( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

आज रेवा जरा नटूनथटूनच ऑफिसला गेली होती.तशी ती नेहमी व्यवस्थित व टापटिपीने राहणारी बाई होती.तीच काय त्यांच्या ऑफिसातील सर्व  स्त्रिया व्यवस्थित टापटिपीने येत असत.ते एक आधुनिक कॉर्पोरेट ऑफिस होते.टापटीप व चटपटीतपणा याला खूप महत्त्व होते. तसे पाहिले तर सर्व स्त्रिया नेहमीच टापटिपीने व व्यवस्थित राहात असतात.त्यातही रेवा जरा जास्तच व्यवस्थित होती.रेवा नेहमीच सर्वांत उठून दिसत असे.तिचे व्यक्तिमत्त्वच तसे होते.आज जुने बॉस निवृत्त होणार होते.त्या जागी नवीन बॉस येणार होते.

पुरुषांपेक्षा बायकांमध्ये   जरा जास्तच उत्सुकता होती.नवे बॉस कसे असतील?हा एकच चर्चेचा विषय होता.दिसायला कसे असतील त्याचबरोबर स्वभावाने कसे असतील,अशी चर्चावजा कुजबुज चालली होती.कांही बायकांनी नवे साहेब कसे असतील याबद्दल माहिती गोळा केली होती. ते विधुर आहेत.उंच निंच देखणे आहेत.त्यांचे वय जेमतेम चाळीस आहे.त्यांचा प्रेमविवाह झाला होता.अपघातात त्यांची पत्नी वारली.त्यांनी पुन्हा विवाह केला नाही.बहुधा पहिल्या पत्नीच्या स्मृतीत ते अडकले आहेत.जरी ते चाळिशीचे असले तरी दिसतात तिशी पस्तिशीचे, चांगलेच तरुण व रुबाबदार.त्यांना मूलबाळ नाही.स्वभावाने ते एरवी जरी मृदू असले तरी कामाच्या बाबतीत काटेकोर व कडक आहेत.हलगर्जीपणा गलथानपणा त्यांना सहन होत नाही.एक ना दोन अनेक गोष्टी बायका एकमेकांच्या कानात कुजबुजत होत्या.

ऑफिसच्या छोटय़ाशा सभागृहात निरोप समारंभ व स्वागत समारंभ एकत्र होते.जुन्या साहेबांना निरोप, पुढील निवृत्त आयुष्यासाठी  सदिच्छा आणि नवीन साहेबांचा स्वागत समारंभ व स्टाफशी ओळख असा छोटेखानी कार्यक्रम होता.एक दोनच मोजकी भाषणे होणार होती.नंतर एकत्रित अल्पोपहार(बुफे) ठेवला होता.ऑफिसची वेळ दहा ते सहा अशी होती.हा कार्यक्रम सहा  वाजता ऑफिसची वेळ संपल्याबरोबर ठेवला होता.निरोप समारंभ, स्वागत समारंभ,त्यात एक दोन छोटी भाषणे,नंतर ओळख परेड व शेवटी चहापान असा छोटेखानी सुटसुटीत कार्यक्रम होता.आठपर्यंत सर्व जण मोकळे होतील आणि आपल्या घरी जाऊ शकतील अशी कल्पना होती.

जुन्या साहेबांच्यावर गौरवपर भाषणे व निवृत्तीनंतर त्यांना दीर्घायुष्य व सदिच्छा देऊन झाल्यावर नवीन साहेबांची ओळख परेड सुरू झाली.बहुतेक कामे   संगणकावर होत असल्यामुळे ऑफिसमध्ये स्टाफ तसा थोडाच होता.दहा बारा स्त्रिया व दहा बारा पुरुष असा वीस पंचवीस जणांचा सुटसुटीत स्टाफ होता.

दोन्ही साहेब स्टेजवर शेजारी शेजारी बसले होते.नवीन साहेबांचे नाव प्रताप होते.मुली कुजबुजत होत्या त्यावरुन साहेब देखणे आकर्षक रुबाबदार आहेत हे लक्षात आले होतेच.प्रत्यक्षात कल्पना केली त्यापेक्षा साहेब रुबाबदार होते.त्यांचे डोळे पाणीदार व भावूक होते.आपल्या डोळ्यांनी ते समोरच्या माणसाला पिऊन टाकीत असत.जणू कांही ते त्या माणसाच्या आरपार  पाहून त्याची ओळख स्वत:ला पेटवून घेत असत.त्यांची दृष्टी भेदक क्ष किरणांसारखी होती.  

जुने साहेब नव्या साहेबांबरोबर फिरताना प्रत्येक स्टाफमेंबरची ओळख करून देत होते.प्रताप(नवे साहेब) प्रत्येक स्टाफ मेंबर बरोबर हस्तांदोलन करीत होता.सस्मित मुद्रेने प्रत्येक वेळी किंचित वाकून हात हातात घेऊन तो प्रत्येक स्टाफ मेंबरशी दोन चार औपचारिक शब्द बोलत होता.रेवाच्या पुढ्यात आल्यावर तिच्याकडे पाहताना त्याचे डोळे चमकल्यासारखे वाटले.त्याचे डोळे जास्त भावूक झाले.त्याच्या डोळ्यात कोणती तरी जुनी स्मृती दाटल्यासारखी वाटली.त्याच्या नजरेत ओळखीचे भाव होते.त्याच्या डोळ्यांत किंचित पाणी तरळल्यासारखे वाटले.त्याने तिचा हात हातात घेतला व इतर स्टाफ मेंबर प्रमाणेच तिच्याशी चार शब्द बोलला.प्रतापने रेवाचा हात जास्त प्रेमाने दाबला असा रेवाला भास झाला.प्रतापचे रेवाकडे इतरांपेक्षा जरा जास्तच लक्ष गेले असे रेवालाच      

नव्हे तर इतरांना सुद्धा जाणवले.अल्पोपहाराच्या वेळी डिश हातात घेऊन सर्व जण एकमेकांशी गप्पा मारीत होते.त्यावेळी प्रताप तिच्याजवळ येऊन जरा जास्तच  वेळ गप्पा मारीत होता.

कार्यक्रम संपला आणि सर्व जण लगबगीने आपल्या घरी निघाले.रेवा व तिची मैत्रीण सुहास दोघीही अंधेरीला रहात होत्या.त्यामुळे ट्रेनमधून साधारणपणे बरोबरच त्यांची ये जा होत असे.परत जाताना सुहासने रेवाला डिवचले.नवे साहेब तुझ्यावर जरा जास्तच खूष दिसतात.सांभाळून राहा ग बाई.त्यावर रेवाने इश्य तुझे आपले कांहीतरीच एवढीच प्रतिक्रिया दिली होती.

सुहास पूर्वेला राहात होती तर रेवा पश्चिमेला राहात होती. स्टेशनवर दोघींनी परस्परांचा निरोप घेतला.रेवाचा फ्लॅट चालत दहा मिनिटांच्या रस्त्यावर होता.ती बहुधा नेहमी चालतच घरी जात असे.गाडीच्या प्रवासाने आंबलेले अंग चालून जरा मोकळे होत असे.घरी जाता जाता ती विचार करीत होती.प्रताप तिच्याकडे नक्कीच आकर्षित झाला होता.त्याच्या नजरेतून, देहबोलीतून, ते स्पष्टपणे जाणवत होते.तिला जे जाणवले तेच सुहासलाही जाणवले होते.तीही प्रतापकडे आकर्षित झाली होती.

हे असले कसले विचार आपल्या मनात येतात म्हणून ती किंचित अस्वस्थ झाली होती.त्याचबरोबर आपल्यामध्ये अजूनही आकर्षण आहे या स्त्रीसुलभ भावनेने उत्तेजितही झाली होती.रेवा काही अल्लड कॉलेजमध्ये जाणारी मुलगी नव्हती.तिची मुलगी कॉलेजमध्ये जात होती.रेवा आता चाळिशीच्या उंबरठ्यावर उभी होती.कॉलेजमध्ये असतानाच तिचे  तिच्याबरोबर शिकणार्‍या  कृष्णकांतवर प्रेम जडले होते.दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या.तेवीस चौविसच्या वयातच दोघांनी विवाह केला होता.त्यांचा संसार आतापर्यंत  उत्तम चालला होता.

दोघानाही  शिक्षण पुरे झाल्या झाल्या नोकरी लागली होती.दोघे लगेच विवाहबंधनात अडकली.वर्षभरात सुकन्येचा जन्म झाला.दोन वर्षांनी सिद्धार्थ झाला.आता सुकन्या आर्किटेक्टला पहिल्या वर्षाला शिकत होती.सिद्धार्थ बारावीची परीक्षा दिल्यावर निरनिराळ्या प्रवेश (एंट्रन्स) परीक्षा देत होता.तो कुठे जाईल कोणत्या शाखेकडे त्याचा कल आहे ते अजून तरी कांही कळत नव्हते.दोघांच्याही लहानपणापासून रेवा व कृष्णकांत नोकरी करीत असल्यामुळे त्यांना घरात सर्व कांही करायची, जमवून घ्यायची सवय लागली होती.प्रत्येकाजवळ स्मार्ट फोन होता.लॅपटॉप होता.प्रत्येकाचे मित्र मैत्रिणींचे वर्तुळ होते.अभ्यास, समाजमाध्यमे, मित्रमैत्रिणी, यांत प्रत्येक जण आपला वेळ घालवित असे.लहानपणी त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी बाई ठेवली होती.त्या मावशी त्यांचे घरच्यासारखे करीत असत.त्यामुळे रेवाला घरची कोणतीही काळजी नव्हती.अजूनही घरी त्या स्वयंपाकपाणी पाहात असत. त्या सकाळीच येत आणि संध्याकाळी जेऊन घरी जात असत.  

रेवाचा नवरा कृष्णकांत यशाची निरनिराळी शिखरे पादाक्रांत करीत होता.त्याला कामासाठी  भारतात निरनिराळ्या शहरी जावे लागे.आजकाल ऑनलाईन बरीच कामे होत असली तरी कांही कामांसाठी प्रत्यक्ष जावे लागत असे.तो त्याच्या कार्यक्रमात व्यस्त असे.

रेवाची नोकरी छानपैकी चालली होती.सकाळी नऊलाच ती घरातून निघत असे.तिचे ऑफिस फोर्टमध्ये होते.दमून भागून संध्याकाळी सातपर्यंत ती घरी येत असे.

घरातील प्रत्येकाचे वर्तुळ भिन्न होते.त्यांची वर्तुळे परस्परांना स्पर्श करून जात असत.क्वचित एकमेकांना छेदत असत.मुले हुषार होती त्यांचा ती मार्ग व्यवस्थित आक्रमत होती.आपण सर्व हॉटेलात राहिल्याप्रमाणे एका ब्लॉकमध्ये राहात आहोत अशी विचित्र कल्पना तिच्या डोक्यात  तरळून गेली.    

लग्न झाल्यावर सुरुवातीचे दिवस फुलपांखरी असतात.तरुण वय असते.दिवस उन्मादाचे असतात.दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नसते.अपरिहार्यपणे नोकरी करावी लागत असली तरी नोकरीवरून घरी केव्हां येतो आणि एकमेकांच्या कुशीत शिरतो असे दोघांनाही होत असे.

रेवाला दिवस राहिले.डोहाळे वगैरे सुरू झाले.तोही काळ परस्परांना जपण्याचा होता.कृष्णकांत त्यावेळी तिला फुलासारखा जपत होता.मुलगी, पुन्हा डोहाळे, मुलगा, या चक्रात व नोकरीत कांही वर्षे गेली.हां हां म्हणता दोघांनाही सोळा सतरा वर्षे केव्हां संपली ते कळले नव्हते.वयाबरोबर आकर्षण कमी झाले होते.पहिली कांही वर्षे परस्परांना भेटण्याची,परस्परांच्या कुशीत शिरण्याची,जी ओढ असे ती हळूहळू कमी होत गेली होती.

उन्मादाचे, प्रेमाचे, आकर्षणाचे, दिवस संपले की काय असे वाटत होते.सर्वच गोष्टीना एक यांत्रिकता आली होती.सर्व गोष्टी रुटीन झाल्या होत्या.दोघांनाही आपल्यावरती गंज चढत चालला असे वाटत होते.हे स्वाभाविकही आहे असाही एक ग्रह होत होता.रेवा अजूनही आकर्षक दिसत होती.ती वयाबरोबर किंचित स्थूल झाली होती.त्यामुळे ती आणखीच गोड दिसत होती.तिच्या शरीराची गोलाई अजुनही कायम होती.चेहऱ्यावर अजुनही कोवळेपणा होता.अजूनही ती शेजारून गेल्यावर मागे वळून पाहावे असे वाटत होते.परंतु या सर्व गोष्टी कृष्णकांतच्या गावीही नव्हत्या. निदान तसे वाटत होते.

स्टेशनवरून घरी जाता जाता तिच्या डोळ्यांसमोर  आयुष्याचा,विवाह झाल्यापासूनचा, गेल्या सोळा सतरा वर्षांचा जीवनपट उलगडत होता.तिचे केस अजूनही लांबसडक काळेभोर व भरपूर दाट होते.तिच्याबरोबरच्या कांही बायका केसांना कलप लावीत असत.तिच्यावर अजून ती वेळ आली नव्हती. सुटसुटीतपणासाठी  बॉबकट करावा असे वाटत असूनही तिने तसे केले नव्हते.तिला तिच्या केसांचा अभिमान होता.एकेकाळी कृष्णकांतलाही तिच्या केसांचे आकर्षण वाटत असे.ते तो बोलूनही दाखवत असे.हल्ली त्याचे तिच्याकडे विशेष लक्ष नाही असे तिला वाटत होते.प्रत्येक जण दुसऱ्याला गृहीत धरीत होता.एकदा केव्हां तरी ती या केसांची अडचण होते, त्रास होतो, मी बॉबकट करते असे म्हणाली होती.त्यावर त्याने पूर्वीप्रमाणे विरोध न करता ठीक आहे एवढेच म्हणून पुन्हा पेपरमध्ये डोके घातले होते.जणूकांही तिने केस ठेवले काय आणि नाही ठेवले काय त्याचे त्याला कांही सोयरसुतक नव्हते.  

कृष्णकांत बदलला होता.निदान तिला तरी तसे वाटत होते.व्यायामाअभावी वयाबरोबर तो जरा जास्तच स्थूल दिसू लागला होता.त्याने जिममध्ये जावे. घरी तरी अर्धा तास एखादा तास व्यायाम करावा.असे रेवा सुचवीत असे.तिचे बोलणे तो हसण्यावारी उडवून लावीत असे.आपणही सकाळी उठून फिरायला जावे, व्यायाम करावा, योगा करावा, फिट राहावे, असे तिला वाटत असे.परंतु विचारापलीकडे अजून तिची मजल गेली नव्हती .

*तिचे घर जवळ आले होते.*

*एकाएकी तिला प्रतापची आठवण झाली.त्याच्या डोळ्यांतील ती चमक तिला आठवली.*

*स्त्रियांना एक उपजत बुद्धी असते.पुरूषांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांना लगेच कळतात.*

*आपण प्रतापला आवडलो आहोत हे तिला ऑफिसमध्येच कळले होते.*

*प्रतापही आपल्याला आवडतो. आपल्याला त्याचे  आकर्षण वाटत आहे याची एकाएकी तिला प्रकर्षत्वाने जाणीव झाली.*

*या जाणिवेने रेवा एकाएकी चमकली आणि स्वतःशीच थोडीशी सुखावली.*

*आता तिच्या पुढील आयुष्यात काय काय घडामोडी होणार होत्या ते त्या जगन्नियंत्याला, अदृश्य हातालाच माहीत.* 

(क्रमशः)

८/९/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel