कढईतल्या गरम गरम तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि हळद टाकलं. जिरे-मोहरी तडतडण्याचा आवाज आला. मग त्यात कढीपत्ता, चिरलेली मिरची टाकली. इतक्यात श्रेयाची आई आतमध्ये आली.

‘‘अगं, मुलाकडची मंडळी आलीत. कांदेपोहे राहू दे. अगोदर चहा कर.’’

 

‘‘थांब गं आई... गोंधळ नको घालूस... गॅसवर दुस-या बाजूला ठेवलाय मी चहा.’’ श्रेया आईवर चिडतच म्हणाली.

 

‘‘बरं... पोहे धुतलेस ना व्यवस्थित? बाजूला हो आता, मी परतवते पोहे... तू तयारी कर जा लवकर आणि हो, त्या मेघाताईंच्या मुलीच्या शेजारणीच्या घरी बारशाला जाताना जो ड्रेस घातला होतास ना! तो ड्रेस घाल... सकाळी जो ड्रेस मला दाखवलेलास त्याचे हात बरोबर नाहीत... जा चल लवकर... बाई गं... चहा पण उकळला बघ... जा ना तू... अजून इथेच का उभी?’’ स्वयंपाकघराचा ताबा घेत आई श्रेयाला बजावत होती.

 

आज श्रेयाला बघण्याचा कार्यक्रम होता. श्रेयाचे बाबा सकाळीच बाजारात जाऊन आले होते. बाजारातून काय आणायचं या सगळया गोष्टी तेच एकटे बघत असत. श्रेयाच्या आईला त्यांनी कधीही कसलीही धावपळ करु दिली नव्हती. श्रेया एकटीच असल्याने ते तिची खूप काळजी घेत असत. आज तिला बघण्याचा कार्यक्रम म्हणजे तिच्या आयुष्याताला सर्वात महत्त्वाचा क्षण, या क्षणामध्ये त्यांना कसलीही कमतरता ठेवायची नव्हती. बाजारातून त्यांनी काही गोडधोड आणि आमरस आणला होता. शेजारच्या सोनावणे काकूदेखील श्रेयाच्या आईला मदत करायला आल्या होत्या.

 

‘‘काय गं सुलभा? श्रेया कुठे आहे ? बाहेर पाहुणे आलेत बघ...’’

 

‘‘बघ ना... अभिजीत आणि त्याच्या घरची मंडळी आलीत आणि इकडे बघते तर ती अजून स्वयंपाकघरातच होती, जरा कप दे मला तिकडून... धुवून दे...’’

 

सोनावणे काकू कप धुवू लागतात. ‘‘मग? आता कुठे गेली ती?’’

 

‘‘तयार होतेय... चहा ओततेस का? नको... मीच ओतते... तू जा आणि बघ तिला काही मदत हवी आहे का तिथे...’’

 

‘‘हो... आणि हे घे... मंगेश सांगत होता लिंबू पाहिजेत म्हणून...’’ लिंबू देत सोनावणे काकू लगेचच श्रेयाच्या खोलीमध्ये जातात.

 

नेहमीप्रमाणे श्रेयाच्या खोलीमध्ये पसारा होता. एकीकडे कपड्यांचं कपाट उघडं आणि दुस-या ठिकाणी कपड्यांचा ढिगारा पडलेला असतो. मेकअपचा डब्बा खाली पडला होता आणि त्यातलं सगळं अस्ताव्यस्त झालं होतं. बेडवरची चादर तर नेहमीप्रमाणेच चोळामोळा होती. एक उशी टेबलावर आणि दुसरी बेडखाली पडलेली, आरशासमोरचा सगळा भाग मेकअपचं सामान पडून खराब झालेला. या सगळ्या पसा-यामधून ती काहीतरी शोधत होती. सोनावणे काकूंना हे नेहमीचं होतं म्हणून त्यांना विशेष काही वाटलं नाही. तिच्या खोलीमध्ये प्रवेश करत त्या दरवाजाजवळ येऊन उभ्या राहतात.

 

‘‘बरं झालं मावशी आलीस, माझ्या कानातलं ना... दिसतचं नाहिये... बघ ना जरा... मी तिथेच बेडवर ठेवलं होतं...’’

 

‘‘हे काय, आरशाच्या बाजूलाच तर आहेत...’’ आरशाजवळ असलेलं कानातलं रिंग हातात घेऊन त्या म्हणतात.

 

‘‘शी... ते नक्को... काकू, माझा ड्रेस बघ आणि ते कानातले बघ... जरा तरी मॅच होतंय का?’’ श्रेयाचा चांगलाच गोंधळ उडाला होता.

 

‘‘अगं श्रेया... चहा घेऊन ये इकडे...’’ बाहेरुन श्रेयाच्या बाबांचा आवाज येतो.

 

श्रेयाला कानातलं रिंग सापडतं. रिंग कानात घालून ती लगेच स्वयंपाकघराच्या दिशेने जाते. आईने आधीच सगळी तयारी करुन ठेवली होती, चहाचा ट्रे घेऊन ती पुढे चालत येते आणि हॉलपाशी आल्यानंतर तो ट्रे श्रेयाच्या हातात देते. श्रेया जरा घाबरतच हॉलमध्ये जाते. लांबसडक केस, पाणीदार डोळे, थोडा गोल चेहरा, रंगाने किंचीत सावळीशी, सडपातळ बांधा आणि आपल्या नाजूक पावलांनी जरा थरथरत श्रेया येते. श्रेयाला बघताक्षणी अभिजीत तिच्या प्रेमात पडतो. ट्रे टेबलावर ठेवून ती अभिजीत आणि त्याच्या आईवडीलांना चहा देते. चहा देत असताना हलकेच अभिजीत आणि तिची नजरानजर होते. अभिजीत तिच्याकडेच पाहत असतो, श्रेया जरा लाजतेच.

 

‘‘ये... बस इथे...’’ श्रेयाचे बाबा तिला बसायला सांगतात. आतमधून श्रेयाची आई आणि सोनावणे काकू चिवडा, काही गोड पदार्थ आणि सरबत घेऊन येतात. त्यादेखील श्रेयाच्या बाजूला जाऊन बसतात.

 

‘‘तुम्ही फोटो दिला होता त्याही पेक्षा खूप गोड मुलगी आहे हो तुमची...’’ अभिजीतची आई बोलू लागते, ‘‘पाहताक्षणी मला तुमची श्रेया आवडली. अशीच सुन हवी होती आम्हाला.’’

 

‘‘बी. कॉम. केलंय आमच्या श्रेयाने, चित्रकलेची सुध्दा आवड आहे तिला.’’ श्रेयाचे बाबा सांगतात.

 

‘‘अरे वा...!! उत्तमच... बेटा श्रेया, तुला काही विचारायचं आहे का?’’ अभिजीतचे बाबा बोलतात.

 

श्रेयाच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात. दोन्ही हाताच्या अंगठयांना एकमेकांभोवती फिरवत ती खाली मान घालून बसली होती. ‘‘काही नाही.’’

 

‘‘अगं... असं कसं म्हणतेस? आल्यापासून तुझे बाबा माझ्याशी गप्पा मारताहेत. आता आईदेखील बोलतेय. लग्न तुला करायचंय ना! तुझ्याही काही अपेक्षा असतील. बोल तू.’’

 

श्रेया गप्पच असते. नंतर अभिजीतची आई स्वतः बोलू लागते, ‘‘बरं बेटा, तू नाही तर मी बोलते. आमचा अभिजीत बाहेरगावी कामाला असतो. एकटाच असतो तो तिथे म्हणून मला त्याची खूप काळजी वाटत असते. आता लग्नाचं वयदेखील झालं आहे तर म्हटलं, उरकून घेऊया. भारतात खूप कमी येणं होतं त्याचं, आता गोव्याला आला होता कसल्यातरी कामासाठी, मग म्हटलं आलाच आहेस तर आणखी काही दिवस सुट्टी घे, लग्नाचं मनावर घे आणि मग दोघांनी जा बाहेरगावी... सोबत कुणीतरी जवळचं आहे या विचाराने मी देखील निश्चिंत असेल.’’

 

‘‘तुम्ही हे सर्व सांगितलंत ही खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर मुलगा बाहेरगावी नोकरी करतो एवढंच सांगून काहीज मोकळे होतात.’’ श्रेयाचे बाबा त्यांच्या बोलण्याला सहमती दर्शवत बोलतात, ‘‘मला तर तुमचा अभिजीत पसंत आहे, विशेष करुन त्याने ज्या काही गोष्टी साध्य करुन दाखविल्या आहेत त्या खरंच कौतुकास्पद आहेत, बाहेरगावी जाऊन महासागराचा अभ्यास करत आज त्याची महासागरशास्त्रज्ञ म्हणून एक वेगळी ओळख आहे. याचं श्रेय त्याच्याबरोबरच तुम्हाला देखील जातं. आपल्याकडे कोणीही आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर, सरकारी नोकर याव्यतिरिक्त कसलीही स्वप्ने पाहू देत नाहीत आणि त्यात अभिजीतने मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करत महासागरातील जे शोध लावलेत त्यासाठी त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.’’

 

अभिजीत बोलू लागतो, ‘‘काय म्हणता बाबा! मी तर फक्त शोध लावतो. आपण निसर्गासमोर ज्या काही समस्या उभ्या केल्या आहेत, त्यामानाने माझ्या संशोधनाचा व्हावा तितका चांगला वापर झाला नाहीये... आणि हो, खरोखरच आई आणि बाबा यांनी...’’

 

‘‘अरे बाळा...महासागर बाजुला ठेव, तुझा बघण्याचा कार्यक्रम आहे हा.  श्रेयाबद्दल बोल काही. मला तर श्रेया खूप आवडली आहे.’’ अभिजीतचे बाबा मध्येच बोलतात.

 

‘‘हो बाबा... म्हणजे... म..ला... प...ण... श्रे..या..’’ अभिजीत गप्प बसतो.

 

‘‘वा..!! वा..!! छानच...आणि श्रेया, तुला अभिजीत कसा वाटला?’’ अभिजीतच्या आईला खूप आनंद होतो.

 

श्रेया गप्पच. खाली मान घालून बसलेली ती, हळून अभिजीतकडे वर बघते आणि लाजतच पुन्हा खाली बघत होकारार्थी मान हलावते. श्रेयाचा होकार पाहून अभिजीतच्या आईवडीलांना आनंद होतो. अभिजीतचे बाबा लगेच उभे राहतात आणि म्हणतात, ‘‘झालं आता तुझ्या मनासारखं? बघण्याचा कार्यक्रम करायचा होता ना तुला? आता खुश?’’

 

श्रेया लगेच बोलू लागते, ‘‘थांबा ना बाबा, असे मध्येच का उठता?अजून पण पुढे काही तरी असतं ना...’’

 

श्रेयाची आई, ‘‘अगं कार्टे, झालं ना आता, तो पण हो म्हणाला आणि तू पण, झाला बघण्याचा कार्यक्रम, अजून काय करणार? चार दिवसांवर लग्न आलयं तुम्हा दोघांचं आणि तुला आता बघण्याचा कार्यक्रम सुचतोय?’’

 

श्रेया, ‘‘अभिजीत, समजाव रे आईला...’’

 

अभिजीतचे वडील, ‘‘तुम्ही बोलत बसा, आम्ही हॉलवर जाऊन येतो.’’

 

श्रेयाची आई, ‘‘बरं. या लवकर.’’

 

श्रेया, ‘‘काय गं आई? असं कशाला करतेस? किती छान चालू होता माझा बघण्याचा कार्यक्रम. शी... सगळा मुड फ केलास माझा...’’

 

अभिजीतची आई, ‘‘बेटा, त्यांना बाकीच्या गोष्टीसुध्दा बघायच्या आहेत ना! म्हणुन ते लवकर निघाले. आपण करु ना बघण्याचा कार्यक्रम...’’

 

श्रेया, ‘‘अरे ए अभड्या... खात का बसलाएस तिथे? मी एकटीच बोलतेय ना!’’

 

अभिजीत, ‘‘श्रेयु, तू म्हणालीस म्हणून सकाळीच त्यांना घेऊन आलो ना. त्यांना बाकीची पण काही कामं असतील.’’

 

श्रेयाची आई, ‘‘पण मी म्हणतेय, तुम्हा दोघांना हे खुळ सुचलंच कसं?’’

 

अभिजीत, ‘‘मला कुठे? अशा कल्पना हिच्याच डोक्यात येतात. काल मला फोनवर म्हणते, तू माझ्या आयुष्यातली सुखं हिरावून घेतलीस. मी विचारलं, काय झालं म्हणून. तर म्हणे, हिच्या एका मैत्रिणीचा बघण्याचा कार्यक्रम होता, तिथे या मॅडमसुध्दा गेल्या होत्या. तो कार्यक्रम बघून झाल्यावर मला म्हणते, आपण एकमेकांना लहानपणापासून ओळखतो, कॉलेज एकत्र केलं, नंतर प्रेम झालं, घरच्यांना कळलं, तू काही वर्ष मागीतलीस आणि पाण्यात बुडायला गेलास. पाण्यातुन बाहेर आल्यावर लग्न करेन म्हणालास, आता आलास आणि आपल्या बाबांनी लग्नाच्या पत्रिका सुध्दा छापल्या. चार दिवसांवर लग्न आलं आणि आपला बघण्याचा कार्यक्रम झालाच नाही. त्यापेक्षा मी अरेंज मॅरेज केलं असतं तर बरं झालं असतं, आता बोला...’’

 

श्रेयाची आई, ‘‘काय गं श्रेया? काय सांगतोय अभिजीत?’’

 

श्रेया हसून अभिजीतला डोळा मारते आणि अभिजीतच्या आईजवळ जाऊन त्याच्या आईच्या कुशीत डोकं ठेवते. अभिजीतची आईदेखील हसू लागते. थोडा वेळ का होईना, बघण्याचा कार्यक्रम झाला म्हणून श्रेया खुश असते.

 

अभिजीत आणि श्रेया एकाच सोसायटीमध्ये राहत असतात, लहानपणापासून दोघे चांगले मित्रमैत्रीण होते. अभ्यासाच्या निमित्ताने किंवा वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्यामध्ये जवळीक वाढू लागली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. ही गोष्ट दोघांच्याही घरी समजली, दोघांच्याही घरी आनंदी वातावरण होते.

 

लग्नाविषयीची बोलणी सुरु असताना अभिजीतला डेन्मार्क येथीलइंटरनॅशनल काउन्सिल फॉर द एक्स्प्लोरेशन ऑफ द सीमध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून संधी मिळते. कॉलेजनंतर अभिजीत महासागरविज्ञानामध्ये गुंतला होता. अभ्यासक्रमाध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती म्हणून जगातील सर्वात मोठी महासागरविज्ञानावर संशोधन करणारी संस्थाइंटरनॅशनल काउन्सिल फॉर द एक्स्प्लोरेशन ऑफ द सीयेथे त्याला नोकरी मिळाली. श्रेया आणि अभिजीत दोघेही लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतात. आईवडील देखील त्यांना परवानगी देतात. डेन्मार्कला जाऊन आता अभिजीतला पाच वर्षं झालेली असतात. फोनवर आईसोबत बोलत असताना पुढच्या महिन्यापासून सुट्टी मिळण्याची शक्यता कमी आहे असं अभिजीत सांगतो. तेव्हा अभिजीतची आई लगेचच त्याला सुट्टी काढून भारतात यायला सांगते आणि लगेचच श्रेया आणि अभिजीतच्या लग्नाची धावपळ सुरु करते. अभिजीतची रवानगी अर्जेंटिना येथे होत असल्याने तो लग्नासाठी सुट्टी घेऊन भारतात येतो. पणजी येथे त्याचं कामदेखील असतं म्हणून ते काम आटोपून तो लग्नासाठी घरी येतो. त्याने श्रेयाच्या पासपोर्टसाठी अर्ज दिलेला असतो. लग्न होईपर्यंत तिचा पासपोर्ट मिळेल आणि दोघांना लगेच अर्जेंटिना येथे जाता येईल अशी व्यवस्था त्याने केलेली असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel