(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
सकाळचे आठ वाजले होते नानासाहेब बगीच्यामध्ये पेपर वाचत बसले होते.थंडीचे दिवस होते. कोवळे ऊन पडले होते .बगीचाला माळी पाणी घालीत होता .त्यांच्या पत्नी माईसाहेब हातात फुलांची परडी घेऊन फुले काढीत होत्या.फुले काढणे गंध उगाळणे देवाची पूजा करणे यामध्ये त्यांचा वेळ छान जात असे.
एवढ्यात फाटकामधून मोटार आत आली व पोर्चमध्ये थांबली .त्यातून त्यांचा मुलगा मोहन उतरून बंगल्यात गेला.रविवार सोडला तर तो रोज सकाळी जीममध्ये जात असे.स्नान नाष्टा वगेरे करून तो बरोबर दहा वाजता फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी निघे.त्याची पत्नी घर फारच चतुराईने सांभाळत असे .घर सांभाळून अश्विनी बँकेतही नोकरी करीत असे. मोहन व अश्विनी जातीने नानासाहेब व माईसाहेब यांच्याकडे लक्ष देत असत.
त्यांची मुलगी शशी व मुलगा मोहन दोघेही त्यांच्या व्यवसायाचा व्याप समर्थपणे सांभाळीत.बहिण भावांमध्ये लहानपणापासून प्रेम होते.त्यांचे कुटुंब आदर्श चौकोनी आता षटकोनी होते .सूनबाई व जावई हे उरलेले दोन कोन. मोहन व अश्विनी आणि शशी व शशांक यांचा प्रेमविवाह होता .
नानाच्या मनात जरी काही वेगळेच विचार असले तरी त्यांनी कधीही दोघांनाही उगीचच अटकाव करण्याचा प्रयत्न केला नव्हता .
नानांचे पेपर वाचनात लक्ष नव्हते .ते आपल्या विचारात हरवले होते .ऊन तापू लागले होते .त्याचे नानाना भान नव्हते.माळी आला आणि त्याने छत्री सूर्याच्या दिशेने फिरविली तिकडे नानासाहेबांचे लक्षही नव्हते .
तीस वर्षांपूर्वीची गोष्ट त्या वेळी नाना पस्तीस वर्षांचे होते .एक यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांचा नावलौकिक होता .वडिलांचा उद्योग त्यांनी समर्थपणे विस्तारला होता .पंचविसाव्या वर्षी त्यांचे माईशी लग्न झाले.त्यांच्या पायगुणाने म्हणा किंवा नानांच्या कर्तृत्वाने म्हणा व्यवसाय चांगलाच फोफावला होता .दोन वर्षातच त्यांना शशी झाली .तिचाही पायगुण चांगला असावा .ती देखणी हुषार व चुणचुणीत होती.त्यावेळी ती तिसरीत होती.
नानाना म्हटले तर एकच दुःख होते .माईना आता दुसरे मूल होऊ शकणार नव्हते .शशीच्या वेळीच डॉक्टरानी नानांना त्याची कल्पना दिली होती. वास्तवाचा त्यांनी स्वीकार केला होता .एखाद्या हुषार चुणचुणीत मुलाला घरजावई करून घेऊ म्हणजे तो आपला व्यवसायही सांभाळील ,आपली एकुलती एक लाडकी मुलगी आपल्याजवळ राहील आणि आपल्याला म्हातारपणी आधारही होईल अशी त्यांची योजना होती .एखाद्या गरीब हुषार मुलाला घरी आणून ठेवावे. त्याला तो म्हणेल तेवढे शिक्षण द्यावे .त्याचा सर्व खर्च करावा.आणि शशीचे लग्न त्याच्या बरोबर लावून त्याला घरजावाई करावा अशी त्यांची योजना होती .गरीब हुषार चुणचुणीत मुलगा अजून त्यांच्या नजरेत येत नव्हता .आपल्या मनातील हे विचार नानांनी माईंजवळ बोलून दाखविले होते.
त्यांच्या मनातील विचाराला आकार मिळेल अशी संधी त्यांना लवकरच चालून आली .शालांत परीक्षेमध्ये पहिले जे दहा जण आले त्यांचा सत्कार एका सेवाभावी संस्थेने आयोजित केला होता. त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले होते .नानासाहेब नेहमीच गरीब विद्यार्थ्यांना व निरनिराळ्या सेवाभावी संस्थांना मदत करीत असत .
बक्षीस वाटप करीत असताना शालांत परीक्षेमध्ये जो पहिला आला होता त्यानेच नानांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रम संपल्यावर त्यांनी संस्थाप्रमुखांकडे त्या मुलाची जास्त खोल चौकशी केली .त्याला त्यांनी बोलावून घेतले .त्याच्याशी सहज म्हणून बरीच चौकशी केली .गप्पा मारल्या. त्याला पुढे काय व्हायचे आहे तेही विचारले . त्याला पुढे खूप शिकण्याची इच्छा होती परंतु आर्थिक सामर्थ्य नसल्यामुळे तो कुठे तरी नोकरी बघणार होता .त्याच्याशी बोलताना त्याची हुषारी, त्याची महत्त्वाकांक्षा , त्याचा नम्रपणा, नानासाहेबांसमोर न घाबरता नम्रपणे योग्य उत्तरे देण्याची हातोटी, या सर्वांनी नाना प्रभावित झाले. त्याचे आई वडील अतिशय गरीब होते .पाच मुलातील हा तिसऱ्या नंबरचा होता .कितीही हुषार असला कितीही इच्छा असली तरी त्याला पुढे शिकविणे त्याच्या वडिलांना शक्य नव्हते . त्यांनी त्या मुलाला (मोहनला) त्याचा पत्ता त्यांच्या डायरीत लिहून देण्यास सांगितले.त्याचे हस्ताक्षर अत्यंत वळणदार व देखणे होते.
दुसऱ्या दिवशी नाना त्या मुलाच्या घरी गेले.नानाना त्या मुलाच्या वडिलांना बोलवून घेता आले असते.परंतु नानाना त्या मुलाचे आई वडील त्यांची संस्कृती राहणीमान घरातील एकूण वातावरणच पाहावयाचे होते.त्यांच्या घरातील स्वच्छता टापटीप लहानश्या जागेत सर्व वस्तू नेटकेपणाने ठेवण्याची शिस्त यांनी नाना चांगलेच प्रभावीत झाले.
चार दिवसांनी त्यानी त्याच्या वडिलांना आपल्या घरी बोलावून घेतले.मुलाच्या शिक्षणाचा सर्व खर्च मी करीन परतु त्याने माझ्याकडे येऊन राहिले पाहिजे .माझा त्याला दत्तक घ्यायचा विचार आहे असेही त्यांनी सांगितले .आमच्याकडे राहू दे,रूळू दे, तूर्त ग्रह व्यवस्थित नाहीत, काही वर्षांनी मी त्याला दत्तक घेईन असे सांगितले .अश्या प्रकारे मोहन त्यांच्याकडे राहायला आला.जरी त्याला दत्तक घेईन असे सांगितले असले तरी नानासाहेबांच्या मनात त्याला दत्तक घ्यायचे नव्हते.तो हळूहळू घरात रुळेल त्याला अापण दत्तक घेणार आहोत हे सर्व विसरतील.अश्विनी व मोहन एकत्र वाढतील त्यांच्यामध्ये केव्हा ना केव्हा नाजूक प्रेमसंबंध निर्माण होतील .आणि आपण त्याला घरजावई करून घेऊ असा त्यांचा मनसुबा होता .
प्रत्यक्षात वेगळे काही घडले .अश्विनी तिच्या मैत्रिणीकडे भाऊबीज राखी पौर्णिमा इत्यादी सण पाहात होती .तिलाही एक भाऊ हवा होता .मोहन घरी आल्यापासून तिने त्याला दादा म्हणून हाक मारण्याला सुरुवात केली.भाऊबिजेला त्याला ओवाळण्याचा हट्ट धरला.नानाना नाही म्हणणे शक्यच नव्हते.राखी पौर्णिमेला तिने त्याला राखी बांधण्याचा हट्ट धरला .त्यांच्या घरात तो त्यांचा मुलगा म्हणून सामावून गेला .शेवटी त्यांनी त्याला दत्तक घेतला .
यथावकाश शिक्षण पुरे झाल्यावर मोहन नानांना त्यांच्या व्यवसायात साहाय्य करू लागला .त्याच्याकडे सर्व कामाची धुरा सोपवून नानासाहेब निवृत्त झाले . अश्विनी बरोबर त्याचा विवाहही झाला .शशीने शशांकला जोडीदार म्हणून निवडले.शशी मोहनच्या बरोबर नानासाहेबांचा व्यवसायाचा व्याप समर्थपणे सांभाळू लागली.
सून अश्विनी सद्गुणी होती . मोहनही नानाना वडिलांप्रमाणे मान देत होता .किंबहुना तो त्यांना आपले वडीलच मानीत होता .
नानांना घरजावई पाहिजे होता. आपली मुलगी जवळच राहावी असे वाटत होते.
*ती गोष्ट काही शक्य झाली नाही .
*त्यांना अश्विनीच्या रूपाने दुसरी मुलगी मिळाली .
*मोहनच्या रूपाने मुलगा मिळाला.
* शशांकच्या रूपाने मनासारखा जावई मिळाला
*शशी तर त्यांची प्रत्यक्ष मुलगीच होती .
*मनासारख्या दोन सुहृदांच्या ठिकाणी त्यांना चार सुहृद मिळाले .
*सुख दोन्ही हातांनी त्यांच्या घरी पाणी भरत होते
* नानासाहेब कितीतरी वेळ आपल्या भूतकाळातील आठवणीमध्ये हरवले होते .
माई त्याना नाष्ट्याला चला म्हणून हाक मारीत होती. परंतु त्यांचे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते .ते आपल्या आठवणींमध्ये रमले होते .
माईने शेवटी त्यांना हलवून त्यांच्या विचारातून बाहेर काढले.
*आपल्याशीच खुषीचे स्मित करीत नानासाहेब बंगल्याकडे चालू लागले .*
७/९/२०१९©प्रभाकर पटवर्धन