( ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे जिवंत वा मृत व्यक्तींशी याचा संबंध नाही तसे आढळल्यास तो योगायोग समजावा )
रामनगर व कृष्णनगर या दोन शहरांमधील अंतर सुमारे दहा किलोमीटर असावे .या दोन्ही शहरांपासून आठ दहा किलोमीटर अंतरावरून हायवे जात होता.दोन्ही गावे रस्त्याने जोडलेली होती.दहा वर्षांपूर्वी या रस्त्याने दोन्ही शहरांमध्ये रात्रीचीही वाहतूक होत असे.परंतु गेली दहा वर्षे रात्री सातनंतर कुणीही या रस्त्याने जात नसे. रात्रीची रस्त्यावर पूर्ण सामसूम असे.जर यदाकदाचित एखाद्याला एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचे असेल तर हायवे मार्फत प्रवास केला जाई.प्रत्येक गावापासून हायवेपर्यंत दहा बारा किलोमीटर अंतर, हायवेवरील दहा बारा किलोमीटर अंतर, असे एकूण प्रवास पस्तीस किलोमीटरचा होत असे.जवळजवळ साडेतीनपट अंतर हायवे मार्फत पार करावे लागे.
रात्री प्रवास न करण्याचे कारण म्हणजे या रस्त्यावर व आसपास रात्रीची भुते फिरत असतात अशी उठलेली अफवा होय.ही अफवा कुणी उठविली ,का उठविली, केव्हा सुरू झाली,याची नक्की माहिती कोणालाही नव्हती .या डायरेक्ट रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना काही विचित्र अनुभव आले होते .समोरून वाहन येताना दिसणे व ते अचानक नाहीसे होणे.विचित्र पोषाख केलेली माणसे दिसणे .फार उंच किंवा अतिशय ठेंगू अशा माणसांचे थवे दिसणे.या रस्त्यापासून जवळच पूर्वेला असणार्या डोंगरावर पलिते फिरताना दिसणे.डोंगरातून प्रकाश बाहेर येत आहे असे दिसणे,असे काही विचित्र प्रकार दिसल्याच्या अफवा उठल्या होत्या .यातील खऱ्या कोणत्या आणि खोट्या कोणत्या यांचा काहीच पत्ता नव्हता. या रस्त्यावर काही माणसे गायब झाल्याच्या घटना घडल्या होत्या .पोलिसांत तक्रार करूनही त्यांचा तपास लागला नव्हता .काही माणसे गायब होणे ही मात्र सत्य घटना होती .परागंदा झालेल्या माणसानी आपल्या कुटुंबाशी कधीही संपर्क ठेवला नव्हता.
उगीच विषाची परीक्षा नको म्हणून माणसे डायरेक्ट रस्त्याने रात्रीचा प्रवास टाळीत असत .पूर्वेला या डोंगरा पलीकडे एक नदी होती .त्या नदीवर किंवा पलीकडे जाण्यासाठी डोंगराला वळसा मारून दोन्ही शहरांपासून रस्ते होते.त्या रस्त्यावरही भुतांचा रात्रीचा वावर असल्यामुळे रात्री कुणीही त्या रस्त्याने जात नसे.जुनी माणसे या डोंगरावर पांडवानी कोरलेली लेणी आहेत असे सांगत .डोंगरावर घनदाट जंगल असल्यामुळे ती लेणी नक्की कुठे आहेत हे हल्ली कोणालाही माहित नव्हते .म्हाताऱ्या माणसांना तुम्ही ही लेणी पाहिली आहेत का असे विचारले तर ते नाही म्हणून सांगत .त्यांच्या वेळची म्हातारी माणसे असा उल्लेख करीत असत असे त्यांच्या बोलण्यात येई .थोडक्यात ती लेणी कुणी पाहिली नव्हती .त्याचप्रमाणे भुतेही कुणी पाहिली होती ते माहीत नव्हते.लेणी व भुते खरोखरच होती की नव्हती ते त्या लेण्यांना व भुतांनाच माहिती.त्या डोंगरावर आसपासच्या खेड्यातील माणसे लाकूडफाटा तोडण्यासाठी जरूर जात असत .परंतु तीही दिवसाउजेडी घरी येण्याची काळजी घेत असत .
युवराज व संदेश कृष्णनगर या शहरात आले होते.संदेशच्या वडिलांचे मित्र कृष्णनगरमध्ये राहात होते .त्यांना भेटण्यासाठी संदेश जात होता .शनिवार रविवार कोर्ट नव्हते. ऑफिसही बंद असे. संदेशने युवराजांना सहज आउटिंगला येता का म्हणून विचारले व विशेष काही काम नसल्यामुळे युवराजांनी हो म्हटले.ज्यांच्याकडे युवराज आले होते त्यांना(माधवरावाना) रामनगर मधून एक फोन आला.माधवरावांचे स्नेही यशवंतराव अकस्मात आजारी पडले होते .त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. यशवंतराव जरा जास्तच सीरियस असल्यामुळे त्यांना रातोरात भेटण्यासाठी जावे असे माधवरावांनी ठरविले.तुम्ही आराम करा मी जाऊन लगेच परत येतो .सकाळी आपण गप्पा मारू असे म्हणून माधवराव निघाले .
माधवराव निघताना त्यांच्या बायकोने त्याना हायवेवरूनच जात आहात ना? असे विचारले.त्यांनी अर्थातच डायरेक्ट रस्त्याने मी कसा काय जाईन व मी म्हटले तरी ड्रायव्हर तिकडून कशी काय गाडी नेईल असे उत्तर दिले.माधवराव त्याच्या मित्राला भेटण्यासाठी निघून गेले .नंतर संदेशने काकूंना कुतुहलाने विचारले की डायरेक्ट रस्त्याने न जाता हायवेवरून जात आहात ना असे तुम्ही का विचारले.तेव्हा काकूनी डायरेक्ट रस्त्याने कुणीही रात्रीचा का जात नाही त्याबद्दलची माहिती दिली .जिथे वीस पंचवीस मिनिटात सहज पोहोचता येईल तिथे लांबच्या रस्त्याने तास सव्वातास खर्च करून जाण्याचे प्रयोजन दोघांनाही पटले नाही .
युवराजांनी संदेशबरोबर उद्या त्या रस्त्याने जाऊन रस्ता डोंगर नदी यांची पहाणी कुतूहल म्हणून करण्याचे ठरविले .दुसऱ्या दिवशी सकाळी माधवरावाना त्यांनी आम्ही जरा भटकून येतो म्हणून सांगितले.माधवरावांनी त्यांना कुठे म्हणून विचारता त्यांनी त्यांचा उद्देश सांगितला .माधवराव त्यांच्याबरोबर परिसर दाखवण्यासाठी निघाले .रस्ता डोंगरापर्यंतचे माळरान डोंगर त्यापलीकडची नदी हा सर्व प्रदेश माधवरावांनी दाखविला .दिवसा या प्रदेशात भटकण्यात कुठलीही भीती नाही मात्र रात्री या बाजूला कुणीही येत नाही असे आवर्जून सांगितले .
डोंगरावर दाट झाडी होती .मधूनमधून असंख्य झुडपे वेली करवंदीच्या जाळी वगैरे वाढलेल्या होत्या .त्यातूनच काही पायवाटा गेलेल्या होत्या .या झुडपा मागे एखादी चोरवाट लेणी असू शकतील असे दोघांनाही वाटले.माहितगार माणसाशिवाय डोंगरांवर हिंडणे व अशा चोरवाटा शोधून काढणे कठीण आहे असे दोघांचेही मत पडले .डोंगरांमध्ये जुने लोक सांगतात त्याप्रमाणे लेणी आहेत का? याची चौकशी पुराणवस्तू संशोधन खात्याकडे केली पाहिजे असे युवराज संदेशजवळ म्हणाले.नदीकडील बाजूने हिंडताना तिकडून एखादी चोरवाट असू शकेल असे दोघांनाही वाटले.
युवराज व संदेश यांच्या संशयी स्वभावाप्रमाणे नदीतून आक्षेपार्ह वस्तू दारूगोळा हत्यारे मादक पदार्थ ही आणून डोंगरांमध्ये कुणालाही न कळता लपविता येणे शक्य आहे असे दोघांचेही मत पडले .हा सर्व व्यवहार रात्रीचा चालत असावा आणि म्हणूनच भुतांची अावई त्या लोकांनी उठविली असावी.प्रत्यक्षात भूत वगैरे काहीही नाही असेही असू शकते असे युवराज म्हणाले.त्यावर माधवरावांनी तुम्ही शहरातील लोक त्यातही वकील व डिटेक्टीव प्रत्येक गोष्टींकडे नास्तिकतेने व संशयाने पाहता असा रिमार्क मारला .त्यावर सर्वानीच खदखदून हसून त्यांच्या बोलण्याला संमती दर्शविली .
युवराज व संदेश कृष्णनगरहून परत आले तरीही तो डोंगर, ती नदी, ते माळरान,तो डायरेक्ट दोन्ही शहरांना जोडणारा रस्ता, युवराजांच्या डोक्यातून जायला तयार होईना.दोन दिवसांनी त्यांनी पुराणवस्तू संशोधन खात्यातील त्यांच्या एका मित्राला फोन लावला .युवराजांनी त्याला आपण बरेच दिवसात भेटलो नाही तरी तू केव्हा मोकळा आहेस मला तुझ्याजवळ मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत असे सांगितले .त्यांचा मित्र सुधांशु युवराजांना पुरेपूर ओळखून होता .त्याने युवराजांना तुम्ही मला सहज बोलाविलेले नाही तुमचा काही तरी अंतस्थ हेतू असावा असे म्हटले.त्यावर युवराजाला असेच काही नाही असे म्हणून मनमोकळे हास्य केले.त्यावर सुधांशूने असेच काही नाही असेही नाही असा रिमार्क मारला.दोन दिवसांनी शनिवारी रात्री सुधांशु युवराजांच्या घरी आला.युवराजांनी त्याला जेवणासाठी बोलाविले होते .
फार दिवसांनी दोघेही भेटत होते.अनेक विषयांवर त्यांच्या गप्पा चालल्या होत्या .त्यामध्ये राजकारणापासून युवराजांनी सोडविलेल्या अवघड केसेस पर्यंत सर्व काही होते .युवराजांनी सोडवलेल्या गूढ केसेसबद्दल गप्पा चाललेल्या असताना युवराजांनी आपल्या गप्पांची गाडी हळूच रामनगर व कृष्णनगर या शहरांकडे वळविली.या शहरांना जोडणारा रस्ता डोंगर त्यापलीकडील नदी व युवराजांना आलेला संशय त्यांनी सुधांशु जवळ बोलून दाखविला.भुताच्या तथाकथित अफवेबद्दलही त्यांनी त्याला सविस्तर सांगितले. त्यामुळे रात्रीचा कुणीही त्या रस्त्याने प्रवास करीत नाही हेही सांगितले .त्याचप्रमाणे रात्री त्या रस्त्याने प्रवास करताना किंवा परिसरात हिंडताना काही माणसे गायब झाल्याचेही सांगितले .सुधांशूने त्यांना मी जुने रेकॉर्ड बघून तुम्हाला^ आमच्याजवळ असलेली सर्व माहिती देतो असे सांगितले.भुताच्या अफवेबद्दलही त्यांनी त्याला सविस्तर सांगितले.
दुसऱ्या दिवशी त्यांनी शामरावांना फोन केला.त्यांना हॉटेलमध्ये रात्री जेवणासाठी येण्याचे निमंत्रण दिले .जेवताना अनेक विषयांवर गप्पा मारीत असताना त्यांनी रामनगर कृष्णनगर व तेथील परिसर याबद्दलच्या अफवा व त्याना आलेला संशय शामरावाना सांगितला.
दोन दिवसांनी सुधांशूंचा युवराजाना फोन आला. त्याच्याजवळ उपलब्ध असलेली बरीच माहिती त्याने दिली.नंतर युवराजांनी शामरावांना फोन लावला.
शामराव युवराज व सुधांशू यांनी भुताचे रहस्य उलगडण्याची एक योजना आखली .
( क्रमशः)
२/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन