( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)
रामभाऊ व सीताकाकू यांचा विवाह होऊन पंचेचाळीस वर्षे झाली होती.लग्नाच्या वेळी राम पंचवीस वर्षांचा तर सीता बावीस वर्षांची होती.आता रामभाऊ सत्तर तर सीता अडुसष वर्षांची होती. मुलगी सांगून जाऊन,मुलगी दाखवून,पसंत करून,नंतर संमती देऊन,विवाहासंबंधी एकत्र बैठक होवून,अगदी पारंपरिक पध्दतीने, प्रथेप्रमाणे,त्यांचा विवाह झाला होता.राम व सीता यांनी प्रथम मुलगी(सीता) दाखवायला आणली तेव्हांच एकमेकांना पाहिले होते.मुलगी पसंत झाल्यावर, लग्न ठरल्यावर,निमित्तानिमित्ताने राम दोनचारदा सीताच्या आईवडिलांकडे निरोप घेऊन गेला होता.त्यावेळी परस्परांशी थोडेबहुत बोलणे झाले होते.दोघेही बिचकत बिचकत, लाजत लाजत,परस्परांशी दोनचार वाक्ये बोलली होती.कांही मुले, कांही मुली, थोड्या बहुत धाडसी असतात.विनासंकोच एकमेकांशी बोलू शकतात.राम व सीता त्या स्वभावाची नव्हती.
त्या काळी संपर्क साधन पत्र,चिठ्ठी किंवा प्रत्यक्ष भेट हेच होते.लँडलाइन फारच कमी लोकांकडे होती.टेलिफोन असणे हे श्रीमंतीचे लक्षण समजले जात असे.व्यावसायिक,श्रीमंत,संपादक, अशा कांही मोजक्या, हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या व्यक्तींकडे टेलिफोन असे.त्या काळी टेलिफोन असणे हे श्रीमंतीचे व्यवच्छेदक लक्षण होते.स्वाभाविकच राम व सीता यांच्या आईवडिलांकडे टेलिफोन नव्हता.त्यांना विवाहासंबंधीच्या निरनिराळ्या कारणांसाठी परस्परांशी संवाद करावा लागे.
त्याकाळी मोटारींप्रमाणेच मोटारसायकल स्कूटर या अभावानेच असत.मुख्य वाहन सायकल हे होते.रामच्या वडिलांना सायकल चालविणे त्रासदायक पडत असे.ते शक्यतो सायकल चालवीत नसत.त्याकाळी रिक्षाही फारशा नव्हत्या.टांगा मिळणे व नंतर एखाद्या ठिकाणी जाणे थोडे त्रासदायकच असे.वरपित्याने वधू पित्याकडे वारंवार कामासाठी जाणे त्या काळी तसे अयोग्य समजले जात असे.गरज पडली तर वधूपित्याने वर पित्याकडे यावे अशी प्रथा होती.
रामच्या ऑफिसच्या वाटेवरच सीताच्या आई वडिलांचे घर होते.त्यामुळे राम बरोबर चिठ्ठी निरोप देणे सोयीस्कर पडत असे.ही गोष्टही रामच्या वडिलांना विशेष पसंत नव्हती.परंतु नाइलाजाने ते निरोप राम बरोबर देत असत.राम सीताच्या वडिलांना भेटण्यासाठी आलेला असताना राम व सीता यांची भेट दोन चारदा लग्नाअगोदर झाली होती.थोडय़ाबहुत गप्पा झाल्या होत्या.सीता तशी चंट मुलगी होती.ती सायकल सफाईने चालवीत असे.तिच्या बाबांचा किंवा आईचा काही निरोप असल्यास ती रामच्या घरी,जे तिचेच पुढे होणार होते जात असे.त्यावेळी राम घरी असल्यास दोघांचे बोलणे होत असे.सीता रामच्या घरी जाताना तो घरी असेल अशी वेळ साधूनच जात असे.त्यामुळे दोघेही परस्परांना अनोळखी नव्हती.दोघांमध्ये थोडाबहुत संवाद झाला होता.दोघांनी ठरवून बाहेर भेटणे शिष्टसंमत नव्हते.शहर लहान असल्यामुळे ती गोष्ट लोकांच्या डोळ्यावर कदाचित आली असती.तरीही दोघांनी ठरवून गावाबाहेरच्या शंकराच्या मंदिरात परस्परांची भेट घेतली होती.गप्पा मारल्या होत्या. मुलगी दाखवून लग्न ठरल्यामुळे प्रेमोत्तर विवाहाचा प्रश्नच नव्हता.विवाहपूर्व थोडीबहुत ओळख,परस्परांच्या आशाआकांक्षा जाणणे,भविष्यकाळाची स्वप्ने रचणे,इत्यादी गोष्टी झाल्या होत्या.थोडक्यात दोघेही संपूर्णपणे परस्परांना अनोळखी नव्हती.
राम व सीता यांचा जोडा राम सीतेसारखा आहे असे सर्व म्हणत असत.जोडा म्हणजे राम सीतेसारखा असे म्हणण्याची प्रथा कां आहे मला समजत नाही.वनवासाची चौदा वर्षे सोडली तर दोघांनाही अनेक संकटे दु:खे यांचा सामना करावा लागला. वनवासात असतानाच दोघांना निरामय, प्रेममय,एकत्र जीवन थोडे बहुत जगता आले.राज्याभिषेक झाल्यावर राम तिचा लोकांच्या बोलण्यामुळे त्याग करीपर्यंत,थोडेबहुत ऐषारामी जीवन जगता आले.इतर वेळी ताटातुटीला तोंड द्यावे लागले.लोक दूषणे सहन करावी लागली.
याउलट कृष्ण रुक्मिणी हा जोडा मला जास्त आदर्श वाटतो.रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र पाठवून प्रेम व्यक्त केले.मला सोडव घेऊन जा असे सांगितले.मी मंदिरात जाणार आहे अशीही सूचना दिली. कृष्णाने तिला स्वतःचा जीव धोक्यात घालून,संकटातून सोडवले.तिला सर्वांसमक्ष रथातून अर्थात रुक्मिणीच्या संमतीने पळवून नेले.
काही असो दोघांचाजोडा राम सीता,कृष्ण रुक्मिणी,यासारखा होता.तरुणपणात तारुण्यसुलभ आकर्षण असते.मतभेद झाले तरी ते रात्रीपर्यंतच सामान्यतः टिकतात. रात्री सर्व मतभेद मिटतात.वय वाढत जाते तसे तारुण्यसुलभ आकर्षण कमी कमी होत जाते.सहवासाने हळूहळू आपुलीक प्रेम निर्माण होत जाते.वाढत्या वयाबरोबर हे प्रेमबंध जास्त घट्ट होत जातात. परस्परांवरील अवलंबित्व अनेक कारणांनी वृद्धिंगत होत जाते.हळूहळू एकाशिवाय दुसर्याला करमत नाही अशी स्थिती निर्माण होते.प्रत्येकात दोष असतात.प्रत्येकाला दुसऱ्यातील उणिवा, कमतरता,दोष, दिसत असतात.या सर्वांसकट एकमेकांनी एकमेकांचा मनापासून स्वीकार केलेला असतो.सुरुवातीला दुसर्याला आपल्यासारखे करण्याची प्रवृत्ती असते.आपण बरोबर दुसरा चूक.ही प्रवृत्ती बदलत जाते.नकळत एकमेक एकमेकांसारखी होत जातात.कित्येक वेळा त्यांचे त्यांनाही ते कळत नाही.
तर राम सीता यांचा विवाह पारंपरिक पध्दतीने जुळवून झाला.संसारातील धक्के चपटे खाता खाता दोघेही हळूहळू एकमेकांत केव्हां कशी मिसळून गेली त्यांचे त्यांनाच कळले नाही.त्यांना मुले झाली.त्यांनी त्यांची संख्या दोनवरच सीमित ठेवली.एक मुलगा व एक मुलगी, राम व सीता, असा चौकोन होता.त्या बाबतीत सर्व जण त्यांना भाग्यवान म्हणत असत.हल्ली सुशिक्षित कुटुंबात,सुशिक्षित काय अशिक्षित आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातही, मुलांची संख्या जाणीवपूर्वक कमी ठेवली जाते.
हम दो हमारे दो,असा जरी एकेकाळी नारा असला तरी हल्ली कित्येक ठिकाणी हम दो हमारा एक,असे आढळून येते.मुलाला किंवा मुलीला कुणीतरी भावंडं पाहिजे याबाबत बऱ्याच जणांचे एकमत आहे. तरीही निरनिराळ्या कारणांसाठी एकच मूल दिसून येते.दोन्ही मुलगे किंवा दोन्ही मुली अशीही कुटूंबे आढळतात.एक मुलगा व एक मुलगी असे समसमान वाटप असेल तर सर्वांनाच समाधान होते.
राम व सीता यांना एक मुलगा व एक मुलगी झाली.हळूहळू ती मोठी झाली.रामला चांगली नोकरी होती.घरचाही तो सुस्थितीत होता.सीता ही नोकरी करीत होती.डबल इंजिन असल्यामुळे संसाराची गाडी झकास जात होती.रामने मुलांना तुम्हाला हवे तेवढे शिका.मी तुमच्या पाठीशी आहे.आपल्याला कांही कमी नाही असे आश्वासन दिले होते.दोघेही उच्चशिक्षित झाली.नोकरीला लागली. त्यांनी परस्पर आपले विवाहही जुळविले.राम सीतेला तथास्तू असे म्हणण्याशिवाय कांहीच काम उरलेले नाही.
राम व सीता वाढत्या वयाबरोबर रामूकाका व सीताकाकू झाल्या.तर कांहीजण रामभाऊ व सीताबाई असे म्हणत असत.मुलीचे कमलचे लग्न झाले तिचा नवरा कांही वर्षांनी ऑस्ट्रेलियात जाऊन तिथेच सुस्थिर झाला.मुलगा विलास अमेरिकेत जाऊन तिथे स्थिरावला.हल्ली कांही कुटुंबांतील मुले परदेशी शिक्षण नोकरी या निमित्ताने जातात.नंतर तिथेच स्थिरावतात.त्यांचे आईवडील इथे एकटे पडतात.वाढत्या वयाबरोबर एकटे राहणे हळूहळू दुष्कर होत जाते.पैसा असतो.आर्थिक सामर्थ्य असते.आर्थिक सामर्थ्य आनंदाने जगण्यासाठी पुरेसे नसते.मुलांचे प्रेम, त्यांचा सहवास,हीही एक गरज असते.वाढत्या वयाबरोबर शारीरिक दौर्बल्य येते.एकटे स्वतंत्र राहताना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते.मुलगा किंवा मुलगी जवळ असली तर जीवन जास्त सुसह्य होते.मुले परदेशी आहेत म्हणून किंवा आई वडिलांना मुलाजवळ कोणत्याही कारणाने पटत नाही म्हणून,(दोष मुलांचा किंवा आईवडिलांचा असतो असे नाही.कांही वेळा दोघांचाही असतो.विशिष्ट परिस्थितीचा असतो.) ज्येष्ठांसाठी हल्ली सर्व सोयी सुविधा असलेले ज्येष्ठ निवास सीनिअर सिटिझन्स होम निर्माण होत आहेत.
विलास सुरवातीला अमेरिकेत गेला तेव्हां प्रथम उच्च शिक्षणासाठी गेला होता.तिथे त्याला मोठ्या पगाराची नोकरी लागली.येथे येऊन नोकरी शोधण्यापेक्षा तिथे लागलेली नोकरी करणे जास्त योग्य वाटले.भरपूर पैसा मिळवू, अनुभव घेऊ आणि नंतर भारतात परत येऊ असे सुरुवातीला तो म्हणत असे.मी तात्पुरता म्हणून गेलो आहे.नंतर आई वडिलांजवळ येऊन राहणार असे तो म्हणत असे.तशी त्याची प्रामाणिक इच्छा होती.
प्रत्यक्षात असे सर्वच जण म्हणत असतात.परंतु एकदा का तिथल्या जीवनशैलीची सवय झाली की मग भारतात राहणे नकोसे वाटते.तात्पुरता म्हणून गेलेला तेथील कायम निवासी होतो.एम्प्लॉयमेंट कार्ड, नंतर ग्रीन कार्ड व शेवटी अमेरिकन (यू एस/कॅनडा/इंग्लंड/ऑस्ट्रेलिया इ.)नागरिक,अशी प्रगती होत जाते.बाळंतपण अमेरिकेतच होऊ दे म्हणजे अमेरिकन नागरिकत्व मिळेल असे म्हणत बाळंतपण अमेरिकेतच होते.
मूल शाळेत जाण्याअगोदर जर दोघेही भारतात आली तर भारतात येणे शक्य होते.मूल परदेशातील शाळेत जायला लागले, त्याला तिथल्या जीवनशैलीची सवय झाली, की भारतात परतणे अशक्य होते.
अति उच्च शिक्षितांच्या आईवडिलांच्या नशिबी येणारे हे अपरिहार्य भोग आहेत. निवृत्ती अगोदर राम व सीता दोघेही एकदोनदा अमेरिकेला व ऑस्ट्रेलियाला जाऊन आले. निवृत्तीनंतर राम व सीता कौतुकाने आपल्या मुलाकडे अमेरिकेत जाऊन कांही काळ राहिले.परंतु त्यांना तिथे करमत नव्हते.त्यांची पाळेमुळे येथे खोल रुजलेली होती.नातेवाईक, मित्रमंडळी, येथे होती.येथील जीवनशैली, हवामान त्यांच्या पचनी पडलेले होते. ते परदेशाशी तुलना करता कसेही असले तरी सवयीचे होते आपले होते. विलास व कमल त्यांना आग्रह करून कायमचे राहाण्यासाठी तिथे बोलावत असतानाही दोघांनीही भारतातच कायमचा राहण्याचा निर्णय घेतला.
पैशाला कांही कमी नव्हते.खात्रीचा प्रामाणिक नोकर मिळणे कठीण काम असते.त्यांनी स्वयंपाकासाठी एक काकू इतर कामासाठी नोकर अशी व्यवस्था केली होती.घरात सर्व प्रकारची यंत्रे हाेती. दोघेही शारीरिकदृष्टय़ा समर्थ होती तोपर्यंत कांहीही अडचण आली नाही.
शारीरिक शक्ती क्षीण झाल्यामुळे अडचण येण्याअगोदरच दुसरी एक अडचण निर्माण झाली.
*हल्ली सीताकाकू अनेक गोष्टी विसरू लागल्या होत्या.*
*सुरुवातीला त्या एखादी साधी गोष्ट विसरत असत.उदाहरणार्थ टॉवेल कुठे ठेवला आहे.कपडे कुठे ठेवले आहेत.हे त्यांना आठवत नसे.*
*वॉशिंग मशीन, डिश वॉशर, सुरू केला की नाही?*
*त्या वॉशिंग मशीन, डिशवॉशर, सुरू करण्यासाठी जात तर तो अगोदरच त्यांनी चालू केलेला असे.*
*दिवसेंदिवस त्यांचा स्मृतिभ्रंश(डिमनेशिया)वाढतच गेला.त्याची परिणिती शेवटी भयानक झाली.*
(क्रमशः)
७/११/२०२१©प्रभाकर पटवर्धन