(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
अमर फोटो स्टुडिओ मध्ये अमर रिव्हॉल्व्हिंग चेअरवर बसला होता.बऱ्याच दिवसांनी त्याला निवांत वेळ मिळाला होता .त्याच्या टेबलाचा एका खणाला नेहमी कुलूप लावलेले असे.त्या खणात एक खास फोटोंचा आल्बम ठेवलेला होता.वेळ असला की तो अाल्बम अमर पाहात असे.
अमरचे वय केवळ अठ्ठावीस होते.गेल्या बारा वर्षांत अतोनात परिश्रम करून त्याने हा फोटो स्टुडिओ उभा केला होता.अमरची फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचप्रमाणे नाटक व्यवसायामध्ये एक उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून ओळख होती . कला क्षेत्रामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या ,नवोदित व जुन्या जाणत्या, नटनट्या फोटो शूटिंगसाठी त्याच्याकडे आवर्जून येत असत.प्रत्येक व्यक्तीत काही ना काही सौंदर्य असतेच .ते सौंदर्य, ती वैशिष्ट्ये, नेमकी ओळखून फोटो कसा घ्यावा ते अमरच जाणे.प्रकाशयोजना कशी असावी, फोटो घेतांचा कोन कोणता असावा ,मेकअप किती व कोणत्या प्रकारचा असावा ,फोटोला पार्श्वभूमी कोणती असावी ,हे त्याला उपजतच कळत असे . त्याची अंत:प्रेरणा काय असावे, काय नसावे, कसे असावे, ते सर्व सांगत असे.
त्याने काढलेले फोटो पाहून तरुण तरुणींना फिल्म व्यवसायात सुरुवातीला काम दिले जाई.पुढे अर्थातच ज्याला त्याला आपली कला, आपले कौशल्य, आपली बुद्धिमत्ता, सिद्ध करावी लागे.
त्याचे फोटोशूट स्टुडिओमध्ये चाले त्याचप्रमाणे निरनिराळ्या लोकेशनवरही होत असे .विवाह, षष्ठ्यब्दपूर्ती, स्वागत समारंभ, अशा अनेक ठिकाणी फोटो काढण्यासाठी अग्रक्रम अमर फोटो स्टुडिओला दिला जाई.अमरच्या हाताखाली तीन चार फोटोग्राफर काम करीत असत .फोटो काढण्यासाठी अमरच हवा असला तर महिना महिना अगोदर बुकिंग करावे लागे.
शाळेत असताना त्याची बुद्धी शाळेतील विषयात विशेष चालत नव्हती .गणित इतिहास भूगोल हे विषय त्याला कंटाळवाणे (बोअर) वाटत असत.तो जेमतेम काठावर पास होत असे . गाव लहान होते. वाडा संस्कृती होती.सर्व घरांचे दरवाजे उघडे आसत.आपापल्या ब्लॉकचा दरवाजा लावून आत बसण्याची संस्कृती नव्हती.वाड्यातील सर्वांचे, प्रत्येक घर आपलेच समजून येणे जाणे होत असे.सर्व अनौपचारिक मामला होता . शाळा त्यावेळच्या गावाबाहेर होती.पाठीला दप्तर डकवून रमत गमत मुले पायी शाळेत जात असत.
अमरची एक सामान्य मुलगा म्हणून ओळख होती .त्याला उपजतच छायाचित्रणाची आवड होती . वडिलांजवळ हट्ट करून त्याने एक स्वस्तातला कॅमेरा विकत घेतला होता.त्या स्वस्त कॅमेऱ्यातून काढलेले फोटो त्याला बक्षीस मिळवून देत होते .अनेक फोटो स्पर्धांमध्ये तो भाग घेत असे .
पारंपारिक शालेय अभ्यासात अमरला रस नाही असे पाहून त्याच्या वडिलांनी त्याला रस असलेल्या छायाचित्रणाच्या व्यवसायात तो पुढे येईल हे वेळीच हेरले . अभ्यास कर अभ्यास कर म्हणून त्याच्या मागे न लागता त्याच्या आवडीच्या क्षेत्रात त्याला काम करण्यासाठी मोकळीक दिली .तो जेमतेम दहावी कसाबसा पास झाला होता .
वडिलांचा पाठिंबा स्वत:चे अंगभूत कौशल्य,परिश्रम, दैव व अंत:प्रेरणा यांच्या जोरावर तो या स्थानापर्यंत येऊन पोचला होता .त्याचे वय आता अठ्ठावीस होते.त्याने अजून लग्न केले नव्हते. परिश्रम मेहनत धडपड यामध्ये त्याला बहुधा लग्न करण्यासाठी वेळ मिळाला नसावा .
त्याच्यासमोरच्याच वाड्यात शलाका राहात होती.थोडी बहुत ती अमरच्या बरोबर विरुद्ध होती .शालेय अभ्यासात ती अतिशय निष्णात होती .ज्याला तैलबुद्धी म्हणता येईल अशी तिची बुद्धी होती . प्रत्येक शालेय विषयात ती जवळजवळ पैकीच्या पैकी गुण मिळवित असे.ती ज्या शाखेकडे जाईल त्या शाखेत सर्वोत्कृष्ट स्थान मिळवील असे तिचे शिक्षक म्हणत असत. ही बहुधा नामांकित डॉक्टर,संशोधक,प्राध्यापक किंवा आर्किटेक्ट होईल असा तिच्या वडिलांचा अंदाज होता .
तिला चित्रकलेची आवड होती .लहानपणापासून अभ्यास सांभाळून ती चित्रे काढीत असे .तिचा कल ओळखून तिच्या वडिलांनी तिला चित्रकलेचा वर्ग लावला होता. लहान वयात पेन्सिल चित्रे, रेखाचित्रे, वॉटर कलर चित्रे, तैलचित्रे,निसर्ग चित्रे ,ती काढत असे .फोटोवरून किंवा प्रत्यक्ष व्यक्ती पुढय़ात बसवून काढलेली व्यक्तिचित्रे (पोर्ट्रेट) उल्लेखनीय असत.
अमर व शलाका एका वर्गात एका शाळेत होती. समोरासमोरच्या वाड्यात राहत असल्यामुळे शाळेत बरोबरच येत जात असत.परस्परांच्या घरीही कामानिमित्त किंवा कामाशिवाय घरातील सर्वांचेच येणे जाणे असे . शलाकाची आई एखादा विशेष पदार्थ केला तर तो नमुना म्हणून तिच्याबरोबर अमरकडे पाठवीत असे .अमरची आईही अमरबरोबर तिने केलेला पदार्थ खास म्हणून शलाकाच्या आईकडे पाठवीत असे.
अमर व शलाका या दोघांचेही लहानपणी एकमेकांकडे येणे जाणे खेळणे खूप होत असे.हळूहळू हे प्रमाण कमी होत गेले. शलाकाच्या शालेय तीव्र बुद्धिमत्तेचे दडपण अमरच्या मनावर येत गेले.दोघेही एकाच वर्गात असल्यामुळे त्यांचे पेपर काही खवचट शिक्षक आदर्श म्हणून संपूर्ण वर्गात दाखवित असत. अर्थातच शलाकाचा पेपर,पेपर कसा असावा याचा आदर्श असे तर अमरचा पेपर,पेपर कसा नसावा याचा आदर्श असे .अशा वेळी अमरची कितीही फडफड झाली तरी तो काहीही करू शकत नसे.नकळत अशा गोष्टींचे दडपण अमरवर येत गेले .हळूहळू त्याचे शलाकाशी बोलणे, बरोबर जाणे येणे, कमी होत गेले .
शलाका अमरकडे निर्बुद्ध म्हणून कधीही पाहात नसे .जरी वर्गात काही खवचट शिक्षकांनी त्याची अवहेलना केली तरी ती घरी जाताना त्याची बाजू घेऊन त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत असे .तू शाळेतील अभ्यासात जरी मागे असला तरी तू आणखी कुठल्यातरी क्षेत्रात नाव काढशील मोठा होशील असे शलाका अमरची समजूत काढताना नेहमी म्हणत असे.असे असले तरी अमरला नाही म्हटले तरी न्यूनगंड (इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स)आला होता.त्यामुळे तो हळूहळू शलाकापासून स्वतःला दूर ठेवू लागला होता.
अमरची आई व शलाकाची आई यांची मैत्री दाट होती.दोघींनी विहिणी होण्याचे मुलांच्या लहानपणापासून ठरविले होते. थट्टेमध्ये दोघे बोलत असताना मुलांच्याही कानावर या गोष्टी गेल्या होत्या .अमर स्वतःला शलाकापासून दूर दूर ठेवू लागल्यामुळे दोघे जेव्हा नववी दहावीमध्ये आली तेव्हा त्यांच्या नात्याला वेगळा रंग येऊ शकला नाही.
अमरने दहावीनंतर शाळा सोडून दिली.त्याने स्वतःला छायाचित्रणासाठी पूर्णपणे वाहून घेतले .वडिलांचाही त्याला पूर्ण पाठिंबा होता .बुद्धिमत्तेचे अनेक पैलू असतात.पारंपरिक क्षेत्रात एखादा अयशस्वी असफल झाला म्हणजे तो फुकट गेला असे म्हणता येत नाही.याची अमरच्या वडिलांना पूर्ण जाणीव होती .अमरला त्याच्या वडिलांनी एका नामांकित फोटोग्राफरकडे शागीर्द शिष्य म्हणून शिक्षणासाठी ठेवला होता.या संधीचा अमरने पूर्ण उपयोग करून घेतला . वडिलानी दिलेले भांडवल, बँकेकडून घेतलेले कर्ज आणि स्वतःचे व्यावसायिक कौशल्य व दैवाची साथ यांच्या जोरावर त्याने दहा बारा वर्षांत आहे हे स्थान मिळविले होते .
शलाका इतकी बुद्धिमान होती की ती कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकली असती.ती डॉक्टर प्राध्यापक संशोधक सीए वगैरे काहीतरी होईल असे सर्वांना वाटत होते.परंतु तसे झाले नाही.
शलाकाची आवड(पॅशन) चित्रकला होती . बारावीनंतर ती जे जे स्कूल ऑफ आर्टसला(जे जे कॉलेज ऑफ अॅप्लाइड आर्ट्सला) मुंबईला गेली. जेव्हा ती सुटीमध्ये घरी येत असे तेव्हांच दोघांची भेट होत असे.प्रत्येक वेळी शलाका आवर्जून अमरला त्याच्या घरी किंवा स्टुडिओत भेटण्यासाठी जात असे.तिने मैत्रीचा व प्रेमाचा बंध कायम ठेवला होता.अमरच प्रत्येक वेळी संकोच करीत असे . कित्येक वेळा तो शलाकाला टाळीत आहे की काय असेही वाटत असे .दोघांच्या मनात काय होते ते त्यांचे त्यांनाच माहीत.
काळाच्या ओघात शहर वाढत गेले.फ्लॅट संस्कृती, मल्टीस्टोअर बिल्डिंग्ज अस्तित्वात आल्या .दोन्ही कुटुंबे गावाबाहेर रहायला आली .एकाच सोसायटीत दोघांनीही फ्लॅट घेतले होते .दोघांचे फ्लॅट दोन इमारतीत असले तरी एकाच मजल्यावर समोरासमोर होते.अमरची आई व शलाकाची आई खिडकीत गॅलरीत उभे राहून गप्पा मारू शकत असत.
अमरने दहावी झाल्यावर शाळा सोडून दिल्यापासून शलाका व अमर यांच्या आयांनी विहिणी होण्याचे त्यांचे स्वप्न सोडून दिले होते.
शलाकाने चित्रकलेचे क्लासेस काढले होते.तिचे (स्पेशालिटी) विशेषीकरण लॅन्डस्केप व पोर्ट्रेट यामध्ये होते .लॅंडस्केपसाठी ती जागा निवडीत असे.त्यासाठी( लोकेशन शोधण्यासाठी )तिचा निरनिराळ्या ठिकाणी प्रवास होत असे. पोट्रेट्ससाठी स्टुडिओमध्येच ज्याचे तैल चित्र काढायचे त्याला यावे लागत असे.एखाद्याला जर जास्त वेळ बसणे शक्य नसेल तर ती त्याच्या फोटोच्या साह्याने पोर्ट्रेट, तैलचित्र, काढीत असे .
दोघांनाही फोटोशूटसाठी किंवा लँडस्केपसाठी योग्य जागेची गरज असे.अशा संशोधन प्रवासामध्ये दोघांचीही भेट होत असे.कित्येक वेळा दोघेही बरोबर जाऊन संशोधन करीत असत.एखाद्या लोकेशनवर एकाच वेळी अमरचे फोटोशूट चाले तर शलाकाचे लॅंडस्केप तयार होत असे . फोटोवरून व्यक्तिचित्र (पोर्ट्रेट) काढण्यासाठी उत्कृष्ट फुलसाइज फोटोची गरज असे.अशा उत्कृष्ट फोटोसाठी ती अमरचे नाव सुचवी.अमर तिला हवा तसा फोटो काढून देत असे .एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ असा एकूण मामला होता .
शलाकाचे आई वडील शलाकाला लग्नाबद्दल आग्रह करीत असत .लग्नाचा विषय ती उडवून लावीत असे . तिच्या मनात काय आहे तेच त्यांना समजत नसे .
अधून मधून अमरचे आई वडील त्याला लग्नासंबंधी विचारीत असत .त्याचा स्टुडिओ झकासपैकी चालत असलेला पाहून चांगली चांगली स्थळे त्याला सांगून येत असत .
तो प्रत्येक वेळी लग्नाचा विषय सफाईने टाळीत असे.
(क्रमशः)
२२/५/२०२०©प्रभाकर पटवर्धन