अटलांटीक मधून उत्तर अमेरीकेच्या किनार्‍याने पॅसिफीक महासागर गाठणारा नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याच्या बरोबरच अटलांटीकमधून पूर्वेच्या मार्गाने रशियाच्या उत्तर किनार्‍याजवळून जाणारा नॉर्थईस्ट पॅसेज शोधण्याचे प्रयत्नही १५२५ पासून सुरु होते. इंग्लिश, डच, नॉर्वेजियन आणि मुख्यतः रशियन दर्यावर्दींचा यात सहभाग होता.

२२ जून १८७८ मध्ये फिनीश-स्वीडीश दर्यावर्दी अ‍ॅडॉल्फ नॉर्डेन्स्कीओल्ड याने वेगा या जहाजातून स्वीडनमधील कार्ल्सस्क्रोना बंदर सोडलं. रशियाच्या उत्तर किनार्‍याने बर्फाचा मुकाबला करत जात असताना सप्टेंबरच्या सुरवातीला बेरींग सामुद्रधुनीच्या पश्चिमेला त्याचं जहाज बर्फात अडकलं. १८७९ च्या उन्हाळ्यात बर्फातून सुटका झाल्यावर अखेर तो बेरींग सामुद्रधुनीत पोहोचण्यात यशस्वी झाला!

नॉर्थईस्ट पॅसेज ओलांडणारा नॉर्डेन्स्कीओल्ड हा पहिला दर्यावर्दी ठरला होता!

१८८८ मध्ये नॉर्वेतून एक मोहीम ग्रीनलंडच्या दिशेने निघाली. ग्रीनलंडच्या एका किनार्‍यापासून अंतर्भातातून प्रवास करत दुसरा किनारा गाठण्याची या मोहीमेची योजना होती. यापूर्वी नॉर्डेन्स्कीओल्ड (१८८३) आणि रॉबर्ट पेरी(१८८६) यांनी केलेले प्रयत्नं अयशस्वी ठरले होते. त्यांनी ग्रीनलंडच्या पश्चिम किनार्‍यावरील डिस्को उपसागरात बोटीने पोहोचल्यावर पूर्वेचा किनारा गाठण्याचा प्रयत्न केला होता. नॉर्वेजियनांचा बेत मात्रं याच्या बरोबर विरूद्ध - ग्रीनलंडच्या पूर्व किनार्यावरुन पश्चिमेला जाण्याचा होता!

नॉर्वेजियनांच्या या मोहीमेचा प्रमुख होता फ्रिट्झॉफ नॅन्सेन!


फ्रिट्झॉफ नॅन्सेन

३ जून १८८८ ला नॉर्वेतून निघाल्यावर १७ जुलैला जहाजावरुन लहान बोटींतून त्यांनी ग्रीनलंडचा पूर्व किनारा गाठला. खडतर हवामानामुळे डिस्को उपसागर गाठण्याच्या आपल्या मूळ योजनेत बदल करुन नॅन्सेनच्या तुकडीने ३ ऑक्टोबरला गॉड्थॅब गाठलं. ग्रीनलंडचाच्या पश्चिम किनार्‍यावर पोहोचण्यात ते यशस्वी झाले होते!

२४ जून १८९३ मध्ये नॅन्सनने फ्राम या जहाजातून उत्तर धृव गाठण्याच्या मोहीमेवर नॉर्वेचं क्रिस्टीयाना(ऑस्लो) बंदर सोडलं! उत्तर धृव गाठण्यात यश आलं नाही तरी नॅन्सन आणि जॅल्मर योहान्सन यांनी ७ एप्रिल १८९५ या दिवशी ८६'१३'' उत्तर अक्षवृत्त गाठलं होतं. धृवीय प्रदेशातील हा सर्वोच्च विक्रम होता. अनेक संकटांचा सामना करत ते ९ सप्टेंबर १८९६ मध्ये नॉर्वेला परतले.

नॅन्सन उत्तर धृवाच्या मोहीमेवर जात असताना एका २० वर्षांच्या तरुणाचं या मोहीमेकडे बारीक लक्षं होतं. लहानपणापासून दर्यावर्दी होण्याची आणि नवीन प्रदेशांचा शोध घेण्याची त्याची सुप्त इच्छा होती, परंतु त्याच्या आईला मात्रं ते मान्यं नव्हतं! आपल्या मुलाने शिकून डॉक्टर व्हावं अशी तिची इच्छा होती! तिच्या इच्छेखातर त्याने डॉक्टरकीचा अभ्यास सुरू केला खरा, पण त्याचा मूळ ओढा समुद्राकडेच होता. आईच्या निधनानंतर त्याला कोणताच अडथळा उरला नाही.

३० मे १८८९ मध्ये ग्रीनलंडच्या मोहीमेवरुन परतलेल्या नॅन्सनवर होत असलेला स्तुतीसुमनांचा वर्षाव पाहून दर्यावर्दी होण्याची त्याची सुप्त इच्छा अधिकच प्रज्वलीत झाली होती. आतापर्यंत अजिंक्य असलेला एक प्रदेश त्याला कधीपासून साद घालत होता...

नॉर्थवेस्ट पॅसेज!

आईच्या मृत्यूनंतर १८९४ मध्ये त्याने जहाजावरील नोकरी पत्करली. १८९७-९९ मधील बेल्जीयन अंटार्क्टीक मोहीमेत तो अंटार्क्टीकावर हिवाळ्यात मुक्काम करुन परतला होता. या मोहीमेवरुन परतल्यावर नॉर्थवेस्ट पॅसेजचं आपलं स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्याच्या तो मागे लागला.

कोण होता तो तरूण?
धृवीय प्रदेशातील नवीन प्रदेशांच्या संशोधनाशी ज्याचं नाव पुढे कायमचं निगडीत राहीलं तो तरूण होता..

रोआल्ड एंजेलबर्ट ग्रॅव्हनिंग अ‍ॅमंडसेन!


रोआल्ड अ‍ॅमंडसेन

अ‍ॅमंडसेनने नॉर्थवेस्ट पॅसेज पार करण्याचा प्रयत्न केलेल्या प्रत्येक मोहीमेचा बारकाईने अभ्यास केला होता. जॉन फ्रँकलीनची मोहीम आणि त्याच्या शोधार्थ गेलेल्या इतर मोहीमांचीही त्याने तपशीलवार नोंद केली होती. या सर्वाचा अभ्यास केल्यावर मोठ्या जहाजावरुन अनेक माणसांची मोहीम घेऊन नॉर्थवेस्ट पॅसेज पार करण्यापेक्षा हलक्या जहाजावरुन आणि कमीतकमी लोकांसह प्रयत्नं केल्यास नॉर्थवेस्ट पॅसेज पार करणं शक्यं असल्याचं त्याने अनुमान काढलं!

नॉर्वेमध्ये धृवीय प्रदेशातील संशोधनाचा शेवटचा शब्द म्हणजे नॅन्सन! अ‍ॅमंडसेनने नॅन्सनची भेट घेऊन नॉर्थवेस्ट पॅसेजची आपली योजना त्याच्यासमोर मांडली. नॅन्सनलाही भल्यामोठ्या मोहीमेचा तिटकाराच होता. ग्रीनलंड आणि उत्तर धृवाच्या मोहीमेवर त्यानेही आवश्यक तेवढीच माणसं बरोबर घेण्याचं धोरण अवलंबलं होतं. अ‍ॅमंडसेनच्या मोहीमेला नॅन्सनने ताबडतोब हिरवा कंदील दाखवला!

नॅन्सनकडून होकार मिळताच अ‍ॅमंडसेनने आपल्या मोहीमेसाठी योग्य अशा जहाजाचा शोध घेण्यास सुरवात केली. लवकरच त्याला असं एक लहानसं जहाज आढळलं.

ग्जो!

ग्जो हे ४५ टनांचं जहाज म्हणजे एक मोठा पडावच होता. ७० फूट लांब आणि २० फूट रुंद असलेलं हे ४५ टनांचं जहाज नट् जोहान्सन स्कॉल याने ज्या वर्षी अ‍ॅमंडसेनच्या जन्म झाला त्याच वर्षी - १८७२ मध्ये रोझंडेल इथे बांधलं होतं! जहाजाच्या मूळ मालकाच्या पत्नीचं नाव जहाजाला देण्यात आलं होतं. १८७२ मध्ये बांधून झाल्यावर पुढील २८ वर्ष ते मासेमारीसाठी वापरलं जात होतं! आर्क्टीक समुद्रात अनेक सफरी या जहाजाने केल्या होत्या. अनेकदा लहानमोठं नुकसान झाल्यानंतरही तुलनेने ते दणकट असल्याचं सिद्ध झालं होतं.

लहान जहाज वापरण्यामागे कमीत कमी लोकांसह सफर करणं हा अ‍ॅमंडसेनचा हेतू होताच. जहाजावर अत्यावश्यक सामग्री आणि खाद्यपदार्थांचा मर्यादीत साठा घेऊन नॉर्वे सोडण्याची त्याची योजना होती. वाटेत लागणार्‍या किनार्‍यावरुन शिकार करुन ताजं मांस मिळवण्याचा त्याचा बेत होता. कमीत कमी माणसांची लहानशी तुकडी नेल्यास सर्वांना पुरेशी शिकार मिळण्यात अडचण येणार नाही असा त्याचा होरा होता. फ्रँकलीन मोहीमेतील शंभरावर माणसांना पुरेशी शिकार उपलब्धं न झाल्यानेच त्यांच्यावर उपासमारीने मृत्यूला कवटाळण्याची वेळ आली होती असं त्याचं ठाम मत होतं! हलकं जहाज असल्याने आर्क्टीकमधील बर्फातून आणि अरुंद आणि उथळ खाड्यांमधून मार्ग काढणं जहाजाला सुकर जाणार होतं.

अ‍ॅमंडसेनसमोर मुख्य अडचण होती ती पैशाची! या मोहीमेसाठी आवश्यक तितकं आर्थिक पाठबळ त्याच्यापाशी नव्हतं, त्यामुळे नवीन जहाज खरेदी करणं त्याच्या आवाक्याबाहेरील होतं. त्या दृष्टीनेही २८ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं ग्जो त्याला किफायतशीर किंमतीत मिळू शकणार होतं.

१९०० मध्ये अ‍ॅमंडसेनने ऑस्बॉर्न सेक्से याच्याकडून ग्जो विकत घेतलं. हे जहाज विकत घेतल्यावर आपल्या मोहीमेसाठी आवश्यक ते बदल अ‍ॅमंडसेनने त्यात करुन घेतले.

इतक्या लहान जहाजावरुन अ‍ॅमंडसेनने पूर्वी कधीही प्रवास केला नव्हता. तसेच आर्क्टीक प्रवासाचाही त्याला काहीही अनुभव नव्हता. त्या दृष्टीने नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेची पूर्वतयारी म्हणून १९०१ च्या एप्रिल मध्ये त्याने एक मोहीम आखली. ग्जो चा पूर्वीचा एक मालक हॅन्स योहान्सन आणि इतर पाच खलाशांसह अ‍ॅमंड्सेनने नॉर्वेतील ट्रॉम्स बंदरातून अ‍ॅमंडसेनने बेरेंट्स समुद्राच्या दिशेने प्रस्थान केलं.

पाच महिन्यांच्या सफरीत अ‍ॅमंडसेनला ग्जो मध्ये अनेक गुणदोष अ‍ॅमंडसेनच्या दृष्टीस पडले. सप्टेंबरमध्ये नॉर्वेला परतल्यावर अ‍ॅमंडसेनने नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेच्या दृष्टीने ग्जो वर नवीन सामग्री बसवण्यास सुरवात केली. १३ हॉर्सपॉवरची इंजिन मोटर जहाजावर बसवण्यात आली. त्याच्या जोडीला बर्फ फोडण्याच्या यंत्रणेतही त्याने सुधार करुन घेतला.

नॉर्थवेस्ट पॅसेज पार करणं हे अ‍ॅमंडसेनचं ध्येय असलं, तरी आर्क्टीकमध्ये किमान एक संपूर्ण वर्ष मुक्काम करुन चुंबकीय उत्तर धृवाचं स्थान नव्याने निश्चीत करणं हे देखील या मोहीमेच एक उद्दीष्ट होतं. १८३१ मध्ये जेम्स क्लार्क रॉसने चुंबकीय उत्तर धृवाचं स्थान निश्चित केलं होतं. पृथ्वीच्या अंतर्भागातील चुंबकीय क्षेत्रात होणार्या बदलांमुळे चुंबकीय उत्तर धृवाचं स्थान बदलत असावं असा शास्त्रज्ञांचा कयास होता. त्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सामग्रीचीही जमवाजमव सुरु होती.

सर्वात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे अ‍ॅमंडसेन बरोबर या सफरीवर कोण कोण जाणार होतं?

अ‍ॅमंडसेनने आपल्याबरोबर एकूण सहा साथीदारांची निवड केली. अ‍ॅमंडसेन स्वत: मोहीमेचा प्रमुख आणि ग्जो चा कॅप्टन होता. त्याच्या खालोखाल दुसर्‍या क्रमांकाचा अधिकारी म्हणून डेन्मार्कच्या नौदलात काम केलेला फर्स्ट लेफ्टनंट गॉडफ्रे हॅन्सन याची निवड करण्यात आली. मासेमारी करणार्‍या जहाजांचा कॅप्टन म्हणून काम केलेला अँटन लुंड, फर्स्ट इंजिनीयर आणि मेटॅलर्जीस्ट पीडर रिझवेल्ट, सेकंड इंजिनीयर आणि अ‍ॅमंडसेनला चुंबकीय निरीक्षणांत मदत करणारा गुस्ताव ज्यूल विल्क, आर्क्टीक मधील सफरींचा अनुभव असलेला आणि स्लेज चालवण्यात वाकबगार असलेला सेकंड ऑफीसर हॅल्मर हॅन्सन आणि अ‍ॅडॉल्फ लिंडस्ट्रॉम हा स्वैपाकी यांची या मोहीमेसाठी निवड करण्यात आली. याखेरीज स्लेज ओढणारे सहा दणकट कुत्रेही या मोहीमेचे सदस्यं होते!
मोहीमेची तयारी करताना अ‍ॅमंडसेनची आर्थिक ओढाताण होऊ लागली होती. आपल्या या मोहीमेसाठी त्याने अनेकांना मदतीचं आवाहन केलं होतं. काही जणांनी मदतीचा हात पुढे केला असला तरी बर्‍याच जणांनी इतक्या लहान बोटीतून नॉर्थवेस्ट पॅसेज पार करण्याचा प्रयत्नं करणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे अशी संभावना केली होती.

त्याकाळी नॉर्वे स्वीडनचा एक प्रदेश असल्याने अ‍ॅमंडसेनने आपल्या मोहीमेसाठी स्वीडनच्या राजाकडे मदत मागितली होती. राजाकडून मिळालेल्या आर्थिक मदतीनंतरही अ‍ॅमंडसेनच्या नाकी नऊ आले होते. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतरही त्याला कर्ज देणार्‍यांनी कर्जफेड होईपर्यंत बोट बंदरातच अडवून ठेवण्याची धमकीही दिली होती! या धमकीमुळे मोहीम सुरु होण्यापूर्वीच बारगळते की काय अशी अ‍ॅमंडसेनच्या मनात शंका आली! अखेर नॅन्सनने हस्तक्षेप करुन स्वतः त्याच्या कर्जाची हमी घेतल्यावर अ‍ॅमंडसेनचा मार्ग मोकळा झाला. मोहीमेवर निघण्यापूर्वी अ‍ॅमंडसेनच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहीला होता!

१६ जून १९०३ या दिवशी रात्री ११ वाजता ग्जो ने क्रिस्टीयाना(ऑस्लो) बंदर सोडलं!

समुद्रमार्गाने नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्याचे आतापर्यंत करण्यात आलेले सारे प्रयत्न अयशस्वी ठरलेले होते. अनेकांना त्या प्रयत्नांत आपले प्राण गमवावे लागलेले होते. जॉन फ्रँकलीनची संपूर्ण मोहीम या प्रयत्नात बळी पडली होती. त्याच्या शोधात गेलेल्या अनेक मोहीमांतील जहाजंही आर्क्टीकमध्ये सोडून द्यावी लागली होती...

अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहा सहकार्यांच्या नशिबात काय लिहीलं होतं?


अ‍ॅमंडसेन आणि त्याचे सहकारी:-
मागे - अँटन लुंड, हॅल्मर हॅन्सन
मध्ये - गॉडफ्रे हॅन्सन, अ‍ॅमंडसेन, पीडर रिझवेल्ट
पुढे - गुस्ताव ज्यूल विल्क, अ‍ॅडॉल्फ लिंडस्ट्रॉम

१७ जूनला सकाळी ग्जो ने हॉर्टन बंदर गाठलं. इथे बर्फ फोडण्यासाठी म्हणून डायनामाईट पावडर जहाजावर चढवण्यात आली. रात्रभर पडणारा पाऊस आता थंडावला होता. सकाळी ११ च्या सुमाराला हॉर्टनमधून बाहेर पडून ग्जो ने दक्षिणेची वाट धरली.

२५ जूनला फेयर आणि ऑर्कनी बेटांमधल्या सामुद्रधुनीतून ग्जो ने अटलांटीक मध्ये प्रवेश केला. पश्चिमेचा मार्ग धरुन काही अंतर काटल्यावर उत्तरेला वळून आर्क्टीक गाठण्याची अ‍ॅमंडसेनची योजना होती. वारा असेल तेव्हा शिडांच्या सहाय्याने आणि वारा नसताना मोटर इंजिनाच्या सहाय्याने ग्जो चा प्रवास व्यवस्थित सुरु होता.

उत्तरेचा मार्ग पकडल्यावर अ‍ॅमंडसेनने आपल्या तुकडीपैकी दोन जण सतत डेकवर राहतील अशा तर्‍हेने टेहळणीची व्यवस्था केली होती. आर्क्टीकमधून कधीकधी दक्षिणेला बर्‍याच अंतरापर्यंत हिमखंड वाहत येतात याची त्याला कल्पना होती. त्याचबरोबर ग्जो हे तुलनेने लहान जहाज असल्याने एखाद्या मोठ्या जहाजाशी किंवा व्हेलच्या शिकारी बोटीशी टक्कर झाल्यास ग्जो ची शंभरीच भरली असती!

अ‍ॅमंडसेनच्या सहा कुत्र्यांपैकी दोन कुत्र्यांना दुर्दैवाने पॅरेलिसीसचा झटका आला. आपल्या जागेवरुन उठण्यासही हे कुत्रे असमर्थ ठरले होते. वास्तवीक हे कुत्रे आर्क्टीकमधील मोहीमेत चांगलेच तरबेज होते, परंतु निरुपायाने त्यांना गोळी घालून यातनातून मुक्ती देण्यापलीकडे इलाज उरला नव्हता.

९ जुलैला अ‍ॅमंडसेनला प्रथम हिमखंडांचं दर्शन झालं!

नॉर्वेहून निघताना अ‍ॅमंडसेनने किनार्‍यावर आढळणार्‍या प्राण्यांची शिकार करुन ताजं मांस मिळवण्याचा बेत केला होता. हिमखंडांचं दर्शन होताच सर्वांचे हात शिवशिवण्यास सुरवात झाली होती. अखेर १५ जुलैच्या दुपारी त्यांना सीलची शिकार मिळाली! जोडीला पीडर रिझवेल्टची मासेमारीही जोरात सुरु होती! एकदा तर रिझवेल्टच्या गळाला चक्क एक व्हेल लागला होता! परंतु गळ तोडून पसार होण्यात तो यशस्वी झाला!

२४ जुलैच्या दुपारी स्वच्छ हवामान असताना डेकवर असलेल्या अँटन लुंडला दूर अंतरावर जहाजासारखा मोठा आकार आढळून आला. हे जहाज नेमकं कोणतं असावं असा विचार सुरु असताना विल्कला त्याच्या शेजारी आणखीन एक जहाज आढळलं. बहुधा ती रॉयल डॅनिश कंपनीची व्यापारी जहाजं असावीत असा विल्कचा कयास होता. फर्स्ट लेफ्टनंट गॉडफ्रे हॅन्सनने त्या जहाजांचं टेलीस्कोपमधून निरीक्षण केलं आणि तो खो खो हसत सुटला. ती जहाजं नसून चक्कं हिमखंडं असल्याचं त्याचं ठाम मत झालं होतं! जवळ जाऊन पाहील्यावर हिमखंडात अडकलेलं सोडून देण्यात आलेलं एक मोठं जहाज त्यांच्या दृष्टीस पडलं!

दुसर्‍या दिवशी त्यांनी ग्रीनलंडच्या पश्चिम किनार्‍यापासून जवळ असलेलं डिस्को बेटावरील ग्रीनलँडीक (गॉडहॉन) बंदर गाढलं. तिथे असलेला डॅनीश अधिकारी ड्युगार्ड-जेन्सन याला आपल्या मोहीमेसाठी आवश्यक असणार्‍या स्लेज, कयाक बोटी, स्कीईंगचं साहीत्यं, इंजिनसाठी आवश्यक असणारं पेट्रोल आणि दहा कुत्रे यांची व्यवस्था करण्याची पत्राद्वारे विनंती केली होती. रॉयल डॅनिश कंपनीला अ‍ॅमंडसनच्या या मोहीमेबद्दल असलेल्या आस्थेमुळे या सर्व सामानाची डेन्मार्कमधून व्यवस्था करण्यात आली होती!

सर्व व्यवस्था झाल्यावर ३१ जुलैला ग्जो ने गॉडहॉन बंदर सोडलं आणि अपरनाव्हीकची वाट धरली.


गॉडहॉन


गॉडहॉन येथील एस्कीमो

६ ऑगस्टला ग्जो ने अप्परनाव्हीकच्या पश्चिमेला सुमारे १२ मैलांवर असताना बरेच मोठे हिमनग अ‍ॅमंडसेनच्या दृष्टीस पडले. मात्रं आतापर्यंत एकही हिमनग पाण्यात वाहत असेलेला त्यांना आढळलेला नव्हता. ८ ऑगस्टला त्यांनि ७३'३०'' उत्तर अक्षवृत्तावरील होम्स बंदर ओलांडलं. सर्वात उत्तरेकडे असलेली ही वसाहत! आतापर्यंत भरकटणारे हिमखंड न आढळल्याने कोणत्याही मोठ्या अडथळ्याविना मेल्व्हील उपसागरात प्रवेश करण्याची अ‍ॅमंडसेनला आशा वाटू लागली.

होम्स बेट मागे टाकून ग्जो ने केप यॉर्कची दिशा धरली. मात्रं दुसर्‍या दिवशी सकाळीच गोठलेल्या बर्फाने मेल्व्हील उपसागर लवकर ओलांडण्याच्या त्यांचा मनसुबा उधळून लावला. निरुपायाने त्यांनी पुन्हा दक्षिणेचा मार्ग धरला. अखेर १३ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजता त्यांनी केप यॉर्क गाठलं!


केप यॉर्क

१५ ऑगस्टच्या दुपारी चारच्या सुमाराला अ‍ॅमंडसेनला एखाद्या उलट्या शंकूप्रमाणे समुद्रात उगवलेलं डालरिंपल बेट दृष्टीस पडलं. व्हेल माशांच्या शिकारीसाठी आर्क्टीकमध्ये आलेल्या कॅप्टन मिलेन आणि अ‍ॅडम्स यांच्याबरोबर अ‍ॅमंडसेनने काही सामग्री पुढे पाठवली होती. डालरिंपल बेटावर ही सामग्री ठेवण्याची अ‍ॅमंडसेनने त्यांना सूचना दिली होती.

डालरिंपल बेटाच्या मार्गावर असतानाच अ‍ॅमंडसेनची मिलीस एरिच्सेनच्या डॅनिश ग्रीनलंड मोहीमेशी गाठ पडली. या मोहीमेत अनेक एस्कीमोंचाही समावेश होता. मिलेन आणि अ‍ॅडम्स यांनी डालरिंपल बेटावरील सामग्रीच्या डेपोची नेमकी जागा दर्शवणारी चिठ्ठी एरिच्सेनकडे दिली होती! डालरिंपल बेटावरील सर्व सामग्री ग्जो मध्ये चढवेपर्यंत १६ ऑगस्टची संध्याकाळ उजाडली होती! सकाळी मध्ये आलेल्या लहानशा वादळामुळे ग्जो ला बेटाला वळसा घालून दुसर्‍या बाजूच्या किनार्‍यावर आश्रय घेणं भाग पडलं होतं!

एरिच्सेनने आपल्याजवळील चार कुत्रे अ‍ॅमंडसेनच्या हवाली केले. नुकताच एक कुत्रा बेटाच्या अंतर्भागात पळून गेल्याने अ‍ॅमंडसेनने त्यांचा सहर्ष स्वीकार केला आणि त्याचा निरोप घेऊन पुढचा मार्ग सुधरला.

२० ऑगस्टला केप हॉर्सबर्गला वळसा घालून ग्जो ने लँकेस्टर खाडीत प्रवेश केला! २२ ऑगस्टला रात्री ९ वाजता ग्जो बीची बेटावर पोहोचलं होतं!

अ‍ॅमंडसेन म्हणतो,
"बीची बेटावर पोहोचल्यावर सर्वात प्रथम माझ्या मनात विचार आला तो सर जॉन फ्रँकलीनच्या मोहीमेचा! १८४५-४६ च्या हिवाळ्यात याच ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता! १८४६ च्या उन्हाळ्यात इथूनच त्यांनी पुढचा मार्ग धरला होता. परंतु नॉर्थवेस्टच्या बर्फाने त्यांना आपलंसं केलं होतं! नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याच्या प्रयत्नांत आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या फ्रँकलीन आणि त्याच्या सहकार्‍यांना मानवंदना देऊन आम्ही तिथे मुक्काम ठोकला!"

अ‍ॅमंडसेन आणि विल्क चुंबकीय निरीक्षणाच्या नोंदी करत असताना गॉडफ्रे हॅन्सन आणि हेल्मर हॅन्सन यांनी बीची बेटाचा किनारा गाठला. एडवर्ड बेल्चरच्या मोहीमेसाठी विल्यम पुलेनने उभारलेल्या कॅंपचे अवशेष त्यांच्या दृष्टीस पडले. हेनरी ग्रिनेलकडून जेन फ्रँकलीनने जॉन फ्रँकलीनच्य स्मृतीप्रित्यर्थ खास करवून घेतलेला आणि फ्रान्सिस मॅक्लींटॉकने उभारलेला स्मृतीस्तंभ त्यांना आढळला. मात्रं बीची बेटावर कोणताही प्राणी त्यांना आढळला नाही!


फ्रॅंकलीन स्मृतीस्तंभ, बीची बेट

२४ ऑगस्टच्या सकाळी बीची बेटावरील चुंबकीय निरीक्षणं आटपल्यावर सर्वांनी फ्रँकलीनच्या स्मारकाला भेट दिली. नॉर्वेपासून निघाल्यानंतर बीची बेटापर्यंतच्या आपल्या प्रवासाची साद्यंत हकीकत लिहून एका बाटलीत घालून तिथे ठेवण्यास अ‍ॅमंडसेन विसरला नाही! फ्रँकलीन आणि त्याच्या सहकार्‍यांच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करुन त्यांनी ग्जो गाठलं आणि बीची बेट सोडलं

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel