‘‘डॉक्टर, पेशंटने डोळे उघडलेत...’’
अभिजीतने डोळे उघडल्यावर नर्स लगेचच डॉक्टरांना बोलवायला जाते. श्रेया, स्टिफन आणि रोडा लगेचच आतमध्ये येतात. थोड्या वेळाने डॉक्टर सुध्दा येतात.
‘‘अभिनंदन, तुम्ही आता शुध्दीवर आला आहात...’’ डॉक्टर अभिजीतची चौकशी करतात. अभिजीत काही बोलत नाही, तो आजूबाजूला बघतो. श्रेयाला पाहिल्यावर तिचे रडून लाल झालेले डोळे त्याला दिसतात. तो शुद्धीवर आल्याने स्टीफन आणि रोडा यांना आनंद झालेला असतो. अभिजीतला तपासून डॉक्टर नर्सला काही सुचना करतात आणि तिथून निघून जातात.
श्रेया अभिजीतच्या बेडजवळील खुर्चीवर जाऊन बसते. अभिजीत काही बोलत नाही, तो फक्त सर्वांकडे एकटक बघत असतो. श्रेया त्याच्या डोळ्यात बघत राहते, मग त्याचा हात आपल्या हातात घेऊन खूप वेळ रडते. अभिजीतचा बेड खिडकीजवळ असल्याने तो खिडकीबाहेर बघत असतो, त्याला समुद्र दिसतो, समुद्रामध्ये हरवलेला अल्बर्ट त्याला दिसतो. त्याच्या डोळ्यांमधून नकळत अश्रु येतात. स्टिफन पुढे येऊन त्याचे अश्रु पुसतो. पेशंटला त्रास होतोय हे पाहून नर्स सर्वांना बाहेर जायला सांगते, मात्र अभिजीत हात हलवत इशा-याने सर्वांना थांबायला सांगतो. थोड्या वेळाने अभिजीत बोलू लागतो.
‘‘मला इथे किती दिवस झाले?’’
‘‘सतरा दिवस...’’ स्टिफन हलक्या आवाजात बोलतो.
‘‘काय? सतरा दिवस मी बेशुध्द होतो?’’
‘‘डोक्याला जास्त ताण देऊ नकोस... आता आराम कर, मग आपण बोलू...’’
‘‘आई आणि बाबांना याबाबत काही माहीत आहे का?’’
श्रेया हातातला रुमाल तोंडाजवळ घेते आणि रडत बाहेर जाते, तिच्या जाण्याचं कारण अभिजीतला समजत नाही.
‘‘ती अशी रडत का गेली?’’
स्टिफन देखील काही बोलत नाही. नर्स अभिजीतला विश्रांती करायला सांगते. श्रेयाचं वागणं पाहून अभिजीतला त्याच्या आईवडीलांची चिंता होते. पण कोणी काही बोलत नाही. सगळे त्याला विश्रांती करण्याचा सल्ला देतात. नंतरचे दोन दिवस अभिजीतला औषधे दिली जातात, त्याच्या प्रकृतीमध्ये लवकरच सुधारणा होते. खिडकीतून समुद्र पाहत असताना स्टिफन आतमध्ये येतो. सोबत डॉक्टर आणि जॉर्डन सरदेखील असतात. जॉर्डन सरांना पाहून अभिजीत बेडवरुन उठण्याचा प्रयत्न करतो.
‘‘अरे? उठतोस कशाला? आराम कर...’’ जॉर्डन सर अभिजीतच्या शेजारी बसत म्हणतात.
‘‘सर, इथे मला गुदमरायला होतंय... बाहेर काय चाललंय, मला काहीच माहीत नाही... एव्हाना माझ्या साथीदारांबाबत देखील मला काहीच माहिती देण्यात आलेली नाही...’’
जॉर्डन सर डॉक्टरांकडे बघत अभिजीतला माहिती देण्याची परवानगी घेतात. डॉक्टर होकारार्थी मान दर्शवतात.
स्टिफन अभिजीतच्या हातात गेल्या दोन आठवड्यांचे वृत्तपत्रं देतो. ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंड 70 टक्के पाण्याखाली गेले असल्याची बातमी त्यात होती. फक्त तेथील पर्वत, उंच भाग एखाद्या बेटाप्रमाणे पाण्याच्या मधोमध आहे. जपानमध्ये त्सुनामीच्या तडाखा बसल्याने तो अर्धा देश पाण्याखाली आला होता. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांना देखील अरबी समुद्रातून त्सुनामीचा तडाखा बसला होता. त्याच बातमीवरुन अभिजीतला श्रेयाच्या रडण्याचं कारण समजलं. उत्तर अमेरिका बर्फाखाली आलेली असते. अर्ध जग स्मशान झालं असतं आणि उरलेलं त्यावर शोक व्यक्त करत असतं. फक्त दोन आठवड्यांमध्ये जवळपास एक अब्ज लोक मृत्यूमूखी पडलेले असतात. अमेरिकी सैन्याने कायद्याचा भंग करुन अंटार्क्टिकावर पाणबुडी पाठविल्याने त्यांना मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागलं, ‘इंटरनॅशनल काउन्सिल फॉर द एक्स्प्लोरेशन ऑफ द सी’ या संस्थेला खूप मोठा दंड आकारावा लागला.
इतक्या विचित्र आणि भयावह बातम्या वाचून अभिजीत एकदम सुन्न होतो. आपण जेव्हा बेशुध्द होतो तेव्हा अर्ध जग नष्ट झालं, आता उरलेलं जग आपल्याला वाचवायचं आहे, त्यासाठी काहीतरी करायचं आहे अशी भावना अभिजीतच्या मनात येते.
अभिजीत, ‘‘सर, मग आता काय करायचंय?’’
जॉर्डन सर, ‘‘सर्व देशांचे प्रतिनिधी इथे जवळ असलेल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. डॉ.वेन जिन्तो यांनी तुला काही माहिती दिल्याचं अमेरिकी सैन्यातील एक जवान सांगत होता.’’
अभिजीत, ‘‘हो, सर... मला समजलं सगळं... सर्व देशांचे प्रतिनिधी आपल्याकडे चर्चा करण्यासाठी आले आहेत... मी चर्चेसाठी तयार आहे...’’
अभिजीतचा उत्साह पाहून जॉर्डन सरांना त्याचा अभिमान वाटतो. ते अभिजीतची पाठ थोपाटत निघू लागतात तेव्हा अभिजीत त्यांना म्हणतो,
‘‘अगोदर माझ्या टीममधले वाचलेले सर्वजण मला माझ्यासमोर हवे आहेत आणि डॉ.वेन जिन्तो यांच्या जहाजामधून आम्हाला काही माहिती मिळाली होती, ती मला लवकरात लवकर हवी आहे...’’
‘‘चिंता करु नकोस... मी बघतो सर्व...’’
स्टिफन तिथेच अभिजीतजवळ थांबतो. थोड्याच वेळात जेन, बार्बरा, ब्रुस, मोहम्मद आणि त्सेन्ग चु येतात. प्रत्येकाच्या चेह-यावर चिंता स्पष्टपणे दिसून येते. मात्र प्रत्येकाच्या मनात आपण काही करु शकतो अशी आशा असते. श्रेया आणि रोडा, दोघीही आतमध्ये येतात. अभिजीत तिला जवळ बोलावतो. ती इतकी भावनाविवश होते की, धावत ती त्याच्या मिठीत जाते आणि जोरजोरात हुंदके देत रडू लागते. तिथे असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येतं. ‘‘माझ्या शोना, मी आहे ना सोबत... नको रडूस... आता आपल्या दोघांनाच एकमेकांचा आधार आहे...’’ श्रेयाचं रडणं थांबतच नाही. शेवटी थोड्या वेळाने ती शांत होते. रोडा आणि जेन तिचं सांत्वन करतात. सगळं शांत झाल्यावर बार्बरा जवळ असलेली फळं बाहेर काढते. रोडा आणि श्रेया ती फळं कापू लागतात. सगळे एकत्र ती फळं खातात. तेव्हा अभिजीत जेनकडे डॉ.वेन जिन्तो यांच्या जहाजामधील माहिती मागवतो. जेन ती माहिती त्याच्या हातात देते. श्रेया आणि रोडादेखील त्या सर्वांचा निरोप घेऊन तिथून निघतात. मग पुढचे नऊ तास तो डॉ. वेन जिन्तो यांनी लिहीलेली माहिती वाचतो. संपूर्ण माहिती वाचून झाल्यावर त्याचा अंदाज खरा ठरतो आणि लगेचच उठत तो हाताची सलाइन काढतो. डॉक्टर त्याला थांबायला सांगतात.
‘‘डॉक्टर, मला थांबवू नका... अगोदरच उशीर झाला आहे...’’
‘‘मला पुर्ण कल्पना आहे... फक्त शरीराला जास्त त्रास देऊ नकोस आणि तुझ्या टीमकडे मी टॅबलेट्स देत आहे… जास्त अशक्त वाटलं तर यातल्या दोन गोळ्या खा...’’
‘‘नक्कीच डॉक्टर, आपल्या सहकार्याबद्दल आभारी आहे. तुम्ही हॉस्पिटलमधलं महत्त्वाचं सामान एकत्र करुन ठेवा आणि जॉर्डन सरांच्या आदेशांची वाट पहा.’’