( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

तिचे घर जवळ आले होते.

एकाएकी तिला प्रतापची आठवण झाली.त्याच्या डोळ्यांतील ती चमक तिला आठवली.

स्त्रियांना एक उपजत बुद्धी असते.पुरुषांच्या चेहऱ्यावरील,मनातील, भाव त्यांना लगेच कळतात.

आपण प्रतापला आवडले आहोत हे तिला ऑफिसमध्येच कळले होते.

प्रतापही आपल्याला आवडतो. त्याचे आपल्याला आकर्षण वाटत आहे याची एकाएकी तिला जाणीव झाली.

या जाणिवेने रेवा एकाएकी चमकली आणि स्वतःशीच थोडीशी सुखावली.

आता तिच्या पुढील आयुष्यात काय काय घडामोडी होणार होत्या ते त्या जगन्नियंत्याला, अदृश्य हातालाच माहीत.   

डोक्यातील विचारांचा गुंता बाजुला करून रेवा आपल्या ब्लॉकमध्ये शिरली.तिच्याजवळ ब्लॉकची स्वतंत्र किल्ली होतीच.तशी ती प्रत्येकाजवळ होती.सेल्फ लॉक उघडून प्रत्येक जण आंत येत असे. मुलांच्या लहानपणापासून त्यांच्याकडे काम करणार्‍या  मावशींकडे सुद्धा एक किल्ली दिलेली होती.रेवाचा नवरा कृष्णकांत टीव्हीवर न्यूज पहात होता.बातम्या पाहता पाहता हातातील मोबाइलवर सर्फिंग(धुंडाळा) चाललेच होते.ती आज ऑफिसात फंक्शन असल्याचे घरी सांगण्याला विसरली होती.नेहमी सातपर्यंत घरात येणारी रेवा नऊ झाले तरी आली नव्हती.याची कुणालाच कांही पडली नव्हती. थांबली असेल ऑफिसमध्ये, गेली असेल मैत्रिणीकडे, असे समजून सर्वजण चालले होते.कृष्णकांतने एकदा रेवाकडे वळून पाहिले.उशीर कां झाला म्हणून तो तरी विचारील अशी ती वाट बघत होती.त्याने कांहीही विचारले नाही.ती उशिरा आल्याचे जसे काही कुणाच्या खिजगणतीतच नव्हते.तिला फोन करून उशीर कां होत आहे असे कुणी विचारले नव्हते.साधा संदेशही कुणी पाठविला नव्हता.

मुलांनी, नवऱ्याने, फोन करायला हवा होता. मेसेज करायला हवा होता. हे जितके खरे तितकेच तिनेही उशीरा घरी येणार असल्याचे कळवायला हवे होते.आपल्याकडून होणारी चूक ती सोयीस्करपणे विसरली होती. आपली चौकशी कुणी केली नाही म्हणून मात्र हिरमुसली झाली होती.थोडी घुश्श्यातच ती आपल्या खोलीत गेली.मुले आपापल्या खोलीत आपापल्या तथाकथित कामात,अभ्यास समाजमाध्यमे गेम वेबसीरिज सिरियल्स कार्टुन्स सिनेमा इत्यादीमध्ये मग्न होती.आपले घर म्हणजे एक हॉटेल आहे. त्यात आपण राहतो. कुणीही केव्हाही यावे केव्हांही जावे. कुणी कुणाला विचारीत नाही.आपली ही कल्पना खरी आहे असे तिला वाटू लागले.

सुशीला मावशी रेवाच्या येण्याची वाट पाहत होत्या.त्यांनी लगेच टेबलावर पाने मांडली.त्यांना आवरून घरी जायचे होते.बाईंना उशीर कां झाला म्हणून त्याच थोड्या चिंतेत होत्या.त्या एकदा बाईंना फोन करणारही होत्या.परंतु बाई ऑफिसात कामात असतील त्यांना आवडणार नाही म्हणून त्यांनी फोन केला नव्हता.उशीर कां झाला म्हणून त्यांनी चौकशी केली.निदान मावशीनी तरी चौकशी केली म्हणून त्यांना थोडे बरे वाटले.मावशीने मुलांना, साहेबांना, बाई अजून कां आल्या नाहीत उशीर होणार आहे का म्हणून विचारले होते.कुणालाच कांही माहीत नव्हते.झाला असेल उशीर कांही कारणाने,येईल थोड्या वेळाने असे सर्व समजत होते.जो तो आपल्या छंदात दंग होता.आईला उशीर कां होत आहे याकडे मुलांचे लक्ष नव्हते.बायको अजून आली नाही याकडे कृष्णकांतचे लक्ष नव्हते.     

सर्वजण जेवायला बसले.जेवणाच्या टेबलासभोवती खुर्च्या मांडल्या होत्या.जेवताना परस्परांत संवाद होईल अशी अपेक्षा होती.प्रत्येकाचा दिवस कसा गेला याबद्दल बोलता आले असते. त्यातून कांही ना कांही संवाद प्रस्थापित झाला असता.बोलण्यातून बोलणी निघाली असती.एकमेकांच्या गप्पा ऐकण्यात वेळ चांगला गेला असता. घरातील माणसांचे स्नेहबंध घट्ट झाले असते.अनोळखी माणसांसारखे चारही जण एकाच टेबला सभोवती बसून जेवत होते.तीसुद्धा काहीवेळा गप्पा मारतात.रेवाने मुलीला   कॉलेजबद्दल प्रश्न विचारला.तिने जेवढय़ास तेवढे उत्तर दिले.जेवतानाही प्रत्येकाचा,डाव्या हाताने फोनचा धुंडाळा,(सर्फिंग) चाललाच होता.   

रेवा कामाने आणि विचारांनी क्लान्त झाली होती.ती कांहीही न बोलता जेवल्यावर आपल्या शयनकक्षात कॉटवर जाऊन आडवी झाली.तिने डोळे मिटून घेतले.तिच्या डोळ्यासमोर प्रताप दिसू लागला.तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते.नव्या साहेबाने प्रतापने तिच्या मनात कुठेतरी घर स्थान निर्माण केले होते.त्याची जाणीव होऊन तिचे तिलाच दचकायला होत होते.त्या जाणिवेने रेवा अस्वस्थ होत होती.

एवढ्यात कृष्णकांत खोलीमध्ये आला.त्याने दरवाजा लावून घेतला.मावशी गेल्यावर एकदा राज्याचा बंदोबस्त पाहून तो खोलीत आला होता.तोपर्यंत रेवा गाढ झोपी गेली होती.निदान ती झोपेचे सोंग घेत होती.कृष्णकांतशी कांही बोलावे असा तिचा मूड नव्हता.त्याच्या कुशीत जाण्याचा तर मुळीच नव्हता.सोंग काढता काढता ती गाढ झोपी गेली.कृष्णकांतला तिच्याजवळ बहुधा कांहीतरी बोलायचे असावे परंतु ती झोपलेली पाहून त्यानेही दिवा मालवला आणि तो झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी रविवार होता.कुणालाच कसली गर्दी नव्हती.सकाळी उठल्यावर तिने ब्यूटी पार्लरमध्ये(सौंदर्य प्रसाधन गृह) जायचे ठरवले.ती कधीतरी क्वचित लग्न, कुणाचा तरी वाढदिवस, एखादे कार्य, या निमित्ताने सौंदर्य प्रसाधनगृहात जात असे.नेहमी नेहमी तिकडे जाणार्‍यातील ती नव्हती.आज तसे काहीच कारण नव्हते.तरीही तिची पावले तिकडे वळली होती.प्रतापला आपण चांगले दिसावे हे कारण त्यामागे होते.ते कारण लक्षात येताच ती मनातच जरा चमकली.आज भरपूर पैसे खर्च करून ती काळजीपूर्वक फेशियल आणि इतर गोष्टी करून आली. आल्या आल्या कृष्णकांतने रिमार्क मारला.आज तू पांच वर्षांनी तरुण दिसत आहेस.त्याची कॉमेंट ऐकून तिला बरे वाटले.पुढे तो थट्टेने म्हणाला एवढी तयारी कुणासाठी.त्यावर न चिडता तिने तुझ्यासाठीच असे म्हणून वेळ मारून नेली.त्यावर कृष्णकांत केवळ "मोबँगो खुश हुआ" असे म्हणाला.नवऱ्याचे आपल्याकडे थोडे तरी लक्ष आहे असे पाहून तिला बरे वाटले.

तिने केवळ फेशियल वगैरे गोष्टी केल्या  एवढेच नव्हे तर दुसऱ्या दिवसापासून योगा,व्यायाम, डाैएटिंग, इत्यादी करून स्लिम व्हायचे ठरविले.आपण वयाबरोबर स्थूल झालो आहोत.कृश झाले पाहिजे ही जाणीव तिला होती.कृष्णकांतही स्थूल होत चालला आहे.प्रकृतीच्या दृष्टीने हे चांगले नव्हे.मेद वाढला की त्यांत रोग आश्रय घेतात.आपण रोज सकाळी फिरायला जाऊया असे ती नवऱ्याला म्हणत असे.केवळ आळसामुळे तो सकाळी फिरायला जायलासुध्दा तयार नसे.जिम योगा इतर व्यायाम तर दूरच राहिला.ती नवऱ्याला आळशी म्हणत असताना स्वत:ही फिरण्याचा, व्यायामाचा, आळस करीत असे.रोज स्टेशनपर्यंत चालत जाणे आणि तिथून परत येणे हा मात्र तिचा व्यायाम होत असे.अंधेरी स्टेशन ते घर व घर ते अंधेरी आणि चर्चगेट ते ऑफिस व ऑफिस ते चर्चगेट ती कटाक्षाने चालत जात असे.कृष्णकांत मात्र गाडी घेऊन ऑफिसला जात असे.त्यांच्या ऑफिसच्या जागा आणि वेळ दोन्ही   जुळत नसल्यामुळे ती त्याच्याबरोबर मोटारीतून जात नसे.कृष्णकांतला त्यामुळे कांहीच व्यायाम होत नव्हता.

सोमवारी सकाळी कृष्णकांतला जरा लवकरच जाग आली.सवयीने शेजारी त्याने  आपला हात नेला.रेवा अंथरूणावर नव्हती.असेल घरात कुठेतरी, उठली असेल लवकर म्हणून त्याने दुर्लक्ष केले.मुखमार्जन करून नंतरही घरात कुठे ती दिसत नव्हती.त्याने सर्व खोल्यांत फिरून शोध घेतला.इतक्या लवकर कुठे गेली अशा विचारात तो पडला.एवढ्यात रेवा बाहेरून आली.चालल्यामुळे तिचे रक्ताभिसरण वाढले होते.आधीच लाल गोरी असलेली रेवा आता लालबुंद दिसत होती.तो तिच्याकडे प्रथमच पाहात असल्यासारखा पाहात राहिला. सकाळी इतक्या लवकर कुठे गेली होतीस?म्हणून विचारता तिने तू तर कांही फिरायला, व्यायाम करायला तयार नाही.मला माझ्या प्रकृतीकडे पाहिले पाहिजे.मी तंदुरूस्त नसले तर तुझ्याकडे कोण पाहणार?आजपासून मी व्यायाम करण्याचे गंभीरपणे ठरविले आहे.दिवसेंदिवस मी स्थूल होत चालले आहे.असे उत्तर दिले.

त्यावर कृष्णकांत किंचित विनोदाने  म्हणाला,आधीच सुंदर असलेली तू बारीक झाल्यावर आणखीच सुंदर तरुण दिसू लागशील.बघ तुझ्या प्रेमात पुन्हा कुणीतरी पडेल.का त्यासाठीच प्रयत्न चालले आहेत?या त्याच्या बोलण्यावर रेवा अंतर्यामी किंचित दचकली.प्रतापच्या मनात ती भरली होती.तिलाही  प्रताप आवडला होता.त्याला आपण जास्त तरुण, जास्त सुंदर दिसावे यासाठीच तिचा खटाटोप चालला होता.ही गोष्ट प्रकर्षाने तिच्या लक्षात आली.आपल्या विचारांची दिशा बरोबर नाही असा विचार तिच्या मनाला चाटून गेला.कृष्णकांत जरी विनोदाने तसे म्हणाला असला तरी त्याला कांही संशय तर आला नाही ना असाही विचार तिच्या मनात आला.

त्यावर आपण सुंदर दिसण्यात तरुण दिसण्यात गैर काय आहे असा विचार तिने केला.त्यावर तिच्या दुसऱ्या मनाने त्यात गैर कांहीच नाही परंतु हा सर्व खटाटोप तू कां करीत आहेस असा प्रश्न विचारला.त्या प्रश्नाला डावलून ती ऑफिसला जाण्याच्या तयारीला लागली.

नेहमीप्रमाणे तिला स्टेशनवर सुहास भेटली.आज तू जास्तच सुंदर दिसत आहेस असा शेरा तिने मारला.गाडीत चढता चढता तिने नव्या साहेबांवर इम्प्रेशन मारण्यासाठी तर नाही ना अशी पुस्ती जोडली.कळत नकळत आपला सर्व खटाटोप प्रतापवर आपले इंप्रेशन(छाप) पाडण्यासाठी आहे.आपण त्याला आवडावी,त्याचे आपल्याकडे लक्ष जावे,तो आपल्याकडे आकर्षित व्हावा,या आपल्या हेतूची तिला जाणीव झाली.

त्यात गैर काय आहे?घरात आपण कंटाळून गेलो आहोत.कृष्णकांत त्याच्या कामात हल्ली जास्तच व्यस्त असतो.मुले त्यांच्या त्यांच्या कामात असतात.समजा मी घरी नसले तरी कोणाचे कांही बिघडत नाही.मुले मोठी झाली आहेत.ती आपला आपला मार्ग चोखाळतील.कृष्णकांतला तर आपली गरज नाही.प्रताप बरोबर आपण सुखात राहू.अशा दिशेने तिचे विचार भरकटत चालले होते.मनुष्य चुकीच्या मार्गाला लागला तरी तो त्या मार्गाचे समर्थन करून स्वत:चे समाधान करीत असतो.आपल्या बऱ्यावाईट कृत्याचे समर्थन करण्याची मूलभूत प्रवृत्ती आहे.अंतर्यामी आपण चुकत आहोत याची जाणीव होत असते.मोहाचे क्षण आपण बरोबरच कसे आहोत ते मनाला पटवून देत असतात.   

सुहास व ती प्रथम श्रेणीच्या डब्यात शेजारी शेजारी बसल्या होत्या.सुदैवाने आज त्यांना बसण्यासाठी जागा मिळाली होती.जरी गाडी अंधेरीहून सुटत असली तरी त्यांना कांही वेळा उभे राहून गर्दीतून प्रवास करावा लागे.    सुहास रेवाकडे निरखून पाहात होती.रेवा आपल्याच विचारात मग्न होती.एवढ्यात चर्चगेट स्टेशन आले.दोघीही ऑफिसच्या दिशेने चालू लागल्या.लिफ्टमध्ये शिरताना त्यांच्याबरोबरच प्रताप लिफ्टमध्ये शिरला.त्याला पाहताच दोघींनीही गुड मॉर्निंग सर असे म्हटले.त्यानेही प्रत्युत्तर दिले.

रेवाला पाहताच त्याचे डोळे पुन्हा चमकले.ती विशिष्ट चमक त्याच्या डोळ्यात दिसताच रेवाच्या अंगावर सुखद काटा उभा राहिला.

*काल आपण सौंदर्य प्रसाधन गृहात गेलो होतो.आज आपण काळजीपूर्वक कपडे केले.नेहमीपेक्षा  थोडा जास्तच मेकअप केला.त्या सर्वांचे चीज झाल्याचे समाधान तिला मिळाले.*

*रेवा भरकटू लागली होती.भरकटत शेवटी ती कुठे जाणार होती कुणास ठाऊक?*

*रेवाची गाडी पटरीवरून घसरू लागली होती.*

*ती पुन्हा पटरीवर येणार होती की नाही ते भविष्य काळच ठरविणार होता.*    

(क्रमशः)

९/९/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel