(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
आमच्या गावात अनेक प्रेक्षणीय गोष्टी आहेत .दोन गोष्टी तर प्रेक्षणीय आहेतच परंतु अद्भुतही आहेत. एक द्रोण टेकडी व दुसरी द्रोण वड होय..
टेकडीला द्रोण टेकडी नाव असण्याचे कारण ज्यावेळी हनुमंताने हिमालयातून द्रोणागिरी पर्वत लंकेमध्ये नेला होता व नंतर परत जाग्यावर नेऊन ठेवला होता, त्या वेळी आणताना किंवा नेताना त्यातील एक ढेकूळ आमच्या गावाजवळ पडले,अशी आख्यायिका आहे.त्यामुळे या टेकडीला द्रोण टेकडी असे नाव आहे.जरी टेकडी असे नाव असले तरी तो भला खासा मोठा डोंगर आहे .त्याला संपूर्ण प्रदक्षिणा घालायची झाली तर एक तास सहज लागतो .डोंगराच्या वरच्या टोकापर्यंत चढत जाण्यासाठी सुमारे अर्धा तास लागतो .वर चढण्यासाठी सुरेख ताशीव पायऱ्या आहेत.डोंगराच्या पलीकडच्या बाजूला तशाच ताशीव पायर्या आहेत.डोंगराच्या पलीकडून एक मोठा सार्वजनिक रस्ता जातो.या रस्त्यामुळे आमच्या गावाची शहराशी चांगली संलग्नता (कनेक्टिविटी) आहे . डोंगराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक वर्तुळाकार रस्ता बांधलेला आहे .या रस्त्याने प्रदक्षिणा घातली तर दोन कार्यभाग साध्य होतात असा सर्वांचा गाढ विश्वास आहे .
एक हिमालयातील मूळ द्रोणागिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य मिळते.
दोन या डोंगरावर औषधी वनस्पती असल्यामुळे येथील हवा औषधी आहे .आल्हाददायक आहे .प्रदक्षिणेमुळे तुमची प्रकृती सुधारण्याला मदत होते. व्यायाम तर व्यायाम आणि त्याचबरोबर औषधी हवेत श्वासोच्छवास यामुळे प्रकृती सुधारते .
डोंगरावर जरी चढ उतार केला तरीही व्यायाम, उत्कृष्ट हवेत श्वसन दोन्ही गोष्टी साध्य होतात .त्याशिवाय वर चढल्यावर सदाहरित वड व राधा कृष्ण मंदिर यांचे दर्शन होते ते वेगळेच.
जरी द्रोण हे डोंगराचे मूळ नांव असले तरीही सर्वजण त्याला दोण डोंगर आणि हळूहळू दोन डोंगर असे म्हणू लागले आहेत .काही जण आणखी शॉर्ट फॉर्म करून दोनवर चाललो,दोन वरून आलो, असेही बोलतात.
या द्रोणचे वैशिष्टय़ असे की या द्रोणवर निरनिराळ्या वनस्पतींची रेलचेल आहे.या सर्व औषधी वनस्पती आहेत .अनेकजण त्यांच्या गरजेप्रमाणे वनस्पतींची साले, मूळे, पाने, काढून नेत असतात .गरजे प्रमाणे त्यांचा वापर केला जातो .वैद्यांना कोणती वनस्पती कशासाठी वापरावी याचे अर्थातच ज्ञान असते.
औषधी कंपन्या येथून काही वनस्पती लागवड करण्यासाठी नेतात .तर काहींनी आपल्या कारखान्यांच्या शाखा येथे सुरू केल्या आहेत. पावसाच्या अखेरीला दिवाळीच्या काळात या वनस्पती पाणी पिऊन तरारलेल्या असतात.या वेळी त्या सर्वात जास्त जीवनशक्ती संपन्न असतात .यावेळी यांच्यापासून बनविलेली औषधे जास्त लवकर उपयोगी पडतात. रोगी लवकर बरा होतो.
औषधासाठी वनस्पती नेण्याचे,मूळ,साल, काढण्याचे, पाने तोडण्याचे, एक शास्त्र आहे. त्या पध्दतीनुसार सर्वच वनस्पतींचा वापर केला तर त्या जास्त गुणकारी ठरतात.अमावास्येला त्या जास्त जीवनशक्ती संपन्न असतात .अमावस्येला आणि ओहटीच्या वेळी जर त्या वनस्पती काढून त्यांचा औषध निर्मितीसाठी वापर केला तर जास्त लवकर गुण येतो.
वैद्याना काही मंत्र माहीत आहेत .त्या मंत्रांचा अर्थ साधारण पुढील स्वरूपाचा आहे .मी तुझा वापर रोग परिहारासाठी करीत आहे .त्यामुळे तुला पीडा होणार आहे.मला क्षमा करावी .जरी अशा विशिष्ट तिथीला आणि शास्त्रोक्त पद्धतीने वनस्पती तोडल्या व त्यापासून औषधे केली तर उत्कृष्ट गुण येतो असे असले तरी इतर काळात सुद्धा वनस्पती काढून बनविलेल्या औषधांचा गुण हा येतोच.मला ही सर्व माहिती असण्याचे कारण की माझे एक नातेवाईक वैद्य आहेत.
या वनस्पती औषधी असण्याचे कारण हा डोंगर मूळ द्रोणागिरी पर्वताचा एक छोटासा भाग आहे .माझ्या एका चिकित्सक मित्राने मला पुढील प्रश्न विचारला .अयोध्या ते लंका हा मार्ग जर पाहिला तर त्या मार्गावर कोकण येत नाही.मग हे ढेकूळ उर्फ डोंगर द्रोणागिरी पर्वताचा एक भाग कसा ?मी त्याला मिश्किलपणे म्हटले की ते कपिराज हनुमंतांना जाऊन विचारले पाहिजे. मी पुढे बोललो, ते मी कसे काय सांगू?आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली अाख्यायिका अशी आहे एवढे मात्र खरे.हा डोंगर द्रोणागिरी पर्वताचा एक भाग असो किंवा नसो त्यावरील वनस्पती औषधी आहेत ही सत्य वस्तुस्थिती आहे .
या डोंगराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे कुठूनही पाहिले असता केवळ वनस्पतीच दिसतात . खडक माती इत्यादी काहीही दिसत नाही .वर्षाच्या कोणत्याही ऋतूमध्ये हा डोंगर हिरवागार असतो हे आणखी एक वैशिष्टय़.उष्ण काळात हा डोंगर नेत्राना अतिशय सुखवितो. वनस्पती कितीही कापल्या तरी थोड्याच दिवसांत त्या वनस्पती पुन्हा तरारून पहिल्यासारख्या होतात.
रात्री या डोंगराचा नजारा पाहण्यासारखा असतो .मंद प्रकाशाचे कमी जास्त तीव्रतेचे असंख्य दिवे जर एखाद्या डोंगरावर लावते आणि जर ते लुकलुकत असतील तर तो नजारा जसा दिसेल तसा हा आमचा अद्भुत डोंगर दिसत असतो .बहुतेक सर्व वनस्पती रात्रीच्या शांत वेळेत प्रकाश फेकीत असतात.लांबून हे सर्व दृश्य पाहता येते . जर जवळ गेले,माणसाची चाहूल त्यांना लागली , तर मात्र लगेच या वनस्पती प्रकाश फेकण्याचे थांबतात . रात्री हा डोंगर इतर डोंगरांमध्ये कौस्तुभ मण्यासारखा चमकत असतो .
तर सदैव हरित असणारा, औषधी वनस्पती ज्याच्या अंगाखांद्यावर आहेत असा,रात्रीचा प्रकाश देणारा,द्रोणागिरी पर्वताचा एक लहान भाग असणारा असा हा डोंगर आहे .गाई,शेळ्या मेंढ्या या डोंगरावर चरत असतात.त्यामुळे त्यांचे दूध औषधी असते. जनावरांना उपजत काही औषधांचे ज्ञान असते.जनावराची काही कारणाने जर प्रकृती ठीक नसली आणि ते जनावर जर चरण्यासाठी मोकळे सोडले,तर ते या डोंगरावर येते आणि त्याच्या आजाराप्रमाणे विशिष्ट वनस्पतींची पाने खाते आणि त्याला बरे वाटते असा लोकांचा अनुभव आहे .
आमच्या गावात केवळ प्रकृती सुधारण्यासाठी येउन लोक राहतात.अनेक प्रकारचे दीर्घकालीन रोग बरे होतात, प्रकृती सुधारते, असा लोकांचा अनुभव आहे.प्रकृती चांगली असलेल्या व नसलेल्या लोकांसाठी येथे अनेक आरोग्य धाम,विश्रामधाम , बांधलेले आहेत.या द्रोण डोंगरातून अनेक निर्झर वाहत असतात.त्यातील काही झरे उष्ण अाहेत . या निर्झरातील पाण्याचे प्राशन व उष्ण झर्यात केलेले स्नान आरोग्यदायी असते.आरोग्य धाममध्ये औषधी वनस्पतींपासून बनविलेले काढे, तेले, गुटिका, यांचा वापर करून रोगी बरे केले जातात.निरनिराळ्या तेलांचा मसाज, व ऊष्ण औषधी पाण्याचे स्नान, ही आमच्या गावची खासियत आहे .
या डोंगरावर वडाचे एक मोठे प्रचंड झाड आहे.त्याच्या असंख्य पारंब्या आसमंतात पसरलेल्या आहेत .मूळ झाड कोणते आणि पारंब्या कोणत्या असा काही वेळा भ्रम पडतो.हा वृक्ष सदाहरित असतो .अनेक खांब असलेला एक मोठा मांडव आहे असे वाटते . याच्या बुंधाजवळ एक राधाकृष्णाचे छोटेसे मंदिर आहे.असंख्य प्रेमिक, असंख्य जोडपी, या मंदिराला आवर्जून भेट देण्यासाठी येतात.येथे बरेच लोक नवस फेडण्यासाठी किंवा नवस बोलण्यासाठी येतात. येथे येणारा प्रत्येक जण बहुधा एक घंटा बांधतो.घंटा मंदिरामध्ये किंवा बाहेर वडाखाली बांधली तरी चालते.जो तो आपल्या ऐपतीनुसार लहान मोठी घंटा बांधतो.लोखंड तांबे पितळ कास्य चांदी सोने कोणत्याही धातूच्या घंटा बांधल्या जातात. या घंटा कुणीही चोरू शकत नाही .जर कुणी चोरण्याचा प्रयत्न केला तर तो लुळापांगळा होऊन तिथेच खाली पडतो . दुसऱ्या दिवशी असा इसम झाडाखाली पडलेला आढळतो. त्याने कृष्णाची मनोभावे प्रार्थना केल्यावर पुन्हा असे कधीही करणार नाही अशी शपथ घेतल्यावर तो चालू शकतो .असा अनुभव अनेक जणांना आल्यावर आता कुणीही घंटा चोरण्याच्या फंदात पडत नाही. या देवस्थानाचा एक ट्रस्ट आहे .दर वर्षी कार्तिकी पौणिमेला सर्व घंटा काढल्या जातात .सोन्याच्या चांदीच्या घंटांना भरपूर किंमत येते .हे सर्व पैसे ट्रस्टच्या खात्यांमध्ये जमा केले जातात .देणग्या मिळाल्यामुळे जमा झालेले पैसे,मंदिरातील दान पेटीमध्ये जमा झालेले पैसे,हे सर्व ट्रस्टच्या खात्यात जमा होतात. या सर्व रकमेचा सामाजिक कार्यासाठी वापर केला जातो .या सर्व पैशांचा शक्यतो पंचक्रोशीमध्ये वापर केला जावा असा नियम आहे
शिक्षण ,आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते बांधणी,
गोरगरिबांना मदत, अशा कार्यात हा पैसा वापरला जातो.द्रोण डोंगर,द्रोण वड व त्याचाच एक आनुषंगिक भाग असलेले राधाकृष्ण मंदिर यामुळे आमच्या गावाची व पंचक्रोशीतील आठ दहा गावांची सर्वांगीण सुधारणा झाली आहे.येथे पर्यटक ,प्रकृतिव्यथित,प्रेमिक यांची रीघ लागलेली असते.यांच्यासाठी अनेक विश्रांती स्थाने निर्माण झाली आहेत .
या वडाची पाने कधीही गळत नाहीत.वड सदासर्वदा ताजातवाना टवटवीत हराभरा दिसतो.यांचा मूळ बुंधा जीर्णशीर्ण झालेला नाही. हा वड असा सदा तरुण असण्याचे कारण, इथे एका प्रेमी युगुलाचे रक्त सांडले आहे,असे सांगितले जाते. प्रेमिकांचे नवस पूर्ण होण्याचे कारणही ते आत्मे आहेत .
* त्या प्रेमिकांचे आत्मे इथे वास करतात.*
*फार फार वर्षांपूर्वीची दोन तीनशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.तिला एका लोककथेचे स्वरूप आले आहे .*
*गावातील सर्वेसर्वा असलेल्या खोतांची,एक प्रकारच्या जमीनदाराची, सरदाराची मुलगी व एका कोळ्याचा मुलगा यांची ही प्रेमकहाणी आहे .*
(क्रमशः)
६/४/२०२०©प्रभाकर पटवर्धन