(ही कथा काल्पनिक आहे वास्तवाशी कुठे साम्यआढळल्यास तो योगायोग समजावा)
सकाळचे दहा वाजले होते .बँकेचे असिस्टंट मॅनेजर आले व त्यांनी किल्ल्या प्यूनजवळ दिल्या.बँकेचे कुलुपावरील सील तोडून कुलूप काढून शटर्स वर करून बँक उघडण्यात आली.
बॅंक झाडण्याला पुसण्याला साफसफाई करण्याला सुरुवात झाली.बँक बरोबर साडेदहा वाजता सुरू होत होती. बँकेचे एकेक कर्मचारी येण्याला सुरुवात झाली होती .सेफ डिपॉझिट व्हॉल्ट रूम उघडण्यासाठी दोन किल्ल्यांची गरज लागे.एक किल्ली कॅशियरकडे असे तर दुसरी मॅनेजरकडे . कॅशिअर मॅनेजर येण्याची वाट पाहात होते.तिजोरीमधून दोघांच्या देखरेखीखाली कॅश काढून ती बाहेर वेळेवर नेणे गरजेचे होते .बँकेत हळूहळू ग्राहकांची गर्दी जमू लागली होती.एवढ्यात घाईघाईने मॅनेजर आले .मॅनेजर व कॅशियरने आपआपल्या किल्ल्या प्यूनजवळ दिल्या मॅनेजर कॅशियर व प्यून तिजोरी असलेल्या स्ट्राँग रूमकडे चालू लागले .खोली उघडण्यात आली तिजोरीही उघडण्यात आली आणि तिघेजण आश्चर्यचकित झाले .तिजोरी रात्रीत कुणीतरी अक्षरशः साफ केली होती.मॅनेजरचा हात इमर्जन्सी बेलवर गेला परंतु बेल वाजली नाही कुणीतरी कनेक्शन तोडून टाकले होते .
पोलिसांना फोन करण्यात आला .तिजोरीच कुणालाही न कळता धुतली असे म्हटल्यावर शामरावसह निवडक पोलिसांचा ताफा बँकेत आला.शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वत्र तलाशी व जाबजबाब सुरू झाले.तिजोरी व सेफ डिपॉझिट व्हॉल्टस ज्या स्ट्राँग रुममध्ये होते त्या खोलीची तपासणी करताना एका भिंतीला पडद्यामागे एक मोठे भगदाड पडलेले आढळून आले . समोरच वाकून जाता येईल असे एक भुयार होते .त्यातून बॅटरीचा प्रकाश पाडीत शामराव व काही पोलीस बाहेरून बंद असलेल्या एका गाळ्यात आले . बाहेरून येऊन पाहता त्या गाळ्यावर भारत इम्पोर्ट एक्स्पोर्ट कंपनी अशी पाटी होती. तो गाळा कुणाचा हे शोधणे आवश्यक होते .बिल्डिंगचे मालक दयारामजी यांच्या मालकीचा तो गाळा होता .त्यांच्याकडे चौकशी करता तो गाळा त्यांनी सुधाकर नावाच्या एका इसमाला भाड्याने दिलेला होता.त्याला भाड्याने देताना सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता केलेली होती .पोलिसांनाही भाड्याने दिल्याबद्दल कळविलेले होते.परंतु त्यांनी तिथे जाऊन खात्री करून घेतली नव्हती .एक रूटीन गोष्ट म्हणून तिकडे दुर्लक्ष झाले होते. सुधाकरच्या पत्यावर जाऊन पाहता तो पत्ता खोटा होता असे आढळून आले .
शेवटी पोलिसांनी पंचनामा करून गाळ्याचे कुलूप तोडले व गाळा उघडला.गाळ्यामध्ये बाहेर ऑफिस सारखी रचना होती.आतल्या खोलीमध्ये पोती रचून ठेवलेली होती .तिथेच खोदकामाचे सर्व साहित्य ठेवलेले होते .भुयाराला सुरुवात तिथंच होत होती .ते भुयार भारत बँकेच्या स्ट्राँग रूमच्या खोलीत उघडत होते .प्रत्यक्षात खोट्या नावाखाली गाळा कुणी भाड्याने घेतला ते शोधल्याशिवाय या दरोड्याच्या व्यक्तींपर्यंत पोहोचता येणार नव्हते .त्याशिवाय गेलेली रक्कम व सोने सापडणे शक्य नव्हते.सुमारे दहा कोटी रोख रक्कम व पंधरा कोटींचे गहाण ठेवलेले सोने चोरीला गेले होते.बँकेला पंचवीस कोटी रुपयांचा फटका बसला होता .केस जितक्या लवकर सुटेल तितक्या लवकर पैसे हाती लागण्याचा संभव होता .अपराध्यांना शक्य तितक्या लवकर पकडण्याची गरज होती.
गुन्ह्यांची वाढती संख्या पोलिसांजवळ असलेले अपुरे दळ पोलिसांना अनेक ठिकाणी लक्ष देण्याची गरज हे लक्षात घेता खासगी गुप्तहेराची मदत घेण्यात कोणतीच अडचण नव्हती .शामरावांनी क्षणात विचार करून युवराजांची मदत घेण्याचे निश्चित केले.युवराज नेहमीच वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करीत असत.त्यांची अंत:प्रेरणा बऱ्याच वेळा गुन्हेगारांवर नेमके बोट ठेवीत असे असा आतापर्यंतचा अनुभव होता .
संदेशचे गुन्हेगार विश्वामध्ये खबऱ्यांचे उत्कृष्ट प्रकारचे जाळे होते .त्याचा नेहमीच फायदा होत असे .शामरावानी युवराजांना फोन लावला.जर त्यांना शक्य असेल तर संदेशसह गुन्ह्याच्या जागी भारतबँकेवर येण्यास सांगितले.थोड्याच वेळात युवराज संदेशसह तिथे पोचले.
युवराज व संदेश यांनी गाळा,भुयार, तिजोरीची जागा,सर्व व्यवस्थित पाहिले .संदेशला त्यांनी पुढील चौकशी करण्यास सांगितले .
१ शेजारच्या गाळेवाल्यांकडे व रखवालदारांकडे चौकशी करून येथे कोण केव्हा येते जाते त्याची माहिती गोळा करणे
२ बँकेच्या व गाळ्यांच्या बाहेरच्या बाजूला बिल्डिंगवर बसविलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज मिळवून त्यातून या गाळ्यामध्ये कोण येते जाते ते कळते का?ते पहाणे
३ गाळा भाड्याने घेण्यासाठी जो आला होता त्याचा फोटो सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न करणे
४ गुन्हेगारांच्या जगात कुणी जास्त खर्च करीत आहे का? त्याचा अंदाज घेणे.
५ बॅंकेवर कुणी डल्ला मारला त्याबद्दल काही कुजबूज गुन्हेगारी विश्वात होत आहे का ?
थोडक्यात ज्यानी बँकेवर दरोडा घातला त्यांच्यापर्यंत शक्य तितक्या लवकर पोचता आले पाहिजे.
दोन दिवसात संदेशने युवराजांना पुढील माहिती दिली .
१ येथे फक्त रात्री टेम्पो येतो व जातो.टेम्पोतून माल उतरवला जातो व पुन्हा चढवला जातो .मालाचे स्वरूप काय आहे ते माहित नाही .
२बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दरोडेखोरांनी बुरखे घातलेले असल्यामुळे काहीही माहिती कळू शकली नाही .
इमारतीच्या बाहेर बसविलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये टेम्पो व त्याचा नंबर दिसला परंतु आत येणारे व जाणारे यांचे चेहरे आढळले नाहीत.नंबरवरून टेम्पो व त्याचा मालक यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता नंबर खोटा होता असे आढळून आले .
३गाळा भाड्याने सहा महिन्यांपूर्वी देण्यात आला होता दयारामजींकडे अनेक लोक येत जात असल्यामुळे त्यातून भाड्याने घेण्यासाठी कोण आला होता त्याची माहिती कळू शकली नाही .
४ गुन्हेगारांच्या जगांमध्ये सरजू व बिरजू हे जरा सढळ हाताने खर्च करीत आहेत असे आढळून आले .परंतु त्यांनी कुठे तरी बऱ्यापैकी मोठा डल्ला मारला म्हणजे ते नेहमीच तसा खर्च करीत असतात असे समजले .
५ खबऱ्यांकडून बिरजू सरजू हे काहीतरी मोठा प्लॅन आखत आहेत किंवा त्यांचा प्लॅन बहुधा यशस्वी झालेला आहे अशा प्रकारची माहिती मिळाली .
एकंदरीत विशेष प्रगती झाली नव्हती .तपासाची गाडी जिथे होती तिथेच होती .तपास करता असे आढळून आले की बिरजू व सरजू हे भुरटे चोर आहेत .स्त्रियांच्या गळ्यातील मंगळसूत्र व साखळ्या उडविणे पाकिटे मारणे गाडया चोरणे अशा गुन्ह्यांमध्ये दोघेही तरबेज आहेत. दोघेही सतत एकमेकांबरोबर असतात .त्यांनी एवढी मोठी योजना आखून ती यशस्वी केली असेल असे वाटत नाही .मुख्य प्रश्न सोने कुठे गेले? पैसे कुठे गेले? त्याचा शोध लागला असता की गुन्हेगारांचा शोध लागला असता .किंवा गुन्हेगार सापडले असते की मालही सापडला असता .
युवराजांनी संदेशाला बिरजू व सरजू यांच्यावर सतत लक्ष ठेवण्यास सांगितले.
युवराजांची अंत:प्रेरणा सरजू व बिरजू यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे असे सांगत होती .त्याचप्रमाणे ज्या दिवशी दरोडा पडला त्या दोन दिवसात बिरजू व सरजू कुठे होते त्याचाही तपास करण्यास सांगितले .
बिरजू व सरजू यांची जास्त माहिती गोळा करण्यास सांगितले. आणखी कुणी संशयीत वाटल्यास त्याचीही संपूर्ण माहिती गोळा करण्यास सांगितले .
संदेशने त्या दोघांबद्दल पुढील माहिती गोळा केली.
बिरजू व सरजू यांची अगदी दाट मैत्री होती .ब्रिजमोहन उत्तर प्रदेशीय तर सर्जेराव महाराष्ट्रीय तरीही त्यांची दाट मैत्री होती .दोघांनी हातात हात घालून शाळा सोडली.शाळेला रामराम ठोकला.बिरजू नावाला उत्तर प्रदेशीय होता .त्याच्या दोन पिढ्या महाराष्ट्रात गेल्यामुळे तो आता महाराष्ट्रीयनच झाला होता.तो मराठी शाळेतच सरजू बरोबर होता .
दोघांनी शाळा जशी बरोबरच सोडली तशी बरोबरच गुन्ह्याला सुरुवात केली .
गळ्यातील मंगळसूत्र सोनेरी साखळी उडविण्यात दोघांचा हातखंडा होता .बिरजू मोटारसायकल चालवीत असे तर सरजू पाठीमागे बसून शिताफीने हेरलेल्या सावजाच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा जे काही असेल ते उडवीत असे.
तीच गोष्ट पाकीटमारीची .बिरजू नखामध्ये ब्लेड ठेवून खिसा सफाईने कापीत असे .हातात पाकीट आल्यावर ते लगेच दुसऱ्याकडे सरकवण्यात दोघेही माहीर होते .
बँकेमध्ये लक्ष ठेऊन पैसे भरायला आलेल्या लोकांचे किंवा ज्यानी पैसे बँकेतून काढले त्यांचे पैसे निरनिराळया क्लुप्त्या लढवून उडविण्यात दोघेही कुशल होते .
त्याचप्रमाणे स्कूटर मोटरसायकल किंवा मोटार डुप्लिकेट किल्ली वापरून पळविण्यात आणि तिची योग्य ठिकाणी विल्हेवाट ते अधूनमधून रुचीपालट म्हणून करीत असत .परंतु त्यात धोका जास्त असे .
यामध्ये केव्हाना केव्हा पोलिसांचा तगडा हात त्याच्या खांद्यावर आणि केव्हा केव्हा गालावर पडत असे !किरकोळ गुन्ह्यांमध्ये आतबाहेर करणे त्यांच्या नेहमीच सवयीचे होते.
या सर्वातून मिळणारा पैसा, करावे लागणारे कष्ट, घ्यावा लागणार धोका, यांचा विचार करता एकदाच परंतु तगडा हात मारावा आणि मग या सर्व उद्योगाचा त्याग करून जंटलमन्स आयुष्य घालवावे असे दोघांनाही वाटत होते .अशा प्रकारे त्यांनी बोलताना काही जणांनी ऐकले होते .त्यावरून त्यांच्यावरील संशय जास्त गडद होत होता.
अर्थात आणखी कुणी नसेलच असे सांगता येत नव्हते .या दोघांमध्ये एवढी नियोजन क्षमता व नियोजन यशस्वीपणे राबविण्याची क्षमता असेल कि काय असा संशय होता .
आणखी एक प्रश्न उभा रहात होता.स्ट्राँगरूमचा दरवाजा तोडण्यात कापण्यात आला नव्हता. त्याचप्रमाणे तिजोरीही कापण्यात आली नव्हती.या दोन्ही उघडण्यासाठी दोन दोन किल्ल्या लागत असंत.या डुप्लिकेट किल्ल्या कशा तयार केल्या .बँकेतील कुणाचा या दरोड्यामागे हात आहे का ?याचाही तपास करणे अत्यावश्यक होते.
(क्रमशः)
६/७/२०१९©प्रभाकर पटवर्धन