(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

त्या शिक्षकांमुळेच तिला आपला मुलगा सतत तीन वर्षे  शाळेत येत नव्हता ही माहिती कळली.शेवटी तिचा मुलगा सुधीर सातवीला नापास झालेला आढळून आला.

याचा अर्थ तेव्हापासून गेली तीन वर्षे तो शाळेत जाण्याचे केवळ नाटक करीत होता

ही सर्व हकिगत ऐकल्यावर तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली .तिला खोट्याची फार चीड होती. समोर जर मुलगा असता तर तिने त्याला  फोडून काढले असते.दुसऱ्या क्षणी तिला आपला मुलगा घरी आलेला नाही याची आठवण झाली .आत्तापर्यंत तिला आपला मुलगा एखाद्या मित्राबरोबर असेल असे वाटत होते .अपघात तर झाला नाही ना म्हणून थोडीशी चिंताही वाटत होती .आता अपघाताबरोबर त्याने जीव तर दिला नाही ना या काळजीची भर पडली.तिचा धीर सुटला.ती मटकन् खाली बसली.

ऑफिस बंद होण्याची वेळ झाली .बाई तुम्ही नातेवाईकांकडे चौकशी करा .त्याच्या मित्रांकडे चौकशी करा .सापडला नाही तर पोलीस कंप्लेंट द्या.अपघात झाला असेल तर पोलिसांना त्याची माहिती असेल .तुमच्या मिस्टरांना फोन करून सांगा.इथे नुसते बसून काय करणार ?असे तिला सर्वांनी समजावून सांगितले .

शेवटी घरी जाऊन तो घरी आला असेल तर पहावे.आला नसेल तर नवऱ्याला फोन करावा.असा विचार करून ती हळूहळू घराच्या दिशेने परत निघाली .

घरी जाताना वाटेत एका मूर्तीकाराचे दुकान होते .निरनिराळ्या देव देवता, भारतातील जुने व हल्लींचे  प्रसिद्ध पुढारी,लेखक कवी नाटककार अश्या प्रसिद्ध व्यक्ती,जगप्रसिद्ध व्यक्ती,यांच्या लहान मोठ्या मूर्ती तिथे तयार केल्या जात .शेजारीच एक गाळा होता.त्यात या मूर्ती विकण्यासाठी ठेवलेल्या असत .प्रसिद्ध मूर्तिकार जगन्नाथ  यांचे ते दोन्ही  गाळे होते.ते शाडूपासून मूर्ती बनवीत त्याचप्रमाणे साचे तयार करून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करीत.तिथेच पाठीमागे त्यांचे घर होते .धातूच्या ओतीव मूर्तीही ते करीत असत.

त्यांच्या मूर्ती इतक्या सुबक व देखण्या असत की येणारा जाणारा रस्त्यात  जरा थांबून वेळ असेल त्याप्रमाणे  तिथे रेंगाळून त्या पाहिल्याशिवाय पुढे जात नसे.दुकानासमोर कुणाचाही पाय अडखळत असे.कमला त्या दुकानाकडे पाहत जात असताना तिला चक्कर आली.सकाळपासून तिच्या पोटात अन्न गेले नव्हते.दुपारपासून ती पाणीही प्यायली नव्हती .त्यात तिची घरापासून शाळा व शाळेपासून परत अशी चाल  झाली.वर मुलाचे काय झाले असेल असे टेन्शन.रस्त्यात पडता पडता तिने स्वतःला जेमतेम सावरले आणि ती त्या दुकानाच्या ओट्यावर बसली.

दुकानाचे मालक जगन्नाथ यांनी तिला पडताना बघितले आणि ते बाहेर धावत आले.त्यांनी तिला आधार दिला व दुकानात नेऊन बसविले .पाणी पिऊन ती जरा सावध झाल्यावर त्यांनी तिला तुम्ही कोण वगैरे चौकशी केली.तिला कुणाला तरी आपले दुःख सांगायचेच होते.तिने भडाभडा आपली सगळी कहाणी सांगितली .

जगन्नाथनी तिला तुमच्याजवळ मुलाचा फोटो आहे का म्हणून विचारले.सुदैवाने तिच्या मोबाइलमध्ये सुधीरचा फोटो होता .तो फोटो बघताच ते म्हणाले या मुलाला मी ओळखतो.हा मुलगा येता जाताना रोज माझ्या दुकानासमोर उभा राहून मी मूर्ती कशा तयार करतो ते निरखीत असे .एक दिवस त्याने धीर करून मला विचारले .मी एखादी मूर्ती करून पाहू का ?मी होय म्हणताच त्याने एका स्त्रीची मूर्ती तयार केली .त्याचे ते कौशल्य पाहून मी थक्क झालो.तेव्हापासून तो माझ्या दुकानात काम करतो .रोज सकाळी अकराच्या सुमारास तो दुकानात येतो व संध्याकाळी सहाच्या सुमारास परत जातो .आजच तो दुकानात आलेला नाही .कमलाने आनंदीत होउन त्यांना त्या मुलाचे नाव विचारले.सुधीर असे ऐकताच तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले .तिने हा माझाच मुलगा म्हणून सांगितले .

परंतु सुरुवातीचा प्रश्न सुधीर कुठे आहे ?तो तसाच होता.जगन्नाथनी तिला सांगितले की तो मुलगा चांगला आहे.मी त्याला रोज पाहतो .तो भलते सलते काही करणार नाही .शाळा बुडवून तो येथे येत आहे हे मला माहीत नव्हते .मला वाटले तो घरी सांगून येत आहे .

तुम्ही म्हणता तो सातवी नापास झाला .माझा सल्ला एेका. तुम्ही त्याच्या मागे अभ्यासासाठी लागू नका.तुम्ही त्याला रागवू नका. त्याचा अभ्यासाकडे  कल नाही .तुम्ही त्याच्यावर अभ्यासाचा जोर करू नका.त्याचा जिकडे कल आहे तिकडे त्याला जाऊ द्या.त्यातच तो मोठा होईल. त्यातच तो नाव कमवील.गेल्या तीन वर्षात तो माझ्याकडे खूप शिकला आहे .मी त्याला नियमित पगारही देतो .मी त्याला पाचशे रुपये देतो .त्यातील तीनशे तो माझ्याकडे ठेवतो .त्याचे दहा हजार रुपये माझ्याकडे साचले आहेत . त्याला माझ्याकडे तसाच सतत येउदे .मी त्याचा पगार वाढवीन.शिकता शिकता तो कमवील.त्याच्या हातात कला व डोक्यात कल्पना आहेत.तुम्ही निश्चिंतपणे घरी जा.तो घरी येईल .इथे तो नक्कीच येईल. मी त्याला स्वतः घरी घेऊन येईन.तीन वर्षे तो तुम्हाला फसवीत राहिला म्हणून तो आणखीच घाबरत असेल.

एकीकडे आनंद एकीकडे विरस अशा संमिश्र भावना घेऊन कमला घराकडे परतली.एव्हाना लहानू कामावरून घरी आला होता.कमलाने रडत रडत सर्व हकीकत सांगितली .मुलगा शिकेल खूप मोठा होईल ऑफिसर होईल या इच्छांची राख रांगोळी झालेली त्यांना दिसत होती.

तर दुसऱ्या  बाजूला तो मोठा मूर्तीकार होईल.त्याचे सर्वत्र नाव होईल हा आनंद होता.

दरवाजा उघडाच होता दरवाज्यावर कुणीतरी टिकटिक केली.जगन्नाथ सुधीरला घेऊन आले होते .

*सुधीर धावत जाऊन आईला बिलगला .आईने त्याला आपल्या कुशीत घेतले .*

*दोघांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळत होते. *

*न बोलताच दोघांनाही जे सांगायचे होते ते कळले होते.*

*त्या दोघांकडे पाहताना लहानूचे डोळे डबडबले होते.* 

(समाप्त)

२७/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel