२९ जुलै १८५४ ला जॉन रे ने नौदलाच्या सेक्रेटरीला आपल्याला मिळालेली सर्व माहीती संकलीत करुन संदेश पाठवला.

रिपल्स बे, जुलै २९

या वर्षीच्या वसंत ऋतूतील बुथिया आखाताचं सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या मोहीमेवर माझी वाटचाल सुरु असताना पेली उपसागरात माझी काही एस्कीमोंशी भेट झाली. त्यांच्यापैकी एकाकडून पश्चिमेच्या दिशेला एका मोठ्या नदीपलीकडे गोर्‍या लोकांची एक तुकडी उपासमारीने प्राणाला मुकल्याचं मला कळून आलं. त्यानंतर मिळालेल्या माहीतीवरुन आणि एस्कीमोंकडून खरेदी केलेल्या वस्तूंवरुन हे सर्व लोक सर जॉन फ्रँकलीनच्या मोहीमेतीलच होते अशी माझी नि:संशय खात्री आहे.

चार वर्षांपूर्वीच्या (१९५०) वसंत ऋतूत सुमारे चाळीस गोर्‍या लोकांची एक तुकडी किंग विल्यम बेटाजवळ सीलची शिकार करत असलेल्या एस्कीमोना भेटली होती. ही तुकडी बर्फावरुन बोट ओढून नेत दक्षिणेला निघाली होती. त्यांच्यापैकी कोणालाही एस्कीमोंची भाषा येत नसली तरी खाणा-खुणांवरुन आपली बोट बर्फात अडकून फुटल्याचं त्यांच्याकडून एस्कीमोना कळलं. दक्षिणेला हरणाच्या शिकारीच्या शोधात त्यांची पदयात्रा सुरु होती. त्यांच्यापैकी एकजण निश्चितच अधिकारी होता. अन्नाच्या कमतरतेमुळे त्यांच्यापैकी अनेक जण अशक्तं झालेले होते. एस्कीमोंकडून त्यांनी मांसासाठी एका सीलची खरेदीही केली.

त्याच वर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीला सुमारे तीस गोर्‍या लोकांचे मृतदेह मुख्य भूभागावर आढळले. तिथून जवळ असलेल्या एका मोठ्या नदीच्या उत्तर-पश्चिमेला एक दिवसांच्या अंतरावर असलेल्या एका बेटावर आणखीन पाच मृतदेह पडलेले होते. ही नदी म्हणजे जॉर्ज बेकची ग्रेट फिश नदीच असावी. या नदीजवळ असलेल्या बेटाच्या वर्णनावरुन ते माँट्रीयाल बेट होतं यात शंका नाही. यापैकी अनेक मृतदेह बर्फात अर्धवट पुरलेले होते. काही तंबूतही आढळले. बोटीला उपडी करुन त्याखाली काहीजणांनी आश्रय घेतला असावा, कारण तिथेही काही मृतदेह होते. एका मृतदेहाजवळ टेलीस्कोप सापडला. तो अधिकारी होता हे निश्चीत.

यापैकी अनेक मृतदेह फाडलेले दिसत होते. त्यांच्या देहावरील मांस व्यवस्थित कापून घेतलेलं दिसत होतं. माझ्या अंदाजाप्रमाणे या दुर्दैवी लोकांना भूक भागविण्यासाठी शेवटचा उपाय अंमलात आणावा लागला असावा. नसमांसभक्षण! आपल्याच मृत सहकार्‍यांचं मांस खाण्यापलीकडे त्यांच्याजवळ कोणताही पर्याय उरला नसावा.

त्यांच्याजवळ घड्याळं, कंपास, टेलीस्कोप्स आणि डब्बल बॅरलच्या अनेक बंदुकी असाव्यात असा माझा तर्क आहे. मला भेटलेल्या एस्कीमोंकडे मला या वस्तूंचे अनेक तुकडे सापडले. काही चांदीचे काटे-चमचेही मला त्यांच्याजवळ आढळले. जमतील तितके मी खरेदी केले आहेत. यापैकी महत्वाच्या वस्तूंची यादी सोबत जोडलेली आहे.

मला भेटलेल्या एकाही एस्कीमोने गोर्‍या लोकांची प्रेतं पाहीली नसली, तरी त्यांना भेटलेल्या एस्कीमोंच्या बाकीच्या टोळ्यांकडून त्यांना ही माहीती मिळालेली होती. ती माहीती खरी आहे याबद्दल मला तरी कोणतीही शंका नाही.

वसंत ऋतूतील माझी मोहीम फारशी यशस्वी ठरली नाही. माझ्यापुढे अशा अनेक अडचणी उभ्या राहील्या ज्यावर माझ्यापाशी कोणताही उपाय उरला नाही.

जॉन रे
कमांडींग ऑफीसर
हडसन बे कंपनी आर्क्टीक एक्सपिडीशन

या संदेशाचा काय परिणाम होणार होता याची थोडीशी तरी कल्पना रे ला होती का?

फिनीक्स आणि नॉर्थस्टार जहाजांनी बॅफीनच्या उपसागरातून अखेर अटलांटीकमध्ये प्रवेश केला!
६ ऑक्टोबरला दोन्ही जहाजं इंग्लंडच्या रॅम्सगेट बंदरात पोहोचली!

४ ऑगस्टला रे ने रिपल्सचा उपसागर सोडला आणि इंग्लंडची वाट धरली. २२ ऑक्टोबरला तो इंग्लंडला येऊन पोहोचला.

.... आणि २३ ऑक्टोबरला नौदलाने रे चा गुप्त संदेश सर्व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केला!

इंग्लंडमध्ये हलकल्लोळ झाला!

ब्रिटीश समाजातील उच्चभ्रू बूर्झ्वा ढुढ्ढाचार्यांना नरमांसभक्षणाचा विचारही पचनी पडणं शक्यं नव्हतं.

इतका भयानक आरोप?
आणि तो देखील सरदारकीने गौरविण्यात आलेल्या एका थोर अधिकार्‍यावर?
आणि त्याला आधार काय...
यःकश्चित आदीवासी एस्कीमोंकडून मिळालेली माहीती? त्यांची लायकी ती काय?

इंग्लंडमधील उच्चभ्रूंनी आदीवासी एस्कीमोंना कःपदार्थ लेखावं यात काहीच आश्चर्य नव्हतं. वर्षानुवर्ष मुरलेल्या इंग्लिश संस्कारांचा आणि वंशश्रेष्ठत्वाच्या अभिमानाचा तो परिपाक होता.

जॉन रे वर टीकेची झोड उठवण्यात आली. लेडी फ्रँकलीनच्या वतीने प्रसिद्ध लेखक चार्ल्स डिकन्स याने जॉन रे वर जहरी टीका करणारे लेख लंडन टाईम्स मध्ये प्रसिद्ध केला. एस्कीमोंकडून मिळालेली माहीती डिकन्सने शुद्ध थोतांड म्हणून उडवून लावली. इतर अनेकांनीही रे वर टीकेचे आसूड ओढले. खुद्द नौदलातील अनेक अधिकार्यांनीही रे वर विश्वास ठेवण्याचं नाकारलं.

मात्रं रे ला एस्कीमोंकडून मिळालेल्या फ्रँकलीनच्या अनेक वस्तूंबद्दल मात्रं कोणी चकार शब्दही काढला नाही!

जॉन रे चा रिपोर्ट आणि त्याने एस्कीमोंकडून मिळवलेल्या वस्तू या फ्रँकलीन मोहीमेतील अधिकार्‍यांच्या असल्याचं सिद्ध झाल्यावर ब्रिटीश नौदलाने नोव्हेंबरमध्ये हडसन बे कंपनीला शोधमोहीम राबविण्याची सूचना दिली.

१८५५ च्या जुलै महिन्यात जेम्स अँडरसन आणि जेम्स स्ट्युअर्ट या हडसन बे कंपनीच्या दोन अधिकार्‍यांनी बेक (ग्रेट फिश) नदीमधून लहानशा बोटीने उत्तरेला नदीवरील चँट्री खाडी गाठली. तिथे एका एस्कीमोंच्या टोळीशी त्यांची गाठ पडली. या एस्कीमोंकडे चौकशी केल्यावर त्याना एक महत्वाची माहिती मिळाली.

बेक नदीच्या पलीकडे सुमारे ३०-३५ गोर्या लोकांची एक तुकडी उपासमारीने मरण पावली होती!

नेमक्या याच तुकडीची माहीती जॉन रे ला एस्कीमोंकडून मिळालेली होती! अँडरसन-स्ट्युअर्टच्या माहीतीमुळे त्याला पुष्टीच मिळात होती.

ऑगस्ट मध्ये चँट्री खाडीतील माँट्रीयाल बेटावर शोध घेताना अँडरसन आणि स्ट्युअर्ट यांना लाकडाच्या दोन लहानशा फळ्या आढळून आल्या.

एका फळीवर कोरलेलं होतं 'इरेबस'!
दुसर्‍या फळीवर कोरलेलं होतं 'मि. स्टॅनली'!

इरेबस हे फ्रँकलीनच्या मोहीमेतलं जहाज. स्टॅनली हा जहाजावरील डॉक्टर होता!

जॉन रे चा रिपोर्ट आणि अँडरसन-स्ट्युअर्ट मोहीमेचे निष्कर्ष समोर असतानाही ब्रिटीश नौदलाने फ्रँकलीनच्या शोधार्थ पुढे कोणतीही मोहीम काढण्यास ठाम नकार दिला!

फ्रँकलीन आणि त्याच्या सर्व सहकार्‍यांना नौदलाने ३१ मार्च १८५४ या दिवशीच मृत घोषीत केलं होतं!

ब्रिटीश नौदलाने जॉन फ्रँकलीनला मृत घोषीत केलं असलं, तरी त्याचं नेमकं काय झालं हे जाणून घेण्याची उर्मी जेन फ्रँकलीनला स्वस्थ बसू देईना! आणखीन शोधमोहीम राबवण्यास ब्रिटीश सरकार आणि नौदलाकडून नकारघंटा मिळाल्यावर तिने स्वतः मोहीमेचा खर्च उचलण्याची तयारी केली.

इसाबेला हे आपलं जहाज या मोहीमेसाठी खूपच लहान असल्याचं ध्यानात आल्यावर जेनने ११७ टनांचं फॉक्स हे जहाज एप्रिल १८५७ मध्ये विकत घेतलं. फ्रँकलीनच्या शोधासाठी हे जहाज वापरण्याचा तिचा बेत होता. आर्क्टीकमधील अनुभवी दर्यावर्दी असलेल्या फ्रान्सिस मॅक्लींटॉकची या मोहीमेचा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. फ्रँकलीनचा शोध घेणं हा मुख्य हेतू असला तरी फ्रँकलीनने नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडल्याच्या शक्यतेचाही मागोवा घ्यावा अशी जेनने मॅक्लींटॉकला सूचना दिली!

१ जुलै १८५७ ला अ‍ॅबर्डीन बंदरातून फॉक्सने आर्क्टीकची वाट धरली. एस्कीमोंची भाषा सफाईदारपणे बोलू शकणार्या कार्ल पीटरसनचा मॅक्लींटॉकने मोहीमेत समावेश केला होता. याखेरीच मोहीमेच्या दृष्टीने एका विशिष्ट जातीच्या प्राण्यांचा खास समावेश करण्यात आला होता.

स्लेज ओढणारे कुत्रे!

डिस्को उपसागरातील हिमखंडांना बगल देत १२ ऑगस्टला फॉक्सने मेल्व्हीलचा उपसागर गाठला. वाटेत आडव्या येणार्‍या बर्फामुळे त्यांची प्रगती खूपच मंदगतीने होत होती. अखेर सप्टेंबरच्या शेवटी जहाज बर्फात अडकलं. सील आणि हिमअस्वलाच्या शिकारीमुळे सुदैवान ताज्या मांसाचा मात्रं तुटवडा नव्हता.

डिसेंबरमध्ये रॉबर्ट स्कॉट या खलाशाचा उंचावरुन खाली पडल्याने अपघाती मृत्यू झाला. मार्चच्या सुरवातीपासूनच हिमखंडांच्या हालचालीस सुरवात झाली असली, तरी फॉक्स मोकळं होण्यास २६ एप्रिल १८५८ उजाडावा लागला!

जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी अपरनाव्हीक गाठलं, परंतु गोठलेल्या बर्फाने पुढची वाट अडवून धरली होती. जुलैच्या मध्यावर धीम्यागतीने पुढची वाटचाल सुरु झाली. वाटेत अनेक एस्कीमोंशी त्यांची गाठ पडली. फ्रँकलीनच्या मोहीमेबद्दल कोणतीही माहिती मिळाली नसली तरी इतर युरोपियन संशोधकांबद्दल, विशेषतः जॉन रे बद्द्ल एस्कीमोंकडून मॅक्लींटॉकला भरपूर माहिती मिळाली. एस्कीमोंच्या मते रे हा त्यांना भेटलेला सर्वोत्कृष्ट युरोपियन माणूस होता! त्यांच्याशी तो नेहमीच बरोबरीच्या आणि मित्रत्वाच्या नात्याने वागत असे!


अपरनाव्हीक

११ ऑगस्टला फॉक्सने बीची बेट गाठलं. आपल्या पूर्वीच्या मोहिमेतील तिथे ठेवलेले सारे संदेश आणि कागदपत्रं मॅक्लींटॉकने ताब्यात घेतले. जेन फ्रँकलीनने हेनरी ग्रिनेलकडून खास करवून घेतलेला स्मारकाचा दगड फ्रँकलीनच्या स्मरणार्थ तिथे उभारण्यात आला.

१६ ऑगस्टला बीची बेट सोडून त्यांनी बॅरो सामुद्रधुनी गाठली. मॅक्क्युलर आणि कॉलीन्सनच्या मोहीमेतील एंटरप्राईझ आणि इन्व्हेस्टीगेटर ही जहाजं इथेच बर्फात अडकली होती. बेलॉट सामुद्रधुनीतून पश्चिमेकडे सरकण्याचा त्यांचा प्रयत्नं मात्रं गोठलेल्या बर्फामुळे निष्प्रभ ठरला होता. २८ सप्टेंबरला केनेडी पॉईंटजवळ त्यांनी हिवाळ्यासाठी मुक्काम ठोकला!

७ नोव्हेंबरला जहाजाचा इंजिनीयर अंतर्गत रक्तस्त्रावामुळे अचानक मरण पावला. १८५९ च्या फेब्रुवारीत आणखीन एका खलाशाचा स्कर्व्हीने बळी गेला.

मॅक्लींटॉकने आपल्याजवळील स्लेजच्या कुत्र्यांची तीन तुकड्यांत विभागणी केली. एका तुकडीबरोबर तो स्वतः फ्रँकलीनच्या शोधार्थ जाणार होता. दुसर्‍या दोन तुकड्या कॅप्टन अ‍ॅलन यंग आणि डॉक्टर डेव्हीड वॉकरच्या नेतृत्वात शोध घेणार होत्या. १७ फेब्रुवारीला तीनही तुकड्यांनी फॉक्स सोडलं!

अतिशय कमी तापमान आणि बोचर्‍या वार्‍यांमुळे मार्गक्रमणा करणं कठीण जात होतं. मॅक्लींटॉकच्या कुत्र्यांची अपेक्षेपेक्षा लवकर दमछाक होत होती. परंतु तरीही तो नेटाने पुढे जात होता. रात्रीच्या मुक्कामासाठी इग्लूचा आश्रय घेत त्याची भटकंती सुरु होती.

२ मार्चला मॅक्लींटॉकची सीलच्या शिकारीवरुन परतणार्या चार एस्कीमोंशी गाठ पडली.

त्यांच्या पैकी एका एस्कीमोने नौदल अधिकार्यांची अधिकार दर्शवणारी पट्टी लावली होती!

"ही पट्टी तुला कुठे मिळाली?" मॅक्लींटॉकने त्याच्याकडे चौकशी केली.
"कब्लूना! कब्लूनांच्या एका तुकडीकडून!" तो एस्कीमो उत्तरला.
"कब्लूना? कुठे?"
"एका मोठ्या नदीच्या एका बाजूला कब्लूनांची एक टोळी उपासमारीने मरण पावलेली आम्हाला आढळली. ही पट्टी मला तिथेच मिळाली!"

नदीच्या जवळ युरोपियनांची मरण पावलेली ही तुकडी म्हणजेच जॉन रे ने वर्णन केलेली फ्रँकलीनच्या मोहीमेतील लोकांची तुकडी असावी हे मॅक्लींटॉकच्या तात्काळ ध्यानात आलं. त्या एस्कीमोने काही वर्षांपूर्वी जॉन रे शी भेट झाल्याचंही मॅक्लींटॉकला सांगितलं!

दुसर्‍या दिवशी एस्कीमोंच्या टोळीतील उरलेले ४५ एस्कीमो तिथे आले! त्यांच्यापैकी अनेकांजवळ चांदीचे काटे-चमचे आणि अधिकारदर्शक पट्ट्या होत्या! मॅक्लींटॉकने हे सर्व साहित्य एस्कीमोंकडून खरेदी केलं.
मॅक्लींटॉकने या सर्व एस्कीमोंकडे चौकशीचं सत्रं आरंभलं. त्यांच्यापैकी कोणीही युरोपियनांना जिवंत पाहिलेलं नव्हतं. त्यांचे अवषेश मात्रं बर्‍याच जणांच्या दृष्टीस पडलेले होते. किंग विल्यम बेटाच्या पश्चिमेला एकातीन शिडांचं जहाज बर्फाने नष्टं झाल्याचं आणि त्यातील लोकांनी जवळच आश्रय घेतल्याचंही त्यांनी मॅक्लींटॉकला सांगितलं.

ही सर्व माहिती जॉन रे याला मिळालेल्या माहितीशी सुसंगत होती!

आपली मोहीम आवरती घेऊन मॅक्लींटॉक परत फिरला. १४ मार्चला तो फॉक्सवर परतला तेव्हा त्याने ३६० मैल स्लेजवरुन प्रवास केला होता! यंग आणि वॉकरच्या तुकड्या आधीच परतल्या होत्या. त्यांना कोणतीही माहिती मिळालेली नव्हती.

मॅक्लींटॉकने पुन्हा स्लेजवरुन किंग विल्यम बेट गाठलं. मॅक्क्युलरने नॉर्थवेस्ट पॅसेजचा जो भाग स्लेजवरुन ओलांडला होता त्या प्रदेशात शोध घेताना मॅक्लींटॉकची आणखीन एका एस्कीमो तुकडीशी गाठ पडली. त्यांच्यापाशीही अनेक गोष्टी त्याला आढळून आल्या!

एस्कीमोंच्या या टोळीकडून दोन जहाजांबद्दल मॅक्लींटॉकला माहिती मिळाली. किंग विल्यम बेटाजवळ या दोनपैकी एक जहाज आर्क्टीकच्या तळाशी गेलं होतं. दुसरं जहाज हिमखंडावर आपटून त्याचं जबरदस्तं नुकसान झालं होतं. या जहाजावर त्यांना एक मृतदेह आढळला होता. त्यावर्षी युरोपियनांची एक टोळी बर्फावरुन बोटी ओढत एका मोठ्या नदीच्या दिशेने निघाली होती. त्यांच्यापैकी अनेकांचा वाटेत मृत्यू झाला होता. दुसर्‍या वर्षी त्यांचे अवशेष एस्कीमोंच्या नजरेस पडले होते!

बर्फावरुन बोट ओढत जाणारी युरोपियनांची टोळी!

जॉन रे ला नेमक्या याच टोळीची माहिती एस्कीमोंकडून मिळाली होती!

एस्कीमोंनी दाखवलेल्या दिशेने मॅक्लींटॉकने शोध घेण्यास प्रारंभ केला. २४ मे या दिवशी त्याला एक हाडांचा सापळा आढळला. या सापळ्यावर असलेल्या कपड्यांच्या तुकड्यांवरुन तो खलाशी असावा असा मॅक्लींटॉकने तर्क केला.

लेफ्टनंट विल्यम हॉबसनची तुकडी स्लेजच्या सहाय्याने केप हर्शेलच्या परिसरात फ्रँकलीनच्या मोहीमेचा शोध घेत होती. बेक उपसागराच्या दक्षिणेला त्याला एक केर्न आढळून आला. या केर्नची तपासणी केल्यावर त्यात एक संदेश ठेवलेला असल्याचं हॉबसनला दिसून आलं. हा संदेश वाचताच हॉबसनला आश्चर्याचा धक्काच बसला.

फ्रँकलीनच्या मोहीमेचा संदेश!

हा संदेश असा होता -

२८ मे १८४७ - ७०'०५'' उत्तर आणि ९८'२३'' पश्चिम

इरेबस आणि टेरर ही दोन्ही जहाज बर्फात अडकली आहेत. इथेच आम्ही हिवा़ळ्यात मुक्काम केला.
वेलींग्टन खाडीतून ७७ अंश उत्तर अक्षवृत्तापर्यंत उत्तरेला जाऊन कॉर्नवॉलीस बेटाच्या पश्चिमेने खाली येत त्या बेटाची प्रदक्षिणा पूर्ण झाली. परत येऊन आम्ही १८४६-४७ च्या हिवाळा बीची बेटावर - ७४'४३'' उत्तर अक्षवृत्त आणि ९१'३९'' पश्चिम रेखावृत्त - व्यतीत केला.

सर जॉन फ्रँकलीनच्या नेतृत्वात आमची मोहीम व्यवस्थित सुरु आहे.

लेफ्टनंट गोर आणि चास डेऊस हे दोन अधिकारी आणि ६ खलाशांची एक तुकडी २४ मे १८४७ या दिवशी जहाजांवरुन बाह्रेर पडली आहे.

(या संदेशातील बीची बेटावर १८४६-४७ चा हिवाळा व्यतीत केला असं लिहीलेलं असलं तरी प्रत्यक्षात ते १८४५-४६ च्या हिवाळ्यात बीची बेटावर होते).

या संदेशाच्या समासात दुसरा एक संदेश लिहीलेला होता -

२५ एप्रिल १८४८

टेरर आणि इरेबस ही दोन्ही जहाजं या ठिकाणाच्या उत्तर-पूर्वेला १२ सप्टेंबर १८४६ पासून बर्फात अडक्ल्यामुळे सोडून देण्यात आली. अधिकारी आणि खलाशी मिळून एकूण १०५ जण कॅप्टन क्रोझीयरच्या नेतृत्वात इथे पोहोचले आहेत. (६९'३७'' अंश उत्तर अक्षवृत्त आणि ९८'४१'' पश्चिम रेखावृत्त). सर जॉन फ्रँकलीन ११ जून १८४७ या दिवशी मरण पावला. आतापर्यंत ९ अधिकारी आणि १५ खलाशांचा मृत्यू झाला आहे. उद्या, २६ तारखेला जॉर्ज बेकने वर्णन केलेल्या ग्रेट फिश नदीच्या दिशेने पुढे जाणार आहोत.

या संदेशाखाली कॅप्टन क्रोझीयर आणि फ्रिट्झजेम्स यांच्या सह्या होत्या. जेम्स क्लार्क रॉसच्या केर्नच्या नेमक्या जागेचे तपशीलही तिथे दिलेले होते.


फ्रँकलीन मोहीमेचा शेवटचा संदेश

मॅक्लींटॉकची शोधमोहीम सुरुच होती. एका ठिकाणी त्याला नदीतून प्रवासासाठी तयार केलेली एक मोठी बोट स्लेजवर चढवलेली आढळली. या बोटीवर दोन हाडांचे सापळे आणि अनेक सटर-फटर वस्तू होत्या.

जूनमध्ये बेकच्या उपसागराच्या परिसरात शोध घेत असताना हॉबसनला आणखीन एक केर्न आढळला. या केर्नमध्ये लेफ्टनंट गोरचा १८४७ च्या मे महिन्यात लिहीलेला संदेश होता. आधीच्या संदेशातीलच सर्व माहीती यात नमूद केलेली होती. आजूबाजूला अनेक वस्तू टाकून दिलेल्या आढळल्या. मात्रं एकाही जहाजाची कोणतीही खूण कुठेही आढळली नाही.

फॉक्समधील खलाशांमध्ये आता स्कर्व्हीचा प्रादुर्भाव वाढत होता. ११ जूनला थॉमस ब्लॅकवेल याचा स्कर्व्हीने मृत्यू झाला! १४ जूनला हॉबसन फॉक्सवर परतला. आणखीन ५ दिवसांनी १९ जूनला मॅक्लींटॉकनेही फॉक्स गाठलं. परंतु त्यांच्यापूर्वीच परतलेला अ‍ॅलन यंग पुन्हा बाहेर पडला होता!

२७ जूनला यंग फॉक्सवर परतला. त्याने पील खाडी गाठून फ्रँकलीनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कोणतीही खूण आढळली नाही. बर्फाने मार्ग रोखल्याने तो फॉक्सवर परतला होता. ९ ऑगस्टला फॉक्सची बर्फातून सुटका झाली. सावधपणे मार्गक्रमणा करत अखेर २१ सप्टेंबर १८५९ ला फॉक्स लंडनला परतलं.


फ्रान्सिस मॅक्लींटॉक

मॅक्लींटॉकच्या या मोहीमेला फ्रँकलीनच्या तुकडीचा शेवटचा संदेश हस्तगत करण्यात यश आलं होतं. एस्कीमोंकडून जॉन रे ला मिळालेल्या माहितीला मॅक्लींटॉकच्या मोहिमेमुळे पुष्टीच मिळाली होती.

व्हिक्टोरीया सामुद्रधुनीतील बर्फ हा अनेक वर्षांपासून गोठल्याने घट्ट झालेला होता. या बर्फातून मार्ग काढण्याचा फ्रँकलीनचा प्रयत्नं निव्वळ आत्मघातकी होता. किंग विल्यम बेटाच्या पश्चिमेला असलेल्या चिंचोळ्या सामुद्रधुनीतूनच फ्रँकलीनला पुढे जाण्यास मार्ग मिळू शकत होता!

मॅक्लींटॉकच्या या मोहीमेतून आण़खीन एका ब्रिटीश कल्पनेचा उदय झाला!

मॅनहॉलींग!

माणसांनी स्लेजवर सामान लादून स्लेज ओढून नेणं!

स्लेजवरुन केलेल्या सुरवातीच्या मोहीमेत कुत्र्यांची कामगिरी मॅक्लींटॉकच्या पसंतीस उतरली नाही. कुत्र्यांना हातळणं हे एस्कीमोंचं काम होतं असं त्याचं ठाम मत होतं. आपल्या पुढच्या मोहीमेत त्याने कुत्र्यांऐवजी स्वतःच स्लेजवर सामान लादून ती ओढत नेण्याचा पर्याय निवडला! त्याच्या मते आपलं सामान स्वतः ओढून नेणं हे नैतिकतेला धरुन होतं आणि ते पौरुषत्वाचं लक्षंण होतं!

१८२० च्या मोहीमेत विल्यम पेरीने सर्वप्रथम स्लेजवरुन सामान ओढत नेऊन मेल्व्हील बेट ओलांडलं असलं तरी त्याला ब्रिटीश परंपरेला साजेसं नैतिक अधिष्ठान चढवलं ते मॅक्लींटॉकने. मॅनहॉलींगच्या या कल्पनेचा त्या मोहिमेवर असलेल्या २१ वर्षांच्या तरुण क्लेमंट्स मार्कहॅमवर फार प्रभाव पडला. पुढे रॉयल जॉग्रॉफीक सोसायटीचा अध्यक्ष झाल्यावर आर्क्टीक - अंटार्क्टीकमधील सर्व ब्रिटीश मोहीमांत त्याने मॅनहॉलींगची पद्धत अनिवार्य केली! मॅनहॉलींगच्या अतिश्रमांनीच दक्षिण धृवावरुन परत येताना रॉबर्ट फॅल्कन स्कॉटच्या तुकडीला प्राणाला मुकावं लागलं!

अमेरीकन संशोधक चार्ल्स फ्रान्सिस हॉलने १८६० मध्ये कॅनडामधून फ्रँकलीनच्या शोधार्थ मोहीम काढली. या मोहीमेत त्याला किंग विल्यम बेटाच्या दक्षिण किनार्‍यावर अनेक कँपचे अवशेष आणि कबरी आढळून आल्या. १८६४ च्या दुसर्या मोहीमेतही किंग विल्यम बेटाजवळ त्याला फ्रँकलीन मोहीमेतील खलाशांनी टाकून दिलेल्या अनेक वस्तू सापडल्या. फ्रँकलीन मोहीमेतील कोणीही वाचलं असण्याची शक्यता नाही याची त्याला खात्री पटली होती!

१८७८ मध्ये अ‍ॅलन यंगच्या मोहीमेने फ्रँकलीनचा शोध घेण्याचा प्रयत्नं केला, परंतु पील खाडीच्या बर्फापुढे त्याला माघार पत्करावी लागली. नॉर्थवेस्ट पॅसेज पार करण्याच्या त्याच्या प्रयत्नावरही बर्फच पडला होता! फ्रॅंकलीनच्या शोधाची आणि पर्यायाने नॉर्थवेस्ट पॅसेजची इंग्लंडमधून आखलेली ही शेवटची मोहीम!

सर जॉन फ्रँकलीनचा शोध घेणार्‍या अनेक मोहीमांतील जवळपास सर्व प्रमुख इंग्लिश संशोधकांना (जॉन रॉस, जेम्स क्लार्क रॉस, रिचर्डसन, कॉलीन्सन, मॅक्क्युलर, ऑस्टीन, ओमनी, बेल्चर, मॅक्लींटॉक, यंग) सरदारकी देण्यात आली.

अपवाद एकच!

जॉन रे!

ठणकावून सत्य सांगण्याची किंमत रे ला अशा रितीने चुकवावी लागली.
नरमांसभक्षणाचा जॉन रे चा तर्क शंभर टक्के सत्यं असल्याचं पुढे आढळून आलं!

युरोपियन संशोधकांपैकी ज्यांनी एस्कीमोंशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी आत्मसात केल्या अशा फार थोड्या लोकांपैकी जॉन रे हा एक होता! एस्कीमोंना खालच्या दर्जाचे आणि नोकर म्हणून न वागवता बरोबरीच्या नात्याने त्यांच्याशी मैत्री करुन त्याने एस्कीमोंचा विश्वास संपादन केला होता. आपल्या संशोधनकार्यात याचा त्याला फार मोठा उपयोग झाला!

इंग्लंडला परतल्यावर रॉबर्ट मॅक्क्युलरवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडणारा पहिला माणूस म्हणून वर्तमानपत्रांनी त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली. बेरींग सामुद्रधुनीतून आर्क्टीकमध्ये प्रवेश करून मॅक्क्युलर अटलांटीक महासागरात पोहोचला असला, तरी संपूर्ण प्रवास जहाजातून न करता मर्सी उपसागरापासून मेल्व्हील बेट आणि पुढे बीची बेटापर्यंतचा प्रवास त्याने स्लेजवरुन म्हणजे जमिनीवरुन केला होता याकडे ब्रिटीश वर्तमानपत्रांनी सोईस्करपणे काणाडोळा केला होता!

दर्यावर्दी वर्तुळात मात्र वेगळाच मतप्रवाह होता.

जोपर्यंत एकादं जहाज अटलांटीक महासागरातून नॉर्थवेस्ट पॅसेजमार्गे बेरींगच्या सामुद्रधुनीतून पॅसिफीक महासागरात पोहोचत नाही किंवा पॅसिफीकमधून बेरींगच्या सामुद्रधुनीतून आर्क्टीकमध्ये प्रवेश करुन अटलांटीकमध्ये पोहोचत नाही, तोपर्यंत नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडल्याच्या दाव्याला काहीही अर्थ नव्हता!

नॉर्थवेस्ट पॅसेज अद्यापही अजिंक्यच होता!


आर्क्टीक सर्कल - उत्तर अमेरीका

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel