संपूर्ण दिवसात मी खूप काही साध्य केले होते .मी माझा आवाज जरी सगळ्यांपर्यंत नाही तरी काही जणांपर्यंत पोचवू शकत होतो .मोबाइल किंवा लॅपटॉप मला सुरू करता येत नव्हता तरीही मी सुरू असलेल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर टाईप करून मेसेजेस पाठवू शकत होतो .माझ्या द्रव्याचे बऱ्याच प्रमाणात सूक्ष्मीकरण किंवा घनीकरण मला करता येऊ लागले होते .मी परीशी संबंध प्रस्थापित करून तिला कराटेचा क्लास सुरू करण्याला सांगितले होते .राजनला मी पुरेशा प्रमाणात घाबरवून सोडले होते .त्याच्या वडिलांना संभ्रमात टाकण्यात मी यशस्वी झालो होतो . आता निदान आज तरी मला करण्यासारखे काही नव्हते .घरातील माणसांचे मला सांत्वन करावेसे वाटत होते परंतु मी सांत्वन कसे काय करणार होतो .माझ्या मृत्यूने त्यांना होणारे दु:ख कमी करू शकत नव्हतो.त्यामुळे तो विचार मी सोडून दिला .मला मुक्ती मिळेपर्यंत मी त्यांच्या सहवासात राहू शकणार होतो हे काय थोडे झाले .

परी नियमितपणे कराटेच्या क्लासला जात होती .ट्यूशन कॉलेज वगैरे नेहमीप्रमाणे सुरू होते .मी तिच्याबरोबर सर्वत्र जात असे .तिला राजन पासून संरक्षण देणे हा माझा हेतू होता . परंतु प्रत्यक्ष जेव्हा वेळ येईल तेव्हा मी कसे संरक्षण देणार होतो ते मला कळत नव्हते .मी जर घनरूपात येऊन तसाच राहू शकलो असतो तर मला परीला संरक्षण देणे सहज शक्य होते .जर मला काही शक्ती प्राप्त झाल्या असत्या तरीही मी संरक्षण देऊ शकलो असतो .जर मी परकाया प्रवेश करण्यात यशस्वी झालो असतो तरीही मी बरेच काही करू शकलो असतो.दहा दिवसांमध्ये काहीही न झाल्यामुळे राजनचा धीर बऱ्यापैकी चेपला होता.मी दम देण्याशिवाय काहीही करू शकत नाही असे त्याला वाटत होते .मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की राजनला मी आता तरी काही करू शकत नव्हतो .मी रोज नियमितपणे एक दोनदा तरी राजनच्या घरी जाऊन येत असे .एकदा त्याचे मित्रांचे टोळके गप्पा मारीत खोलीत बसलेले असताना मी पंख्यावर बसून ते सर्व पाहात होतो. बोलता बोलता त्यांनी परीचा उल्लेख गल्लीच्छपणे केला.माझा राग अनावर झाला .छताला बांधलेले झुंबर तोडून ते त्यांच्या डोक्यावर मारावे असे मला वाटले.आणि काय आश्चर्य रागाच्या भरात मी झुंबर तोडू शकलो परंतु ते त्यांच्या अंगावर नेम धरून मला मारता आले नाही.ते त्यांच्या जवळ जमिनीवर पडून फुटले.सगळेच एकदम दचकून उभे राहिले .झुंबर तुटून पडणे शक्य नव्हते.आणि तुटलेच तर ते सरळ खाली पडणे आवश्यक होते.ते तिरपे जाऊन त्यांच्या जवळ आपटले होते .माझ्या अस्तित्वाचा त्यांना कुठे तरी सुगावा लागलेला असावा .त्यांनी लगेच बोलण्याचा विषय बदलला .थोड्याच वेळात निरोप घेऊन त्याचे टोळके  निघून गेले.ज्यावेळी माझा राग तीव्र होतो त्यावेळी मी काहीतरी अचाट काम करू शकतो असे माझ्या लक्षात आले.माझ्या शक्ती हळूहळू विकसित होत आहेत हे माझ्या लक्षात आले परंतु प्रत्यक्ष जेव्हा वेळ येईल तेव्हा मी कसे संरक्षण देणार होतो ते मला कळत नव्हते .आणि ती वेळ आलीच 

माझ्या मृत्यूला पंधरा दिवस झाले होते .ते झुंबर तुटले याशिवाय अघटित  काहीच घडले नव्हते.परी ट्यूशन वरून घरी जात होती . मी नेहमीप्रमाणे तिच्याबरोबर होतो .मला आज काहीतरी अघटित घडणार आहे असे वाटत होते .पाठीमागून राजनला येताना मी पाहिले .ही गोष्ट मला ठीक वाटली नाही .राजन मोटारसायकल आडवी घालून उभा राहिला .परीला स्कूटर थांबवणे भाग होते .तू मुकाटय़ाने मी सांगतो ते ऐक नाहीतर परिणाम चांगला होणार नाही असे म्हणून त्याने दमबाजीला सुरुवात केली.परीला मी रोज भेटून धीट हो धीट हो म्हणून सांगत होतो.पंधरा दिवसांच्या कराटेचा क्लासने तिला थोडासा आत्मविश्वास आलेला असावा.तिने जरा दरडावून त्याला तू बाजूला हो म्हणून सांगितले .तिचा आवाज ऐकून तो दचकला .परीचा असा करडा स्वर व अविर्भाव त्यांने अजून पाहिला नव्हता.हिला कुणाचे तरी संरक्षण असल्याशिवाय ही असे बोलणार नाही असे त्याला स्वाभाविकपणे वाटले .मी तर तिच्या आसपास नाही ना असेही त्याला वाटले .तरीही उसना धीर एकवटून तो म्हणाला की तो तुझा तो यार गेला ढगात .मी त्याला ढगात पाठविला.त्या दिवशी त्याने माझा अपमान केला त्याचा मी पुरेपूर बदला घेतला .तो आता तुझे संरक्षण करण्याला येणार नाही.तुला मुकाट्याने मी सांगतो तसे वागावे लागेल .परी म्हणाली मी काय करावेअसे तुला वाटते ?  तू उद्या मला शिवाजी गार्डनमध्ये संध्याकाळी आठ वाजता भेटण्यास ये.जर आली नाहीस तर परिणाम चांगला होणार नाही .तिने ठीक आहे येईन उद्या म्हणून सांगितले .आता काहीतरी समरप्रसंग होणार असे वाटत होते .परंतु तो थोडक्यात चुकला .दुसर्‍या  दिवशी काय होणार याची मला धुकधुकी वाटत होती .साडेसात वाजता परी बागेत जाण्यासाठी निघाली .मी तिला तू घाबरू नकोस मी तुझ्या बरोबर आहे असा धीर दिला होता .परंतु वेळ आली तर मी काय करणार होतो ते माझे मलाच माहीत नव्हते .मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की मी तिच्याशी संपूर्ण संपर्क प्रस्थापित करण्यात यशस्वी झालो होतो .बागेत फाटकाजवळ राजन तिची वाट पाहत उभा होता.हिरवळीवर जाऊन बसू असे तो म्हणाला .परीही निमूटपणे त्याच्याबरोबर हिरवळीवर गेली.मी राजनच्या खांद्यावर बसून त्यांच्या बरोबरच हिरवळीवर गेलो .त्याच्या खांद्यावरून जाता जाता माझे हात त्याचा गळा दाबण्यासाठी शिवशिवत होते.हिरवळीवर बसल्यानंतर त्यांने वेगळीच भयानक मागणी परीकडे केली.मी हॉटेलमध्ये खोली बुक करतो एक रात्र तू माझ्या बरोबर काढ मग मी तुला त्रास देणार  नाही वगैरे बडबड त्याने सुरू केली .ते एेकून आकस्मिकपणे परी ताडकन उठून उभी राहिली.तिने त्याचा हात पकडून एकच कराटेचा डाव टाकला.आणि क्षणार्धात राजनला आकाशातील चांदण्या दिसल्या.तिचा तो आवेश चपळाई  धाडस आणि कराटेतील कसब पाहून राजन तर अचंबित झालाच पण मीही अचंबित झालो.पुन्हा माझ्या वाटेला गेलास तर याद राख असा दम देऊन परी तिथून निघून आली.

आजचा दिवस तर निभावला परंतु राजन एखाद्या सापासारखा डूख धरून राहणार होता.फक्त तो केव्हा डसेल व कसा डसेल ते पाहावयाचे होते.दुसऱ्या दिवशी राजनचे टोळके एका गाडीत बसून क्लासच्या बाहेर परीची वाट पहात होते.मी त्यांच्याबरोबरच गाडीत बसलो होतो.आता काहीतरी भयानक घडणार हे निश्चित होते .परी क्लास बाहेर आल्याबरोबर ती स्कूटर सुरू करणार एवढ्यात त्या टोळक्याने तिला उचलून गाडीमध्ये घातले.आणि गाडी गावाबाहेर भन्नाट वेगाने निघाली .परीला काही कळण्या अगोदर तिच्या नाकावर क्लोरोफॉर्मचा रुमाल ठेवण्यात आला आणि ती बेशुद्ध झाली.मी त्यांच्याबरोबरच गाडीत होतो .गावाबाहेर आठदहा किलोमीटरवर राजनच्या वडिलांचे एक हॉटेल होते.गाडी हॉटेलच्या मागच्या बाजूला येऊन उभी राहिली .तिथून परीला तळघरात नेण्यात आले.तिथून सर्व्हिस लिफ्टने तिला दहाव्या मजल्यावर नेण्यात आले.तिथून तिला एका खोलीत नेण्यात आले .सर्व अगतिकपणे पाहत राहण्याशिवाय मला दुसरे काहीही गत्यंतर नव्हते.

थोड्याच वेळात परी शुद्धीवर आली .ते टोळके अश्लील विनोद करीत पेगवर पेग ढोशीत होते .परी शुद्धीवर आली तरी तिचे डोके गरगरत होते .ती अर्धवट शुद्धीवर येऊन या टोळक्याकडे पाहात होती .राजन तिच्याकडे गेला.तिच्या चेहऱ्यावरून  हात फिरवित तो म्हणाला राणी आता तुला कसे काय वाटत आहे ? आता दाखव तुझा कराटेचा डाव .परीने उठण्याचा प्रयत्न केला परंतु क्लोरोफॉर्मच्या अंमलाखाली असल्यामुळे तिला उभे रहाता आले नाही.आता ते टोळके तिच्या गादीवर बसले व तिला नको तिथे हात लावण्यास सुरुवात केली.आता मात्र कडेलोट झाला होता .काय झाले मला माहित नाही .मी एकदम परीच्या शरीरात घुसलो.क्षणार्धात धाडकन मी म्हणजे परी उभी राहिली.आणि मग काय विचारता उचल की आपट उचल की आपट असा एकच धडाका मी सुरू केला.परीचा अंगात आल्यासारखा आवेश आणि एकामागून एक दणका पाहून त्या टोळक्याला प्रतिकार करण्याचे सुद्धा सुचले नाही.त्या चौघांना यथेच्छ बुकलून काढल्यानंतर मी परीला घेऊन खोलीतून बाहेर पडलो .लिफ्टने खाली येऊन मी टॅक्सी केली. तिच्या घरासमोर टॅक्सी थांबवून मी परीला उतरविले .तोपर्यंत ती चांगली शुद्धीवर आली होती .तिचा निरोप घेऊन मी माझ्या घरी परत आलो .अर्थात परीच्या घरी येईपर्यंत मी परीच्या शरीरात होतो हे आपण ओळखले असेलच !

घरी परत आलो आणि मला तिकडे हॉटेलमध्ये काय झाले असेल ते जाणून घेण्याची उत्सुकता लागली .मी लगेच क्षणार्धात हॉटेलमध्ये पोहोचलो .पाहातो तो तिथे रणांगणावर जसे सैनिक आडवे झालेले असतात त्याप्रमाणे ते चौघे जण आडवे आणि बेशुद्ध  झालेले होते.हॉटेलमधील कर्मचारी स्टाफ तिथे जमला होता .राजनच्या वडिलांना कुणीतरी फोन केला होता .राजनचे वडील थोड्याच वेळात तिथे आले.कुणी तरी पोलीस केस करू असे म्हणाले .पण पोलिसांना काय सांगणार हा प्रश्न होता .जर परी तिचे अपहरण व नंतरचा प्रकार पोलिसांना कळला असता तर प्रकरण सर्वच दृष्टींनी दोघांनाही राजन व त्याच्या वडिलांना महाग पडले असते .तेव्हा काहीही न करता त्या सर्वांना हॉस्पिटलमध्ये हलविण्याचे ठरले.सर्व प्रकरण तिथल्या तिथे दाबून टाकण्यात आले .एकाचा पाय फ्रॅक्चर झाला होता .तर दुसऱ्याचा हात फ्रॅक्चर झाला होता .तिसऱ्याच्या डोक्याला फार मार लागल्यामुळे तो बेशुद्ध होता .राजनच्या मणक्याला मार लागला होता .सिटी स्कॅन शिवाय माराचे गंभीर स्वरूप लक्षात येणार नव्हते .एकूण दोन तीन महिन्यांची बेगमी झाली होती .परीने म्हणजे मी त्यांना एवढा हिसका दाखविला होता की त्यानंतरही ते तिच्या वाटेला गेले असते असे नाही.तरीही धोका संपला होता असे नाही .राजन उलटय़ा काळजाचा होता .झालेला अपमान व फजिती त्याला नक्की सलत असणार .परीच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न तो नक्की करणार हे मी त्याच्या पूर्व अनुभवावरून  जाणून होतो

राजन व त्यांचे टोळके  हॉस्पिटल मधून बरे होऊन घरी येईपर्यंत जवळजवळ तीन महिने गेले. आणखी एक दोन महिने  तरी राजन काही हालचाल करणार नाही असा माझा अंदाज होता.त्यानंतर त्याने परी व तिचे कुटुंबीय यांना दगा फटका करण्याचा प्रयत्न नक्की केला असता .तीन चार महिन्यांमध्ये माझी प्रगतीही छान झाली होती .आता कुणाच्याही अंगांमध्ये मी मनात येईल तेव्हा शिरू शकत होतो.माझ्या शक्तीही चांगल्या वाढल्या होत्या .रोज माझी राजनकडे चक्कर असे.त्याचे परीसंबंधी प्लॅन काय आहेत हे मला जाणून घ्यायचे असे. मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की मला काहींच्या मनातील ओळखता येत असे.परी आपली झाली नाही तर ती कुणाचीही होऊ नये असा त्यांचा मानस होता .परीला अपंग करून ठेवायचे किंवा तिला संपवायचे अशी त्याची योजना होती.असे काही करण्या अगोदर त्याला माझा बंदोबस्त करणे भाग होते .त्यासाठी त्याने उत्तर प्रदेशमधून एक मांत्रिक बोलावला होता .वेताळापासून समंधापर्यंत कोणतेही कितीही जहाल भूत असले तरी त्यांचा बंदोबस्त करण्यात तो वाकबगार आहे अशी त्याची ख्याती होती .त्याच्या घरी त्याने प्रवेश केला तेव्हा मी त्याच्या खोलीतच पंख्यावर बसून सर्व काही बघत होतो .

मांत्रिक वस्ताद होता हे नक्की .त्यांच्या घरात शिरताच त्याने इथे काही अनिष्ट शक्ती आहेत हे ओळखले .त्याने हे ओळखले हे मी ओळखले .राजन आरामात कोचावर बसला होता .आत येताच त्याने माझ्याकडे म्हणजे पंख्याकडे दृष्टीक्षेप केला .त्याने मी पंख्यावर बसलेला आहे हे ओळखले .राजनने त्याला मी सतावत आहे असे सांगून माझा बंदोबस्त करण्यास सांगितले .मांत्रिकाने काही तांत्रिक गोष्टी केल्यावर त्याला हे भूत त्रास का देत आहे हे लक्षात आले .त्याने राजनला तुम्ही त्याच्या वाटेला जाऊ नका म्हणजे  तोही तुमच्या वाटेला जाणार नाही असे सांगून समजाविण्याचा प्रयत्न केला .राजन ऐकायला तयारच नव्हता .शेवटी पैशाच्या लालसेने तो मांत्रिक माझा बंदोबस्त करण्यास तयार झाला .त्याने राजन जवळ काही साहित्य मागितले. काही साहित्य त्याच्या जवळ होते.त्याने काही आकृत्या काही मंडळे इत्यादी रचना फरशीवर काढल्या.त्याने पद्मासन घालून मंत्र पठनाला सुरुवात केली. शेजारी एक बाटली त्याने ठेविली होती .मला त्याच्यात बंद करण्याचा त्यांचा इरादा असावा. माझा राग अनावर झाला.मी पंख्यावरून एखाद्या प्रचंड झंझावाता सारखा त्या आकृत्यांवर तुटून पडलो .आणि हा हा म्हणता ते सर्व मंडल वस्तू इतस्ततः उधळून टाकल्या .त्याने राजनला अगोदर तुमच्या घरात यज्ञ केला पाहिजे .घर शुद्ध झाल्यावर तो आत येऊ शकणार नाही.नंतर मी घरात मंत्रसाधना करून त्याला बोलवून आणिन व मग बाटलीत बंद करीन असे सांगितले .

मला एकदा माझी ताकद मांत्रिकापेक्षा जास्त आहे असे वाटत होते .तर दुसऱ्या वेळेला माझी ताकत कमी पडेल की काय असे वाटत होते.मी संभ्रमात होतो .मांत्रिकाची उतरण्याची व्यवस्था आऊट हाऊसमध्ये केलेली होती .मी परीला ही सर्व हकिगत सांगितली . ती म्हणाली की मी एकदा मांत्रिकाला जाऊन भेटते.त्याला सर्व हकीगत सांगते.तो जर चांगला असेल तर तो हे काम करणार नाही .मी मांत्रिकाचा फोन नंबर तिला आणून दिला .तिने मांत्रिकाला भेटण्यासाठी एका जागी बोलाविले. त्याला सर्व हकीगत सांगितली .राजनने माझा खून कसा केला वगैरे  सर्व हकीकत सांगितली.मी तिचे रक्षण कसे करीत आहे .जर मांत्रिकाने माझा बंदोबस्त केला तर ती कशी निराधार होईल वगैरे सर्व खुलासेवार सांगितले . माझा बंदोबस्त करण्याऐवजी राजनचा बंदोबस्त करणे कसे आवश्यक आहे हे ही तिने त्याला समजावून सांगितले .मांत्रिक खरोखरच सज्जन होता .तो तसाच परत यूपीला निघून गेला .ही वेळ निभावली .दुसरा मांत्रिक असाच सज्जन निघेल अशी खात्री नव्हती .मला लवकर काहीतरी करणे भाग होते.

परी जवळ मी जिवंत होतो त्याप्रमाणे गप्पा मारू शकत होतो .ती एकदा तर इतकी भावविवश झाली होती की आत्महत्या करून आपण दोघेही बरोबर राहू असे तिने सांगितले.मी तिला समजावून  सांगितले असे करणे योग्य नाही .जीवन हे जगण्यासाठी आहे .येईल त्या परिस्थितीला धैर्याने तोंड दिले पाहिजे .मृत्यू हे कुठल्याही समस्येवर उत्तर होऊ शकत नाही .तू शीक मोठी हो नंतर तू काय करायचे ते ठरव .हळूहळू तिला माझे म्हणणे पटू लागले होते .माझा समंजसपणाही तिला आवडू लागला होता .मी कुठेही आक्रस्ताळेपणा करीत नव्हतो .

मी बन्याला त्याच्यावरील सर्व जबाबदारी समजावून सांगितली. मोठा हो आई वडिलांना सांभाळ त्यांची आज्ञा पाळ.मला विसरून जा .

मला आई वडिलांनाही भेटावे बोलावे असे वाटत होते .जरी ते शक्य होते तरी त्यामुळे त्यांच्या जखमेवरील खपली निघाली असती.दुःखाची भरत आलेली जखम पुन्हा वाहू लागली असती.त्यामुळे मी त्यांचा दुरूनच नमस्कार करुन निरोप घेतला .

अशा प्रकारे सर्व निरवानिरव करून मी माझ्या अंतिम सूडासाठी तयार झालो .हा सूडही मी नाईलाजाने घेणार होतो .जर राजन झाल्या त्या प्रकारातून धडा शिकला असता तर सूडाची गरजच नव्हती. वडिलांच्या प्रभावाचा उपयोग करून परीशी लग्न करावे व अशा प्रकारे माझ्यावर व परीवर सूड उगवावा असे त्याचे मनसुबे होते .हे सर्व कसे कोण जाणे पण वेळोवेळी  माझ्या लक्षात येत होते . त्याला दोन प्रकारे सजा मला देता आली असती .त्याला अपंग करून कायमचा अंथरुणाला खिळवून टाकणे किंवा मृत्यूदंड .पहिला पर्याय मला ठीक वाटत नव्हता .अपंगावस्थेतही त्याने परीला दगा दिला असता .त्यामुळे दुसरा पर्याय मला शिल्लक राहिला होता .

मलाही इथे फार काळ राहणे शक्य नव्हते अशा प्रकारे अंतिम सूडासाठी मी नाइलाजाने तयार झालो .मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की मला परकाया प्रवेश आता सहज करता येत होता.मी संधीची वाट पाहात होतो .राजन असाच कार घेऊन बाहेर पडला असता मी त्याच्यात प्रवेश केला व त्याचा ताबा घेतला.घाटांमध्ये एका मोठ्या कडय़ावर आणून मी त्याची गाडी उभी केली .तो का मरत आहे हेही त्याला कळणे जरूर होते.हा धडा घेऊन निदान तो पुढच्या जन्मी तरी सुधारावा अशी माझी प्रामाणिक इच्छा होती .मी गाडी अशी उभी केली होती की ती केव्हा घसरून कड्यावरून कोसळेल त्याचा नेम नव्हता .जोपर्यंत राजन काही हालचाल करीत नाही तोपर्यंत तो सुरक्षित होता .जराशी हालचाल आणि मग सर्व काही संपले असत.

मी त्याच्या चुकांचा पाढा वाचला.जर त्याने वेळीच आपल्याला सुधारले असते तर हा प्रसंग त्याच्यावर ओढवला नसता .प्रेम हे एकतर्फी असू शकते.परंतु जर त्याला प्रतिसाद असला तरच ते पुढे न्यावे.प्रेम हे कधीही लादू नये.संपत्ती सामर्थ्य यांच्या जोरावर वाटेल ते मिळविण्याचा प्रयत्न करणे हे चूक आणि घातकही असते.संपत्ती व सामर्थ्य  यांचा उपयोग कल्याणासाठी करावा लोकांचे अकल्याण करण्यासाठी नव्हे.त्याने माझा त्याच्या स्वार्थासाठी लालसेपोटी आणि अहंकारापोटी  खून केला.हकनाक एक उमलते आयुष्य त्याने विझवून टाकले .परीला मग्रुरी पोटी त्रास दिला.तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिच्याजवळ शरीर सुखाची मागणी केली.तिच्यावर व तिच्या वडिलांवर दबाव आणून तिच्याशी लग्न करण्याची  आसुरी इच्छा बाळगली .स्वतःची चूक असतानाही मांत्रिक बोलवून माझा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला .या सर्व गुन्ह्यांना मृत्यू दंडाशिवाय दुसरी कोणतीही एकत्रित शिक्षा असू शकत नाही .

मृत्यू समोर दिसू लागल्यावर त्याने गयावया करायला सुरुवात केली. केलेल्या गुन्ह्याबद्दल माफी मागितली.मला आता जाऊ दे मी मान वर करून कधी परीकडे पाहणारही नाही म्हणून शपथ घेतली.  पण मला त्याचे कुटिल अंतरंग कळत होते .जर यातून सुटलो तर सर्वांवर कसा सूड उगवावा यांच्या योजना त्याच्या मनात चाललेल्या आहेत हे मला कळत होते.माझे कार्य पुरे झाले होते.मला पुढील गतीला जाणे आवश्यक व अपरिहार्य होते . मी मोटार सुरू केली व कड्यावरून उड्डाण केले .मी हवेत तरंगत होतो . दरीतून कार आपटल्याचा आवाज व आर्त किंकाळी आली .उंच ज्वाळा उमटल्या .

(समाप्त )

४/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel