( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
नर्मदेने दत्तोपंतांची कथा सांगायला पुढे सुरुवात केली.
दत्तोपंत स्वतः व्हरांड्यात किंवा शाळेच्या फाटकामध्ये उभे राहात असत.त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत असे.त्यांच्या धाकाने सर्वजण वेळेअगोदर हजर राहात असत.त्यांची शिस्त जरी कडक होती,शिस्त मोडणाऱ्याला ते जरी शिक्षा करीत होते,तरी अंत:करणाने ते कनवाळू होते. सर्व कर्मचार्यांवर त्यांचे मुलाप्रमाणे प्रेम होते.ही गोष्ट सर्वांना माहित असल्यामुळे, ती त्यांच्या वर्तणुकीतून केव्हां केव्हां जाणवत असल्यामुळे सर्वजण त्यांच्यावर प्रेम करीत असत.त्यांच्या कनवाळूपणाच्या अनेक गोष्टी आहेत.नर्मदेने त्या सांगितल्या.विस्तारभयास्तव त्या इथे देत नाही.
दत्तोपंत कितीही कनवाळू असले तरी त्यांचे भूत या घरात फिरत असते हे ऐकल्यावर आमची अवस्था केविलवाणी झाली.
"भीक नको पण कुत्रा आवर." "मागच्या खोता तूच बरा""घी देखा लेकिन बडगा नही देखा" यांतील कोणती म्हण वापरावी तेच आम्हाला कळेना.
नर्मदा दत्तोपंतांचे कौतुक पुढे सांगू लागली.
जे घरी ते दारी किंवा जे दारी ते घरी असा त्यांचा स्वभाव होता.शाळा गिरगावात होती ते शाळेपासून जवळच राहात असत. त्या जुन्या काळी भैय्या घरी येऊन दूध घालीत असे.दूध स्वच्छ शुद्ध पाहिजे,त्यात पाण्याची भेसळ नको,यावर त्यांचा कटाक्ष असे.एकदा दुधामध्ये माशी सापडली.त्यांनी दुधाची बरणीच्या बरणी उचलून ती भैयाच्या डोक्यावर उपडी केली.दुधाने भैय्याला सचैल स्नान घडले. त्यांचा धाक एवढा होता की भैय्या एक शब्दही न बोलता तसाच ओलेता दुधाने न्हालेला गुपचूप निघून गेला.दुसऱ्या दिवशी तो मुकाटपणे दूध घेऊन आला.ते मुंबईत छत्तीस वर्षे राहत होते.एकाच भैय्याकडील दूध ते घेत असत.भैय्या म्हातारा झाला त्याचा मुलगा दूध घालू लागला तरी दूध त्याचेच सुरू होते.त्यांची एकच गोष्ट सांगते.अडचणीच्या वेळी ते कमी जास्त पैशाची मदत त्यांच्या स्टाफला करीत असत.घरीही मोलकरीण इतर काम करणारे यांच्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्नेहार्द असे.संकटकाळात त्यांच्या नोकरांना, त्यांच्या मित्रांना त्यांचा आधार होता.जितके ते रागावत तितकेच प्रेमाने विचारपूस करीत असत.
तो जुना जमाना होता.जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीची (१९२०)ही गोष्ट आहे.तेव्हा हे सर्व चालत असे.पुरूषांचा विक्षिप्तपणा, कडकपणा, धाक, तऱ्हेवाईकपणा, या सर्वसाधारण गोष्टी होत्या. मुले वडिलांच्या धाकात असत.स्त्रियांनाही विशेष स्वातंत्र्य नव्हते.त्याही नवर्याच्या धाकात असत.हल्लीच्या काळात तुम्हा मुलांना त्याची कदाचित कल्पना येणार नाही नर्मदा सांगत होती.
त्यांना एकुलता एक मुलगा होता.त्यालाही त्यांनी शिस्तीत मोठा केला.खूप शिकून तो फार मोठ्या पोस्टवर होता.पुण्याला हवामान खात्यांमध्ये तो प्रमुख होता.
निवृत्तीनंतर ते गिरगावातील त्यांच्या घरी राहू शकले असते.त्यांच्याजवळ पैसा भरपूर होता.निवृत्ती अगोदरही हवेशीर ब्लॉक घेवून समुद्र किनारी क्वीन्स नेकलेसवर ते राहू शकले असते.परंतु त्या काळी कोकणातील माणसांची(इतर प्रदेशातील लोकांचे मला माहीत नाही) एक विशिष्ट धारणा होती.नोकरीनिमित्त कुठेही गेले तरी निवृत्तीनंतर आपल्या मूळ गावी परत यायचे.त्याप्रमाणे ते निवृत्तीनंतर आपल्या गावी म्हणजेच आमच्या गावी परत आले.त्यांचा मुलगा त्याना पुण्याला बोलवीत असे.मरेपर्यंत ते येथेच राहिले.मुलगा त्यांना अधूनमधून येऊन भेटून जात असे.त्याकाळी अर्थातच मोटारी विशेष नव्हत्या.हा काळ स्वातंत्र्य नुकतेच मिळाले त्या वेळचा होता.आमच्या गावापर्यंत रस्ता नव्हता.बराच प्रवास पायी किंवा बैलगाडीतून करावा लागे.त्याकाळी बऱ्याच नद्यांवर पूल नव्हते.(नर्मदेने तिच्या पध्दतीने तिच्या भाषेत ही हकिगत सांगितली.)
निवृत्तीनंतर येथे राहायला आल्यावर त्यांची कांही वर्षे आनंदात गेली.पुढे दत्तोपंतांना निद्रानाशाचा विकार जडला.हळू हळू तो वाढत गेला. कोणत्याही औषधाने त्यांना झोप येईना.अनेक वैद्य डॉक्टर हकीम झाले.रात्रीच्या रात्री ते डोळे उघडे ठेवून टक्क जागे असत.पापण्या मिटल्या तरी निद्रा येत नसे. ते वेड्यासारखे झाले.
शेवटी एका रात्री गवताच्या गंजीखाली ते सरपटत गेले.गंजी म्हणजे चिरे मांडून त्यावर बांबू काठय़ा वगैरे टाकून मचाण केलेले असते.त्यावर गवताच्या पेंढय़ा व्यवस्थित रचून ठेवलेल्या असतात.तर अशा गंजीखाली जाऊन त्यांनी निराशेच्या भरात अर्धवट वेडसर स्थितीत काड्याच्या पेटीतील काडी पेटवून गंजीला आग लावली. आगीच्या झळा लागल्यावर कदाचित त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला असेलही.अर्थात तो सफल झाला नाही.दत्तोपंत कुठे गेले कुठे गेले म्हणून सर्वजण चौकशी करीत होते.गंजी धडाडून पेटली होती.सर्व गाव गोळा झाला होता.विहिरीपासून मानवी साखळी करून, पाणी आणून, गंजी विझविण्याचे प्रयत्न चालू होते.उन्हाळ्याचे दिवस वारा यामुळे प्रयत्न असफल झाले.गंजी विझल्यावर त्याखाली दत्तोपंत अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडले.त्यानंतर त्यांना विधीपूर्वक अग्नी देण्यात आला.सर्व धार्मिक विधी त्यांच्या मुलाने व्यवस्थित केले.तरीही कां कोण जाणे दत्तोपंत पुढील गतीला जाऊ शकले नाहीत.
त्यानंतर थोडय़ाच दिवसांत गावात कुणाकुणाला दत्तोपंत दिसू लागले.त्यांच्या घराच्या परिसरात ते दिसतात.कधी ते मूळ रूपात असतात तर कधी जळक्या स्थितीत असतात.कधी केवळ हाडांचा सापळा दिसतो.फक्त चेहऱ्यावरून दत्तोपंत म्हणून ओळखता येते.कधी पूर्ण पेटत्या स्थितीत घरावरून येणार्या जाणार्याला ते दिसतात.ते दत्तोपंत आहेत म्हणून तर्क केला जातो.ते कुणालाही कांहीही करीत नाहीतच त.तरीही त्यांची दहशत पसरली आहे.
हे घर त्यांचे आहे.त्यांचे भूत या घरात वावरत असते.ते भूत कुणालाही कांहीही करीत नाही.परंतु त्यांच्या भयानक दर्शनाने बघणारा सटपटतो.त्याला पुढे निदान दोन तीन दिवस झोप लागत नाही.त्यामुळेच या घरात कुणीही राहात नाही.ते या घरात फिरत असतात.दत्तोपंतांच्या नातवाने हे घर जसेच्या तसे ठेवले आहे.दत्तोपंतांचे कुटुंबीय वंशज येथे आले तर ते भूत त्यांना कांहीही करीत नाही.मात्र इतराना ते घरात राहू देत नाही.ते कांहीही अपाय करीत नाही.परंतु त्यांच्या दर्शनाने बघणारा पुन्हा येथे येण्याचे धाडस करीत नाही.
जर तुम्ही शिस्तबद्ध वर्तन केले, घराची पूर्ण स्वच्छता राखली, तर ते भूत तुम्हाला दर्शनही देत नाही.येथे भुताचा निवास असल्याचा तुम्हाला संशयही येणार नाही.रात्री दहाच्या आंत झोपले पाहिजे.सर्व दिवे मालवले गेलेच पाहिजेत.सकाळी सहाच्या आंत उठलेच पाहिजे.अंथरूण नीट गुंडाळून ठेवले पाहिजे.पांघरुणाच्या व्यवस्थित घडय़ा केल्या पाहिजेत.सर्व घराचा रोजच्या रोज केर काढला पाहिजे.हे केले नाही तर ते तुम्हाला दर्शन देतात.त्यांच्या पध्दतीने रागावतात.तुम्हाला शिक्षा करतात.तुम्ही अव्यवस्थित वागून पाहा.तुम्हाला पूर्ण प्रचीती येईल.
हे घर कोणाचे एवढेच विचारल्यावर नर्मदाने आम्हाला सर्व गोष्ट तिच्या पध्दतीने तिच्या भाषेत सांगितली.ती मी माझ्या पद्धतीने सांगितली आहे. दुसरे कोणतेच घर उपलब्ध नव्हते.दत्तोपंत कुणालाही काहीही इजा करीत नाहीत याची आजींना खात्री होती.म्हणूनच त्यांनी हे घर तुमच्यासाठी घेतले.
आम्हा भावंडांना कोकणात आल्यावर मजा करायची असे.कधी कधी रात्रीचे समुद्रावर जाणे, उशिरापर्यंत पत्ते खेळत, भेंड्या लावत,सोंगटय़ा खेळत(सारीपाट), गप्पा मारीत जागणे,व सकाळी उन्हे वर येईपर्यंत झोपणे,दिवसा समुद्रात डुंबणे,डोंगरावर फिरायला जाऊन करवंदे, ओकाबोकीची फळे, चिंचा, जांभळे खाणे,असा आमचा हुंदडण्याचा एक कलमी परंतु प्रत्यक्षात अनेक कलमी कार्यक्रम असे.
लवकर झोपायचे व लवकर उठायचे असे म्हटल्यावर आमची तोंडे वाकडी झाली.परिस्थितीला अर्थातच तोंड दिल्याशिवाय इलाज नव्हता. नर्मदेच्या सांगण्यानुसार आम्ही शिस्तीत वागलो तर दत्तोपंत आम्हाला दर्शनही देणार नव्हते.
एक दिवस म्हणजे रात्री दहा वाजून गेल्यावर आम्ही पत्ते खेळत होतो.आमचे कुणाचेच घड्याळाकडे लक्ष नव्हते.नर्मदाही आमच्याबरोबर खेळण्यात गुंग झाली होती. कुणीतरी माळ्यावर खाकरले.घोगऱ्या, जरब बसविणार्या आवाजात,चला मुकाट्याने निजा आता असे दरडावून सांगितले.आमचा श्वास वरचा वर व खालचा खाली राहिला.एवढे दरडावून दत्तोपंत थांबले नाहीत.लाइट एकदम बंद झाले.हे कुणी केले कसे केले कांहीच कळत नव्हते.आम्ही चिडीचूप गुपचूप होवून तत्काळ झोपी गेलो.अर्थात झोप किती लागली ते देव जाणे.
नर्मदा शंभर टक्के बरोबर होती असे त्या रात्री लक्षात आले
आम्ही सकाळी एकदा उशिरापर्यंत झोपून राहिलो .मूर्तिमंत पेटते, धगधगते, ज्वाळांनी वेढलेले,जळते मांस लोंबत असलेले, नुसती कवटी,डोळ्याच्या खोबणीत दोन भोके,असे दत्तोपंत आम्हाला दिसले.घोगऱ्या आवाजात त्यांनी असे चालणार नाही म्हणून आम्हाला दाटले.
त्या भयानक दर्शनाने आम्हाला त्या दिवशी जेवण व्यवस्थित गेले नाही.कोणत्याही रात्री व्यवस्थित शांत झोप लागली नाही.डोळे मिटले कि दत्तोपंतांचे ते भयानक स्वरूप दिसे.स्वप्नातही ते दिसत व दचकून जागे व्हायला होई.
घरी गेलो तर अंगणात उघड्यावर झोपले पाहिजे.तिथे गावात फिरणार्या,कुत्री कोंबडी मारणार्यांचे वाघाची भीती.
इथे घरात झोपायला आलो तर दत्तोपंताची दहशत.
आम्हाला कात्रीच्या दोन पात्त्यामध्ये किंवा अडकित्यामध्ये सापडल्यासारखे झाले.
एकदा बाबाना फोन करून मोटार मागवून मुंबईला निघून जावे असे वाटले.परंतु आम्हाला तर कोकणात महिना दीड महिना राहायचे होते.आठ दिवसांचा प्रश्न होता.तेवढ्यात आमचे घर व्यवस्थित झाले असते.
आम्ही दत्तोपंतांच्या घरात कडक शिस्तीत कसेबसे आठ दिवस काढले.ते आठ दिवस आठ महिन्यांसारखे वाटले.
दत्तोपंतांनी एकदा आवाज रूपाने तर एकदा प्रत्यक्ष दर्शन दिले.आमची झोप उडवायला, मनात दहशत निर्माण करायला, तेवढे पुरेसे होते. ते कडक शिस्तीचे भोक्ते आहेत त्याप्रमाणेच कनवाळूही आहेत याचाही प्रत्यय आम्हाला आला.एकदा दरवाजा बंद करायचा आम्ही विसरलो होतो.झोपताना बहुधा आम्ही दरवाजा लावला असता. वाघ दरवाजापर्यंत आला.त्याला आंत यायचे होते.तो गुरगुरत होता.दरवाजा उघडा असूनही तो आंत येऊ शकत नव्हता.त्याला कुणीतरी दरवाज्यात अडवून धरले होते.बाहेर वाघ आत आम्ही चौघे, धडधडत्या हृदयाने एकमेकांना धरून बसलो होतो.वाघ आंत आला नाही.त्याला दत्तोपंतांनी बाहेरच रोखून धरले होते.दत्तोपंतानी त्याला बाहेर रोखून धरले नसते तर तो नक्की आंत आला असता.
*आम्हाला त्या आठ दिवसांत व्यवस्थित झोप लागली नाही.*
*ते आठ दिवस संपले.आम्ही आमच्या घरात सुखरूप परत आलो.*
*आजोबा व आजी बिनधास्त बाहेर मांडवात झोपत होते.*
*आम्ही मुले घरात झोपत होतो.नर्मदा आमच्या सोबत होतीच. दत्तोपंतांच्या घरातील ते आठ दिवस आम्ही कधीही विसरणार नाही.*
(समाप्त)
३/७/२०२१©प्रभाकर पटवर्धन