अकबर बादशहाच्या राजदरबारांत बिरबलला खास मानाची जागा होती. तो बादशहाची करमणूक खास विनोदी शैलीत करीत असे, आणि त्यादिवशी सुद्धां असेच झाले.

''बिरबल, तू तुझ्या बुद्धी व चातुर्यामुळे असलेल्या ताकदीबद्दल ऋणी असायला हवेस'' बादशहा, बिरबलच्या एका विनोदावर उद्गारला.

''शहेनशहा, तिथेच तर आपल्या दोघांत फरक आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आपण आपोआप बादशहा झालात. आपली सत्ता आपल्या कर्तृत्वाने नाही मिळवलेली. माझी ताकद माझ्यांत आहे. आपली ताकद बाहेरून आली आहे,'' बिरबलाने सांगितले.

''बाहेरून?'' अकबर जोरांत म्हणाला.

''जसे कोणी माझा मेंदू घेऊ शकत नाही, तसे आपला राजमुकुटही, व त्याबरोबर आलेली शक्ती व पदकेही, सर्व या मुकुटाबरोबरच आलेली आहेत.''

''तू जे म्हणतोस ते सिद्ध कर, नाहीतर मरणास सामोरे जा'', दीर्घ श्वास सोडून अकबर म्हणाला.

बिरबल नम्रपणे खाली वांकला, मागे सरकला तेव्हां नकळत त्याच्या चेहर्‍यावर हसूं आले, कारण त्याला माहित होते की त्याचे बरोबर होते.

ती रात्र त्याने त्याच्या विछान्यावर जागून वेगवेगळे पर्याय शोधीत काढली, आणि तो स्वतःशीच म्हणाला, ''ही युक्ती चालली पाहिजे.''

दुसर्‍या दिवशी बिरबल नेहमीप्रमाणे राजवाड्यांत परतला. बिरबल सांगत होता, तेव्हां त्याचे विचार ऐकताना बादशहा शांत होता.

अजून पर्यत तरी बिरबलला कोणी वेडे ठरवू शकले नव्हते. त्यालाही माहित होते की बादशहा हे जाणून आहे. दोघेही वरवर हंसत राहून एकमेकांकडे अगदी बहिरी ससाण्याच्या नजरेने बघत होते.

असे करता करता एक पंधरवडा निघून गेला. बिरबलला राजा अकबराची नित्यकर्मे माहित होती. त्यापैकी एक म्हणजे तो आठवड्यांतून एकदा रात्री राजधानीत चक्कर मारून सुरक्षेची पाहशणी करत असे. त्यामुळे त्याची राजधानी चोर व दरोडेखोरांपासून पूर्ण सुरक्षित आहे. याची खात्री पटत असे.

अशा वेळी तो वेगवेगळे पोशाख करून, वेषांतर करून गांवातून फिरत असे.

प्रत्येक वेष परिधान केल्यावर तो हुबेहुब तसा वेगळा वागत असे. त्याचे श्रेय आश्रफ नांवाच्या सेवकाकडे जाते. तो वेगवेगळे रंग, पोशाख, दाढी-मिशा वापरून त्याला नवीन पोशाखांत सादर करीत असे. आणि आश्रफ, ह्याचे श्रेय बिरबलाने दिलेल्या अचूक सूचनांना देत असे.

जेव्हां त्याला बादशहाच्या पेहरावात बदल करायचा असेल, तेव्हां तो बिरबलाचा सल्ला घेत असे. त्यामुळे, साहजिकच बिरबलाला बादशहा पुढील रात्री काय पोशाख घालणार आहे, ते आधीच कळत असे. आणि आश्रफसुद्धा त्याला बादशहाच्या रात्रीच्या बेताची नोंद देत असे.

एका शनिवारी सकाळी आश्रफ, बिरबरलच्या घरी पोहचला. ते पाहून बिरबल म्हणाला, ''मला माहित आहे, तू, एवढ्या सकाळी कां आला आहेस?'' असे म्हणून त्याने आश्रफचे हंसत हंसत स्वागत केले.

''महोदय, आज रात्री बादशहा बाहेर पडणार आहेत आणि मी विचार केला की ह्या वेळी मी त्यांना भिकार्‍याचे रूप देईन,'' असे म्हणून आश्रफ क्षणभर थांबला.

''तूच एकटा बादशहाला क्षणभर कां होईना, भिकारी बनवू शकतोस'', बिरबल विनोदाने म्हणाला. त्या विनोदावर आश्रफ सुद्धा हसू लागला.

''तू त्यांना मळलेले, जुने पुराणे, ठिगळे लावलेले कपडे, व पायांत जास्त झिजले आहेत, असे जोडे घालायला दे. डोक्यावरचे पागोटे अगदी चुरगळलेल्या कपड्यापासून बनव, जेणेकरून ते हुबेहुब भिकारी वाटतील. त्याशिवाय हातांत एक पत्र्याचा डबा, खांद्यावर झोळी व कपड्यांचा जोड दे,'' बिरबल हळूच आश्रफला सांगत होता.

''अजून काही तुम्हाला सुचवायचे आहे कां?'' आश्रफने विचारले.

''तू शहेनशहाच्या चेहर्‍याकडे थोडे लक्ष दे चेहर्‍यावर सुरकुत्या हव्यात. नाहीतर ते हुबेहुब राहणार नाही.'' बिरबल म्हणाला.

आश्रफ सर्व समजून घेऊन, नमस्कार करुन निघाला. ''आता माझी वेळ आली आहे,'' बिरबल कुजबुजला. संध्याकाळ संपून काळोख व्हायला सुरवात झाली, तेव्हां त्याने घाईने आपल्या बायकोला बोलावून ‘भिकारी’ वेष करण्यास मदत करायला सांगितले.

''भिकारी''- ती मिष्किलपणे म्हणाली.

''हो, मला रात्रभर राजधानीमधे फिरून, भिकार्‍यांचे जीवन किती कठीण असते, ते बघायचे आहे. त्यानंतर मी शहेनशहाला भेटून सांगेन की, त्यांचे जीवन सुसह्य करायला आपण काय केले पाहिजे ते?'' तो म्हणाला.

''तुमच्याकडे नेहमीच कांहीतरी नवी युक्ती असते'', असे म्हणून ती तयारीला लागली. तिने त्याचा जुना पुराणा, विटलेला पोशाख शोधून काढला. तो बर्‍याच ठिकाणी फाटला होता. तिने त्याला काही ठिकाणी ठिगळे लावली व घालावयास दिला.

''चेहरा थोडा सुरकुतलेला दिसेल असे बघ. कपळावर थोड्या सुरकुत्या, तर गाल ओढलेले बनव,'' त्याने तिला सांगितले. तिने कुंचला व वेगवेगळे रंग वापरुन योग्य परिणाम साधून आणला.

त्याने कांही वर्षापूर्वी काढून टाकलेले जुने जोडे पायांत घातले व तिला सांगितले, ''तू माझी वाट पाहात बसू नकोस, मी केव्हां परत येईन, ते माझे मलाच माहित नाही.'' आणि तो बाहेर पडून राजवाड्याच्या दिशेने चालू लागला. त्याने राजवाड्याच्या जवळ साधारणतः शंभर हात, अशी जागा निवडली. ती जागा अंधारी व चटकन दिसणार नाही, अशी होती व तिथे तो वाट पाहू लागला.

त्याला फार वेळ वाट पाहावी लागली नाही. राजवाड्याचा दरवाजा उघडला. त्यांतून एक भिकारी बाहेर पडला. दारावरच्या पाहारेकर्‍याने त्याला वांकून मुजरा केला.

''शहेनशहा, आता तुला नेऊन दाखवितोच,'' बिरबल म्हणाला.

बादशहा त्याच्या समोरुन जाईपर्यत त्याने वाट बघितली आणि चटकन म्हणाला, ''अरे मित्रा, मी तुझ्याबरोबर येऊ कां?''

''तू कोण आहेस?'' बादशहा हुकुमी आवाजांत म्हणाला.

''तू तर शहेनशहा सारखा बोलतो आहेस, पण, तू तर एक साधा भिकारी आहेस. तेव्हां भिकार्‍याप्रमाणे बोलायला लाग. नाहीतर तुला एक दमडी सुद्धां मिळणार नाही.'' बिरबल त्याच्या आवाजात म्हणाला.

''तू कोण आहेस?'' बादशहाने हळूच विचारले.

''एक भिकारी, तुझ्या सारखाच!''

''पण, मी भिकारी नाही,'' बादशहा गुरगुरला.

''मग, तू कोण आहेस, शहेनशहा?'' असे बोलताना बिरबलच्या आवाजात तिरस्कार जाणवत होता.

''तू बरोबर आहेस आणि मी रात्रीसाठी बाहेर पडलो आहे.'' ताठ मानेने बादशहा उद्गारला.

''तुला काय वाटले, तू मला फसवूं शकतोस?''

''मी सिद्ध करूं शकतो, की मी कोण आहे ते?'' बादशहा उत्तरला.

''ताबडतोब सिद्ध कर, नाही तर मी तुला अधिकार्‍यांकडे सुपूर्द करेन.'' बिरबलाने त्याला भीती दाखविली.

बादशहाचा राग उफाळून आला. त्याला एका भिकार्‍याकडून त्याचा अवमान झाल्यासारखे वाटले, ''मी कशाला माझे व्यक्तिमत्व सिद्ध करुन दाखवूं, आणि ते सुद्धा तुझ्यासारख्या एक भटक्या वाटसरूला?''

''कारण, एकासारखे पक्षी नेहमीच एकत्र येतात,'' बिरबल म्हणाला.

''किती खुळी समजूत आहे,'' बादशहा म्हणाला आणि त्याने आपली शाही अंगठी बिरबलला दाखविली.

''बघू दे, ती खरी आहे का?'' बिरबल आग्रह करीत म्हणाला.

बादशहाने बिरबलला अंगठी दिली. बिरबल ती अंगठी सर्व बाजूने पारखू लागला आणि म्हणाला, ''ही तुला कोणी दिली?''

''ही माझी आहे, कारण मी शहेनशहा आहे.''

''तुला काय वाटते, की मी तुझ्यावर विश्वास ठेवावा?'' उपहासाने बिरबल म्हणाला.

''मूर्ख माणसा, जरा हंसायचे थांब! तुला तुझे डोके तुझ्या धडावर हवे आहे ना?'' बादशहाने धमकावले. दोघे जण भांडत होते. तेवढ्यांत त्यांना रात्रीची गस्त घालणार्‍या मंडळींनी व त्यांच्या सोबत असलेल्या अधिकार्‍याने भांडताना बघितले, व त्यांचे काय चालले आहे ते पाहाण्यास ते पुढे सरसावले.

''ह्या माणसाला येथून घेऊन जा. हा चोर आहे,'' बिरबल बादशहाकडे अंगुली निर्देश करत म्हणाला.

''तो खोटे बोलतो आहे. मीच शहेनशहा आहे आणि ही पाहा माझी शाही अंगठी,'' असे म्हणून त्याने ती अधिकार्‍यांना दाखविली.

अधिकारी खाली वांकले आणि त्या भिकार्‍याला रागाने पकडायला धावले, तेव्हा त्यांना माहित नव्हते की तो खरोखरीच बादशहा आहे. त्यांना पाहून अकबर घाबरला आणि जोरांत पळूं लागला.

''त्या वावळटाला जाऊं दे'', बिरबल मंडळींना म्हणाला. दुसर्‍या दिवशी सकाळी बिरबल दरबारांत निघाला. त्याने त्याच्या खास विश्वस्तांबरोबर बादशहाची बैठक ठरविली. बादशहाला बिरबल येण्याआधी त्याच्या पाहारेकर्‍यांनी आठवण केली.

''शहेनशहा'' बिरबल गुडघे टेकून बसत म्हणाला.

''बोल, बिरबला''

''काल रात्री शाही अंगठी हरवली आहे कां?''

''तुला कसे कळले?''

बिरबलाने घडलेले सर्व सांगितले. ते ऐकून बादशहाचा चेहरा रागाने लाल होऊ लागला.

''शहेनशहा, मला क्षमा करा. कांही दिवसांपूर्वी तुम्ही मला आव्हान दिले होते, आणि ते सिद्ध करायला सांगितले होते, की तुमची ताकद तुमच्या सन्मान चिन्हाबरोबर आली आहे. पण काल रात्री जेव्हा मी शाही अंगठी हातांत धरली, तेव्हां अधिकार्‍यांनी माझी आज्ञा मानली'', असे सांगत बिरबलाने ती अंगठी बादशहाकडे दिली.

''बिरबल,'' बादशहा जोरजोरात हसूं लागला. ''लबाडा, तुला माहित आहे तुझा मुद्दा कसा सिद्ध करायचा ते, आणि आता मला माहित झाले की मी माझ्या ताकदीवर ऋणी असायला हवे; कारण ती मला माझ्या मुकुटाबरोबर व त्याबरोबर आलेल्या मान सन्मानानेच मिळाली आहे. तुझी ताकद ही तुझ्या कल्पक बुद्धी व चातुर्याने मिळविली आहेस. आणि ती कधीही चोरली जाऊं शकत नाही.''

बादशहाने खूष होऊन त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेला रेशमी बटवा बक्षीस दिला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel