्या आहेत .तात्या हे गावचे खोत होते .ते सावकारीही करीत असत .इतरांशी बोलताना जरी ते सौजन्याचा पुतळा वाटत असले तरी ते प्रत्यक्षात तसे नव्हते .कुळांसाठी, ऋणकोंसाठी, ते कर्दनकाळ होते.वाट्टेल ते उपाय योजून ते पैशांची वसुली करीत असत .त्यासाठी ते कोणतीही दयामाया दाखवीत नसत .कर्ज वसुलीसाठी त्यांनी तीन चार पेहेलवान ठेवले होते .अर्थातच त्यांचे संरक्षक म्हणूनही ते काम करीत असत .
कोऱ्या कागदावर अंगठे घेऊन कर्ज देत असत .नंतर त्या कागदावर ते त्यांना हवा असलेला मजकूर लिहित .अशा प्रकारे त्यांनी लोकांचा बराच जमीनजुमला हडप केला.त्यांच्या निर्दयतेच्या, हृदयशून्यतेच्या, क्रोर्याच्या , कितीतरी कहाण्या आहेत.
तात्या खोतांचे अत्याचार शेवटी लोकांना असह्य झाले. त्यांच्याविरुद्ध काही करण्याची कुणाचीही हिंमत नव्हती .शेवटी त्यांच्या छळाला बळी पडलेल्या दोन तीन रामोशांनी ती हिंमत दाखविली.काही कारणाने ते पेहलवान त्यांच्या गावी गेले होते.रामोशानी ती संधी बरोबर साधली. त्या दिवशी रात्री ते तात्यांच्या वाड्यावर चालून गेले.तुम्ही पाहिलेल्या सर्व घटना जशाच्या तशा त्या रात्री घडल्या .तात्यांचा निर्वंश झाला. त्या मारामारीमध्ये ते रामोशीही मृत्यू पावले.
तेव्हापासून दर अमावस्येला तुम्ही पाहिलेल्या सर्व घटना तिथे घडत असतात. आरोळ्या, किंकाळ्या, गावातील लोक ऐकतात.रात्री तो वाडा प्रकाशाने उजळून निघालेला असतो .अमावास्येच्या रात्री त्या बाजूला जाण्याची कुणीही हिम्मत करीत नाही .एरवीही तात्यांच्या कम्पाऊंडमध्ये जाण्याची कोणाचीही हिम्मत नाही .दुरुस्ती अभावी वाडा मोडकळीला आलेला आहे .पाऊस पाण्याने घराच्या भिंती कोसळल्या आहेत .वाड्याचे लाकूड सागवानी असूनही त्याची रया गेली आहे .घराभोवती रानगवत उगवले आहे .पालापाचोळा सर्वत्र पसरला आहे.
अमावास्येच्या रात्री कसे कोण जाणे परंतु हे सर्व चित्र पालटते. वाड्याला पूर्वीचे वैभव प्राप्त होते .त्या रात्री घडलेल्या घटना पुन्हा तिथे घडतात .दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर पडिक, दुर्लक्षित, वाड्याचे स्वरूप तिथे पुन्हा अस्तित्वात येते .
केव्हाना केव्हा तात्यांच्या घरची माणसे व ते मारेकरी पुढे गतीला जातीलच .
तेव्हा आणि तेव्हांच अमावस्येच्या रात्री होणारी ही सर्व पुनरावृत्ती थांबेल.
स्वाभाविकच ही सर्व हकिगत ऐकून राजेश व योगेश यांचे धाबे दणाणले.ते आपला रात्रीचा अनुभव आठवीत होते.त्यांना काही गोष्टी जरी अमानवी वाटत असल्या तरी त्यांचे झालेली आगत स्वागत, तात्यांचा मनमोकळा गप्पिष्ट स्वभाव, सुधाकरचे मुद्देसूद बोलणे ,त्यांच्या घरी घेतलेले जेवण,अंगणातील तुळशी वृंदावन, त्यापुढे घातलेली रांगोळी, तुळशी वृंदावना पुढे तेवत असलेले निरांजन,पाय रहाट, विहीर, दोण, त्यातील पाणी, हा सर्व भुताटकीचा खेळ होता हे मान्य करण्याला त्यांचे मन तयार होत नव्हते .
हा पोलीस काम टाळण्याचा तर प्रयत्न करीत नव्हता ?ड्यूटी ऑफिसर तर नवीनच आलेला असल्यामुळे ही सर्व कथा तो तोंड वासून ऐकत होता .शेवटी योगेश व राजेश यांनी त्या पोलिसांना एकदा तुम्ही त्या वाड्यावर चला प्रत्यक्ष घटना पाहा मग काय तो निर्णय घ्या असे सांगितले .
पोलिसही या दोघांबरोबर वाड्यावर आले .रात्री पाहिलेल्या बेड्याचा कुठेही मागमूस नव्हता.रात्रीचे चित्र व हे चित्र संपूर्णपणे निराळे होते. वाडा व संपूर्ण कंपाऊंड दुर्लक्षित होते .जिकडे तिकडे रान माजले होते .गुडघाभर उंचीचा पालापाचोळा सर्वत्र साचला होता. वाडा अर्धवट कोसळला होता .तुळशीवृंदावनाचा तर कुठेही मागमूस नव्हता.फक्त विहीर होती . बेड्याचे फक्त चिरे होते. अर्थातच घरात प्रेते,रक्त, बंदुक, तलवारी, कशाचाही पत्ता नव्हता. कुणाही माणसाचा मागमूस नव्हता .
ते सर्व पाहून दोघेही हादरले .काल संपूर्ण रात्र अापण भुतांच्या सहवासात काढली या विचारानेच त्यांचा थरकाप उडत होता .
पोलिसांचा निरोप घेऊन ते पुढे परिक्रमेसाठी मार्गस्थ झाले .
*एकदा तर त्यांना परिक्रमा अर्ध्यावर सोडून द्यावी असे वाटत होते .*
*रात्री कुठेही वस्ती करताना त्यांना त्या वाडय़ाच्या स्मरणाने नीट निद्रा येणार नव्हती. अापण आता वस्ती करतो ते घर तसे तर नसेल, अश्या विचारांचा भुंगा त्यांना पोखरत राहणार होता *
*मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे दोघेही धाडसी होते .त्यांच्याजवळ अनुभवाचे प्रचंड भांडार होते .*
*केवळ म्हणूनच आणि म्हणूनच ते परिक्रमा पूर्ण करू शकले .*
(समाप्त)
११/२/२०२०©प्रभाकर पटवर्धन