(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. )

तात्या गादीवर आडवे झाले होते . त्यांचा चेहरा विचित्र दिसत होता त्याने जवळ जाऊन नाकाजवळ बोट धरून पाहिले. त्यांचा श्वास चालत नव्हता.ते हे जग सोडून केव्हाच निघून गेले होते .

त्यांना आता हॉस्पिटलमध्ये नेण्यातही अर्थ नव्हता.बाहेर लग्नाला सर्व मंडळी जमा झाली होती .सर्वत्र आनंद उल्हास व समाधान याचे वातावरण होते . अजून जेवणे व्हायची होती. बाहेर जाऊन हे सर्व सांगितले असते तर हाहा:कार उडाला असता .  

अविनाशने क्षणभर विचार केला .घरी जाईपर्यंत ही गोष्ट माईला सांगता कामा नये . अण्णासाहेबांना सविताच्या वडिलांना विश्वासात घेतल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही .हेही त्याच्या लक्षात आले .त्याचे वडिलांवर खूप प्रेम होते .अविनाशच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते .धाय मोकलून रडावे असे त्याला वाटत होते .त्याने अश्रू आवरले . मन घट्ट केले .कुणालाही काहीही कळणार नाही याची काळजी त्याला घ्यायची होती. बाहेर जाऊन त्याने अण्णासाहेबांना खुणेने बोलाविले.त्यांना बाजूला घेऊन सर्व हकिगत सांगितली .

झालीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला .माईनी झालीचा कार्यक्रम रद्द कां केला म्हणून विचारले.तात्यांना झोप लागली आहे. तात्यांशिवाय कार्यक्रम कसा करणार असे अविनाश म्हणाला.तात्या झोपले असताना त्यांना जर उठविले तर ते खूप रागावतात हे माईना माहीत होते .क्षणभर विचार करून त्यांनी त्यांच्याशिवाय कार्यक्रम करूया म्हणून सांगितले .झाल देण्याचा कार्यक्रम पार पडला .

भोजन समारंभ सुरू झाला .सौ.माईंची लगबग चालली होती.तात्यांना जेवण त्यांच्या खोलीत देण्यात आले .त्यांची प्रकृती जरा नरम आहे असे सांगून सर्वांचे समाधान करण्यात आले. लग्नाच्या गडबडीत आणि अण्णासाहेबांना हे सर्व मान्य आहे असे लक्षात आल्यावर कुणीही तात्यांना भेटण्याचा विशेष आग्रह धरला नाही . अविनाश व अण्णासाहेबांनी सर्व कार्यक्रम  शक्य तितक्या लवकर उरकण्यावर भर दिला होता.अण्णासाहेबांच्या पूर्ण संमतीने व सहकार्यानेच हे शक्य झाले होते.माई मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या, त्यांच्या माहेरच्या माणसांच्या ,घोळक्यात होत्या .मधून मधून माईंच्या विहीणबाईंजवळही गप्पा चालल्या होत्या .बाहेर समारंभात तात्या नाहीत ही गोष्ट माईंच्या लक्षात आली नाही .

भोजन समारंभ चालू असताना अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली .मागच्या दरवाज्याने तात्यांचे पार्थिव व अविनाश त्यांच्या बंगल्यावर निघून गेले .बरोबर अविनाशची पत्नी सुधाही गेली होती. 

तात्या, अविनाश व सुधा कुठे आहेत म्हणून माईनी चौकशी केली. नव्या सुनेच्या स्वागताची तयारी करण्यासाठी ते पुढे गेले आहेत असे माईंना सांगण्यात आले .

कुणालाही काहीही कळू न देता घाईघाईत लक्ष्मी पूजन ,स्टेजवर पती पत्नींनी एकत्र बसून सर्वांना भेटणे,मांडव परतणी ,इत्यादी कार्यक्रम उरकण्यात आले.फुलांनी सजवलेली मोटार अगोदरच तयार होती .त्यातून नवदाम्पत्य व माई बंगल्यावर रवाना झाली .इतर वऱ्हाडी मंडळी मागून मोटारीतून येत होती. 

कुणालाच प्रत्यक्षात काय घडले त्याची कल्पना नव्हती .अण्णासाहेबांनी चतुराईने सर्व प्रसंग निभावून नेले होते. कुणी काही विचारले तर एकच उत्तर होते. नवदाम्पत्याच्या स्वागतासाठी तात्या अविनाश व सुधा पुढे गेली आहेत.सर्वांना पटणारे असे ते उत्तर होते.सुदैवाने समारंभाच्या गर्दीत कुणाच्याही काहीही लक्षात आले नाही .तात्यासाहेबांची समारंभअप्रियता  सर्वांनाच माहीत होती .त्यांचा रागीट स्वभावही सर्वांना माहित होता. त्यामुळे जास्त चौकशी कुणी केली नाही.

बंगला जवळ आला .रात्र झाली होती .लग्न म्हणून बंगल्यावर दिव्यांच्या माळा दोन दिवस अगोदरच सोडलेल्या होत्या.दिव्यांच्या माळा प्रज्वलीत न झालेल्या पाहून माईना राग आला . त्या म्हणाल्या सुद्धा हा अविनाश असाच धांदरट आहे .सुधाच्या तरी निदान ही गोष्ट लक्षात यायला हवी होती .

त्यावर मधुकर म्हणाला कदाचित लाईट गेले असतील . बंगल्यातील लाईट इन्व्हर्टरवर आहेत. लाईट आले की माळा सुरू होतील .सुधावहिनीने भाकरतुकडा सवितावरून ओवाळून टाकला.माप ओलांडून सविता घरात आली .

अकस्मात आलेले  विघ्न गुप्त ठेवून शेवटी एकदाचे लग्न  पार पडले.

तात्या कुठे आहेत म्हणून माईनी चौकशी केली .ते आपल्या खोलीत आराम करीत आहेत असे सांगण्यात आले .

अविनाश माईना घेऊन तात्यांचे पार्थिव ठेवले होते त्या खोलीत निघाला .

त्याने आईचा हात जरा जास्तच घट्ट धरला होता .माईंचा हात पकडण्याच्या पद्धतीवरून व अविनाशच्या चेहऱ्यावरून माईना काहीतरी संशय आला .किंचित घोगऱ्या स्वरात त्यांनी सर्व काही ठीक आहे ना म्हणून विचारले .त्यावर सरळ उत्तर न देता खोलीत चल म्हणजे तुला सांगतो असे अविनाश म्हणाला .

आई या सर्वाला कसे तोंड देईल याची त्याला चिंता होती .

आई काय म्हणेल? तिचा प्रतिसाद कसा असेल?ती बेशुद्ध तर पडणार नाही ना?आणखी काही अशुभ तर होणार नाही ना?सविता पांढऱ्या पायांची, अवलक्षणी , अपशकुनी, म्हणून तिच्यावर जन्माचा शिक्का तर बसणार नाहीना?असे हजारो प्रश्न डोक्यात घेऊन अविनाश आईचा हात घट्ट पकडून तात्यांच्या खोलीकडे चालत जात होता .

माई मुळातच सुंदर देखण्या होत्या .मुलाचे लग्न मनासारखे झाल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक आगळीच झळाळी पसरली होती .

* माई पैठणी नेसल्या होत्या.दागदागिन्यांनी लगडलेल्या होत्या .*

*फुलांचा गजरा अंबाडय़ावर माळलेला होता .*

*कपाळावर ठसठशीत कुंकू होते .*

*गळ्यात विवाहानिमित्त मुद्दाम नवीन केलेले मंगळसूत्र होते.*

* त्या मूर्तिमंत लक्ष्मीसारख्या दिसत होत्या.*

* त्यांचे सौभाग्य मात्र त्यांना सोडून केव्हाच गेले होते .* 

(समाप्त)

२५/२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel