( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

मी गोंधळून गेलो आहे. मला कोणता निर्णय घ्यावा तेच कळत नाही.माझ्यापुढे तीन पर्याय आहेत.यातील कोणता पर्याय निवडावा ते मला समजत नाही.तिघीही मला आवडतात. प्रत्येकीचे वेगळे वैशिष्ट्य आहे. तिघीनाही मी आवडतो असे मला वाटते.मी त्यांना विचारायचाच अवकाश त्या लगेच मला हो म्हणतील.किंबहुना मी केव्हां विचारतो म्हणून त्या वाट पाहत असतील.मी काय बोलतोय कशाबद्दल बोलतोय त्याची कल्पना कदाचित कांहीजणांना आली असेल.कांहीजणांना शंका आली असेल.क्वचित एखाद दुसरा अनभिज्ञ असेल.

रंजना, विशाखा आणि सविता या तीन मुलींबद्दल,माझ्या मैत्रिणींबद्दल, मी बोलत आहे.तिघीही दिसायला सारख्याच आकर्षक आहेत.कुणीही अतिसुंदर (एक्स्ट्रॉऑर्डिनरी) नाही.किंवा कुणीही अतिसामान्य  (बिलो नॉर्मल) नाही.मी मुद्दामच कोण कशी दिसायला आहे ते सांगत नाही.गोरी सावळी गहुवर्णी ठेंगू उंच सडपातळ स्थूल इत्यादी इत्यादी.कारण मी दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व देतो.दिसणे महत्त्वाचे आहेच याबद्दल प्रश्नच नाही.मी त्याला महत्त्व देत नाही असेही नाही.परंतु जास्त महत्त्व मी असण्याला देतो.स्वभावाला देतो.

कुणीही मुलगा किंवा मुलगी कशी आहे ते अनुभवानेच कळत असते.ज्यावेळी विवाहाचा प्रश्न येतो त्यावेळी आपण वरवरच्या गोष्टी पाहत असतो.रूप,शिक्षण, नोकरी,पैसा,इत्यादी बाह्य गोष्टी  दिसत असतात.स्वभावाचा अंदाज  बाह्य रूपावरून,थोडा वेळ गप्पा मारून येत नसतो. इतकेच काय दीर्घकाळ मैत्री असली तरीही बऱ्याच गोष्टी आपल्याला समजत नसतात.ज्या केवळ लग्नानंतर लक्षात येतात आणि ते स्वाभाविकही आहे.प्रेमविवाहातसुद्धा दोघेही एकमेकांना वरवर ओळखत असतात.तारुण्यातील आकर्षणाचा फार मोठा भाग असतो.दोघे एकमेकांजवळ आपली चांगलीच बाजू दिसेल अशा पध्दतीने वागत असतात.जेव्हा विवाह होतो.दोघेही एकत्र जीवन जगण्याला सुरुवात करतात.त्यावेळी माहीत नसलेल्या अनेक गोष्टी लक्षात येऊ लागतात.स्वभावाचे विविध पैलू लक्षात येऊ लागतात.नंतर त्यातील किती खुपतात किती खुपत नाहीत असा प्रश्न निर्माण होतो.वैवाहिक संबंध हा तर एक महत्त्वाचा मुद्दा आहेच.जोडा कुठे खुपतो ते जोडा घालणार्‍यालाच समजते.वैवाहिक सुखामध्ये जुळवून घेण्याची वृत्ती हा सर्वात मोठा भाग असतो.प्रत्येक जण दुसर्‍याला आपल्यासारखे  करण्याचा प्रयत्न करीत असतो.ते स्वाभाविकही आहे.परंतु हा प्रयत्न जास्त झाल्यास सर्वांनाच दु:ख होते. शेवटी प्रत्येकाला थोडे थोडे बदलावे लागते.ते अपरिहार्यही आहे.बदलणे स्वाभाविक आपोआपच होते.मी मुळीच बदलणार नाही, दुसऱ्याने हवे तर बदलावे,अशी भूमिका जास्त तणाव निर्माण करते.विवाहात दोन व्यक्ती नव्हेत तर दोन कुटुंबे एकत्र येत असतात याची जाणीव दोघांनीही ठेवली पाहिजे.आपल्या येथे पुरुषसत्ताक पद्धतीत स्त्रीला पुरुषाकडे राह्यला जावे लागते.दुधात साखर मिसळावी त्याप्रमाणे स्त्री दुसर्‍या कुटुंबात अलगद सामावली गेली तर सर्वांनाच सुख व आनंद प्राप्त होतो. प्रत्येकाच्या कांही अपेक्षा असतात.त्यांची पूर्तता किती होते त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.अर्थात या सर्व गोष्टी नंतरच्या आहेत. तरीही निर्णय घेत असताना स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे या गोष्टींचा ऊहापोह मनातल्या मनात होतच असतो.म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मी गोंधळून गेलो आहे.काय निर्णय घ्यावा ते मला कळत नाही.अर्थात शेवटी मी निर्णय घेतलाच.त्याचीच ही गोष्ट.            

रंजना ही माझी ऑफिसमधील मैत्रीण आहे.गेली दोन वर्षेंआम्ही एकमेकांना ओळखतो.हिची चटकन दुसऱ्यावर छाप पडते.एकूण हिचे वागणे हायफाय असते.फेशियल केल्याशिवाय तिचा एकही महिना जात नसेल.तिचा मेकअप जरा हेवी   असतो.ती गोडबोली आहे.चटपटीत आहे.उच्च शिक्षित आहे.तिच्या हाताखाली आठ दहा जणांचा स्टाफ आहे.तिचे ऑफिस रेकॉर्ड उत्तम आहे.आमची ओळख झाल्यापासून ती नेहमीच प्रेमळपणे व आपुलकीने  माझ्याशी वागली आहे. ती जरी बोलून दाखवीत नसली तरी तिचे इरादे लगेच माझ्या लक्षात आले आहे.तशी ती स्वाभिमानी आहे.मी तिला प्रपोज केव्हां करतो याची ती वाट पाहात असावी.  

विशाखा ही माझी बालपणापासूनची मैत्रीण आहे. आम्ही शाळेत एकत्रच होतो.मी तिच्यापुढे दोन वर्षें होतो.महाविद्यालयात गेल्यावर आमच्या शाखा भिन्न होत्या.तरीही आमची मैत्री तशीच राहिली.आम्ही   भेटत, फोनवर बोलत,व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करत राहिलो.ती उच्च माध्यमिक शाळेत शिक्षिका आहे.ती आमच्या घरीही अधूनमधून आलेली आहे.माझ्या आई वडिलांना ती पसंत असावी असा मला संशय आहे.आडून आडून त्यांनी मला तिच्याशी विवाह करण्याबद्दल विचारले आहे.

सविता ही आमच्या सोसायटीत दुसर्‍या बिल्डिंगमध्ये राहते .आम्ही आमची जुनी जागा सोडून या संकुलात राहायला आलो तेव्हापासून तिची व माझी ओळख आहे.जवळजवळ दहा वर्षे आम्ही एकमेकांना ओळखतो.ती मला बाहेरही भेटते.विशाखा व रंजना याही मला बाहेर भेटतात. एकाच सोसायटीमध्ये रहात असल्यामुळे आमच्या घरी सविताचे येणे जाणे कांही निमित्ताने,कारणा कारणाने होत असते.तिची आई व माझी आई या मैत्रिणी आहेत.तिच्या आईने आडून आडून माझ्या आईला माझ्याबद्दल विचारले आहे.आईलाही ती पसंत असावी असे वाटते. 

तिघीं बरोबर मी निमित्तानिमित्ताने सिनेमा नाटक शॉपिंग पिकनिक यासाठी बरोबर   गेलेला आहे.पूर्वी स्त्री पुरुष मैत्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता.तो दृष्टिकोन (हेल्दी) सकस नव्हता.  हल्ली जास्त मोकळेपणा,दृष्टिकोनात बदल, निदान शहरातून तरी आला आहे.ही गोष्ट स्वागतार्ह आहे.

मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कांही गोष्टी लग्नानंतरच कळू शकतात. प्रत्येकाच्या अपेक्षा असतात.नेहमीप्रमाणे त्यामध्ये अग्रक्रमता असते.अपेक्षा अर्थातच आपल्या दृष्टीने कमी जास्त महत्त्वाच्या असतात.माझ्या अपेक्षामध्ये एकत्र कुटुंबात राहण्याच्या वृत्तीला जास्त महत्त्व आहे.माझी आई पंचावन्न व वडील साठ वर्षांचे आहेत.बाबा निवृत्त झाले आहेत.त्यांना चांगले पेन्शन आहे.आर्थिक दृष्टय़ा दोघेही चांगलेच सक्षम आहेत.त्यांना माझ्या आर्थिक   आधाराची गरज नाही.आयुष्यात  नेहमी एवढ्याच गोष्टी पुरेशा नसतात.सहजीवन,एकत्र निवास, हाही महत्त्वाचा असतो.परस्परांचा एकमेकांना आधार हाही महत्त्वाचा भाग असतो.कदाचित केव्हांही आधाराची गरज पडणार नाही.परंतु गरज पडली तर आधार आहे हा विश्वासच मनुष्याला मोठा आधार देत असतो. माझे आईवडील हळूहळू वृध्द होत जाणार.वय वाढते तसे रोगांचे आजारपणाचे प्रमाण आणखी वाढते.अशावेळी आर्थिक मदतची गरज नसली तरी भावनिक व इतर आधाराची गरज असते. कोणी कांहीही म्हणो मी आपला आईवडील वेडा मुलगा आहे.माझ्या पत्नीने एकत्र कुटुंबात राहावे माझ्या आईवडिलांशी पूर्णपणे सामावून जावे असे मला वाटते.आमच्या घरी स्वयंपाकाला बाई आहे.ती दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. झाडूपोचासाठी बाई आहे.डिश वॉशर आहे.वरकामाला संपूर्ण दिवस एक नोकर असतो.आम्हाला आर्थिक दृष्ट्या कांहीही कमी नाही.कुणीही आजारी पडले तर सहज हॉस्पिटलायझेशन करु शकतो.आवश्यक असेल तर घरी नर्सही कामासाठी ठेवू शकतो.पैसा आवश्यक आहे परंतु तोच सर्वस्व नाही.

इतके असले तरी घरातील सर्व गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत असा माझा आग्रह असतो.बऱ्याचवेळा संत तुकारामबुवांनी म्हटले आहे त्याप्रमाणे "मोले घातले रडाया नाही आसू आणि माया" अशी अनेकदा स्थिती असते.वेळ पडली तर सर्व कांही स्वतः करण्याची कुवत व इच्छा दोन्ही पाहिजे.कर्तव्यबुद्धी तर आहेच.परंतु प्रेमही पाहिजे.एखादी व्यक्ती वरवरचे प्रेम दाखवित आहे की खरेच त्याला किंवा तिला आंतून प्रेमाचा उमाळा आहे ते सहज समजू शकते.

तर माझ्यापुढील ही समस्या होती.तिघी मला तशा पसंत होत्या.जास्त सहवासानंतर प्रत्येकीचे कंगोरे,टोकदारपणा लक्षात येणार होता.प्रत्येकीचे सौंदर्य निरनिराळ्या गोष्टींत हाेते.प्रत्येकीचा आकर्षकपणा भिन्न होता.थोडक्यात  सर्वच चांगल्या दिसत होत्या. वाटत होत्या. माझ्या दृष्टीने कोण चांगली आहे हे कसे ओळखावे ते मला समजत नव्हते.माझ्या एकत्र कुटुंबात दुधातील साखरेसारखी कोण सामावून जाईल ते लक्षात येत नव्हते. 

आई माझ्यामागे लग्न कर, लग्न कर,म्हणून आग्रह करीत होती.तिने सविता व विशाखा या दोघींना पाहिले होतेच.सविता आमच्या सोसायटीतच राहत होती.तिच्या आईशी माझ्या आईची मैत्रीही होती.विशाखा माझी बालमैत्रीण आहे ते आईला माहीत होते.अधून मधून तीही घरी येऊन जात होती.माझ्या आईला दोघीही पसंत होत्या.तिने रंजनालाच पाहिले नव्हते.एक दिवस मी तिलाही घरी बोलावले.आईशी तिची ओळख करून दिली.तिने तिच्या बोलण्याने आईवर चांगलीच छाप पाडली.ती मार्केटींगलाच होती.त्यानंतर एकदोनदा ती घरी येऊन गेली.स्वतःचे मार्केटिंग तिने उत्तम केले.आईला तीही पसंत पडली.मी तिला घरी मुद्दाम आणून ओळख करून दिली त्याअर्थी ती मला पसंत आहे.आईची अनुमती मिळविण्यासाठी मी तसे केले असा आईचा ग्रह झाला होता.ती म्हणाली मला सर्व सारख्याच चांगल्या वाटतात.तुला कोण आवडते ते पाहा.ते महत्त्वाचे.आम्ही काय आज आहोत उद्या नाही.

आई पुढे म्हणाली. अपेक्षा आणि त्यांची पूर्ती हा भाग असतोच.अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही,कितपत पूर्ण झाल्या ते लग्नानंतर दोन चार वर्षांनीच कळते.बऱ्याचवेळा आंतून एखादीशी आपले स्नेहबंध जुळतात जुळलेले आहेत असे वाटते.ही 'अंतरीची खूण' महत्त्वाची.तसे कुणाबद्दल वाटते ते तू ठरव.आणि त्याप्रमाणे निर्णय घे.ही सर्व चर्चा होत असताना बाबा तिथेच होते.त्यांनी यामध्ये विशेष लक्ष घातले नाही.त्यांना त्यांचे मत विचारता.बाबा म्हणाले,तुझ्या आईच्या मताशी मी सहमत आहे.अंतरीची खूण महत्त्वाची मात्र ती उमजली पाहिजे.तारुण्यसुलभ आकर्षण हीच अंतरीची खूण असे होता कामा नये.तारुण्यसुलभ आकर्षण आणि अंतरीची खूण यांची गल्लत होता कामा नये.ते पुढे म्हणाले जे होणारे आहे ते टळत नाही.जेव्हा जे व्हायचे तेव्हां ते होते.चर्चा जरूर करावी परंतु ही गोष्टही पार्श्र्वभूमीला असावी.    

*मी दोघांचेही ऐकत होतो.अंतरीची खूण मला कळत होती.*

*परंतु तारुण्यसुलभ आकर्षणाशी त्याची गल्लत होत आहे की नाही ते मला समजत नव्हते.*

*सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी गोंधळून गेलो होतो.*

*शेवटी मी एक प्रयोग करण्याचे ठरविले.त्या प्रयोगाच्या निष्कर्षावर व यशस्वितेवर माझा निर्णय अवलंबून होता.*

(क्रमशः)

५/११/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel