( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

मी दोघांचेही ऐकत होतो.अंतरीची खूण मला कळत होती.

परंतु तारुण्यसुलभ आकर्षणाशी त्याची गल्लत होत नाहीना ते मला समजत नव्हते.

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी गोंधळून गेलो होतो.

शेवटी मी एक प्रयोग करण्याचे ठरविले.त्या प्रयोगाच्या निष्कर्षावर व यशस्वितेवर माझा निर्णय अवलंबून होता.

एक दिवस मी आई व बाबा यांना मला तुम्हाला कांहीतरी सांगायचे आहे,महत्त्वाचे बोलायचे आहे, असे सांगून बोलण्यास सुरुवात केली.त्याना मी लग्नाचा निर्णय घेतला आहे आणि त्याबद्दल बोलणार आहे असे वाटले होते.मी त्यांना म्हणालो, एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला तो असा आहे,तो तसा आहे अशा बर्‍याच कल्पना असतात.प्रत्यक्ष वेळ आल्याशिवाय कोण कसा आहे याचा उलगडा होत नाही. प्रत्यक्ष प्रसंगांत कोण कसा वागेल ते सांगता येत नाही.प्रत्यक्ष परीक्षेची वेळ केव्हां येईल सांगता येत नाही.त्यावेळी परीक्षेत माझी पत्नी उत्तीर्ण झाली नाही तरी आपण कांहीच करू शकत नाही.मुलाचा किंवा मुलीचा विवाह ही कुटुंबाच्या जीवनातील महत्त्वाची घटना आहे. माझ्या पत्नीने आपल्या कुटुंबात दुधामध्ये साखर असते त्याप्रमाणे समावून जावे असे मला वाटते.मी वेळोवेळी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझी तिघींशीही चांगली मैत्री आहे.तिघीही माझ्यावर प्रेम करतात असे मला वाटते.मी प्रपोज करण्याची त्या वाट पाहत असाव्यात.मला माझा निर्णय घेता येत नाही. 

यासाठी एक प्रयोग करावा असे मला वाटते.या प्रयोगात मला तुमचे विशेषतःआईचे पूर्ण सहकार्य पाहिजे.आईने खोटे खोटे कांही दिवसांसाठी,आठवड्यांसाठी, आजारी पडावे.आईच्या आजारपणात प्रत्येकीच्या प्रतिक्रिया कशा येतात,प्रत्येक जण कसे वागते, त्यावर आपल्याला निर्णय घेता येईल.

आई माझ्या विचाराशी पूर्ण सहमत झाली.दुसऱ्या दिवसापासूनच तिने प्रयोगाला सुरवात करावी असे मला सांगितले.मी दुसर्‍या दिवशी ऑफिसात रजेचा अर्ज दिला.कारण अर्थातच आईचे आजारपण हे होते.आईला झोपून राह्यला सांगितले आहे.तिचे बीपी वाढले आहे.डॉक्टरानी औषधांबरोबरच तिला पूर्ण विश्रांती घेतलीच पाहिजे असे सांगितले आहे.असे सर्वांना सांगण्यास सुरुवात केली.ऑफिसात रंजनाला लगेच ती बातमी कळली.  ऑफिस सुटल्यावर रंजना लगेच घरी आली.येताना ती पुष्पगुच्छ घेऊन आली होती.आईची आपुलकीने तिने चौकशी केली.गेट वेल सून म्हणून सदिच्छाही दिल्या.तशी ती गोडबोली  होती.तेवढ्यात मला आई म्हणाली "प्रदीप मला चहा प्यावासा वाटतो.आले,गवती चहा,घालून चहा कर.मी तिला बरे असे म्हटले.

रंजनाला आमच्या घरी स्वयंपाकीण काकू आहेत हे माहीत होते.त्या संपूर्ण दिवस असतात हेही माहीत होते.तिने स्वयंपाकीण बाई  नाहीत का म्हणून विचारले.त्यावर आईने त्या दहा दिवस रजा घेऊन गावी गेल्या आहेत म्हणून सांगितले.आम्हीच त्यांना दहा दिवस विश्रांती घ्या कामावर येऊ नका असे सांगितले होते.त्यांचा पगार अर्थातच चालू राहणार होता.मी बरे आहे असे म्हणून स्वयंपाकघरात निघून गेलो.रंजना स्वयंपाकघरात येईल चहा करील अशी आमची अपेक्षा होती.तिने त्यातील कांहीच केले नाही.मग नाश्ता जेवण याचे काय करता असे विचारले.त्यावर आईने जमेल तसे प्रदीप बघतो.म्हणून तर त्याने रजा टाकली आहे.बाहेरूनही मागवतो परंतु मला बाहेरील मसालेयुक्त तिखट तेलकट पदार्थ चालत नाहीत.यानाही त्याचा त्रास होतो.त्यामुळे माझ्यासाठी प्रदीप मला हवे ते जमेल तसे शिजवतो असे सांगितले.हल्ली स्पेशलायझेशनचे विशेषीकरणाचे दिवस आहेत.अनेक ठिकाणी वस्तू मिळत असतात.कुठे ना कुठे आपल्या मनासारख्या वस्तू मिळतीलच.आणि नाही मिळाल्या तर थोडे जुळवून घेतले पाहिजे.असे म्हणून रंजना स्वयंपाकघरात आली. माझ्याशी तिने गप्पा मारल्या.मला कांहीही मदत केली नाही.जमले तर, मिळाली तर, एखादी तात्पुरती स्वयंपाकीण बाई पाठवून देते असे सांगितले.मी केलेला चहा पिऊन ती निघून गेली.

ती गेल्यावर आई माझ्याकडे बघून मिस्कीलपणे हसली.मीही तिच्याकडे बघून हसलो.आम्ही दोघेही जे काय समजायचे ते समजलो होतो.   

सविता तर आमच्या सोसायटीतच राहात होती.आमच्या आईची ती चांगली मैत्रीण होती.आई आजारी असल्याचे तिला लगेच कळले.ती लगेच भेटायलाही आली.आईने चहा पाहिजे म्हणून मला सांगितले.सविता उत्साहाने पुढे झाली.तिने आईला हवा तसा चहा करून दिला.आमच्या स्वयंपाकीण काकूंची चौकशी केली.त्या गावाला गेल्या आहेत असे आम्ही सांगितले.  त्यावर तिने जेवण माझी आई करील.मी घेऊन येत जाईन म्हणून सांगितले.त्यावर आई म्हणाली उगीच तुझ्या आईला त्रास कशाला?माझे आजारपण दोन दिवस चालते,चार दिवस चालते की लांबते कांहीच सांगता येत नाही. त्यावर तिने काकू तुम्ही काळजी करू नका.मी व आई बघून घेऊ म्हणून सांगितले.आई म्हणाली,कशाला तू त्रास घेतेस.माझ्यापुरते पथ्याचे हा प्रदीप करीत जाईल.बाकी आम्ही बाहेरून मागवत जाऊ.या निमित्ताने दोघानाही प्रदीपला व त्याच्या वडिलाना बाहेरचे चमचमीत जेवण मिळेल.

त्यावर सविता म्हणाली दोन चार दिवस आम्ही पाठवू.काकू तोपर्यंत बर्‍या होतील.नाहीतर पुढचे पुढे बघता येईल.मी शेजारीच राहते.मी इथे स्वयंपाक करीन.तुम्हाला गरमागरम जेवायला देईन असे कांही ती म्हणाली नाही. तिच्या आईने स्वयंपाक करावा आणि तिने फक्त आणण्याचे काम करावे असा तिचा प्लॅन दिसला.ती रोज येऊन आईची विचारपूस करीत असे.तिच्या पथ्याचे तिला केव्हां केव्हां करून देत असे.तिचे निश्चित असे कांहीही नव्हते.सर्व लहरी कारभार होता.मनात आले तर ती सर्व कांही करीत असे.असेच दोन चार दिवस गेले.सवितापेक्षा तिची आईच जास्त उत्साह दाखवत होती.

चार सहा दिवस असेच गेले.आई अजून बरी होत नव्हती.मला ऑफिसात जास्त रजा मिळणे शक्य नव्हते.सविता आलेली असताना एक दिवस आईला चक्कर आली.तिला बाथरुमलाही जाणे कठीण झाले.मी तिला धरून कशीबशी बाथरूमपर्यंत नेले.सविता कांहीही पुढाकार न घेता तशीच बसून होती.तेवढ्यात तिच्या डोक्यात कांहीतरी प्रकाश पडला.आई बाथरुममधून बाहेर येते तो ती तिथे हजर होती.आईच्या हाताला धरून तिने आईला अंथरूणावर नेऊन झोपवले.

मी आईने चार दिवस स्नान केले नाही अशी पुडी सोडून दिली.मी स्पंजिंग करतो असे म्हटले तर आईला संकोच वाटतो.एखादी नर्स आम्ही बघत आहोत परंतु मिळत नाही असे म्हटले.नर्स असली की ती सबंध दिवस थांबेल.स्पंजिंग करील.अाईला बाथरुममध्ये नेऊन स्नानही घालील.असे पुढे म्हणालो.

सविता मी स्पंजिंग करते,आईला स्नान  घालते,असे कांही म्हणते का,ते आम्ही पाहत होतो.त्या बाबतीत तिने ऐकून न ऐकल्यासारखे केले.

आई आजारी पडली ती वेळ मी बरोबर शोधून काढली होती.माझी बालमैत्रीण विशाखा त्यावेळी ट्रीपवर गेली होती.तिच्याशी माझे फोनवर बोलणे होतच होते.आईच्या आजारपणाची बातमी मी तिला मुद्दामच दिली नव्हती.तिची ट्रिप आनंदात पार पडावी. तिला तिकडे काळजी लागून राहू नये. किंवा तिने मध्येच ट्रिप सोडून येऊ नये अशी माझी इच्छा होती.

दिवस असेच चालले होते.कधी आम्ही बाहेरून जेवण मागवत होतो.कधी सविता तिच्या घरून जेवण घेऊन येत होती.

विशाखा सहलीवरून परत आली.मी तिला आईच्या आजारपणाची बातमी दिली.आपला जवळजवळ रोज फोन होत होता.तरी तू मला काकूंच्या आजारपणाबद्दल कांहीही का बोलला नाही म्हणून मला बोलणी खावी लागली.तिने तिची तिच्या ऑफिसमधील रजा वाढवली.ती जवळजवळ आमच्या घरीच राहायला आली.आमचा तिने पूर्ण ताबा घेतला.आईला धरून ती बाथरुममध्ये नेत होती.आईचे न सांगता वेळच्या वेळी स्पंजिंग करीत होती.एक दोन दिवसांनी तिला आंघोळही घालीत होती.तिला जमेल तसा स्वयंपाक करून जेवायला घालत होती.रोज बाहेरचे खाणे चांगले नाही असे सांगून, ती तिने बनविलेला स्वयंपाक आम्हाला खाण्याला भाग पाडत होती.तिच्या हाताला तेवढी चव नव्हती पण त्यामध्ये माया होती. तिचे प्रेम होते. तिचा जिव्हाळा होता.तिची आपुलकी होती.   

त्या प्रेमामुळे त्या मायेमुळे ते अन्न गोड लागत होते.हल्लींच्या बऱ्याच मुलींना शिकत असल्यामुळे,नोकरी करीत असल्यामुळे,स्वयंपाकाची सवय नसते.अंगावर पडले म्हणजे सर्व कांही येते.केल्याने होत आहेरे हेच खरे.जिला स्वयंपाकाची अंगभूत, उत्स्फूर्त, गोडी असते ती स्वयंपाक शिकते.त्यात प्रवीणही होते.जेवण महत्त्वाचे आहे यात शंका नाही.पोटासाठी तर सगळे चालले आहे.परंतु कुटुंबात,जीवनात अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात.

सविताचा स्वभाव मनमिळाऊ व प्रेमळ होता.त्याची कल्पना जरी मला असली तरी आम्हा सर्वांना आईच्या आजारपणात त्याचा अनुभव आला.कोणतेही काम करण्याला तिची ना नसे.ती माझी बालपणापासूनची मैत्रीण होती.तिचे स्वभावाचे अनेक पैलू मला माहिती होते.आई विचारीत होती तेव्हां माझ्या हृदयाची 'अंतरीची खूण' तीच होती. 

रंजना एक दोन दिवसाआड पुष्पगुच्छ घेऊन येत असे.गोड गोड गप्पा मारीत असे.कधी कुणाबरोबर तरी पुष्पगुच्छ चिठीसह पाठवीत असे.तिच्याशी गप्पा मारताना प्रत्येकाला त्याची स्पेस मिळाली पाहिजे.त्यासाठी पती पत्नीने स्वतंत्र राहणे जरुरीचे आहे अस ठाम मत तिने मांडले होते.दूर राहून प्रेम वाढते असे तिचे मत होते.भांडी जवळ जवळ आली की आवाज होतो असे ती म्हणत असे.तिच्या म्हणण्यात तथ्य होतेही आणि नव्हतेही.भांड्यांचा आवाज होतो हे बरोबर आहे.परंतु किती आवाज करायचा हे ज्याच्या त्याच्या हातात आहे असे आपले माझे मत आहे.भांड्यांचे आवाज येतात तसा अनेक भांड्यांचा उपयोगही होतो. 

सविताजवळ गप्पा मारताना एकत्र कुटुंब पद्धतीच्या बाबतीत ती नरो वा कुंजरोवा होती.तशी सगळ्याच बाबतीत ती मध्यम होती.कामाची अळंटळं करण्याचा तिचा स्वभाव होता.

विशाखाच्या बाबतीत कसलाच प्रश्न नव्हता.तिच्या मनात, हृदयात, माझ्याबद्दल आणि त्यामुळे माझ्या कुटुंबाबद्दल आईवडिलांबद्दल प्रेम,जिव्हाळा,आपुलकी होती.शेवटी प्रेम हे सहवासाने निर्माण होत असते.एकदा एखाद्याला आपला म्हटला कि म्हटला असा तिचा स्वभाव होता.एकदा एखाद्याला आपला म्हटल्यावर त्याच्या किंवा तिच्या गुणदोषांसह आपण स्वीकार केला पाहिजे असा तिचा स्वभाव व मत होते.

*विशाखाला मी प्रपोज केले.तिनेही त्याचा आनंदाने स्वीकार केला.*

*आज आम्ही सर्व एकत्र राहात आहोत.*

*वडिलांनी दोन फ्लॅट शेजारीशेजारी घेतले होते.मध्ये समाईक दरवाजा होता.म्हटले तर स्वतंत्र व म्हटले तर जवळजवळ एकत्र असा सांचा होता.*

*माझी पत्नी कोणत्या स्वभावाची मिळेल याबद्दल बाबांना खात्री नव्हती.त्यांना शक्यतो कोणावरही कोणतीही गोष्ट लादायची नव्हती.*

*विशाखाला आईबाबा व आम्ही शेजारीशेजारी राहणे  ही गोष्ट पसंत नव्हती.आम्ही एकत्रच असतो.*

(समाप्त)

७/११/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel